कानपूरला झालेल्या पाच दिवसांच्या कसोटी सामन्यातील अडीच दिवसांचा खेळ पावसानं रद्द झाला. पहिल्या डावात बांगलादेश संघानं मोमीन उल हक या एका खेळाडूनं केलेल्या सुंदर शतकाच्या जोरावर चांगला तग धरत तीनशेच्या जवळपासची धावसंख्या उभी केली. तरीही उरलेल्या वेळात भारतीय संघानं बांगलादेश संघाचा बराच वेळ बाकी ठेवत भलामोठा पराभव केला. भारतीय संघाने मायदेशात अजून एक मालिकेतील विजयाची नोंद केली.
२०१३ फेब्रुवारीपासून भारतीय संघाने भारताच्या दौर्यावर आलेल्या प्रत्येक संघाला मालिकेत पराभूत करून परत पाठवले आहे. होय १८ कसोटी मालिकांमध्ये भारतीय संघाने अपराजित राहण्याचा मोठा विक्रम नोंदवला आहे. दुसर्या क्रमांकावर दहा मालिका विजय मायदेशात पटकावणारा ऑस्ट्रेलियन संघ आहे. थोडक्यात भारतीय संघाला मायदेशात पराभूत करण्याची तर सोडा साधी जोरदार लढत देण्याची किमयाही कोणत्याही संघाला साधता आलेली नाही.
भारतीय संघावर काही कारण नसताना खार खाणारे विद्वान लोक भारतीय संघ म्हणजे ‘अपनी गली में शेर’ असल्याची टीका नेहमीच करतात, तेव्हा मराठीतील ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ ही म्हण आठवते. कारण असे बोलण्यामागं त्यांचा कोणताच अभ्यास दिसत नाही. बाजू दोन्ही बाजूंनी तपासली पाहिजे.
भारतीय संघ मायदेशात प्रत्येक संघाला पराभूत करतो तसं कोणत्याही संघाला करता आलेलं नाही. होय अगदी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया संघांनाही मायदेशात विजयाचा धडाका गेल्या १० -१५ वर्षांत ठेवता आलेला नाही.
भारतीय संघानंच गेल्या दोन ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ऑस्ट्रेलियन संघाला कसोटी मालिकेत पराभूत करायची किमया साधून दाखवली आहे. इंग्लंडबरोबर बरोबरी साधून दाखवली आहे. इंग्लंड दौऱ्यावर जाऊन थेम्स नदीच्या दोनही बाजूंना म्हणजेच लॉर्डस् आणि ओव्हल मैदानांवर एकाच सामन्यात विजय मिळवून दाखवायची कमाल साधून दाखवली आहे. खटकणारी एकच बाब म्हणजे भारतीय संघाला न्यूझीलंड दौर्यात निर्भेळ यश कसोटी मालिकेत गेल्या भूतकाळात मिळवता आलेले नाही. तेव्हा भारतीय संघाची जमेच बाजू मान्य करावीच लागेल.
परदेशात जाऊन कसोटी मालिकेत चांगला खेळ करून दाखवायचा असेल, तर वेगवान गोलंदाजांचा ताफा असणे क्रमप्राप्त ठरते. भूतकाळात भारतीय संघाकडे किमान दोन तगडे वेगवान गोलंदाज एकाच वेळी खेळताना अभावाने दिसले. झहीर खान, नेहरा, मुनाफ पटेल असे त्रिकूट २०११ विश्वकरंडक स्पर्धेत एकत्र होते, ज्याला सणकी श्रीसंतची जोड होती जो माझ्यामते एक चांगला वेगवान गोलंदाजांचा समूह भारतीय संघात होता. फरक पाडायला कारण ठरला विराट कोहली.
विराट कर्णधार झाल्यावर त्याने विशेष करून वेगवान गोलंदाजांकडेच लक्ष दिले. भारताला परदेश दौर्यात टक्कर देण्याचा तोच एक उपाय असल्याची खात्री कर्णधार म्हणून विराटला पटली होती. त्यानं प्रथम पूर्ण लक्ष वेगवान गोलंदाजांच्या तंदुरुस्तीकडे दिले. सर्वोत्तम ट्रेनर आणि फिजिओ थेरपिस्ट बरोबर चांगले मसाज करणारे भारतीय संघाच्या सोबत आणले.
त्याने काही काळानंतर फरक असा पडला, की वेगवान गोलंदाज तंदुरुस्त झाले आणि त्यांना होणार्या दुखापतींचे प्रमाण कमी झाले. साथीला एक दोन नव्हे तर ४-५ वेगवान गोलंदाजांची फळी तयार केली गेली. परिणामी वेगवान गोलंदाजांना आलटून पालटून वापरणे शक्य झाले आणि कोणाला चुकून दुखापत झाली तर समर्थ पर्याय उभे राहिले.
पुढील दोन परदेश दौर्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच आणि इंग्लंड विरुद्धही पाच कसोटी सामने खेळणार आहे. भारतासाठी हे दोन दौरे सत्त्वपरीक्षा ठरणार आहेत. त्याच आव्हानांना सामोरे जाण्याची पायाभरणी झाली आहे असे वाटते आहे.
चढाओढ चांगली आहे
‘दाग अच्छे हैं ’असे एका साबणाच्या जाहिरातीत म्हटले जाते तसेच मला म्हणावेसे वाटते की चढाओढ चांगली आहे. भारतीय संघात सध्या प्रत्येक जागेसाठी चांगलीच रस्सीखेच आहे. संघात खेळणार्या खेळाडूंच्या जागी पर्याय म्हणून बाहेर बसलेले खेळाडू सतत इतकाच चांगला खेळ करत आहे की कोणाला संघातील जागा गृहीत धरता येत नाहीये. याला अगदी रोहित शर्मा आणि विराट कोहलीही अपवाद ठरत नाहीत, इतकी चुरस वाढली आहे.
रिषभ पंतच्या मागे ध्रुव जुरेल सारखा जबरदस्त पर्याय मागे रांगेत उभा आहे. मान्य आहे की सध्या पर्याय नसलेला एकमेव खेळाडू आहे तो म्हणजे जसप्रीत बुमरा. बुमराने त्याच्या गोलंदाजीचा स्तर इतका उंचावला आहे की त्याच्या मार्याची धास्ती भले भले फलंदाज घेत आहेत.
खेळपट्टीच्या मदतीवर बुमराचा मारा अवलंबून नसल्याने त्याची कामगिरीही कोणाच्या मदतीवर विसंबून नाहीये. के एल राहुलवर संघ व्यवस्थापन खूप विश्वास दाखवत असल्याने पोत्याने धावा करणारा सर्फराज खान बाहेर बसतोय. पण त्याच्या धावांच्या धडाक्याने के एल राहुल खूप सतर्क झाला आहे, हे नक्की.
सर्वांत लक्षणीय बदल वेगवान गोलंदाजांच्या चमूत झाला आहे. बुमरा, सिराजच्या साथीला आकाशदीप चांगलाच तयार झाला आहे आणि दर्जेदार वेगवान गोलंदाज मोहंमद शमी दुखापतीतून सावरून परत यायच्या मार्गावर आहे. सोबतीला शार्दूल ठाकूरसारखा गुणी अष्टपैलू खेळाडूही दुखापतीतून बाहेर येऊन खेळू लागला आहे.
साहजिकच कोणताही संघ केवळ वेगवान खेळपट्टी बनवून भारताला आरामात पराभूत करायचे स्वप्न बघू शकत नाही. कारण साधे सरळ आहे, ते म्हणजे जर ती तलवार चालवायला गेले तर वार भारतीय वेगवान गोलंदाजही करू शकतात याची जाणीव अगदी इंग्लंड - ऑस्ट्रेलिया संघांनाही आहे.
भारावून जाण्याचे कारण नाही
बांगलादेश संघाला दोन कसोटी सामन्यांत पराभूत केल्याने भारावून जाण्यासारखे काहीच नाहीये. पाकिस्तानला सलग दोन सामन्यांत पराभूत करून भारताच्या दौर्यावर आले तरीही बांगलादेश खरंच त्यामानाने सामान्य कसोटी संघ आहे हे दिसून आले आहे. पाकिस्तान संघ या बांगलादेशी संघासमोर त्यांच्या मायदेशात पराभूत झालाच कसा हेच कोडे पडले आहे.
तसेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कसोटी सामन्यात निकाल लागायला धोका पत्करून आक्रमक खेळ करायला मनातून तयार असल्याचे दिसून आले आहे. बांगलादेश संघाला पराभूत करून ऑस्ट्रेलिया दौर्याची तयारी पूर्ण झाली अशी कोणाचीच भ्रामक समजूत नसणार.
फक्त भारतीय संघाकडे प्रत्येक जागेसाठी समर्थ पर्याय असल्याचे लक्षण चांगले वाटत आहे. थोडक्यात सांगायचे तर चाचणी परीक्षा चांगल्या मार्कांनी पार पडली आहे. आता प्रतीक्षा वार्षिक परीक्षेची म्हणजेच ऑस्ट्रेलिया, इंग्लंड दौर्यांसोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्याची आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.