सुनील छेत्रीनंतरचा भारतीय फुटबॉल...

क्रिकेटएवढं फुटबॉल भारतात लोकप्रिय नसेल, परंतु सुनील छेत्रीची महानता फुटबॉल या खेळाची वैश्विक व्यापता पाहता एक पाऊल सरसच असंच म्हणता येईल.
sunil chhetri
sunil chhetrisakal
Updated on

भारतीय फुटबॉलसाठीच नाही तर भारताच्या क्रीडा क्षेत्रासाठी २०२४ मधला ६ जून हा दिवस सर्वांत भावनिक असणार आहे. गेली दोन दशकं भारतीय फुटबॉलची अविरत सेवा करणारा... आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून सवंगड्यांचं संरक्षण करणाऱ्या कृष्णाप्रमाणे आपल्या एका `पायानं` भारतीय फुटबॉलला आपल्या छत्रछायेखाली घेणारा सुनील छेत्री फुटबॉलचा निरोप घेतोय.

क्रिकेटएवढं फुटबॉल भारतात लोकप्रिय नसेल, परंतु सुनील छेत्रीची महानता फुटबॉल या खेळाची वैश्विक व्यापता पाहता एक पाऊल सरसच असंच म्हणता येईल. जागतिक फुटबॉलमधले विद्यमान सुपरस्टार लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यानंतर आपल्या देशासाठी सर्वाधिक गोल करणारा सुनील छेत्री जगात चौथा आहे आणि त्याच्या या अनन्यसाधारण कारकीर्दीची दखल घेत फिफाने एक लघुपट तयार केला होता. यावरून छेत्रीची महानता अधोरेखित कधीच झाली होती.

फुटबॉल हा खेळ पूर्णतः सांघिक असला आणि या खेळात प्रत्येक खेळाडूची गुणवत्ता आणि कृती तेवढीच महत्त्वाची असते. तरीही छेत्री म्हणजे भारतीय फुटबॉल... आणि छेत्रीच भारतीय संघाचा तारणहार असं समीकरण गेली दोन दशके तरी तयार झालेलं. एकट्याच्या जिवावर भारतीय फुटबॉलचा हा गोवर्धन उचलणं आणि दोन दशकं अखंडपणानं सांभाळणं काही सोपं नाही. पण आता वय वर्षे ३९ !

खेळाडूला शेवटी कधी तरी थांबायचं असतं. आज ना उद्या छेत्री निवृत्त होणार याचे संकेत मिळत होते, अखेर तो क्षण आला, पण सर्वांत मोठा प्रश्न, ज्याचं उत्तर अद्यप तरी कोणालाही सापडलेलं नाही तो म्हणजे भारतीय फुटबॉलचा हा गोवर्धन आता सांभाळणार कोण?

कोणत्याही खेळाचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा तिथं कुणीतरी एक आयकॉन असतो आणि त्याला पाहून त्याच्यापासून प्रेरण घेत पुढची पिढी तयार होत असतो. एकाकडून दुसऱ्याकडं बॅटन पास होतो आणि त्या खेळातील प्रगती पुढं कायम राहते. क्रिकेटमध्ये फलंदाजीबाबत बोलायचं तर सुनील गावसकरकडून सचिन तेंडुलकर आणि त्याच्याकडून विराट कोहली असा वर्चस्वाचा बॅटन पुढं आला.

भारतीय फुटबॉलमध्ये बायचुंग भुटियाकडून सुनील छेत्री असा प्रवास झाला खरा, पण फुटबॉलमधील या सुनीलनंतर `सचिन` ना `कोहली` कोणीच तसा दृष्टिपथात नाही. सर्वांत खंत एका गोष्टीची आहे ती म्हणजे गेल्या काही वर्षांत भारतीय कधी नव्हे ते फिफा रँकिंगमध्ये सध्या १२१ व्या स्थानी आहे. हेच रँकिंग ९९ पर्यंत आलं होतं.

दोन वर्षांनी विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा होत आहे आणि त्यात प्रथमच ३२ ऐवजी ४८ संघ आहेत म्हणजेच १६ संघ वाढणार आहेत आणि त्यासाठी पात्रता स्पर्धा सुरू आहेत. कोठे तरी या वाढलेल्या १६ संघांत आपला संघ असावा अशी सर्वांची इच्छा, परंतु या पात्रता स्पर्धेतील ६ जून रोजी होणाऱ्या सामन्यातून छेत्री अलविदा करणार आहे. म्हणजे आता अंधुक आशाही संपल्यातच जमा होतील असेच चित्र आहे. प्रत्येक विश्वकरंडक फुटबॉलनंतर यात भारत कोठेय ? असा प्रश्न विचारला जातो. या पुढेही हे प्रश्नचिन्ह कायम राहील...

छेत्रीच्या निवृत्तीच्या निमित्तानं पुन्हा एकदा प्रश्नांचं मोहोळ उभं राहतं. सर्वाधिक देशात खेळला जाणारा आणि सर्वाधिक प्रतिष्ठा तसेच लोकप्रियता असलेल्या या खेळात आपल्याला दखल घेण्याएवढीही प्रगती करता आलेली नाही. एक छेत्री तयार होतो म्हणजेच पोषक वातावण नाही असं नाही.

पूर्व भारत, पश्चिम बंगाल आणि आपल्याकडं गोवा, कोल्हापूरमध्ये कुस्ती एवढीच फुटबॉलची क्रेझ आहे. कोणत्याही क्लबचे किंवा स्थानिक सामने असोत स्टेडियममध्ये बसायला जागा नसते. दोन संघांतील द्वंद प्रेक्षकांसाठी हातघाईची परिस्थिती निर्माण करणारे असतं. मग असं वातावरण असताना एकच छेत्री निर्माण व्हावा, हे कोडेच आहे.

मुळात कोणत्याही खेळात पिढी घडण्यासाठी संस्कृती असावी लागते. त्यानंतर सुविधा, वातावरण निर्मिती अशी माळ गुंफली जावी लागते. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे ध्यास आणि जिद्द खेळाडूमध्ये निर्माण व्हावी लागते.

सुनील छेत्रीला तरी कुठं फुटबॉपटू व्हायचं होतं. लष्करात असलेले त्याचे वडील तिथं क्लब फुटबॉल खेळायचे. आई नेपाळमधील होती. ती मात्र फुटबॉल खेळायची. म्हणजे छेत्रीसाठी कुटुंबाकडून वारसा मिळाला होता, पण त्याची पहिली पसंती फुटबॉलला नव्हती. चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून तो फुटबॉलकडे वळला मात्र त्यानंतर त्यानं या खेळात झोकून दिलं. त्याच्या नसासनात फुटबॉल भिनला. देशाच्या फुटबॉलसाठी जिवाचं रान केलं.

हात पायही जोडले. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या मुंबईत एक आंतरराष्ट्रीय सामना होता, पण नेहमीप्रमाणे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. शेवटी हवं तर आम्हाला खराब खेळ करतो म्हणून शिव्या द्या, पण सामने पाहायला मैदानात या असं आपल्या खेळासाठी आर्जव करणारा छेत्री सर्वांपेक्षा वेगळा होता.

भारतात जागतिक फुटबॉलची क्रेझ युरोपाएवढीच मोठी आहे. इंग्लिश प्रीमियर लीग असो वा स्पॅनिश लीग... असंख्य खेळाडूंची नावे पाठ असतात त्यांचे विक्रम माहीत असतात. मेस्सी, रोनाल्डो यांच्या नावांची टी शर्ट अभिमानाने परिधान केली जातात, पण त्यात आपल्या छेत्रीचा टी शर्ट नसतो.

आपल्याकडील फुटबॉलची ही क्रेझ दिवाणखान्यातून मैदानावर यायला हवी तरच देशाची प्रगती होईल, असं छेत्रीच्या अगोदरचा कर्णधार बायचुंग भुटिया म्हणाला होता. म्हणजेच टीव्हीवर मन एकाग्र करून सामने पाहण्याबरोबर मैदानात उतरून खेळा, असं भुटिया याला सुचवायचं होतं.

विश्वकरंडकाचे यजमान तरीही...

कपिलदेव यांनी विश्वकरंडक उंचावता पाहून सचिनला स्फूर्ती मिळाली. पुढं हाच सचिन १९८७ मधील विश्वकरंडक स्पर्धेत मुंबईत झालेल्या सामन्यात बॉलबॉय होता. म्हणजेच काय तर जागतिक स्तरावरच्या अशा स्पर्धा देशात झाल्या, की साहजिकच वातावरण निर्मिती होत असते. मुख्य विश्वकरंडकाचे यजमानपद सध्या तरी शक्य नाही, पण १९ वर्षांखालील फुटबॉलचा विश्वकरंडक आणि १६ वर्षांखालील मुलींचा विश्वकरंडक भारतात झाला आहे.

भारतीय संघटनेनं हे शिवधनुष्य पेललं पण त्यातून अपेक्षित प्रगती झाली नाही. यजमान असल्यामुळं १९ वर्षांखाली विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळालेल्या त्या संघातील किती खेळाडू आता मुख्य संघात आहेत आणि त्यांनी त्या संधीचे सोने केले?

गेली १० वर्षे आयएसएल (इंडियन सुपर लीग) स्पर्धा होत आहे त्याअगोदर आयलीग ही पारंपरिक स्पर्धा होत आहेच, एवढेच कशाला डुरँड करंडक स्पर्धेचा इतिहास तर १३६ वर्षांचा आहे. इंग्लिश फुटबॉल लीग एवढीच ती जुनी आहे. चुन्नी गोस्वामी, विजयन, बायचुंग भुटिया आणि आता सुनील छेत्री या खेळाडूंनी गेल्या काही दशकांत आपापले युग गाजवले, परंतु स्वातंत्र्यानंतर १९४८ ते १९६० पर्यंतच्या प्रत्येक ऑलिंपिकमघ्ये भारतीय संघ पात्र ठरत होता.

१९५१ आणि १९६२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदके मिळवण्याइतका भारतीय संघ सक्षम होता, पण पुढच्या काळात इतर देश आपल्यापुढं गेले. एका पेक्षा एक सरस खेळाडू तयार झाले. आपल्याकडे मात्र २०२४ या आधुनिक युगात छेत्रीनंतर कोण...? या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही.

सध्या भारतीय संघात असलेल्या सर्व खेळाडूंना कमी लेखण्याचा प्रश्न नाही. मात्र त्यांच्याकडून आम्ही सर्व छेत्री आहोत... चिंता नसावी... अशी जिद्द बागळून खेळ करावा, हीच बाब छेत्रीला त्याच्या कारकीर्दीची बूज राखणारी आणि त्याचा खऱ्या अर्थानं मान राखणारी ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.