भारतीय जैन चित्रशैली

भारतात कलासंस्कृती समृद्ध आहे आणि व्यक्त होण्यासाठीचं माध्यम म्हणून प्रामुख्यानं चित्रकलेला प्राचीन काळापासून प्राधान्य आहे.
Indian Jain style of painting
Indian Jain style of paintingsakal

- दुर्गा आजगांवकर, ajg.durga17@gmail.com

भारतात कलासंस्कृती समृद्ध आहे आणि व्यक्त होण्यासाठीचं माध्यम म्हणून प्रामुख्यानं चित्रकलेला प्राचीन काळापासून प्राधान्य आहे. तंत्रज्ञानाच्या आणि सृजनतेच्या विश्वात वेळोवेळी चित्रांची नवीनता साहित्यामधून स्पष्ट होताना दिसते. राजा-महाराजांनी चित्रकला अवगत केल्याची अथवा राजाश्रयातून चित्रपरंपरा विकसित झाल्याची असंख्य उदाहरणं आहेत.

साधारणतः अकराव्या शतकाच्या प्रारंभी पश्चिम भारतात गुजरात-राजस्थान या ठिकाणी ताडपत्रावर हस्तलिखिताच्या रचनानिर्मितीस सुरुवात झाली आणि पुढची काही शतकं ती सुरू होती. भित्तिचित्रांचं लहान स्वरूप म्हणून गणली जाणारी चित्रं हस्तलिखितांच्या सुशोभीकरणासाठी वापरली जाऊ लागली.

अशातच पूर्वेकडच्या शैलीशी साम्य दर्शवणारं; परंतु पश्चिम भारतात नवीन शैलीची पाळंमुळं रोवणारं ताडपत्रावरचं ‘कल्पसूत्र’ निर्मिलं गेलं. त्यांतून नक्षीकाम केलेल्या, रंग वापरून केलेल्या, तसंच सुवर्ण आणि रौप्य अक्षरांची योजना असलेल्या वैभवशाली शैलीला प्रारंभ झाला आणि ‘जैन कला’ म्हणून ती शैली नावारूपाला आली.

समाजात नवीन धर्मपरिवार निर्माण झाला की त्याची धर्मवैशिष्ट्यं त्याच्या कलेत दिसू लागतात. कथा-मिथकांमधून त्यांना उद्गार मिळतो आणि चित्रसाहित्याची गुंफण विणली जाते. आपल्या संमिश्र आचारधारणेत त्यांचा एक वेगळाच ठसा उमटतो आणि तो हस्तांतरित होत, नकळतपणे जतनही होतो. जैन कलाही याला अपवाद नाही.

धर्म-आचार-विचार-संस्कृती यांची जोड मिळत गुंफा, मंदिरं, वास्तू, साहित्य, चित्र-शिल्प यांतून ही कला प्रतिबिंबित होते. खरं तर याबाबतीत आधीच प्रस्थापित असलेल्या, प्रामुख्यानं बौद्ध कल्पनांचा व कलापरंपरांचा प्रभाव सुरुवातीला जैन कलेवर असावा. मात्र, आकार व घडण यांबाबतीत विशेष प्रगत दर्शनामुळं जैनकलेच्या निर्मितीला शैलीदृष्ट्या वेगळेपण प्राप्त होतं.

जैन दंतकथेनुसार, पहिले तीर्थंकर ऋषभनाथ यांना सर्व कलांचा जन्मदाता मानलं जातं. त्यामुळं चित्रकार, शिल्पकार यांना समाजात असामान्य स्थान मिळालं. एकीकडे जैन संप्रदायाच्या अगदी बाल्यावस्थेतली स्थिती म्हणजे ‘जैन संघातल्या व्यक्तींनी चित्रं काढू नयेत...’, ‘चित्रांनी सजवलेल्या वास्तूत राहू नये...’ अशी अनेक बंधनं.

मात्र ही बंधनं मोडीत काढत, तसंच अगदी पाना-फुलांचं चित्रण म्हणजे निर्दोष ‘चित्तकम्म’ व उडणाऱ्या यक्ष-यक्षिणी, सामान्य स्त्रिया आदी रंगवणं म्हणजे सदोष ‘चित्तकम्म’ अशा कल्पनांचे जैन ग्रंथांमधले उल्लेख बाजूला ठेवत उत्तमोत्तम हस्तलिखितांची रचना केली गेली.

या ग्रंथांमध्ये ‘वसंतविलास’, ‘बालगोपालस्तुती’, ‘शालिभद्रचरित’ आणि अन्य विषयांचा समावेश असणाऱ्या रचना आहेत. ताडपत्रावर साकारलेलं ‘कल्पसूत्र’ आणि कागदावर निर्मिलेल्या ‘सिद्धहेमलघुवृत्ती’, ‘कुमारपालचरित’ आणि ‘कालकाचार्यकथा’ आदी रचना पूर्व भारतीय पालहस्तलिखितांशी साधर्म्य दर्शवतात.

जैन चित्रशैली ताडपत्र, भूर्जपत्र, कापड आणि कागद यांवर चित्रित झालेली दिसते. चित्ररचनेत स्थानिक नैसर्गिक रंगलेपन, शैलीतला प्रवाहीपणा आणि जोमदारपणा, तसंच नेमस्तपणाही दिसून येतो. यातल्या मानवाकृती डौलदार आहेत. मात्र, तीनचतुर्थांश चेहरा, चेहऱ्याबाहेर दर्शवलेला डोळा, टोकदार नाक, मोठे आणि काहीसे बटबटीत डोळे आणि मध्यभागी चित्रित बुबुळ, तसंच हनुवटीचा पुढं आलेला भाग अशा वैशिष्ट्यांनी युक्त आहेत.

यांतलं हस्ताक्षर सुबक-नेटकं असून कलात्मक शैलीतून स्वतःचं वेगळेपण जपणारं आहे. या रचना कोणत्या पंथाच्या विचारधारणेचा पुरस्कार करतात याबद्दल मात्र अनेक कलासंशोधक/इतिहास- संशोधक यांच्यात मतमतांतरं आढळतात. मात्र, प्रादेशिक-नैसर्गिक घटकांचा समावेश असल्यानं गुजराती, तर आशयाच्या गुणधर्मावरून जैन चित्रशैली असं नामांतरण पाहायला मिळतं. यांत श्वेतांबर पंथातल्या जतन केलेल्या भांडारांचा उल्लेख काही संशोधक करतात.

जैन चित्रांच्या आशयाची व्याप्ती धर्माच्या संदर्भात अधिक दृढ आहे. महावीरांच्या जन्माआधी माता त्रिशलेला स्वप्नात दिसलेलं शुभचिन्हं, त्यांचा गृहत्याग, केशलुंचन, ज्ञानप्राप्तीनंतर समवसरणात वास्तव्य आदी अनेक प्रसंगांभोवती आणि इतर तीर्थंकरांच्या चरित्रचित्रांभोवती ‘कल्पसूत्र’ या प्रमुख ग्रंथाची रचना आहे. त्यात तीर्थंकरांचं अखंड जीवनमान, संदेश आणि असंख्य कल्पनांच्या पार्श्वभूमीवरच्या चित्रांचा समावेश आहे.

कालकाचार्य कथा, सुबाहू कथा, ज्ञातसूत्र, नागरसर्वस्व (पद्मश्रीनं लिहिलेली कामशास्त्रावरची रचना) अशा अनेक ग्रंथांची चित्रमय हस्तलिखितं, खगोलीय आकृत्या, मंडलं वगैरे यांतून चित्रित झालेली आहेत. ‘रतिरहस्य’, ‘नाट्यशास्त्र’, ‘गीतगोविंद’, ‘देवीमाहात्म्य’,

‘मेघदूत’, ‘कुमारसंभव’ आदी विविध साहित्यकृतींवर आधारित, तसंच संगीतातल्या रागांवर अधिष्ठित असं चित्रणही जैनशैलीत झालं आहे.

त्यांत पालख्या, उत्सव, मिरवणुका यांची चित्रंही आढळतात. बाराव्या शतकात पाटणमधला (गुजरात) चालुक्य राजा कुमारपाल यानं ‘कल्पसूत्रा’च्या शंभरेक प्रती छापल्या आणि त्या दान केल्याचा उल्लेख आहे. आजही जैन चित्रांमधली ‘ज्ञानपूजा’ केंद्रस्थानी असून, पर्जन्यकाळात येणाऱ्या पर्यूषणपर्वाच्या समारंभात श्वेतांबर जैन संप्रदाय ‘कल्पसूत्र’ या ग्रंथाची आवर्जून पूजा करतात.

कलाकाराची धर्माविषयी असणारी कळकळ, समर्पणवृत्ती, आशयानुरूप वैचारिक उदात्तता आणि वैश्विक आवाहन आदी बाबींना महत्त्व देऊन ही चित्रं साकारली गेली आहेत आणि हेच या चित्रांचं वेगळेपण ठरतं.

एकूणच, रोजचं जीवनमान आणि भोवताल यांचा समन्वय साधून, धर्माचा प्रभाव पूर्णतः चित्रित झालेला दिसतो. संस्कृतीचा वैभवशाली कालखंड, त्या अनुषंगानं येणारे वस्त्रांचे, दागिन्यांचे बारकावे, स्थापत्यशैली आणि जीवनशैली यांचं दर्शन या चित्रांमधून घडतं.

‘कल्पसूत्रा’मधली पंधराव्या शतकातली एक उत्कृष्ट कलाकृती म्हणजे ‘महावीरांच्या जन्माबद्दलचं स्वप्न प्रतीत होणारं चित्र’. ही कलाकृती उत्तर प्रदेशातल्या जौनपूर इथं जतन केलेली आहे. या चित्रांमध्ये एका बाजूला गद्याची रचना, नक्षीदार काठ असं असून यात महत्त्वाची जागा चित्रणासाठी उपयोगात आणली आहे. यात १४ रत्नप्रतीकं प्रतिबिंबित होतात. चित्रांमध्ये सोनेरी आणि लाल रंगाचं प्राबल्य आढळतं.

निळ्या रंगात रेषा आहेत आणि सोनेरी रंगानं बाह्यरेषा साकारलेली आहे. विदेशातून आयात होणाऱ्या ‘लॅपिस लॅझुली’ खनिजांपासून हा निळा रंग तयार करण्याचं कौशल्य यातून दिसून येतं. हे रंग उठावदारपणे अस्तित्व जपताना दिसतात आणि जैन चित्रशैलीचा सार्वत्रिक प्रसार दर्शवतात. यांतून प्रादेशिक आणि सांस्कृतिक कलेचं प्राकृत चित्रण दिसून येतं.

हस्तलिखित ग्रंथांच्या ठेवणीत मुखपृष्ठांसाठी लाकडी पट्ट्यांचा (पाटली) वापर करण्यात येत असे. तत्कालीन सामाजिक हालचाली अचूकपणे दर्शवताना पारदर्शक वस्त्ररचना, देहबोली यांचा प्रत्यय हीही या शैलीची प्रमुख वैशिष्ट्यं मानली जातात. नक्षीयुक्त मखरात आणि चौकटीत वळणदार अक्षरांनी मजकूर लिहिलेला आढळतो. या सर्व गोष्टींच्या एकत्रित मांडणीतल्या कल्पकतेमुळं ग्रंथाचं एक पान म्हणजे एक चित्रात्मक साहित्य ठरतं.

धर्मवाङ्मय नष्ट होऊ नये म्हणून जैन अंग-उपांगांचं जतन व एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात यातून करण्यात आला आहे. गुजरातमधली जैन भांडारे आजही या ग्रंथांची जपणूक करत आहेत. अनेक वर्षांच्या राजाश्रयामुळं आणि श्रीमंत अनुयायांमुळं हस्तलिखितांची निर्मिती अव्याहत होत राहिली. जैन भांडारांमध्ये व खासगी संग्रहांत ग्रथांचा सांभाळ झाला.

परकीय आक्रमणाच्या व जाळपोळीच्या काळात बरंचसं वाङ्मय नष्टही झालं. अशा वेळी काही जैन भांडारे गुप्त आणि बंदिस्त ठेवण्यात आल्यामुळं हे जुने दुवे आजही उपलब्ध होतात. भारतातल्या आणि भारताबाहेरच्या संग्रहालयातले जैन शैलीचे संग्रह याची साक्ष देतात.

(लेखिका ह्या चित्रकार व पुरातत्त्व-सहाय्यक संशोधक असून, हैदराबाद इथल्या ‘प्लीच इंडिया फाउंडेशन’मध्ये कार्यरत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com