भारतीय मुघल शैली

अगदी जुन्या काळापासून- मध्ययुगातल्या आणि नंतरच्या आधुनिक काळापर्यंतच्या इतिहासात धर्म आणि युद्ध ही राजकारणाची साधनं होती.
Indian Mughal style
Indian Mughal stylesakal
Updated on

- अजेय दळवी, ajeydalvi2@gmail.com

अगदी जुन्या काळापासून- मध्ययुगातल्या आणि नंतरच्या आधुनिक काळापर्यंतच्या इतिहासात धर्म आणि युद्ध ही राजकारणाची साधनं होती. त्याही परिस्थितीत राजकारणाच्या पलीकडं असणाऱ्या कलांचा आणि तत्त्वज्ञानाचा तिथल्या समाजाशी आंतरसंवाद होऊन अनेकदा चांगल्या घटना घडल्या आहेत.

प्रचंड सैन्य घेऊन आलेला ग्रीक राजा सिकंदर म्हणजेच ॲलेक्झांडर भारताच्या समृद्ध तत्त्वज्ञानाची झलक अनुभवत, काही ग्रीक संस्कार देत आणि काही भारतीय संस्कार वेचत वायव्येकडच्या भागातून मागं फिरला. परत जाताना भारतीय तत्त्वज्ञानातले मुनी सोबत घेऊन गेला. तत्कालीन ग्रीसमध्ये या वैचारिक संक्रमणातून संस्कारित सांप्रदाय तयार झाल्याच्या नोंदी आढळतात.

याशिवाय, मंगोलियाच्या मैदानी प्रदेशातून बाहेर पडलेल्या भटक्या लोकांनी मध्य आशियाच्या वाळवंटातली समाजव्यवस्था आक्रमकपणे प्रभावित केली. पुढं त्यांच्यात मिसळून जात इस्लाम धर्माचा संस्कार स्वीकारला गेला. त्यानंतरच्या काळात मध्य आशियातल्या राजवटींनी वाळवंट ओलांडून युरोपपर्यंत धडक मारली. तिथल्या आक्रमणात घडून आलेल्या घटना युरोपातल्या कला प्रभावित करणाऱ्या ठरल्या होत्या.

भारताच्या पश्चिमेकडच्या खैबर खिंडीतून प्रवेश करणाऱ्या मुघलांनी आक्रमणकर्ते म्हणून येताना स्वतःबरोबर अनेक कला-परंपरा आणल्या, ज्यांची नाळ पर्शियन आणि मंगोलियन संस्कृतीशी जोडलेली आहे. मध्य आशियातून भारतात मार्गक्रमण होत असताना, या मुघलांबरोबर आलेली मुघल चित्रशैली, उदार राजाश्रयामुळे विकसित होत गेली. आदर्श अशा वातावरणात परिपक्व झाली.

मुघल साम्राज्याची स्थापना, विकास आणि अंत याच क्रमानं या चित्रशैलीचा उगम, विकास आणि अस्त पाहायला मिळतो. बाबराच्या काळातदेखील चित्रकारांना चांगल्या संधी मिळाल्या होत्या. पर्शियन बाज असणाऱ्या भारतीय मुघल चित्रशैलीत बादशहाची अभिरुची महत्त्वाची ठरत होती. ‘बाबरनामा’ या त्याच्या चरित्रात निसर्गचित्रांचा उल्लेख आहे. त्यामध्ये बिहजाद या चित्रकाराची प्रशंसा केलेली आढळते.

त्यानंतर सत्तेत आलेल्या हुमायून बादशहानं राज्य टिकवण्याच्या खटाटोपातही मीर सय्यद अली आणि अब्दुल समद हे इराणी चित्रकार पदरी बाळगले होते. त्यांच्या मार्गदर्शनात स्थानिक चित्रकारांकडून चित्रं काढून घेतली गेली. ती या काळातली मुघलदरबारी चित्रं ठरतात. थोडक्यात, स्थानिक भारतीय आणि पर्शियन चित्रपरंपरेचा सुंदर मिलाफ इथं घडून आला.

हुमायूननंतर त्याचा मुलगा अकबर वयाच्या चौदाव्या वर्षी बादशहा झाला. कलेचा वारसा उपजतच असल्यामुळं या उमद्या स्वभावाच्या बादशहाच्या काळात मुघल शैली उत्तरोत्तर विकसित होत गेली. ‘अकबरनामा’, ‘रज्म-नामा’ आदी ग्रंथ त्याच्या दरबारी चित्रांकित केले गेले.

उदारमतवादी आणि कलेचा भोक्ता असणाऱ्या अकबरानं पारंपरिक काम करणाऱ्या हिंदू कलाकारांना प्रोत्साहन दिलं. मीर सय्यद अली, अब्दुल समद, अब्दुल ख्वाजा या पर्शियन चित्रकारांबरोबरच माधव, भीम गुजराती, जसवंत, बसावन, केशवदास, मधू असे हिंदू कलाकार मिळून जवळपास १५० कलावंत त्याच्या दरबारात होते.

या चित्रांमधल्या पार्श्वभूमीला झाडं, पर्वत, खडक यांचं सूक्ष्म रेखांकन, रंगकाम आणि आलंकारण करण्यात पर्शियन चित्रकार तरबेज होते, तर भारतीय चित्रकार व्यक्तिचित्रणातले भाव दर्शवण्यात प्रवीण होते. या काळातल्या कलेतल्या या परस्पर आंतरसंवादातून मुघल चित्रशैली अधिक बहरत गेली. स्वधर्माबरोबरच हिंदू धर्माग्रंथांमधल्या कथांवर सचित्र हस्तलिखितं अकबरानं तयार करून घेतली होती.

‘राहनामा’, ‘तैमूरनामा’, ‘अकबरनामा’, ‘दरबारनामा’, चरित्रग्रंथ आणि महाभारताचा अनुवाद असणारं ‘रज्म नामा’,‘आयारदानिश’ (पंचतंत्राचा अनुवाद), ‘रामायण’, ‘हरिवंश’ आदी ग्रंथ त्याच्या संग्रही होते. ‘योगवासिष्ठ’ या तत्त्वज्ञानपर ग्रंथातल्या काही बोधप्रद कथांवरही त्यानं चित्रं रंगवून घेतली होती.

त्यानंतर त्याचा मुलगा जहाँगीर याच्या काळात कला परमोत्कर्षाला पोहोचली. पशू-पक्षी आणि फुलबागा यांची आवड असणारा सौंदर्यप्रेमी जहाँगीर मोठा आश्रयदाता होता. त्यामुळं विविध वनस्पती, फुलं-पानं आणि पशू-पक्ष्यांची स्वतंत्र चित्रनिर्मिती त्याच्या काळात झालेली दिसते. बादशहाला त्याची स्वतःची व्यक्तिचित्रणं विशेष प्रिय होती. यांतून वास्तववादी चित्रणाचा अधिकाधिक वापर दिसून येतो.

त्यामुळं चित्रं ही फक्त ‘ग्रंथसजावटीचं माध्यम’ न राहता स्वतंत्र अशा चित्रांची निर्मिती या काळात होत गेली. बहिरी ससाणा, हरीण, तुर्की कोंबडा, सुतारपक्षी अशी चित्रं उस्ताद मन्सूर हा चित्रकार त्या काळी काढत असे, तसंच गोवर्धन, कसू, दासू, गोविंद, बिशनदास, मन्सूर, अब्दुल हसन, मंहमद नादीर, मकरकंदी, इनायत फारुक बेग इत्यादी चित्रकारांनी राजाच्या आवडी-निवडी आणि छंद याची नोंद घेत या काळातल्या मुघल चित्रशैलीत मोठी भर घातली.

युद्धादरम्यान आणि शिकारीदरम्यान जहाँगीर स्वतःबरोबर चित्रकारांनाही घेऊन जात असे. त्यानं कारकीर्दीच्या सुरुवातीलाच शाही चित्रशाळेची स्थापना केली होती असं म्हटल्यास वावगं नाही. चित्र शिकारीचं असो, दरबारातलं असो किंवा जनानखान्यातलं असो...या सर्व चित्रांमध्ये जहाँगीराचं प्रमुख स्थान दर्शवलेलं पाहायला मिळतं.

जहाँगीराचा मुलगा शहाजहान याला चित्रकलेपेक्षा वास्तुकलेत अधिक रस होता. त्यानं दिल्लीचा ‘लाल किल्ला’ आणि नंतर जगप्रसिद्ध ठरलेला ‘ताजमहाल’ यांसारख्या सुंदर वास्तू बांधल्या. तरीदेखील त्याच्या काळात एकूणच चित्रकलेच्या दृष्टीनं रेखाटनांमध्ये तंत्रांची भर पडली आणि ती पूर्णत्वास गेली. या काळात चित्रकलेत मानवी शरीराचं रेखाटन अधिक परिपूर्ण झालं. कारागिरीबरोबरच रुपेरी रंगाचा वापर आणि रंगपद्धतीत सुधारणा झाली.

जहाँगीराप्रमाणेच शहाजहानच्या चित्रांत त्याच्या चेहऱ्यामागं तेजोवलय दाखवलं गेलेलं आढळतं. राजपुत्र मुराद व नाझर महंमद यांच्या भेटीचं चित्र आणि ‘हरणाची शिकार करणारा शहाजहान’ या चित्रांत गौणत्व आणि प्राधान्य यांचा विचार करून रसिकांचं लक्ष अधिक सहज वेधण्याची पद्धत वापरण्यात आल्याचं आपण अनुभवू शकतो.

वेगवेगळ्या टप्प्यांवर मुघल शैलीचा विकास हा वास्तववादी दृष्टिकोनातून झालेला आहे. विविध बादशहांच्या ऐहिक जीवनातला सुखोपभोग, विलासी वृत्ती, राजवैभवाचा थाट असे चित्रविषय त्या काळात असल्यामुळं आध्यात्मिक आणि धार्मिक विषय चित्रांत साकार झालेले दिसत नाहीत. शिकार केलेले प्राणी-पक्षी यांचे भोत समोर ठेवून अतिबारकाव्यांसह प्रमाणबद्ध चित्रण करण्यात आलेलं आहे.

युरोपातून आलेले व्यापारी, ख्रिस्ती धर्मोपदेशक यांनी बादशहांना पाश्चिमात्य पद्धतीच्या भेटी दिल्याचं चित्रण, चित्रांमधला छाया-प्रकाश, निसर्गाला दिलेलं प्राधान्य या बाबी लक्षात घेता तत्कालीन मुघल चित्रशैलीवर पाश्चिमात्य प्रभाव पडत राहिला.

शहाजहाननंतर औरंगजेबाच्या काळात चित्रकारांचं आणि चित्रकलेचं दमन सुरू झालं. औरंगजेब बादशहा हा ललित कलांचा कट्टर विरोधक होता. त्याच्या राजवटीत चित्रकारांना त्रास दिला गेल्यामुळं ते हिमालयातल्या राजपूत राजांकडं स्थलांतरित झाले. त्यांतून पहाडी कलेचा उदय होत असताना मुघल कलेचा अस्त झाला.

या जगप्रसिद्ध कलाशैलीचे काही अस्सल नमुने मुंबईच्या ‘छत्रपती शिवाजीमहाराज वस्तुसंग्रहालया’त (पूर्वीचं ‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम’) इथं पाहायला मिळतात.

(लेखक हे चित्रकार आणि कलाभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.