मध्य वर्तुळाचा, परीघ वर्तुळाचा...!

आजपासून बरोबर पंचेचाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. स्थळ, साहित्य संघ मंदिर नाट्यगृह, गिरगाव. निमित्त होतं आय.एन.टी. अर्थात इंडियन नॅशनल थिएटर ह्या संस्थेतर्फे घेण्यात येणारी आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धा.
One Act Play
One Act Playsakal
Updated on

आजपासून बरोबर पंचेचाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. स्थळ, साहित्य संघ मंदिर नाट्यगृह, गिरगाव. निमित्त होतं आय.एन.टी. अर्थात इंडियन नॅशनल थिएटर ह्या संस्थेतर्फे घेण्यात येणारी आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धा. आमच्या जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयातर्फे सादर होणार होती मी लिहिलेली एकांकिका, ‘पार्टनर.’ नाटकाच्या पहिल्या प्रयोगाआधी असलेल्या, चिंतातुर उत्सुकतेला या वेळी नवीच किनार होती.

ही एकांकिका होती, समलैंगिकता या विषयावरची. पात्रे फक्त तीन. हा विषय प्रेक्षक कसा स्वीकारणार याची धाकधूक. प्रमुख भूमिकेत होता मनोज (डॉ. मनोज भाटवडेकर, आजचे प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ) आणि मिलिंद (डॉ. मिलिंद चौधरी, आज अस्थिरोगतज्ञ, अकोला शहरात) आणि मेधा (डॉ. मेधा जोशी, आज रत्नागिरीमध्ये वैद्यकीय व्यवसाय); दिग्दर्शक होता आमचा मित्र चंदू पाटणकर. पडदा उघडला आणि पाच मिनिटांत नाटकानं पकड घेतली.

अंशभरसुद्धा बटबटीतपणा न आणता, दोन व्यक्तीमधल्या आकर्षणातील ध्यास आणि वेदनेचा वेध घेण्याचा प्रयत्न होता आमचा. समलैंगिकतेला शाप, गुन्हा, पाप आणि विकृती मानणारा काळ होता तो. एकांकिकेसाठी अभ्यास करायला मला मदत केली होती डॉ. कुमार ढवळे या ज्येष्ठ मित्रानं.

त्याच्या सायकीॲट्रीमध्ये एम.डी. पदवीसाठीचा थिसिस होता तो. त्याच्या संशोधनासाठी स्वतःहून येणाऱ्या काही समलैंगिक व्यक्तींना मी भेटलो, बोललो. माझ्या संपर्कपरिवारामध्ये असं एक नातं माझ्या दृष्टीला आलं होतं. वैद्यकीय विद्यार्थी असूनही मी त्या वेळी चक्रावून गेलो होतो.

स्वतःच्या इच्छा आणि प्राधान्यक्रम ज्यांना सांगताच येत नाहीत, त्यांची काय परवड होते ते मला भिडलं होतं. अशा समलैंगिक पुरुषाचा विवाह स्त्रीशी झाला तर त्यातून होणारी गुंतागुंत कोणती करुण वेदनाकहाणी लिहिते, हे आमच्या एकांकिकेत दाखवलं होतं. एकांकिका संपली आणि सुन्न नाट्यगृहातील शांततेनंतर टाळ्यांचा आवाज उठला. ‘माणसा’ची गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचली होती. या प्रयोगाला बक्षिसे मिळाली.

त्या वर्षीच्या निवडीतील दहा संहितांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट मराठी एकांकिका’ असं स्थान मिळालं. पुढच्या दोन वर्षांतच, समलैंगिकता असलेल्या स्त्रीच्या जीवनावरचं नाटक आलं ‘मित्राची गोष्ट.’ विजय तेंडुलकरांनी त्या काळी हा विषय व्यावसायिक रंगभूमीवर आणला होता. रोहिणी हट्टंगडी काम करत होत्या. सुमित्रा, नमा आणि बापू या व्यक्तिरेखा. अगदी पार्टनरसारखाच बाज होता.

तेंडुलकरांनी भर दिला होता, नात्यांमधल्या ‘सत्ता संघर्षावर.’ नाते रुळलेल्या वाटेवरचे असो की अनवट रस्त्याने जाणारे... सत्ता आली की शोषण आलं. सगळ्या मानवी नात्यांवर सत्ता चालवणारी ‘समाज’ नावाची एक शक्ती असतेच असते. आणि या शक्तीमध्ये असतात चिवट, रूढीबद्ध विचारांचे शक्तिमान सापळे. माणसाचे भावविश्व प्रसंगी उद्ध्वस्त करून सांगणारे. १९८१ मध्ये सादर झालेली, तेंडुलकरांची ही संहिता, बाईंडर, घाशीराम, कमला, शांतता कोर्ट... अशा नाटकांइतकीच प्रयोगशील आहे. अतिशय वेगळी अशी आहे.

मनोविकारतज्ज्ञ म्हणून व्यवसायाला लागल्यावर नाटकातील या व्यक्तिरेखा नेमाने भेटू लागल्या. गेली चार दशके त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना समजून घेण्याचा प्रवास सुरू आहे. आज LGBTQ समूहाबद्दल तुलनेने जास्त लिहिले-बोलले जाते. परंतु ज्या कुटुंबांमध्ये ही अवस्था एका सदस्याच्या अनुभवाला येते त्या कुटुंबामध्ये भावनिक भूकंप होतो, हे स्वाभाविक म्हटले पाहिजे. मनआरोग्यक्षेत्रातील कार्यकर्ता म्हणून व्यक्तीची आणि कुटुंबाची, अशा दोन्ही बाजू समजून घ्याव्या लागतात.

मनोविकारशास्त्राची भूमिका, आजची कायद्याची भूमिका, प्रस्थापित समाजमत, तत्त्वज्ञान आणि संस्कृतीमधील मतमतांतरे असे सारे चर्चेमध्ये आणावे लागते. अशा सत्रांमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांला खूप तयारीनिशी उतरावे लागते. तयारी फक्त वैचारिक नसते. त्या व्यक्तीच्या भूमिकेत स्वतःला नेण्याची असते. ‘पार्टनर’ ही एकांकिका आजही दर आठवड्याला माझ्या मनात नव्याने घडत असते. आजही लैंगिकतेच्या संदर्भातला, ‘वेगळी वळणे’ अनुभवणाऱ्या व्यक्तींचा संघर्ष तेवढ्याच तीव्रतेचा असतो.

‘मित्राची गोष्ट’ मधल्या सुमित्रासारखी एक मुलगी अनेक वर्षांपूर्वी माझ्याकडे पाठवली होती, ती एका ज्येष्ठ काकांनी. विद्वत्ता, सौजन्य आणि आस्था यांचे विलक्षण रसायन होते हे काका. ही मुलगी उत्तम शिकलेली, कर्ती आणि कमावणारी. स्वतःच्या समलैंगिकतेची जाणीव झाल्यावर तिचा अंतर्गत संघर्ष सुरू झाला. स्वतःच्या लैंगिकतेचा स्वीकार करताना काही वर्षे गेली. तिने कुटुंबामध्ये हे सांगितल्यावर तणावाचे नवे वादळ उफाळून आले.

'एका मुलीला दुसऱ्या मुलीबद्दल शारीरिक आकर्षण असूच कसे शकते?” तिच्या आईने मला विचारले होते. पुरुषत्व (Masculinity) आणि स्त्रीत्व (Feminity) हा ‘वैज्ञानिक वर्णपट’ असून प्रत्येक व्यक्तीमध्ये दोन्हीचे अस्तित्व कसे असू शकते ते मी त्यांना समजावून सांगत होतो.

मानसिक तपासणी व चाचण्यांमधून जर ‘मनोविकार’ आढळला नाही, तर अशा व्यक्तींना मदतीची जास्त गरज असते, उपचारांची म्हणजे ट्रीटमेंटची नाही हे सांगत होतो. हळूहळू त्यांचा स्वीकार वाढत होता. ह्या माझ्या ‘सुमित्रा’ची एक मैत्रीण होती. कालांतराने त्या दोघी एकत्र राहू लागल्या. त्या काळात हे अधिकच धाडसाचे होते.

या मैत्रिणीच्या (तिला नमा म्हणू) पालकांनी तिला एका स्त्रीमनोविकारतज्ज्ञांना दाखवलं. त्यांचा सल्ला असा होता, की नमा ही ‘मनोरुग्ण’ आहे. म्हणून सुमित्रानं नमाला माझ्याकडं पाठवले. नमा मध्ये ‘मनोविकार’ असा नावालाही नव्हता. Difference म्हणजे वेगळेपणा आणि Deviation म्हणजे वाकडेपणा! वेगळेपण निसर्गात आहे आणि माणसातही.

टोकाचे वेगळेपण म्हणजे वाकडेपण. त्याला ‘वाकडे’ का म्हणायचे? कारण बहुसंख्येच्या सरळपणापासून ते जरा ‘जास्तच’ वेगळे म्हणून आणि विकार म्हणजे Disorder कधी म्हणायचे? जेव्हा स्वीकारलेल्या लैंगिकतेमुळे त्या व्यक्तीला भावनिक तणाव येत असेल, ती वास्तवापासून दूर जात असेल, तिची उत्पादकता आणि जीवनानंद क्षीण होत असेल तरच.

जिथे - जिथे स्वतःच्या भिन्नलैंगिकतेचा स्वीकार स्वतःच केल्यावर व्यक्तीला हायसे वाटते, दिलासा मिळतो आणि त्या व्यक्तीची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढीला लागते, त्याला कोणत्या निकषावर ‘विकार’ म्हणायचे? तर फक्त ‘वाकडेपणा’च्या प्रचलित व्याख्येवर.

सुमित्रा आणि नमा यांनी त्यांच्या स्वतःच्या स्त्रीत्वाचा ‘अस्वीकार’ केला नव्हता. फक्त आपली लैंगिकता, ‘समलिंगी’ आहे असा त्यांचा अनुभव आणि ठेवण होती. यथावकाश या दोघींचा साहचर्यपूर्ण ‘संसार’ सुरू झाला. काकांची प्रेमळ नजर त्यांच्यावर होतीच. काकांच्या घरीच एक लग्नकार्य निघाले. त्याच्या आमंत्रणपत्रिका वाटणे सुरू झाले. काका ह्या दोघींच्या घरी आले. त्यांनी पत्रिकेवर या दोघींची नावे लिहिली. त्यांना अक्षता दिल्या. वीस-पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही.

सुमित्रा आणि नमा गलबलून गेल्या. हा प्रसंग मला सुमित्राने सांगितला तेव्हाही तिच्या डोळ्यांमध्ये पाणी होते. त्या रात्री मी काकांना फोन केला आणि म्हणालो, 'तुम्हाला नम्र नमस्कार करण्यासाठी आहे हा फोन... लैंगिकतेच्या वेगवेगळ्या अवस्थांमधून जाणाऱ्या माणसांची खडतर भावनिक कहाणी मी अनुभवत असतो... अशा प्रकारे त्यांना सामावून घेणे... Include करून घेणे आणि तेही शुभसमारंभामध्ये... तुम्ही ग्रेट आहात काका!'

'डॉक्टर, माझे जेवढे म्हणून नातेसंबंध आहेत ते एक वर्तुळ आहे असे समजा. मी आहे त्या गोलाचा मध्यबिंदू. माझ्यापासून कमीजास्त भावनिक अंतरावर असणारी सारी नाती. त्यांच्या कक्षा काही कायमच्या आखीव रेखीव नसतात. काही नात्यांची अंतरे स्थिर राहतात तर काहींची बदलतात. सुमित्रा आणि नमासारख्या नात्यांना समाजानेच परिघावर टाकले आहे. आपण जर स्वतःला विवेकी समजत असू तर आपल्या वैयक्तिक परिघावरून त्यांना आपण मध्याकडे आकर्षित नको का करून घ्यायला? मी माझं कर्तव्य केलं फक्त... मायेनं केलं.'

काकांचा शांत स्वर अजूनही माझ्या कानात घुमतो आहे. माणुसकीला कणा देणाऱ्या अशा असंख्य अनाम व्यक्तींच्या बळावरच ‘माणूस’ अजून टिकून आहे.

(लेखक हे विख्यात मनोविकारतज्ज्ञ, विचारवंत, नाटककार, संगीतकार, कवी, चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com