'जागर सावित्रीचा'
'जागर सावित्रीचा' या माझ्या दुसऱ्या दिवशीच्या लेखमालेत मी शास्त्रज्ञ माधवी ठाकरे यांच्याविषयी आणि त्यांच्या कामाची ओळख करून देणार आहे. तसा विचार केला तर विज्ञान या क्षेत्रात आपण करिअर करावे, असे स्वप्न पाहणारे फार कमी आहेत. त्यात मुली तर सोडाच. शास्त्रज्ञ म्हणून, विज्ञाननिष्ठता म्हणून ध्येयवेड्या शास्त्रज्ञ माधवी ठाकरे यांनी उभे केलेले काम, येथील प्रत्येक मुलीसाठी प्रेरणादायी आहे. ज्यांना वेगळे आणि आपल्या देशासाठी काहीतरी करायचे आहे, त्यांनी ‘मला शास्त्रज्ञ माधवी व्हायचे आहे’ हे स्वप्न उराशी बाळगले पाहिजे.
माधवी ठाकरे या नागपूरच्या. माधवी भौतिकशास्त्राच्या विद्यार्थिनी. त्यामध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेत डॉक्टरेट मिळवली. वयाच्या तिसाव्या वर्षी यशस्वी आणि बुद्धिमान शास्त्रज्ञ म्हणून त्यांच्यावर शिक्कामोर्तब झालाय. त्यांच्या नावे वैज्ञानिक विषयाला घेऊन अनेक रेकॉर्ड झालेत. त्यांनी उभे केलेले काम आणि त्या कामातून निर्माण झालेले आशावादी वातावरण देशातल्या त्या प्रत्येक मुलीसाठी अभिमानाची गोष्ट म्हणावी लागेल.
माधवी ठाकरे अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), अहमदाबाद, गुजरात येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. चांद्रयान- 2, मार्स ऑर्बिटर मिशन, रिसोर्ससॅट-2A(R), चांद्रयान-3, भारतीय नॅनोसॅटलाईट (INS) मिशन – 1A, 1B, 1C, स्पेस डॉकिंग प्रयोग, रिसोर्ससॅट-3 अशा कितीतरी महत्त्वपूर्ण असणाऱ्या भारतीय मिशनच्या त्या महत्त्वपूर्ण भाग होत्या. आता इस्रोत नव्याने होणाऱ्या अनेक भारतीय प्रयोगांत त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा असेल.
माधवी ठाकरे (9724236059) यांचा आत्तापर्यंतचा अत्यंत कमी वयातला हा सगळा प्रवास पाहून एकूण मी थक्क झालो. मी माधवी यांना विचारले, आपल्याकडे मुली तुमच्यासारखं शास्त्रज्ञ म्हणून करिअर करण्याच्या दृष्टीने दोन पावलं पुढे का टाकत नाहीत.? त्यावर माधवी म्हणाल्या, या क्षेत्रामध्ये मुलींची संख्या आहे, पण फार कमी आहे. ती संख्या जर वाढली तर भारताची ओळख म्हणून असणारे इस्रोसारख्या अनेक ठिकाणचे प्रयोग अजून खूप छान पद्धतीने यशस्वी होतील. चूल आणि मूल या पलिकडे महिलांनी पावले टाकली पाहिजेत. अलीकडे सर्वच क्षेत्र मुलींनी व्यापली आहेत. त्याला माझं क्षेत्र तसं अपवाद आहे. सरकार यांनी सामाजिक अशा दोन्ही पातळ्यांवर माझ्या क्षेत्राकडे बघण्याचा मुलींचा दृष्टिकोन वाढला पाहिजे यासाठी खूप महत्त्वपूर्ण पावले टाकली जात आहेत. तरीही रुची असणाऱ्या त्या शेवटच्या मुली, महिलेपर्यंत इथलं चांगुलपण कळत नाही.
माझी आई अरुणा, वडील विजय दोघेही विज्ञानाची कास धरणारे. त्यांनी स्वप्न पाहिले होते मी शास्त्रज्ञ झाले पाहिजे. या देशासाठी वेगळे काहीतरी केले पाहिजे. चांगुलपणाचे बाळकडू मला माझ्या घरामध्येच मिळाले. ज्यातून माझे विचार परिपक्व झाले. प्रत्येकाचे असेच असते. मी अनेक मुलींना भेटत असते. त्या मुलींना माझे नेहमी सांगणे असते, तुम्ही माझ्यासारखे करियर निवडा. तुमचे नाव, देशसेवा आणि तुमचा इतिहास सर्वकाही तुमच्या नावावर कायमचे होईल. काही हिंमत करून पुढेही येऊ लागल्या आहेत.
माधवी यांच्याशी मी जेव्हा बोलत होतो, तेव्हा त्यांच्या अनेक प्रसंगांमधून, रोजच्या कामाच्या आठवणीमधून, माझ्या समोर ‘मिशन मंगल’ हा चित्रपट येत होता. अक्षय कुमार आणि विद्या बालन यांनी चित्रपटामध्ये शास्त्रज्ञाची भूमिका साकारली. ती भूमिका प्रत्यक्षामध्ये माधवी इस्रोमध्ये साकारतात. व्वा किती छान ना.
माधवी यांच्यासारख्या ध्येयानी वेड्या झालेल्या, काहीही झाले तरी देशसेवेसाठी लढत राहायचे, अशा मुली, महिला आज पुढे येणे गरजेचे आहे. हा विचार माधवी यांच्याशी बोलताना माझ्या मनात येत होता. आपण सारे मिळून आपली बहीण, आपली मुलगी, माधवी यांच्यासारखी बनली पाहिजे. हा विचार केला तरच अनेक माधवी शास्त्रज्ञ असलेला मानाचा मुकुट घेऊन देशसेवेसाठी, समाजासाठी नक्की पुढे येतील.. बरोबर ना..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.