यशवंत आयुष्याची ‘सारथी’

एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मी ओडिशात गेलो होतो. कार्यक्रम संपल्यावर ओडिशामध्ये काही ठरवलेल्या ठिकाणी भेट देण्यासाठी मी बाहेर पडलो. ओडिशातल्या बालेश्वर इथं एका पत्रकार मित्राकडं जेवणानंतर पायी आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर निघालो.
यशवंत आयुष्याची ‘सारथी’
यशवंत आयुष्याची ‘सारथी’sakal
Updated on

भ्रमंती लाईव्ह

संदीप काळे,sandip.kale@esakal.com

एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मी ओडिशात गेलो होतो. कार्यक्रम संपल्यावर ओडिशामध्ये काही ठरवलेल्या ठिकाणी भेट देण्यासाठी मी बाहेर पडलो. ओडिशातल्या बालेश्वर इथं एका पत्रकार मित्राकडं जेवणानंतर पायी आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर निघालो. आईस्क्रीम खात आम्ही एका बाकावर बोलत असताना एक व्यक्ती बाजूला क्लासमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची गोष्ट हिंदीमधून त्या समोर बसलेल्या युवकांना सांगत होती. त्या शिकवणाऱ्या माणसाला मला भेटायचं आहे, असं मी त्या पत्रकार मित्राला म्हणालो. तो पत्रकार मित्र आतमध्ये गेला. आतमध्ये जाऊन तो बाहेर आला आणि मला म्हणाला, ‘‘शिकवणारे आमच्या भागातलेच उपविभागीय अधिकारी आहेत. आपण क्लास सुटला की, त्यांना भेटू.’’ क्लास सुटला, आम्ही त्यांना भेटायला गेलो. मी बोलताच क्षणी त्यांच्या लक्षात आले, मी महाराष्ट्राचा आहे असा. बोलण्यातून त्यांचा चांगला परिचय झाला. माझ्याशी बोलणारे ते अधिकारी अवघ्या २८ वर्षांचे होते. ते यूपीएससी पास होऊन ओडिशामध्ये उपविभागीय अधिकारी म्हणून रुजू झाले होते. प्रथमेश अरविंद राजेशिर्के असं या अधिकाऱ्याचं नाव. ते कोकणातल्या चिपळूण तालुक्यातील मांडकी या गावचे. आम्ही दोघेजण बोलत होतो. प्रथमेश यांचा सर्व प्रवास थक्क करणारा होता. प्रथमेश व त्यांचे कुटुंबीय कोरोनाच्या विळख्यात अडकले होते. प्रथमेशही दवाखान्यामध्ये अभ्यास करत होते. परिस्थिती अत्यंत हलाखीची, त्यामुळे घरी बसून परीक्षा देण्याशिवाय प्रथमेश यांना पर्याय नव्हता.

या काळात एका मित्राच्या माध्यमातून ‘सारथी’ या पुण्यामधल्या शासकीय संस्थेची माहती मिळाली. शिक्षणासाठी मुलांचा खर्च पूर्णपणे उचलला जातो, असं प्रथमेश यांना कळालं. प्रथमेश ‘सारथी’च्या परीक्षेला बसले. ती परीक्षा पास झाले. त्यांना ‘सारथी’मुळे तेरा हजार रुपये दर महिन्याला मिळत गेले. दिल्लीच्या क्लासची संपूर्ण फी ‘सारथी’ने भरली होती. प्रथमेश म्हणाले, ‘‘मी ‘सारथी’चे प्रमुख असलेले काकडे सर यांना भेटलो. त्यांनी दिलासा दिला. माझ्या आजारपणातही ते माझ्यासोबत होते. माझ्या आयुष्यात ‘सारथी’चा दोन अर्थाने महत्त्वपूर्ण वाटा आहे. एक माझ्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये आर्थिक साह्य करून मला उभं केलं आणि दुसरं जबरदस्त असे मार्गदर्शन, मेंटॉरशिप दिली. जर त्या काळामध्ये ‘सारथी’ने मला हात दिला नसता तर मी आणि माझ्यासारखी कित्येक मित्र कदाचित घरीच राहिलो असतो.’’ मी प्रथमेशला म्हणालो, ‘‘तुम्ही ओडिशाच का निवडलं?’’ प्रथमेश म्हणाले, ‘‘मला आदिवासी बांधवांची सेवा करायची होती. इथल्या अनेक युवकांना मला लाल दिव्याच्या गाडीत बसवायचे होतं. ते मी केलेही. मी सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी करावं, ही माझ्या वडिलांची इच्छा फार होती; पण जेव्हा माझा यूपीएससीचा निकाल लागला, तेव्हा ते सगळं बघायला वडील नव्हते.’’ वडिलांच्या आठवणींमध्ये भावनिक झालेल्या प्रथमेश यांचा निरोप घेऊन मी परतीच्या मार्गाला निघालो.

‘सारथी’ इतक्या मोठ्या प्रमाणात काम करते, हे मला माहिती नव्हतं. ओडिशा इथून मला कामानिमित्त थेट पुण्याला जायचं होतं. शनिवारी सायंकाळी पुण्यामध्ये पोहोचलो. पुण्यात आल्याआल्या ‘सारथी’वर आलेले अनेकांचे लेख वाचून काढले. बातम्या, अनेकांनी केलेले संशोधन मी वाचलं. मराठा, कुणबी समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यासंदर्भात २०१८ मध्ये मराठा समाजाचे अनेक मोर्चे निघाले. त्यात मराठा समाजाच्या मुलांचा शैक्षणिक विकास व्हावा, अशी मागणी होती. या मागणीतून अत्यंत बुद्धिमान, संवेदनशील, दूरदृष्टी असलेल्या देवेंद्र फडणवीस या अभ्यासू अशा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ‘सारथी’ची सुरुवात केली. दिवसेंदिवस आर्थिक अडचणीमध्ये दारिद्र्याच्या गाळामध्ये फसणाऱ्या मराठा, कुणबी समाजातील मुलांचे ‘सारथी’मुळे अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ लागलं. मी ‘सारथी’चा चार तास अभ्यास केल्यावर माझ्या लक्षात आलं, ‘सारथी’ने मागच्या चार वर्षांत चार लाखांपेक्षा अधिक तरुणाईचे मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केलं. मी या कामामुळं प्रचंड भारावून गेलो. तेवढ्या रात्री मी देवेंद्र फडणवीस यांना फोन लावला, त्यांचे अभिनंदन केले. त्यांनीही मला प्रतिसाद दिला. देवेंद्र यांनी ‘सारथी’च्या माध्यमातून झालेले सामाजिक काम, भविष्यामध्ये ‘सारथी’च्या माध्यमातून मराठा, कुणबी समाजाचा होणारा उद्धार त्याचे नियोजन अगदी नेमकंपणानं माझ्यासमोर ठेवलं.

सकाळी लवकर उठून ‘सारथी’चे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांची भेट घेण्याचं ठरवलं. काकडे सर (९८२२८०८६०८) यांनी दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो. बाहेर एक व्यक्ती झाडाला पाणी घालत होती. एकीकडे ते बगिचा साफ करत होते तर दुसरीकडे झाडांना पाणी घालत होते. ‘‘काकडे सरांचं घर इथंच आहे का?’’ असं मी त्यांना विचारलं, त्यांनी होकाराची मान हालवली. हातामध्ये असलेलं पाणी झाडांना घातलं. हात धुतले आणि डोक्याचा लावलेला रुमाल काढत त्यांनी हात पुसले. ते म्हणाले, ‘‘तुम्ही सकाळचे संदीप काळे का?’’ मी म्हणालो, ‘‘हो.’’ ‘‘या आतमध्ये. मीच काकडे.’’ मला काही क्षण आश्चर्य वाटलं. आम्ही आतमध्ये गेलो. काकडे सर यांच्या पत्नी शरदिनी नाश्ता घेऊन आल्या. त्यांनीही मला खुशाली विचारली. मी ‘सारथी’विषयी ऐकलं होतं. जो ‘सारथी’विषयी अभ्यास केला होता, त्याच्या पलीकडे जाऊन मला काकडे सरांनी ‘सारथी’चे अनेक पैलू सांगितले.

छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं ‘सारथी’ सुरू झाली त्या छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेसं काम इथं उभं राहिलंय. काकडे सरांनी काही पत्रं माझ्यासमोर ठेवली आणि ती मला वाचायला सांगितली. ती पत्र खूप भावनिक होती. कोणाच्या आई, वडील, बहिणीचं, कुण्या यशस्वी झालेल्या युवक- युवतींची ती पत्रे होती. तुम्ही ‘सारथी’च्या माध्यमातून मदत केली नसती तर माझ्या आयुष्याचं काय झालं असतं? काम करून शिकणं एवढं सोपं नव्हतं? योग्य वयात योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळ दिलं. काकडे सर तुम्हीच आई-बाबा झालात, असं त्या पत्रातला मजकूर सांगत होता. ती पत्रं नव्हती, तर लाखो यशस्वी झालेल्या तरुण मनांचा हुंकार होता. मराठा आणि कुणबी समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास व्हावा, या उद्देशाने २०१८ला सुरू झालेले सारथी प्रामुख्याने शेती करणाऱ्या मराठा, कुणबी समाजासाठी उपयोगाला आली. नांदेडला जिल्हा परिषदेमध्ये शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमामध्ये जबरदस्त कामगिरी केलेल्या आयएएस काकडे सर यांची मुद्दाम ‘सारथी’साठी निवड केली गेली.

नंतर मी आणि काकडे सर ‘सारथी’कडे निघालो. रस्त्याने जाताना पुन्हा काकडे सर ‘सारथी’च्या शाबासकीचा महिमा सांगत मला होते. मागच्या चार वर्षांत पाचशे एक्कावन तरुण एमपीएससी परीक्षेमध्ये अव्वल ठरले. तर या चार वर्षांमध्ये यूपीएससीमध्ये ८४ तरुणांनी जबरदस्त यश संपादन केलं. केंद्र शासनाच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पात्र ठरवूनही मेरीटमध्ये नंबर न लागणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘सारथी’ने हेरलं आणि त्यांच्या आयुष्याचा उद्धार केला. नववीपासून ते वयाच्या चाळीस वर्षांपर्यंत ‘सारथी’मध्ये कितीतरी प्रकारच्या शिक्षणासाठी मदत केली जाते. अनेक व्यक्ती, अनेक संस्था अनेक सामाजिक कार्यकर्ते ‘सारथी’च्या कामांमध्ये वेळ देत आहेत. परवा लागलेल्या एमपीएससी, यूपीएससीच्या निकालामध्ये बारा मुलं आयएएस झाले, तर अठरा मुली आयपीएस झाल्यात. आता ‘सारथी’ अजून विस्तार करत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह, प्रशिक्षण केंद्र यासाठी भर देत आहे. काकडे सर यांच्याकडे इतक्या यशोगाथा होत्या, इतके अनुभव होते की, ते एका लेखांमध्ये मांडणे मला शक्य नव्हतं.

रविवार असूनही आज ‘सारथी’ला काकडे सर यांना भेटण्यासाठी आलेली मुला-मुलींची संख्या कमी नव्हती. त्या मुला-मुलींमध्ये अनेक पालक असे होते की, ज्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यातल्या अनेकांनी हातामध्ये काकडे सरांच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी हार आणले होते. काकडे सरांनी ‘सारथी’मधून मला अनेक गरीब, शेतकरी, मजूर, वडिलांची मुलं असणाऱ्या आयपीएस, आएएस यांच्याशी माझं बोलणं करून दिलं. त्यांचं म्हणणं एकच होतं, ‘सारथी’ने मदत केली नसती तर आमच्या आयुष्यामध्ये हा सोन्याचा क्षण आला नसता. मी काकडे सरांचा निरोप घेऊन परतीच्या मार्गाला निघालो. काकडे सरांनी निघताना मला छत्रपती शाहू महाराज यांचे चरित्र भेट म्हणून दिले. पुस्तकाच्या कव्हरवरचे शाहू महाराज पाहून माझे डोळे पाण्याने भरून आले. त्या ‘सारथी’च्या प्रत्येक कामात मला शाहू महाराज दिसत होते. शासनाचा एखादा उपक्रम पिढ्यानपिढ्या प्रेरणा देणारा कसा असू शकतो, याचा सर्वोत्तम उदाहरण माझ्यासमोर ‘सारथी’ होते. शासनाचे अनेक प्रकल्प आहेत, त्यात प्रचंड पैसा असून काय करता? केवळ उपक्रम आहे, असं म्हणून चालत नाही, तर ते राबवणारे डोके सक्षम पाहिजे. काकडे सरांच्या माध्यमातून, त्यांच्या टीमच्या माध्यमातून ती सक्षमता तिथे मला दिसत होती. आपल्या अवतीभोवती पिढ्यानपिढ्यांचा उद्धार करणारे असे अनेक उपक्रम असतील, त्या प्रकल्पाला तुम्ही-आम्ही सगळ्यांनी हातभार लावणं गरजेचं आहे, बरोबर ना..!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.