पुणे-सातारा रोडवर वाल्हे नावाचं एक गाव आहे. या गावात पुणे जिल्ह्यात पहिल्यांदा संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, या मागणीसाठी लढा उभा राहिला होता.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि स्वातंत्र्य चळवळ यात योगदान देणारे पुणे-सातारा रोडवरचे वाल्हे गाव. याच गावातील नागरिकांनी १९५७ मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते रघुनाथराव पवार बापू यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला. ते विजयी झाले आणि आमदार म्हणून काम करताना त्यांनी लोकांचे साधे साधे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ दिला.
पुरंदर विधानसभा मतदारसंघात ते सायकलवरून फिरत. लोकांच्या अडचणी समजून घेत. अलीकडच्या काळात पदे मिळाली की माणसं बदलतात, मात्र रघुनाथ पवार यांनी त्यांच्या साध्या राहणीमानातून आपले कर्तृत्व सिद्ध केले, त्यांची ही गोष्ट...
पुणे-सातारा रोडवर वाल्हे नावाचं एक गाव आहे. या गावात पुणे जिल्ह्यात पहिल्यांदा संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, या मागणीसाठी लढा उभा राहिला होता. वाल्हे गावातील प्रत्येक घरातील माणूस या लढ्यात सहभागी होता. त्यापूर्वी या गावाने भारतीय स्वातंत्र्यलढ्यात असाच सहभाग नोंदवला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि स्वातंत्र्य चळवळ यात योगदान देणारे हे गाव.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईची हाक दिली आणि ती हाक वाल्हेच्या दिशेने आली. प्रत्येक माणसाला संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, असं वाटू लागलं. एका विचाराने प्रेरित होऊन हे गावकरी रोज वेगवेगळ्या मार्गानी आपला आवाज सरकार दरबारी पोहोचवू लागले होते. संपूर्ण पुरंदर तालुक्यात वाल्हे गाव आणि या गावची चळवळ याची चर्चा सुरू झालेली होती.
याचदरम्यान १९५७ची विधानसभा निवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे नेते रघुनाथराव पवार बापू यांनी उमेदवारी करावी, असा आग्रह लोकांनी धरला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात रघुनाथराव अग्रभागी होते.
त्यांनी या लढाईत स्वतःला झोकून दिले होते, त्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, असे त्यांच्या गावातील लोकांना वाटू लागले होतेच; पण संपूर्ण तालुक्यातही त्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह होता. तेव्हा काँग्रेस पक्ष बलवान होता, त्यांच्या उमेदवारापुढे लढणे म्हणजे आव्हान होते. पैशाचाही प्रश्न होता.
अनामत रकमेपासून सुरुवात करायची होती. त्या वेळी त्यांचे मित्र बारामतीचे उद्योजक नानासाहेब जगताप यांनी त्यांची अनामत रक्कम भरली. ते स्वतः बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते. त्यांनी अनेक उमेदवारांच्या अनामत रकमा भरल्या होत्या. रघुनाथराव पवार यांचे ते मित्र होते. त्यांनी अनामत रक्कम भरल्याने निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला.
या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीच्या उमेदवारांना सर्वत्र पाठिंबा मिळत होता. महाराष्ट्राच्या ग्रामीण मतदारसंघात संयुक्त महाराष्ट्र समितीकडून अनेक सामान्य कुटुंबातील उमेदवार उमेदवारी करत होते.
संयुक्त महाराष्ट्र समितीच्या चळवळीचे वलय असल्याने या सामान्य कुटुंबातील उमेदवारांना लोकांची साथ मिळत होती. वाल्हे मतदारसंघातही काँग्रेस उमेदवारांचा पराभव करत रघुनाथराव पवार आमदार झाले.
आमदार म्हणून काम करताना त्यांनी लोकांचे साधे साधे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ दिला. पुरंदर विधानसभा मतदारसंघात ते सायकलवरून फिरत. लोकांच्या अडचणी समजून घेत. रोजच्या रोज लोकांच्यात जाणे, त्यांच्या कैफियत ऐकणे, त्यावर मार्ग काढणे हे काम आमदार करत राहिले. मतदारसंघ मोठा होता, त्यामुळे अनेकदा दौऱ्यावर गेल्यावर मुक्काम करावा लागत असे.
कार्यकर्त्यांच्या घरी साध्या पद्धतीने ते राहत. आजच्यासारखी विश्रामगृहे त्या काळी नव्हती. गतीने पोहोचणारी वाहनेसुद्धा नव्हती. अशा वेळी मिळेल ते खाऊन राजकीय नेतेसुद्धा पुढील प्रवासाला जायचे. पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळात त्यांनी पुरंदर तालुक्यासाठी जे जे करता येईल, ते केले. त्याच वेळी त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा विचार गावागावात पोहोचवला. त्यांच्या तालुक्यात सगळ्या गावात या चळवळीचे लोण पोहोचले होते.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि विधानसभा निवडणूक यांच्या अगोदर रघुनाथराव पवार यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातसुद्धा मोठे योगदान दिले. ते शिकायला पुण्याला होते. स्वतंत्र चळवळीचे वारे जोरात होते. विद्यार्थी म्हणून शिकत असलेल्या रघुनाथ यांनी एक दिवस आपल्या शाळेवर तिरंगी झेंडा फडकवला.
चौकशी झाली तेव्हा त्यांनी कबुली दिली. मग त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले; पण देशप्रेमाने वेडे झालेल्या रघुनाथ यांना त्याचे काहीही वाटले नाही. मग ते गावाकडे गेले आणि त्या भागात ब्रिटिशांच्या विरोधात चळवळ उभारली. त्यांचे गाव पुणे जिल्ह्याच्या सीमेवर. पलीकडे सातारा जिल्ह्यात प्रतिसरकार चळवळ सुरू होती.
प्रतिसरकारच्या नेत्यांच्यावर तिकडे अटकेचे वॉरंट होते. त्या नेत्यांना वाल्हे भागातील अज्ञात ठिकाणी भूमिगत राहायला पवार यांनी मदत केली. पुढे त्याच चळवळीत सोबत असलेले क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी त्यांच्यासोबत विधानसभा सदस्य झाले. स्वतंत्र चळवळीतली मैत्री पुढे कायम राहिली.
स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झाल्यामुळे पवार यांना काही काळ तुरुंगवास भोगावा लागला. विद्यार्थी असताना शाळेवर झेंडा फडकवून त्यांनी या चळवळीत पाऊल ठेवले आणि पुढे तालुक्यातील अनेक गावात जाऊन त्यांनी ब्रिटिश राजवटीच्या विरोधात सभा घेतल्या. लोकांच्या मनात सरकारच्या विरोधात जनमत निर्माण केले. त्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला..
आमदारकीचा कार्यकाळ संपल्यावर ते सामाजिक काम करत शेती व्यवसायाकडे वळले. आपल्या सायकलीला खोरे, टिकाव अडकवून ते शेतात जात असत, हे चित्र अनेकांनी बघितले. जेव्हा ही गोष्ट एका पत्रकाराला समजली तेव्हा त्याने बातमी दिली. असा सायकलीवरून शेतात जाणारा आमदार पहायला लोक पुण्याहून वाल्हे गावी येऊ लागले.
ते आमदार नव्हते तेव्हा जसे राहात तसेच आमदार झाल्यावर आणि आमदारकी गेल्यावरसुद्धा तसेच राहत असत. सत्ता आल्यावरसुद्धा त्यांच्या राहण्यात काही बदल झाला नाही. पदे मिळाली की माणसं बदलतात; मात्र स्वातंत्र्य चळवळीनंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अखंड कार्यरत असलेल्या रघुनाथ पवार यांच्यात मात्र काहीही बदल झाला नाही.
महाराष्ट्रात नंतरच्या काळात बेरजेचे राजकारण सुरू झाले. या काळात त्यांना काँग्रेसकडून ऑफर आली. सत्तेतले पदे देण्याचे आश्वासन देण्यात आले; मात्र आपल्या मार्क्सवादी विचारावर निष्ठा असलेल्या पवार यांनी ऑफर नाकारत साधे जीवन जगणे पसंद केले. त्यांच्या दोन्ही मुलांनाही त्यांनी त्याच विचारासोबत राहा, असे सांगितले.
आज त्यांची दोन्हीही मुलं फत्तेसिंग आणि रणसिंग वडिलांच्या विचारासोबत आहेत. शेती आणि छोटा व्यवसाय करून आपला संसार चालवत आहेत. वडील आमदार होते, याचा त्यांना अभिमान आहे; मात्र इतर राजकीय वारसदारांच्यासारखा ते बडेजाव दाखवत नाहीत.
त्यांच्या आठवणी आजही गावकरी सांगतात. एकदा ते पुण्याहून गावाकडे एसटीने येत होते. गावातील अनेक प्रवासी गाडीत होते. त्या वेळी चालकाने मुद्दाम त्यांच्या गावात गाडी न थांबवता पुढे तीन-चार किलोमीटर नेली. गाडीत वयस्कर लोक होते.
महिला, छोटी मुलं होती. रघुनाथ पवार चालकावर चिडले. त्याला आपली ओळख सांगितली. तो माफी मागू लागला. तेव्हा त्याला गाडी परत घे आणि या लोकांना वाल्हेत सोड, असे सांगितले. गेलेली गाडी परत आली. अधूनमधून एसटीचा काही विषय आला की आजही वाल्हे स्टॅन्डवर बसलेले लोक आमदार बापूंनी परत आणलेल्या गाडीची आठवण काढतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.