Women's day 2021 : ‘डायन’ ठरविलेल्या तिला पोलिस म्हणतात ‘मॅडम सर’!

Chutani_Devi
Chutani_Devi
Updated on

Women's day 2021 : जगभरातील अनेक समाजांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा कमी करणाऱ्या अनेक कुप्रथा अद्यापही सुरु आहेत. अनेकदा त्याकडे दुर्लक्षच होते. काही निवडक लोक, संस्था मात्र त्याविरोधात लढण्यासाठी आयुष्य पणाला लावतात. झारखंडमधील छूटनी देवी या अशा निवडक लोकांपैकीच एक आहेत. महिलांना हडळ (डायन) ठरवून त्यांना मरेपर्यंत अपमानाचे जीणे जगायला लावणारी दुष्ट प्रथा झारखंडमध्ये काही भागांत प्रचलित आहे. स्वत: या कुप्रथेच्या बळी ठरलेल्या छूटनी देवी यांनी निर्धाराने त्याविरोधात लढा देऊन शेकडो महिलांना अपमानास्पद जगण्यातून बाहेर काढले. यासाठी भारत सरकारने त्यांना यंदा ‘पद्म’ सन्मान बहाल केला आहे.

छूटनी देवी यांना एका तांत्रिकाच्या सांगण्यावरून समाजाने हडळ ठरविले होते. त्यांना घरातून बाहेर काढून जमावाने मारपीट केली. या संकटात त्यांच्या नवऱ्यानेही साथ सोडली. अशा वेळी स्वत:चा जीव वाचविण्यासाठी त्यांनी मध्यरात्री नदी पार करून गाव सोडले आणि पुढील आठ महिने जंगलात झाडाखाली झोपडी बांधून राहिल्या. अशा वेळी पोलिसांचीही साथ मिळाली नाही. समाजाकडून मिळालेल्या या कठोर वागणूकीलाच आपली ताकद बनवत त्यांनी अत्याचारांविरोधात आपला आवाज बुलंद केला.

आपल्या सारख्याच परिस्थिती ओढवलेल्या महिलांना एकत्र करून त्यांनी संघटना बांधली आहे आणि तिच्या माध्यमातून त्या आवाज उठवितात. अशा घटनेची माहिती मिळताच त्या आपल्या पथकाला घेऊन तिथे दाखल होतात आणि तांत्रिक किंवा इतर आरोपींविरोधात तक्रार दाखल करून घेतात. पीडित महिलेला स्वत:बरोबर घेऊन जातात आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर महिलेच्या घरच्यांशी चर्चा करून, त्यांच्यावर काही अटी लादून तिची घरवापसी करतात.

‘डायन’ ठरविलेल्या ज्या छूटनी देवी यांना एकेकाळी पोलिसांचीही साथ मिळाली नव्हती, तेच पोलिस आज त्यांना ‘मॅडम सर’ असे आदराने संबोधतात. कोणतीही चूक नसताना घोर अपमानाचे विष पचविलेल्या छूटनी देवी यांना मान-सन्मानाचे फारसे कौतुक नाही. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी मरेपर्यंत काम करण्याची प्रबळ इच्छा मात्र त्यांच्या मनात आहे.

- संपादकीय लेख वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.