- विशाखा बाग
नॉर्वेमध्ये फिरताना सतत तुम्हाला निसर्गाचा आविष्कार अनेक ठिकाणी अनुभवायला मिळतो. मोठ्या क्रूजवरून समुद्र सफरीचा आनंद अवर्णनीय होता. ‘ट्रॅव्हल बकेट लिस्ट’मधली माझी क्रूज टूर साकार झाल्याने मी प्रचंड खूश होते. नॉर्वेमध्ये फिरताना सतत तुम्हाला निसर्गाचा आविष्कार अनेक ठिकाणी अनुभवायला मिळतो.
समुद्रातून मोठ्या क्रूजवरून फिरण्याचं सुख काही औरच असते. रॉयल कॅरेबियनच्या क्रूजवरून समुद्रात फिरताना मिळणारा आनंद अवर्णनीय होता. आजूबाजूला पसरलेला अथांग निळाशार समुद्र, दूरवर दिसणारे डोंगर आणि अंगाला झोंबणारा थंडगार वारा ही सगळी मजा अनुभवातूनच येते. ‘ट्रॅव्हल बकेट लिस्ट’मध्ये असलेली माझी ही टूर प्रत्यक्षात साकार झालेली बघून मला प्रचंड आनंद होत होता... तेही एवढ्या मोठ्या क्रूजवर सात दिवस घालवता येणं म्हणजे मी स्वतःला खरं तर नशीबवान समजत होते.
रॉयल कॅरेबियन क्रूजला एकंदरीत १६ डेक. तिसऱ्या ते पंधराव्या डेकपर्यंत प्रत्येक ठिकाणी स्टेट रूम्स म्हणजेच राहण्याच्या खोल्या असतात. त्याशिवाय या सर्व डेकवर सर्व वयोगटातील पर्यटकांच्या करमणुकीसाठी नानाविध गोष्टीही उपलब्ध होत्या. त्यामध्ये तिसऱ्या डेकवर कॅसिनो आणि म्युझिक हॉल, चौथ्या आणि पाचव्या डेकवर दीड हजार जण बसू शकतील,
असे रॉयल थिएटर, पब्ज, रेस्टॉरंट आणि दुकानं, सहाव्या डेकवर लायब्ररी अन् चौदाव्यापासून सोळाव्या डेकपर्यंत पर्यटकांसाठी मौजमजेची रेलचेल. दोन मोठे स्विमिंग पूल, जाकुझी, मोठ्या टीव्ही स्क्रीन, ओपन स्काय बार आणि रेस्टॉरंट, डिस्को थिएटर, जॉगिंग ट्रॅक, स्पा, जिम आणि मुलांसाठी फुटबॉल ग्राऊंड, व्हिडीओ गेम एरिया, रॉक क्लाइंबिंग वॉल अशी एक नाही तर अनेक ठिकाणं मन रमवायला तिथे होती.
इंग्लंडहून निघाल्यानंतर नॉर्वेपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून पूर्ण दोन दिवस आपण फक्त नॉर्थ सी किंवा युरोपियन वॉटरमधून सेलिंग करत असतो आणि त्यामुळेच या सर्व सोयी-सुविधा पर्यटकांसाठी आवश्यक असतात. त्याशिवाय प्रत्येक ओपन डेकवर बसण्यासाठी म्हणून आरामदायी सोफे, खुर्च्या असतात. मला तरी तिथेच बसून निळ्याशार समुद्राकडे बघत पुस्तक वाचायला प्रचंड आवडत होतं आणि ती जागा मी पुस्तक वाचण्यासाठी म्हणून खरोखरच एन्जॉय केली. अथांग समुद्राकडे अनेक तास बघत बसलं तरीसुद्धा मन तृप्त होत नाही, हे मात्र खरं.
सकाळी उठून सोळाव्या डेकवरच्या जॉगिंग ट्रॅकवर समुद्र बघत एक तास फिरायचं आणि त्यानंतर चौदाव्या डेकवर पुन्हा समुद्राकडे बघतच मस्त कॉन्टिनेन्टल ब्रेकफास्ट करायचा, असा जवळपास आमचा सहा दिवसांचा कार्यक्रम ठरला होताच. अथांग पसरलेलं, स्वच्छ नितळ निळं पाणी, त्यावर पडलेली नॉर्वेजियन फिऑडस् म्हणजेच डोंगरांची प्रतिबिंब, डोंगरांच्या मधूनच पाण्यावर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाची तिरीप हे दृश्य खरोखरच अविस्मरणीय होतं. नॉर्वेमध्ये फिरताना सतत तुम्हाला निसर्गाचा आविष्कार अनेक ठिकाणी अनुभवायला मिळतो.
बघता बघता आम्ही नॉर्वेपर्यंत येऊनसुद्धा पोहोचलो. आमचं पहिलं ठिकाण होतं नॉर्वेमधलं क्रिस्तियन सेंड हे समुद्राकाठी असलेलं निसर्गरम्य आणि सुबत्तापूर्ण गाव. रिसॉर्ट टाऊन म्हणूनही ते पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. गावाची अर्थव्यवस्था इथे असणाऱ्या मुख्यतः बियरच्या आणि आईस्क्रीमच्या फॅक्टरीवर अवलंबून आहे.
पर्यटनस्थळ असलेल्या या गावात ओपन एअर म्युझियम आहे जिथे साधारण पंधराव्या शतकापासून लोकवस्ती आणि त्यांची घरं कशी होती, हे दाखवलं आहे. मिनिएचर स्वरूपातील क्रिसियन सेंड हे गावसुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळतं. आखीवरेखीव पद्धतीने वसवलेलं हे गाव पेस्टल कलरमधल्या लाकडी घरांसाठी प्रसिद्ध आहे. पुढचं नॉर्वेमधलं आमचं ठिकाण होतं ओलेसुंड नावाचं पोर्ट टाऊन.
हे गाव एक व्यापारी बंदर आहे; परंतु त्याचबरोबर इथे व्यापारी आणि मोठी मोठी प्रवासी जहाजसुद्धा येत असतात. अतिशय उत्तम आणि प्रचंड मोठा अन् सोयी-सुविधांनी सुसज्ज असा धक्का किंवा पोर्ट इथे जहाजांसाठी बांधलेलं आहे. मासेमारीसाठीसुद्धा प्रसिद्ध असलेल्या गावाची लोकसंख्या फक्त ६६ हजार आहे.
नॉर्वेचं अफलातून निसर्गसौंदर्य न्याहाळत आम्ही येऊन पोहोचलो फ्लाम या गावाला. आमचं क्रूज धक्क्याला लागल्या लागल्या हे गाव पाहून तर मी पहिल्याच नजरेत त्याच्या प्रेमात पडले. चारही बाजूंनी डोंगराच्या कुशीत असलेलं, इतक्या सुबक आणि शिस्तबद्ध रीतीने वसवलेलं हे टुमदार गाव एका स्वप्नातलंच वाटत होतं.
समुद्राच्या काठावर असलेल्या या गावात मोठी नदी आहे, नदीच्या आजूबाजूला मोठे रस्ते, बागा, झोपडीवजा असलेली मोठी लाकडी घरं, गावाच्याच मागे दिसणारे डोंगर आणि त्यामधून वाहणारे धबधबे, एका बाजूला लांब वर दिसणारी हिरवीगार कुरणं हे चित्र अजूनही डोळ्यासमोरून जात नाही. छोट्याशा असणाऱ्या या गावाची लोकसंख्या फक्त पाचशे आहे; पण दरवर्षी साडेचार लाख पर्यटक या गावात येत असतात.
हे गाव तर बघण्यासारखं आहेच; पण तुम्ही इथे वीस किलोमीटर लांब चालणाऱ्या फ्लाम सीनिक रेल्वेमध्ये बसून एक चक्करसुद्धा मारू शकता. दिवसभर अशा अनेक ठिकाणी फिरून आल्यानंतर संध्याकाळी क्रूजवर आपल्यासाठी वेगवेगळे म्युझिकल शो, ऑर्केस्ट्रा आणि मॅजिक शो यांसारख्या कार्यक्रमांची मेजवानी तयारच असते. हे सगळे कार्यक्रम आपल्या तिकिटामध्येच समाविष्ट असतात; परंतु त्यासाठी आपल्याला वेळेवर तिथे पोहोचावं लागतं.
स्विमिंग पूल, जाकुझी यांसारख्या गोष्टींची मजा तर आम्ही घेतलीच; पण इथे एक अफलातून गोष्ट आम्ही केली आणि ती म्हणजे क्लोज स्काय डायव्हिंग. स्काय डायव्हिंग सिम्युलेटरमध्ये एक विशिष्ट प्रकारचा सूट घालून आपण आतमध्ये जातो आणि वाऱ्याच्या प्रचंड झोतावर आकाशात तरंगल्याचा अनुभव घेतो. ॲडव्हेंचर स्पोर्टस् असणारी ही गोष्ट सगळेच जण करू शकतात, असं नाही.
क्रूजवरचे आमचे सात दिवस कसे भर्रकन निघून गेले हे कळलंसुद्धा नाही. नॉर्वेचं अनोखं निसर्गसौंदर्य पाहत आणि क्रूजची लक्झरी, उत्तम जेवण आणि करमणूक हे सगळं अनुभवत असतानाच पुन्हा एकदा इंग्लंडला येऊन पोहोचलो.
तुमच्याकडेसुद्धा युके आणि युरोप असे दोन्ही व्हिसा असतील, तर ही ट्रीप करायला तुम्हाला नक्कीच आवडेल. नॉर्वेचं निसर्गसौंदर्य अनुभवायला समुद्रावरची ही सफर करायलाच हवी.
gauribag7@gmail.com
(लेखिका वित्त सल्लागार आणि कॉर्पोरेट ट्रेनर आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.