Entrepreneurship : उद्योजकीय नवीनता (इनोव्हेशन) आणि शोध (इन्व्हेन्शन)

इनोव्हेशनमध्ये साधारणपणे केलेल्या गुंतवणुकीची वसुली ही तीन वर्षांत व्हावी. चौथ्या व अंतिम टप्प्यात ही सुधारणा राबवण्यासाठीची योजना आखायला हवी.
investment business startup entrepreneurial Innovation and Invention
investment business startup entrepreneurial Innovation and Inventionsakal
Updated on

- डॉ. गिरीश जाखोटिया

इनोव्हेशनमध्ये साधारणपणे केलेल्या गुंतवणुकीची वसुली ही तीन वर्षांत व्हावी. चौथ्या व अंतिम टप्प्यात ही सुधारणा राबवण्यासाठीची योजना आखायला हवी. एकूण लागणारा वेळ, जबाबदारीची निश्चिती, बाजारातील प्रतिसाद तपासण्याची पद्धती, स्पर्धकांशी करायची तुलना आदी गोष्टी या योजनेत समाविष्ट होतात.

‘अमूल’ ही शेतकऱ्यांच्या सहकारी क्षेत्रातील भारतीय कंपनी आणि अमेझॉन ही सेवाक्षेत्रातील अमेरिकी कंपनी ‘उद्योजकीय इनोव्हेशन’ची उत्तम व सुपरिचित उदाहरणं आहेत.

तुम्ही सातत्यानं नवीन काही केल्याशिवाय बाजाराचं नेतृत्व मिळत नाही व ते तुम्ही नीटपणे टिकवूही शकत नाही. तुमचे प्रतिस्पर्धी हे तुमच्या वर्तमान बलस्थानांना (कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजला) नेहमीच आव्हान देत राहतात व तुमच्याही पुढं जाण्याचा प्रयत्न करत असतात.

यासाठी प्रॉडक्ट्स, प्रोसेसेस व पीपल (कर्मचारी) या तीन प्रमुख घटकांमध्ये सुधारणा (इनोव्हेशन) किंवा संशोधनात्मक मोठा बदल (इन्व्हेन्शन) हा नियमितपणे आणावाच लागतो.

इनोव्हेशन म्हणजे अस्तित्वात असणाऱ्या गोष्टीत केलेली सुधारणा. यासाठी कॉपीराईट घेता येतो. इन्व्हेन्शन म्हणजे नवा मूलभूत शोध लावणं. यासाठी पेटंट मिळू शकतं. अगदीच प्राथमिक इनोव्हेशन म्हणजे पाच टक्के सुधारणा. पन्नास टक्के सुधारणेला मध्यम इनोव्हेशन म्हणता येईल. ‘ब्रेक थ्रू इनोव्हेशन’ ही ९० टक्के सुधारणा असते.

ही इन्व्हेन्शनच्या अगदी जवळ जाणारी असते. असं इनोव्हेशन खूप अवघड असतं; परंतु ते बाजारातील आपलं वर्चस्व भक्कम करतं. आपल्या प्रॉडक्टची जाहिरात, किमतीचं धोरण, खर्च कमी करणं, नवे प्रकल्प, उत्पादन व विक्रीक्षेत्र इत्यादी अनेक बाबतींत इनोव्हेशन शक्य असतं.

इनोव्हेशनचे महत्त्वाचे दहा फायदे असे मिळू शकतात :

१. बाजाराचं नेतृत्व, २. कर्मचाऱ्यांचं बौद्धिक व व्यावसायिक समाधान, ३. उद्योगाचं ब्रँडिंग, ४. प्रक्रियांमधील सुधारणेमुळे प्रॉडक्टच्या गुणवत्तेत सुधारणा, ५. खर्चात बचत, ६. कॉपीराईट्स व पेटंट्सच्या मालकीमुळे आंतरराष्ट्रीय करारमदार व उद्योगाच्या व्हॅल्युएशनमध्ये वाढ, ७. विविध प्रक्रियांच्या सिनर्जीमधील वाढ,

८. नव्या उद्योगांचं बीजारोपण, ९. जाहिरातीमधील नावीन्यामुळे नव्या ग्राहकांची व बाजारपेठांची बांधणी, आणि १०. इनोव्हेशनच्या संस्कृतीमुळे अडचणींवर मात करण्याची सहज तयारी. अर्थात्, हे फायदे मिळवण्यासाठी उद्योगाचं बिझनेस मॉडेल, मूल्यसाखळी, संस्थेची रचना आदी स्थायी गोष्टींमध्येही वेळोवेळी बदल करावे लागतात.

उदाहरणार्थ : कालच्या जुन्या खानावळीतील चविष्ट पारंपरिक पदार्थ हे आजही विकायचे असतील तर एकविसाव्या शतकातील हॉटेलची सुधारित रचना अंगीकारावी लागेल व पदार्थांचं सादरीकरणही सुधारावं लागेल.

इनोव्हेशनच्या संपूर्ण प्रक्रियेत चार टप्पे (किंवा चार उपप्रक्रिया) असतात. पहिला टप्पा हा एक ‘बिहेविअरल प्रोसेस’ असते. म्हणजे, अमुक एखाद्या गोष्टीत सुधारणा होऊ शकते अशी आपली स्वतःची धारणा पक्की व्हायला हवी.

यासाठी बाजारातील अन्य प्रयत्नांचा मागोवा घेत आपलं पुढचं पाऊल ठरवावं लागतं. इनोव्हेशनचा दुसरा टप्पा हा सर्वाधिक महत्त्वाचा असतो. याला आपण ‘क्लिनिकल प्रोसेस’ असं म्हणू शकतो.

सुधारणेची जी कल्पना आपल्याला सुचते तिचं सूक्ष्म असं प्रक्रियात्मक मूल्यमापन काटेकोरपणे करावं लागतं. तांत्रिक दृष्टीनं आपली कल्पना ही अचूक असायला हवी व तिनं खरी नवीनता प्रदान करायला हवी.

अमूर्त कल्पनेचं रूपांतरण मूर्त अशा सुधारणेत व्हायला हवं. सुधारणेचा पक्का आराखडा ठरला की तिसऱ्या टप्प्यात तिचं आर्थिक मूल्यमापन केलं पाहिजे. सुधारणा राबवण्यासाठी भांडवली खर्च व नियमित खर्च किती होईल व अशा सुधारणेचा उद्योजकीय फायदा किती असेल याचं एक ‘कॉस्ट बेनिफिट ॲनॅलिसिस’(सीबीए) काळजीपूर्वक करायला हवं.

अन्यथा एखादी उत्तम सुधारणा ही वरवर फायदेशीर वाटते; परंतु वास्तवात ती तशी नसल्यानं आपल्या संसाधनांची मोठी नासाडी होऊ शकते. कल्पकता ही नवीनतेला जन्म देते. नवनव्या उद्योजकीय कल्पना या विविध स्रोतांमधून मिळवाव्या लागतात; किंबहुना ‘इनोव्हेशन’ ही प्रत्येक उद्योजकीय संस्थेची संस्कृती असायला हवी.

यासाठी अद्ययावत असं ‘इनोव्हेशन सेंटर’ तयार करायला हवं. तिथं वर नमूद केलेल्या चारही प्रक्रियांची अंमलबजावणी होत राहील. या सेंटरमध्ये अनुभवी वरिष्ठांची ‘ॲडव्हायझरी कौन्सिल’ असावी. ती बाहेरील तज्ज्ञांच्या ज्ञानाचा लाभ करून देईल. सेंटर चालवण्यासाठी तरुण कर्मचाऱ्यांची ‘एक्झिक्युटिव्ह कौन्सिल’ असावी.

उद्योजकीय फायद्याच्या उत्तम कल्पना मिळवण्यासाठीचे दहा स्रोत असे असू शकतात : १. ग्राहक, २. स्पर्धक, ३. पुरवठादार, ४. वितरक, ५. बँकर्स, ६. तरुण कर्मचारी, ७. निवृत्त कर्मचारी, ८. संशोधकीय संस्था, ९. सरकारी अधिकारी, १०. प्रकाशित साहित्य व सल्लागार.

उपयोगी कल्पनांसाठी कर्मचाऱ्यांना कॉपीराईट अथवा पेटंट मिळवून देण्याची व्यवस्था कंपनीनं राबवायला हवी. उत्तम कल्पनेसाठी बक्षीस, बढती, पगारवाढ आदी गोष्टी हुशार कर्मचाऱ्यांना प्रदान केल्या पाहिजेत. दर वर्षी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचं ‘लक्ष्य’ देताना उत्तम कल्पकतेचंही परिमाण वापरायला हवं.

उद्योगाची वाटचाल सुरू असताना वेगवेगळ्या टप्प्यांवर विविध प्रकारच्या इनोव्हेशनची गरज असते. उदाहरणार्थ : नव्या उद्योगाचं टेक ऑफ करताना संतुलन राखण्यासाठीच्या कल्पना हव्या असतात. विशिष्ट असा मोठा आकार प्राप्त केल्यानंतर बाजाराचं नेतृत्व करण्याची महत्त्वाकांक्षा असायला हवी. ती उत्तम कल्पकतेनं फलद्रूप होऊ शकते.

अलीकडच्या ऐतिहासिक कालखंडातील ‘इनोव्हेशन’चं उत्तम प्रशासकीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजीमहाराजांचं स्वराज्य. नागरी व्यवस्थापन, शेतसाऱ्याची आखणी, शेतकऱ्यांसाठीच्या योजना, सागरी आरमार, व्यापार व चलनाचं व्यवस्थापन आदी अनेक उदाहरणं छत्रपती शिवाजीमहाराजांच्या कल्पक व्यवस्थापकीय दृष्टिकोनाची देता येतील. ही इनोव्हेशनची परंपरा मराठ्यांनी अगदी एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत जपलेली होती.

आजच्या व्यवस्थापकीय भाषेत संघटना (ऑर्गनायझेशन) व संस्था (इन्स्टिट्यूशन) या दोहोंमधील गुणात्मक फरक हा इनोव्हेशनमुळे बनतो. जगातील बहुतेक सार्वकालीन ‘ग्रेट’ कंपन्या या सातत्यानं व हिरीरीनं इनोव्हेशन करत आल्या आहेत.

अशा संस्था अंतिमतः मोठ्या आदरणीय ‘संस्था’ बनतात. आयबीएम ही माहिती तंत्रज्ञानक्षेत्रातील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनी पुढील पंचवीस वर्षांसाठी लागणाऱ्या संशोधनाची पेटंट्स आजच प्राप्त करते. यामुळे तिला आपली दूरगामी व्यूहात्मक वाटचाल ठरवता येते.

बरेच छोटे व मध्यम आकाराचे भारतीय उद्योजक हे काळाची पावलं ओळखत वेळच्या वेळी इनोव्हेशन वापरत नाहीत आणि आपलं बिझनेस मॉडेल बदलत नाहीत. छोटी हॉटेलं, कापडगिरण्या, प्रेक्षागृहं, मिठाईची दुकानं, सलून, पिठाच्या गिरण्या, फर्निचर तयार करणारे व विकणारे उद्योग आदी अनेक छोटे-मोठे उद्योग हे गेल्या दोन दशकांत इनोव्हेशनच्या अभावी बंद पडले.

कोणत्याही इनोव्हेशनला आपण चार प्राथमिक कसोट्या लावल्या पाहिजेत :

  • ते दूरगामी स्वरूपाचं आहे का?

  • ते उद्योजकीय फायद्याचं आहे काय?

  • ते अंमलबजावणी करण्यास सोपं आहे का?

  • आणि, ते कंपनीच्या सांस्कृतिक चौकटीत बसतं काय?

बऱ्याच वेळा तरुण कर्मचारी किंवा तरुण भागीदार हे अत्यंत उत्साहानं नव्या कल्पना मांडतात; परंतु त्यांना या कल्पनांची कमर्शिअल वैधता तपासण्याची जाणीव नसते. प्रत्येक इनोव्हेशनच्या सोबतीनं थोडा धोका हा संभवतोच.

त्याचं एका जाणिवेनं व्यवस्थापन करावं लागतं; परंतु याबाबतीत उद्योजकीय कुटुंबांतील पिता-पुत्रांमध्ये किंवा वरिष्ठ व कनिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. इनोव्हेशनच्या बाबतीतली अनिश्चितता ही सुरुवातीला एक मोठी समस्या असते; परंतु विस्तृत अभ्यासानं, विम्याच्या संरक्षणानं व तज्ज्ञांसोबत केलेल्या भागीदारीनं ही अनिश्चितता बरीच कमी करता येते.

उद्योजकीय कुटुंबांतील मुलांना लहानपणापासूनच कल्पकता जोपासण्याची सवय लावली गेल्यास इनोव्हेशनच्या चारही प्रक्रिया ते नंतर लीलया हाताळू शकतात. कोणत्याही कंपनीतील इनोव्हेशनची संस्कृती ही मुख्यत्वे कंपनीच्या मालकांनी जोपासायची असते! पुढील भागात आपण पाहणार आहोत : ‘महिलांचं व मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचं योगदान’.

(लेखक हे व्यवस्थापकीय, उद्योजकीय व वित्तीय सल्लागार असून, देशात व परदेशांत त्यांनी विविध विषयांवर दोन हजारांहून अधिक व्याख्यानं दिलेली आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.