अवकाशातलं विक्रमी शतक

ISRO launches 104 satellites, India hails world record
ISRO launches 104 satellites, India hails world record
Updated on

एकाच उड्डाणात तब्बल १०४ उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण करून भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं (इस्रो) बुधवारी (ता. १५) नवा इतिहास घडवला. अमेरिका, रशिया या अवकाश संशोधनातल्या दिग्गजांनाही जे जमलं नव्हतं, ती कामगिरी भारतानं करून दाखवली. ‘कार्टोसॅट-२’ या महत्त्वाच्या उपग्रहाबरोबर इतर देशी-परदेशी उपग्रह अवकाशात झेपावले. या विक्रमी मोहिमेसाठी कशा प्रकारचं तंत्र अवलंबण्यात आलं, या मोहिमेमुळं भारताला काय फायदे होणार, वेगवेगळ्या उपग्रहांचं वैशिष्ट्य काय, भविष्यात काय गोष्टी होऊ शकतात आदींचं विश्‍लेषण.

भारतीय अवकाशशास्त्राच्या दृष्टीनं बुधवारचा (ता. १५) दिवस ऐतिहासिक ठरला. या दिवशी सकाळी साडेनऊच्या सुमारास भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं (इस्रो) एकाच उड्डाणात तब्बल १०४ उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण करून इतिहास रचला. या आधी एप्रिल २००८मध्ये एकाच वेळी दहा, तर जून २०१६मध्ये एकाच उड्डाणात २० उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात आलं होतं. एकाच अग्निबाणाच्या उड्डाणातून सर्वाधिक ३७ उपग्रह प्रक्षेपित करण्याचा जागतिक विक्रम रशियाच्या नावावर होता. त्या खालोखाल नासातर्फे एकाच वेळी २९ उपग्रह अवकाशात पाठविण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर भारतानं शतकी खेळी करून स्वतःची ‘दादा’गिरी दाखवून दिली.  
इस्रोच्या पोलर सॅटेलाइट लाँच व्हेईकल (पीएसएलव्ही) या अत्यंत भरवशाच्या रॉकेटचं एकोणचाळीसावं उड्डाण होतं. सर्व १०४ उपग्रहांना अवकाशामध्ये ध्रुवीय कक्षेत सुमारे ५०४ किलोमीटर उंचीच्या कक्षेत अचूकपणे सोडण्यात आलं. या कक्षेत पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला उपग्रहांना ९४.७२ मिनिटं लागतात. ५०४ किलोमीटर उंचीपर्यंत सर्व उपग्रहांना नेण्यासाठी पीएसएलव्हीला केवळ १७ मिनिटं लागली आणि त्यानंतर त्याच्या चवथ्या ‘स्टेज’नं १०४ उपग्रहांना कक्षेत सोडण्याचं काम बारा मिनिटांत यशस्वीपणे पूर्ण केलं. पहिल्यांदा प्रक्षेपित करण्यात आलेल्या उपग्रहाची पृथ्वीभोवतीची एक फेरी पूर्ण व्हायच्या आत बाकीचे १०३ उपग्रह अवकाशात सोडणं आवश्‍यक असतं. नाही तर तो उपग्रह इतर उपग्रहांना धडकू शकतो. त्याचप्रमाणं एकानंतर एक सोडण्यात आलेले उपग्रह एकमेकांना धडकणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागते. कल्पना करा- एका रस्त्यावर शंभर वाहनं ताशी २५ हजार किलोमीटर या वेगानं जात आहेत! खरं आव्हान एकमेकावर धडकून होणारे अपघात टाळण्याचं असतं. एका उड्डाणातून अनेक उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याचं तंत्रज्ञान अत्यंत क्‍लिष्ट असतं. त्यांच्या मुक्ततेची वेळ, ठिकाण, दिशा, प्रक्षेपणाचा कोन आणि प्रत्येक दोन उपग्रहांमधील अलग होण्याचा अवधी पराकोटीच्या अचूकतेनं निश्‍चित करणं आणि प्रत्यक्षात तसं घडवून आणणं हे महाकठीण काम असते. यासाठी उपग्रहांना टप्प्याटप्प्यानं, वेगवेगळ्या दिशांत आणि भिन्न-भिन्न वेगानं मुक्त करणं हाच एक उपाय असतो. अवकाशात फिरणाऱ्या दर दोन उपग्रहांमधलं अंतर कमीत कमी सहा किलोमीटर राहील, याची खबरदारी घेण्यात आली होती. यासाठी साऱ्या १०४ उपग्रहांची बरोबर मांडणी करण्याचं कामही अत्यंत कौशल्याचं होतं. भारतानं याविषयीचं तंत्रज्ञान पूर्णपणे आत्मसात केलेलं आहे. त्यामुळं कमीत कमी वेळेत अशा प्रकारच्या आव्हानात्मक मोहिमा यशस्वीपणे अंमलात आणणं भारताला शक्‍य होतं. या मोहिमेसाठी भारताच्या ‘आयआरएनएसएस’ किंवा ‘नाविक’चा (भारताची जीपीएस प्रणाली) महत्त्वपूर्ण उपयोग झाला.

अवकाशातला २९ मिनिटांचा थरार
बुधवारी श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अवकाश केंद्रातल्या उड्डाण मंचावरून ‘पीएसएलव्ही-सी ३७’ रॉकेटनं सकाळी बरोबर ९ वाजून २८ मिनिटांनी १०४ उपग्रहांसह अवकाशतळ सोडला. म्हणजे ‘लिफ्ट-ऑफ’ नेहमीप्रमाणंच यशस्वी झाला आणि त्याचं उत्कंठापूर्ण जल्लोषात स्वागत झालं. चार स्टेजेसच्या, तीनशे टन वजनाच्या, ४४ मीटर इंचीच्या (सुमारे १४ मजली इमारतीएवढ्या उंचीच्या) महाकाय रॉकेटच्या पहिल्या स्टेजला अधिक बळकट करण्यासाठी त्याच्याभोवती सहा छोटे अग्निबाण (स्ट्रॅप-ऑन-बूस्टर्स), पहिली स्टेज आणि दोन बूस्टर्स प्रज्वलित झाले होते. जोडी-जोडीनं २५ सेकंदांमध्ये सहाही बूस्टर्स प्रज्वलित झाले आणि आपलं काम व्यवस्थित करून क्रमाक्रमानं १ मिनीट ३२ सेकंदांमध्ये ते विलग होऊन बंगालच्या उपसागरात गळून पडले. त्यानंतर वीस सेकंदांनंतर पहिली स्टेज विलग होऊन पुढच्याच सेकंदात अचूकपणे दुसरी स्टेज प्रज्वलित झाली आणि तिनं पुढच्या उड्डाणाचा ताबा स्वतःकडं घेतला. त्यानंतर तीन मिनिटांत रॉकेटला नियोजित उंचीवर नेण्याचे काम करून दुसरी स्टेज विलग झाली आणि एखाद्या ‘रिले रेस’प्रमाणं पुढच्या उड्डाणाचं ‘बॅटन’ तिनं तिसऱ्या स्टेजकडं दिलं! अशा प्रकारे उड्डाण क्रिया अचूकपणे पुढं जात राहिली आणि ‘लिफ्ट-ऑफ’नंतर बरोबर १६ मिनिटं ४७.८० सेकंदांमध्ये रॉकेटच्या चौथ्या स्टेजनं १०४ उपग्रहांना ५०९ कि.मी. उंचीवर नेले. त्यानंतर उपग्रहांना अवकाशात प्रक्षेपित करायच्या क्रियेला सुरवात झाली आणि पुढच्या ११ मिनिटं ३० सेकंदांत १०४ उपग्रहांना यशस्वीपणे कक्षेत सोडण्याचं काम पूर्ण झाले. पीएसएलव्ही रॉकेटनं पुन्हा एकदा आपलं काम चोखपणे बजावलं होतं! कोणताही उपग्रह अवकाशात फिरता ठेवायचा असेल, तर त्याला प्रतिसेकंद सात किलोमीटर एवढी ‘व्हेलॉसिटी’ द्यावी लागते. हे काम रॉकेटचं असतं. रॉकेटची चौथी स्टेज पृथ्वीभोवती फिरत राहते. अवकाशात भ्रमण करताना तिच्यात राहिलेल्या इंधनाचा अपघाती स्फोट होऊन कचऱ्यात वाढ होऊ नये म्हणून त्यामध्ये उरलेलं इंधन रिकामं करावं लागतं. हा आंतरराष्ट्रीय अवकाश समितीचा नियम असतो.
या उड्डाणात सोडण्यात आलेल्या १०४ उपग्रहांपैकी ‘कार्टोसॅट-२ डी’ हा मुख्य उपग्रह ७१४ किलो वजनाचा आहे आणि बाकीच्या १०३ सहयात्री उपग्रहांचं मिळून एकूण वजन ६६४ किलो आहे. सहप्रवासी १०३ उपग्रहांपैकी दोन छोटे उपग्रह ‘आयएनएस (इस्रो नॅनो सॅटेलाइट) १-ए’ आणि ‘आयएनएस-१ बी’ भारतीय आहेत आणि बाकीचे १०१ छोटे उपग्रह परदेशी आहेत. त्यामध्ये अमेरिकेचे ९६ उपग्रह आहेत आणि नेदरलॅंड्‌स, स्वित्झर्लंड, इस्रायल, कझाकिस्तान आणि संयुक्त अरब आमिरात या देशांचा प्रत्येकी एक उपग्रह आहे.

मुख्य उपग्रह 
‘कार्टोसॅट- २’ मालिकेतला पाचवा उपग्रह, हा ‘पीएसएलव्ही- सी ३७’ या रॉकेटद्वारे सोडण्यात आलेल्या उपग्रहांमधला मुख्य उपग्रह आहे.
‘कार्टोसॅट-१’ हा या मालिकेतला पहिला उपग्रह ५ मे २००५ रोजी सोडण्यात आला. याआधी भारतानं अनेक सुदूरसंवेदन (रिमोट सेन्सिंग) करणारे उपग्रह सोडले आहेत. देशाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची माहिती या प्रकारच्या उपग्रहांमुळं मिळू शकते. या दूरसंवेदक उपग्रहांमुळं एक दशलक्ष ते १२५००ः१ या रेंजच्या स्केलमध्ये माहिती मिळते. मात्र, याहीपेक्षा मोठ्या स्केलमधल्या नकाशांची; तसंच भूपृष्ठावरची उंच-सखलता दाखवणाऱ्या नकाशांची गरज भासू शकते. ‘कार्टोसॅट’ मालिकेतले उपग्रह अशा प्रकारची माहिती पुरवू शकतात. त्यांच्यावर असलेल्या संवेदकाद्वारे स्टिरिओस्कोपिक, त्रिमिती (थ्री डी) चित्रं आणि छोट्या लांबीच्या व्हिडिओ क्‍लिप्स मिळू शकतात. प्रत्येक उपग्रहाबरोबर त्याची रेझोल्युशन क्षमता (भूभागावरील किती लहान आकाराची वस्तू उपग्रह अचूकतेने टिपू शकतो ती क्षमता) सुधारत आहे. ०.६ मीटरपेक्षाही लहान आकाराच्या वस्तू आता आपले उपग्रह ओळखू शकतात.
कार्टोसॅट उपग्रहीय माहिती, सुदूरसंवेदक उपग्रहीय माहिती आणि जिओग्राफिकल इन्फर्मेशन प्रणाली यांचं एकत्रीकरण करून भारताला अनेक सेवा मिळत आहेत. यामध्ये शहरांचं; तसंच ग्रामीण भागातल्या सेवांचं नियोजन, किनारपट्टीच्या उपयोगांचं नियोजन; रस्त्यांच्या उपयोगासाठीचे नकाशे तयार करणं अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो.

लष्करी उपयोग
विश्‍वसनीय सूत्रांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, ‘कार्टोसॅट २ सी’ उपग्रहाकडून मिळालेल्या हाय-रेझोल्युशन चित्रांचा लाइन ऑफ कंट्रोलपलीकडे (एलओसी) जाऊन सर्जिकल स्ट्राइकसाठी उपयोग करण्यात आला. लष्करी कारणासाठी उपग्रहीय माहितीचा उपयोग करण्याची ती पहिली घटना होती. भारताच्या अवकाशातून देखरेख करण्याच्या; तसंच शत्रूच्या टापूतल्या हालचालीवर नजर ठेवण्याच्या क्षमतेला कार्टोसॅट उपग्रहांनी निश्‍चितच प्रभावी केलं आहे.

सूर्यसमकालीन कक्षा
‘कार्टोसॅट-२ डी’ उपग्रहाला सूर्यसमकालीन (सन सिंक्रोनस) ध्रुवीय कक्षेत सोडण्यात आलं. या कक्षेतल्या भूनिरीक्षण करणाऱ्या उपग्रहांचं वैशिष्ट्य असं, की प्रत्येक दिवशी उपग्रह पृथ्वीवरच्या कोणत्याही एका बिंदूवरून जातो तेव्हा सूर्याचं ठिकाण, पृथ्वी आणि उपग्रह यांच्या तुलनेत बरोबर तेच असतं. दूरसंवेदक (पृथ्वीनिरीक्षक) उपग्रहांसाठी ही अतिशय उपयुक्त गोष्ट आहे. तो उपग्रह पृथ्वीवरचा तो विशिष्ट बिंदू जेव्हा पाहतो, त्या वेळी सूर्यप्रकाश त्या बिंदूवर दर प्रदक्षिणेत त्याच ठराविक कोनातून पडतो. त्याला ‘सूर्य-वेळ’ म्हणता येईल. अर्थातच ही क्रिया उपग्रहाच्या नजरेत येणाऱ्या प्रत्येक दृश्‍याच्या बाबतीत घडते. याचा उपयोग ज्या भूभागातल्या क्षेत्रांमध्ये आपल्याला माहितीची आवश्‍यकता आहे (एरिया ऑफ इंटरेस्ट), त्यांच्यामध्ये काळाप्रमाणं होणाऱ्या बदलांची अचूक माहिती मिळण्यासाठी होतो.

सहप्रवासी भारतीय उपग्रह 
‘पीएसएलव्ही-सी ३७’ रॉकेटनं ‘कार्टोसॅट’ या मुख्य उपग्रहाबरोबर ‘आयएनएस १ ए’ आणि ‘आयएनएस- १ बी’ या दोन भारतीय लघुउपग्रहांनाही अवकाशात सोडलं. ‘आयएनएस’ ही लघुउपग्रहांसाठी एक अष्टपैलू (versatile) आणि मॉड्युलर पद्धती आहे. यामुळं उपग्रहांच्या उपयोगात लवचिकता आणि बांधणीत प्रमाणीकरण (स्टॅंडर्डायझेशन) असे दुहेरी उपयोग होणार आहेत. याचा भविष्यात शास्त्रीय आणि प्रायोगिक पेलोड (उपग्रहाचं जीवित कार्य करणारं उपकरण) अवकाशात सोडण्यासाठी उपयोग होईल.
‘आयएनएस-१ ए’ या उपग्रहाचं वजन ८.४ किलो असून, त्यावर दोन विज्ञान-संशोधक पेलोड्‌स बसवण्यात आले आहेत. हे दोन्ही पेलोड्‌स इस्रोच्या अहमदाबाद इथल्या ‘स्पेस 
स्पेस ऍप्लिकेशन्स सेंटरनं (सॅक) बनवलेले आहेत.

‘आयएनएस १ बी’ या उपग्रहाचं वजन ९.७ किलो असून, याचा पेलोडही ‘सॅक’नं बनवला आहे. नवीन प्रकारची लेन्स-असेंब्ली डिझाइन करून यामध्ये कॅमेरा बसवण्यात आला आहे. त्यामुळं छोट्या उपग्रहाच्या साह्यानं (पृथ्वीची) हाय-रेझोल्युशन रंगीत छायाचित्रं मिळू शकतील.

‘फ्लॉक-३ पी डोव्ह सॅटेलाइट्‌स’
अमेरिकेच्या ‘प्लेन लॅब्स’ या कंपनीनं बनवलेले ८८ उपग्रह एका वेळेला दोन या उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. हे उपग्रह १०० छोट्या उपग्रहांच्या तांड्याचा भाग होते. याआधी जून २०१६मध्ये १२ उपग्रह ‘पीएसएलव्ही’तर्फे सोडण्यात आले होते. या शंभर छोट्या उपग्रहांच्या मदतीनं सबंध पृथ्वी व्यापणारी अशी छायाचित्रं दररोज मिळू शकतील. सुदूरसंवेदक १०० उपग्रहांचा समूह म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं जाळं आहे. त्यांचं नियंत्रण पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रस्थापित करण्यात आलेल्या एकूण ३० भूकेंद्राद्वारे होईल.

‘लेमूर-२’
अमेरिकेतल्या ‘स्पाईर-ग्लोबल’ या कंपनीचे आठ छोटे उपग्रह या मोहिमेत प्रक्षेपित करण्यात आले. या उपग्रहांद्वारे महासागरातल्या मोठ्या बोटींवर नजर ठेवण्यात येईल. मोठ्या बोटींची सुरक्षिततेविषयक माहिती इन्शुअरन्स कंपन्यांना मिळू शकेल; तसंच चाचेगिरीविरोधी उपाययोजना करता येईल. त्याचबरोबर अचूक हवामान अंदाज वर्तवणं या उपग्रहांमुळं शक्‍य होईल.

इतर देशांतले उपग्रह
पीआस्स (PEASS) : पिझो-इलेक्‍ट्रिक असिस्टेड स्मार्ट सॅटेलाइट स्ट्रक्‍चर (PEASS) हा तीन किलो वजनाचा नेदलॅंडसने बनविलेला नॅनो सॅटेलाइट आहे. नवीन तंत्रज्ञानाचा विकास करणे आणि त्याचे अवकाशात मूल्यमापन करणे हा या उपग्रहाचा मुख्य उद्देश आहे.
डिडो-२ (DIDO) : स्वित्झर्लंडच्या ‘स्पेस फार्मा’ कंपनीनं तयार केलेला ४.२ किलो वजनाचा हा नॅनो सॅटेलाइट आहे. इतके दिवस ‘बायोकेमिकल’ या क्षेत्रातलं अवकाशातलं संशोधन फक्त ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’मध्येच करणं शक्‍य होतं आणि ते अतिशय खर्चिक होतं. ‘डिडो-२’ या छोट्या उपग्रहामध्ये सूक्ष्म गुरुत्वाकर्षण अवस्थेतलं ‘बायोकेमिकल’ संशोधन शक्‍य होणार आहे. या उपग्रहामधल्या मायक्रोस्कोपद्वारा घेण्यात येणारी छायाचित्रं भूकेंद्राकडं पाठवली जातील. ज्यांचा संशोधकांना उपयोग होईल.
बीजीयू सॅट : इस्राईलच्या एरोस्पेस इंडस्ट्रीजनं बेन गुरिऑन युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्यानं बनवलेला ४.३ किलो वजनाचा हा उपग्रह आहे. याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना उपग्रहनिर्मितीचा अनुभव मिळावा हा आहे. 
‘अल्‌- फराबी १’ : हाही कझाकस्तानमधील अल्‌-फराबी कझाक नॅशन युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला १.७ किलो वजनाचा छोटा उपग्रह आहे. याचा उद्देश वातावरणातल्या रेडिएशन्सची चित्रं घेणं आणि त्यांचं मापन करणं हा आहे. 
‘नायिफ-१’ : दुबईमधलं मोहंमद बिन रशीद स्पेस सेंटर आणि अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ शारजा यांनी मिळून बनविलेला हा ११ किलो वजनाचा उपग्रह आहे. हा संयुक्त अरब आमिरातीकडून बनवण्यात आलेला पहिला उपग्रह असून, तो अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी बनवला आहे. संयुक्त अरब आमिरातीवर हा उपग्रह दिवसातून दोन वेळा भ्रमण करेल. ‘ऍमेच्युअर' रेडिओ कम्युनिकेशन’साठी त्याचा उपयोग होईल.

परदेशी उपग्रहांच्या प्रक्षेपणाला वाढती मागणी
आतापर्यंत इस्रोनं प्रक्षेपित केलेल्या परदेशी उपग्रहांची संख्या १७५च्या वर आहे. उत्तम गुणवत्ता, विश्‍वासार्हता आणि तुलनात्मकदृष्ट्या कमी खर्च या घटकामुळे विशेषतः लघुउपग्रहांच्या प्रक्षेपणाची मागणी वाढत आहे. बुधवारी इस्रोनं केलेल्या जागतिक विक्रमामुळं ही मागणी आणखी वाढेल यात शंका नाही.

वेगळेपण 
‘मल्टिपल सॅटेलाइट’ सोडण्याचं तंत्रज्ञान आपल्याला तसं नवीन नाही. याआधी भारताने एका उड्डाणात दहा आणि दुसऱ्यांदा एका उड्डाणात २३ उपग्रह सोडलेले आहेत. त्याच्याशिवाय अनेक उपग्रह वेगवेगळ्या कक्षेत सोडण्याचं तंत्रज्ञानही इस्रोनं आत्मसात केलं आहे. बुधवारच्या मोहिमेसाठी मोठ्या संख्येनं उपग्रह सोडण्यासाठी इस्रोला इतक्‍या सगळ्या उपग्रहांची रॉकेटच्या वरच्या स्टेजमध्ये मांडणी करण्याचं विशेष कौशल्य दाखवावं लागलं. त्यासाठी खास ‘सेपरेशन सिक्वेन्स’ कल्पकतेनं, अवकाशात उपग्रह एकमेकांना धडकणार नाहीत यासाठी त्यांच्या प्रक्षेपणाचा कोन, वेग, दिशा यांमध्ये अचूक बदल करणं इत्यादी गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण होत्या. या मोहिमेसाठी अंदाजे खर्च १३० ते १५० कोटी. त्यापैकी निम्मा खर्च परदेशी उपग्रह सोडल्यामुळे भरून निघणार.

पुढचा प्रवास
पाचशे किलोपेक्षा अधिक वजनाचे उपग्रह बनवण्यास खर्च जास्त येतो. त्यांच्या प्रक्षेपणाचा खर्चही वाढतो. अर्थात त्यांची सेवा पुरविण्याची क्षमता अधिक असते. शिवाय त्यांची आयुर्मर्यादाही १५ वर्षांपर्यंत असू शकते. त्याउलट ‘नॅनो सॅटेलाइट’ची म्हणजे दहा किलोपर्यंत वजनाच्या उपग्रहांची आयुर्मर्यादा सहा महिन्यांची किंवा एक वर्षांची असते; पण त्यांचे फायदे म्हणजे खूपच कमी खर्च (पाच कोटींच्या आसपास), लवकर बनवता येणं आणि नवीन कल्पनांचा प्रत्यक्ष अवकाशातल्या अवस्थेत प्रयोग करणं हे होत. या गोष्टीमुळं जगातल्या बऱ्याच देशांत ‘नॅनो सॅटेलाइट’ची संकल्पना वाढू लागली आहे. भारताच्या उपग्रह प्रक्षेपणाची उच्च कोटीची विश्‍वासार्हता आणि कमी खर्च यांमुळं लघुउपग्रह प्रक्षेपणाच्या बाजारपेठेत भारताला अग्रणी स्थान घेता येईल. शिवाय ‘जीएसएलव्ही’ हे भारताचं अधिक शक्तिमान असं रॉकेट लवकरच कार्यान्वित होईल. त्यामुळं भविष्यात भारत स्वतःचे मोठ्या वजनाचे उपग्रह; तसंच इतर देशांचे अधिकाधिक ‘नॅनो सॅटेलाइट’ प्रक्षेपित करू शकेल. अर्थात ‘नॅनो सॅटेलाइट्‌स’चे फायदे असले तरी, त्यांच्या वाढत्या प्रक्षेपणामुळं अवकाशातल्या कचऱ्याच्या समस्येची चिंता हाही भविष्यात एक महत्त्वाचा विषय असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.