परीक्षेचा काळ आलाय...कसे वाढवायचे मनोबल

exam
exam
Updated on

सर, मी परीक्षेत पास होईन याची मला खात्री नाही. सर रिव्हिजन करायला सुरुवात केली, पण काहीच आठवत नाही.
सर, मी वर्षभर खूप अभ्यास केला होता. त्यावेळी झालेल्या युनिट टेस्टमध्ये मला खूप चांगले मार्क्‍स होते. पण, आता झालेल्या टेस्ट एक्‍झाममध्ये सर्व पेपर्स वाईट गेले. आताच ही परिस्थिती आहे तर परीक्षेत काय होईल? सर आधी रोज सहा-सहा तास अभ्यास केला. आता परीक्षा अगदी जवळ आली आहे. पण, अर्धा तासदेखील कॉन्स्ट्रेशन टिकत नाही.
10 वी व 12 वी च्या परीक्षेला केवळ एक महिना उरलेला असताना मला भेटलेल्या विद्यार्थ्यांची ही वाक्‍ये. जे प्रत्यक्ष भेटलेत, ज्यांनी उपचार घेतलेत, ज्यांच्यापैकी अनेकांमध्ये फक्त आठ दिवसांत आत्मविश्वास परत आला. नव्या उत्साहाने ते अभ्यासाला लागलेत.
जसजशी परीक्षा एकेका दिवसाने जवळ येते, तसतसे विद्यार्थ्यांचे व पालकांचे टेंशन वाढत जाते. हे टेंशन जर विशिष्ट मर्यादेच्या आत असेल तर या काळात अधिक चांगला अभ्यास होतो. वाचलेले अधिक चांगले लक्षात राहते. मनाची एकाग्रता वाढते. थोडीशी चिंता असते. पण, आत्मविश्‍वास त्यापेक्षा जास्त असतो. त्यामुळे परफॉर्मन्स सुधारतो. चांगले मार्क्‍स मिळतात.
पण, मनावरचा ताण व चिंता खूप वाढली तर मात्र परिणाम उलटा होऊ लागतो. आणि लेखाच्या सुरुवातीला लिहिलेली वाक्‍ये विद्यार्थी बोलायला लागतात. मनात नकारात्मक विचारांची मालिका सुरू होते. माझी बुद्धी, स्मरणशक्ती चांगली नाही. मला काहीच जमत नाही. मी कूचकामी आहे. नालायक आहे. मी माझ्या पालकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. मला डॉक्‍टर व्हायचे आहे, पण साधा कारकून होण्याचीदेखील माझी लायकी नाही. मी माझ्या पालकांचा पैसा वाया घालवतो आहे, असे विचार एकदा मनात सुरू झाले की, हिनत्वाची कमकुवतपणाची भावना मनात निर्माण होते. नैराश्‍य येते. विद्यार्थ्यांचे मनोबल कमी होते. त्याचा सरळ सरळ परिणाम अभ्यासावर होतो. पुस्तक हातात धरावेसे वाटत नाही. अभ्यास करणे मुले लांबणीवर टाकतात. अभ्यास टाळण्यासाठी कारणे शोधायला लागतात. झोपेचे प्रमाण बरेच वाढते. जास्त वेळ टीव्ही समोर घालवतात. सुप्त मनाने ताण कमी करण्यासाठी शोधलेल्या त्या पळवाटा आहेत. एकीकडे अभ्यासाची टाळाटाळ होत असताना आपण खूप अभ्यास केला पाहिजे, आपले टाळाटाळ करणे चुकीचे आहे, हे कळत असते. त्यामुळे मनातील हिनत्वाची भावना आणखी वाढते. परफॉर्मन्स आणखी कमी होतो.
अशा समस्या निर्माण झाल्यावर खरे तर पालकांनी मुलांची समस्या समजून घेणे गरजेचे असते. त्यांच्याशी बोलून त्यांना धीर देणे, त्यांचे मनोबल वाढवणे हे काम पालक खूप चांगले करू शकतात. गरज भासल्यास तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकतात. पण, असे होत नाही. मुलगा फालतु नाटक करतो, मायबापाची कदर नाही, पैशाची कदर नाही, आळशी आहे, नको ते धंदे पोराला जास्त सुचतात, बिनडोक आहे, असे बोलून मुलाचे आणखी खच्चीकरण करतात. काही पालक बोलत नाहीत. स्वतः हतबल होतात. कारण या परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा हे त्यांना माहीत नसते.
अशा समस्या घेऊन ज्यावेळी पालक माझ्याकडे येतात, त्यावेळी विद्यार्थ्यांशी बोलायच्या आधी पालकांना ही समस्या, त्याची कारणे, त्यांची नेमकी भूमिका आधी समजावून सांगावी लागते. नकारात्मक बोलणे, टोमणे मारणे आधी पूर्णपणे बंद करा, यासाठी कन्व्हिन्स करावे लागते. पालकांनी जर हे पथ्य पाळले तर ते अर्धी लढाई इथेच जिंकतात.
मुलांना कौन्सिलिंग करून रिलॅक्‍सेशन, पॉझिटिव्ह थिंकिंग, फास्ट रिव्हिजन करण्याच्या पद्धती शिकवून साधारण एका आठवड्याच्या उपचारानंतर मुलांचा आत्मविश्‍वास बराच वाढतो व ते नव्या जोमाने, नव्या उत्साहाने अभ्यासाला लागतात.
ताणतणाव खूप वाढलाय ही समस्या असताना यातून बाहेर पडायचा मार्ग आहे. हे जर माहीत नसेल तर खूप हुशार विद्यार्थी असूनसुद्धा त्याचे बोर्डाच्या परीक्षेतील परसेंटेज कमी होतात. काही मुले नापास होतात किंवा ड्रॉप घेतात. एकदा अपयश आले की, पुढच्या आयुष्यात हीच समस्या आणखी बिकट होत जाते व त्यातून बाहेर पडताना आपल्या करिअरमधील उमेदीची वर्षे वाया जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.