खेळ ‘सेंद्रिय’ शब्दाचा !

शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या एका व्हॉट्सॲप ग्रुपवर काही दिवसांपूर्वी सेंद्रिय शेतीबाबत चर्चा सुरू होती. या ग्रुपमध्ये मी देखील आहे.
Organic Agriculture
Organic AgricultureSakal
Updated on

शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या एका व्हॉट्सॲप ग्रुपवर काही दिवसांपूर्वी सेंद्रिय शेतीबाबत चर्चा सुरू होती. या ग्रुपमध्ये मी देखील आहे. चर्चेदरम्यान ग्रुपमधील एका सदस्याने सेंद्रिय शेतीबद्धल माहिती देत, सध्या तोच एक कसा एकमेव उपयुक्त मार्ग आहे, असे सांगणारा एक व्हिडिओ पोस्ट केला. या पोस्टनंतर ग्रुपमधील काही शेतकरी अस्वस्थ झाले आणि ‘सेंद्रिय’ या शब्दाचा, विशेषत: शेतीबाबत कसा दुरुपयोग केला जात आहे, यावरून ग्रुपमध्ये चर्चा सुरू झाली. यात सामील असलेल्या एकाने विचारले की, फक्त शेतकऱ्यांनीच का म्हणून तंत्रज्ञानाचा वापर न करता पारंपरिक शेतीलाच चिकटून रहावे ? या वेळी त्याने मनातला उद्वेग व्यक्त करताना, सेंद्रिय शेतीचा सल्ला देणाऱ्यांनी मोटार आणि विमानाचा प्रवास टाळावा, असे खोचक आवाहन केले. ‘जी मंडळी शेतीसाठी तंत्रज्ञान किती चुकीचे असल्याचे सांगतात, तेच जगभरात विमानाने प्रवास करत सेंद्रिय आणि पारंपरिक शेतीवर भाषण ठोकतात आणि बक्कळ पैसे कमावतात. हे लोक कसे आहेत, हे आम्हाला चांगले ठाऊक आहे,’ असे सांगण्यासही तो विसरला नाही. ते पुढे म्हणतात, प्रत्यक्षात आपल्या आयुष्यावर विज्ञानाने सर्वांगीण परिणाम केला आहे. आपल्याला पुढे नेण्यास हातभार लावला आहे. यास कृषी क्षेत्रही अपवाद नाही. भारतातील कृषी क्षेत्रातही व्यापक बदल होत आहेत. देशात विपुल प्रमाणात असलेला अन्नधान्याचा साठा ही अभिमानाची बाब ठरत आहे. शेतकऱ्यांच्या कष्टातून या गोष्टी साध्य होत असून विज्ञान, तंत्रज्ञान आणि धोरणांमुळे हे शक्य होत आहे.

प्रत्यक्षात संपूर्ण जग पर्यावरणपूरक होण्याची तयारी करत असून अनेक प्रकारे लोक आपल्या प्राचीन रूढींकडे वळत आहेत. अर्थात, शाश्‍वत व पर्यावरणपूरक शेती आणि केवळ विज्ञानाच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी ‘सेंद्रिय’ शब्दाचा गैरवापर करणे, यात फरक आहे.

यासाठी उदाहरण पाहू. एखादा माणूस आजारी पडला, तर तो औषधे आणि उपचारातून बरा होतो. त्याचप्रमाणे पिकाला जेव्हा कीड लागते, तेव्हा पिकाची काळजी घेणे गरजेचे आहे. कीड रोखण्यासाठी वापरण्यात येणारे कीटकनाशके सेंद्रिय असो किंवा असेंद्रिय असो, पिकाची देखभाल महत्त्वाची आहे. या ठिकाणी कीटकनाशके वापरण्याचा प्रश्‍न येत नाही तर, त्याचा होणारा बेसुमार वापर हा खरा मुद्दा आहे. ज्या रीतीने औषधाचा अतिवापर हा शरीराला हानिकारक ठरतो, त्याचप्रमाणे रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर केल्यास पिकांची हानी होते तसेच परिसरातील वातावरणही दूषित करते. एवढेच नाही तर या कीटकनाशकांचा माणसांवरही दुष्परिणाम झाला आहे. म्हणूनच कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानांवर खापर फोडण्यापेक्षा त्याचा संतुलित वापर करणे गरजेचे आहे.

आपण पुन्हा ‘सेंद्रिय’ शब्दाच्या चर्चेकडे वळू. एक व्यापारी मला अभिमानाने एक माहिती देत होता की, खाद्य विक्री करणारे माझे साधे दुकान होते. मी केवळ माझ्या दुकानाच्या नावात ‘सेंद्रिय’ शब्द जोडला आणि माझा नफा वाढला. कारण ग्राहक ''सेंद्रिय'' शब्दाखातर जादा पैसे देण्यासाठी तयार आहेत. जागतिक पातळीचा विचार केल्यास दरवर्षी सेंद्रिय खाद्य उद्योग हा दहा टक्क्यांनी वाढत आहे आणि सेंद्रिय पदार्थ सुमारे ४० टक्क्यांपर्यंत महाग आहेत. पण आता या शब्दाचा गैरवापर एवढा वाढला आहे की, आपण कपड्यांपासून ते छोट्या वस्तूंपर्यंत, एवढेच नाही तर खाद्यपदार्थांतही सेंद्रिय या शब्दांचा बिनदिक्कत वापर होत आहे.

सेंद्रिय ही प्रक्रिया वातावरणातील जैवविविधता जपण्यासाठी मदत करते. वनस्पती, माती, पदार्थ, सभोवतालचे वातावरण निकोप ठेवण्याचे काम करते. भारत सरकारच्या राष्ट्रीय सेंद्रिय शेती केंद्राने (नॅशनल सेंटर फॉर ऑर्गेनिक फार्मिंग) सेंद्रिय शेती विकसित करण्यास प्राधान्य दिले आहे. कोणत्याही रासायनिक प्रक्रियेचा आणि द्रव्याचा वापर न करता पौष्टिक, सुरक्षित आणि आरोग्यदायी धान्योत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. आपण सेंद्रिय पदार्थ कसा ओळखायचा? भारताचा विचार केल्यास, आपल्याला त्या वस्तूवर ‘जैविक भारत’ हे नाव आणि त्याचा लोगो आहे का नाही, हे पहावे लागेल.

सेंद्रिय पदार्थांना मान्यता देण्याची एक मानक प्रक्रिया आहे. त्यात लागवड, साठवणूक, प्रक्रिया, पॅकेजिंग एवढेच नाही त्याची निर्यात, याचे निकष दिले आहेत. तसेच सेंद्रिय पदार्थाचे प्रमाणीकरण करणारी पीजीएस-इंडिया नावाची पद्धत असून ती सेंद्रिय असल्याचे प्रमाणपत्र प्रदान करते. याव्यतिरिक्त त्रयस्थ संस्थेकडून मूल्यांकन करण्याची सोय असून त्यानुसार सेंद्रिय प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. म्हणूनच, कृपया आकर्षक मथळ्यांना हुरळून न जाता किंवा संबंधितांकडून स्वत:हून केलेल्या दाव्यांना भरीस न पडता वरील संस्थांची मान्यता आहे की नाही, ते पहा.

विशेष म्हणजे जगात सर्वाधिक सेंद्रिय शेती करणारे शेतकरी भारतात आहेत. सेंद्रिय शेतीच्या लागवडीखालील जमिनीच्या बाबतीतही भारताचा जगात दहावा क्रमांक लागतो. अर्थात देशाची गरज वाढत असताना सेंद्रिय शेतीचा पर्याय हा कठीण मार्ग असू शकतो. सेंद्रिय शेती स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांना सुरवातीच्या काळात नुकसान होण्याची शक्यता असते आणि त्याची भरपाई करून देण्याची सोय देखील उपलब्ध नाही. सेंद्रिय शेतीसाठी पर्यावरण पूरक खते आणि कीटकनाशकांचा वापर करावा लागतो. अर्थात या उत्पादनाची गुणवत्ता आणि निकषाची पडताळणी आपल्याकडे बाल्यावस्थेत आहे. तसेच त्याची बाजारातून खरेदी खिशाला परवडणारी नाही. तसेच पशुपालनाची जोड आणि पोषक वातावरण असल्याशिवाय शाश्‍वत सेंद्रिय शेती ही शेतकऱ्यांना परवडणारी नाही, आणि ती आणखी कठीण ठरू शकते.

संपूर्ण देशाचे पोट सेंद्रिय शेतीच्या आधारे भरणे शक्य आहे काय? सध्याच्या काळात ही बाब अशक्य वाटते. पारंपरिक शेतीच्या पद्धतीप्रमाणे लोकांची गरज भागवण्यासाठी मुळातच कमी उत्पादकक्षमता असलेल्या सेंद्रिय शेतीला आणखी जमीन लागणार आहे. यासाठी श्रीलंकेचे उदाहरण घेऊ. काही वर्षांपूर्वी श्रीलंकेतील शेतीने सेंद्रिय पद्धत स्वीकारली. शेतीत रासायनिक पदार्थ वापरण्यावर संपूर्णपणे बंदी घालण्यात आली. तेव्हापासून श्रीलंकेत अन्नधान्याची मोठी टंचाई निर्माण झाली आणि मोठे आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे. याबाबत जगभरात बरीच चर्चा झाली आहे. यातून एक बाब स्पष्ट झाली की, सेंद्रिय पद्धतीकडे व्यावहारिक पातळीवर आणि सखोल दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. केवळ एका रात्रीतून ‘सेंद्रिय’ पद्धतीचे अनुकरण करून फायदा मिळणार नाही.

आरोग्य आणि पोषणाचा विचार केल्यास पारंपरिक आणि सेंद्रिय अन्न उत्पादन यांच्यात असलेला फरक हा एखाद्या चर्चेचा विषय आहे. संशोधनाची दिशा आणि अभ्यास कोणत्या पद्धतीने केला जातो, यावरही चर्चा अवलंबून असते. भारतातही सेंद्रिय शेतीवर अभ्यास करण्यात आला असून हिमालयीन क्षेत्रात दीर्घकाळ केलेल्या संशोधनातून काही सकारात्मक परिणाम पहावयास मिळाले. यात मातीचे आरोग्य, भाजीपाल्यांची गुणवत्ता आणि सकसपणा, तसेच दर्जेदार उत्पादन यात फरक आढळून आला. परंतु अशा प्रकारची शेती विकसित होण्यासाठी बराच काळ लागू शकतो.

आपण परत विज्ञान विरुद्ध सेंद्रिय या चर्चेवर परत येऊ. एखाद्या शेतकऱ्यासाठी शेती ही दर्जेदार, शाश्‍वत, हमखास उत्पन्न देणारी असावी लागते. कारण हा एक व्यवसाय आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला आणखी काही गोष्टींची गरज आहे आणि ती म्हणजे धोरण, तंत्रज्ञान आणि पारंपरिक पद्धतीचे तार्किक अनुकरण. या आधारावर अन्नधान्याची गरज भागवता येईल. पृथ्वीला पर्यावरणपूरक ठेवताना सेंद्रिय किंवा शास्त्रीय शेती यापैकी एकाची निवड करताना गोंधळून जाण्याची गरज नाही. कारण त्याचा एकत्रित अमल करता येणे शक्य आहे.

(सदराच्या लेखिका कृषिक्षेत्राच्या अभ्यासक असून रिलायन्स फाउंडेशनमध्ये त्या काम करतात, लेखातील मते त्यांची वैयक्तिक आहेत.)

(अनुवाद : अरविंद रेणापूरकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()