- डॉ. जयश्री फडणवीस
आदिमानवापासून ते आजच्या प्रगत मानवापर्यंतचा प्रवास आपण बघितला, तर आपल्या लक्षात येईल, की माणसाची बौद्धिक क्षमता, सर्जनशीलता व नावीन्याची ओढ व गरज यातून अनेक शोध लागत गेले व आजही लागत आहेत.
असे एकही क्षेत्र नाही, की जेथे सर्जनशीलता व नावीन्याची गरज नाही, ऑटोमोबाईल, टेक्नॉलॉजी, फार्मसीपासून ते मॉर्डन फर्निचरपर्यंत.
अंतराळात भरारी मारायला हवी, या कल्पनेचा जन्म होताच रॉकेटचा शोध लागला, चंद्रवरही यान गेले, मानव जाऊन थडकला. आपले शैक्षणिक क्षेत्र; तसेच करमणुकीचे क्षेत्रही सर्जनशीलतेवरच विकसित होत असते. दूरदर्शनच्या काळातील सिद्धार्थ बसू यांच्या सामान्य ज्ञानावर आधारित ‘क्विझ टाइम’ने समस्त शाळकरी विद्यार्थ्यांना वेड लावले, तर सध्या अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ने जनसामान्यांना वेड लावले. म्हणूनच आपल्यातील सर्जनशीलता आणि नावीन्यपूर्णता विकसित करायला हवी. ती करता येते.
कुतूहल
मनातील कुतूहल सतत जागृत ठेवा. खूप सारे प्रश्न विचारा. जमेल तिथे, जमेल तेव्हा सतत नवीन अनुभव घेत राहा. भरपूर प्रवास करा. ‘केल्याने देशाटन येई शहाणपण.’ आजूबाजूच्या परिस्थितीचे बारकाईने अवलोकन करा. त्यातून सर्जनशीलतेचा विकास होऊ लागेल, नवीन कल्पना सुचतील. नावीन्य जन्म घेईल.
मनाची लवचिकता व खुलेपण
प्रत्येक नवीन अनुभवाचा, गोष्टीचा खुल्या मनाने स्वीकार करा. त्यातील कल्पकता व त्यामागील दृष्टिकोन याचा खोलवर विचार करा. या सर्वांत अनिश्चितता असणारच आहे, हे पण समजून घ्या. एकाच गोष्टीला चिकटून न राहता नवीन पर्यायांचा विचार करा. नावीन्याचा विचार करताना मनाची लवचिकता महत्त्वाची. कोणतीही आडमुठे धोरण नसलेले बरे.
विचारमंथन
आपल्या क्षेत्रातील विविध चर्चासत्रांमध्ये भाग घ्या. त्यामध्ये आपल्या संपूर्ण टीमचा सहभाग असू द्या. विषय कदाचित एकच असेल; पण सर्वांच्या विचारमंथनातून अनेक संकल्पनांचा जन्म होईल. त्यासाठी टीमला मुक्त संवादास प्रोत्साहित करा. कोणत्याही प्रकारच्या ताण-तणावाखाली ते असू नयेत, याची काळजी घ्या. संवादातील विश्वासार्हता वाढवून सभोवताली सुरक्षित वातावरण निर्माण करा.
भिन्न विचार (Divergent thinking)
एखादी वस्तू किंवा विचार घेऊन त्याचा किती पद्धतीने वापर करता येईल, सर्जनशीलता वापरून कसे फुलवता येईल या शक्यतांचा विचार करणे. एका विचारातून दुसऱ्या विचारांची विकसित होत जाणारी श्रुंखला. उदा. मुंबईला जायचंय!.. मग कधी जायचे? कशाने जायचे? गाडीने गेल्यास किती वेळ? विमानाने गेल्यावर किती, तर बसने गेल्यावर काय?... या सर्व विचारांत आपल्याला आवडणारा, परवडणारा पर्याय कोणता? हे शोधणे. अशा भिन्न विचारप्रक्रियेकरता ‘mind mapping’ करणे उपयोगी ठरते.
प्रेरणा
शक्य असल्यास आपल्या घरी अथवा ऑफिस स्वतःचा छानसा छोटासा स्टुडिओ बनवा किवा एखादा सुंदर कोपरा बनवा. आयुष्याला समृद्ध करणारे अनुभव घेण्याकरता स्वतःला थोडा निवांत वेळ द्या. जिथे तुमच्या सर्जनशीलतेला वाव मिळेल. कधी ते पुस्तकातून, मित्रांमधून अथवा संगीतातून मिळेल. कोपऱ्यात ठेवलेल्या सुंदरशा फुलदाणीतून मिळेल, तर कधी एखाद्या निरागस बालकाच्या हास्यातून मिळेल. कोणतीही आपल्या आवडीची एखादी कला विकसित करा. या सर्वांतून निर्माण होणाऱ्या संप्रेरकांमधून विचारांना चालना मिळेल.
अपयश ही यशाची पहिली पायरी
कोणतेही अपयश खुल्या मनाने स्वीकारा. ते का आले याचा सखोल विचार करा. त्यातूनच नवीन शिकत जाण्याची संधी मिळेल. आव्हाने स्वीकारणे, धोका पत्करून एखादी कृती करणे ही सर्जनशीलतेचीच एक बाजू आहे. सर्जनशीलता आणि नावीन्य मानवी जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. यांच्या संयोगातून माणसाचे व्यक्तिमत्त्व विकसित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.