मलताईला गाणी गुणगुणायची खूप सवय होती. ती सतत तिच्या आवडीची गाणी, अभंग गुणगुणत असे. विमलताईकडे मी राहायला आल्यापासून मला सकाळी उठणं क्रमप्राप्त होतं. ताईचं घर माझ्या घरापासून फार दूर नव्हतं. एकाच वसाहतीत आम्ही राहत होतो. सकाळी पाच वाजता ताई मला उठवायला सुरुवात करायची. मी मात्र उठायला खूप आळस करीत असे. डोक्यावर पांघरूण घेऊन, ‘अजून थोडावेळ झोपू दे’ म्हणत मी वेळ काढत असे. सकाळची भूपाळी, ‘उठा उठा हो सकळीक... वाचे वदावा गजमुख...’ हे ती नित्यनेमाने म्हणत असे. कधी कधी त्याच्याऐवजी ताई ‘उठा उठा हो अवघे जण’ असं म्हणत असे. असं म्हणताक्षणीच मी म्हणत असे, की ‘ठेवा कॉफीचे आधण’... ताईला कॉफी खूप आवडायची. मी शाखा संपताच कधी कधी ताई शाळेतून यायच्या वेळी तिच्या घरी जाऊन तिला हवी तशी गरम गरम कॉफी बनवून ती आल्यावर कप तिच्या हातात देत असे. मला त्यातून खूप समाधान मिळे.
मी सकाळी लवकर उठून अभ्यास करावा, मला शिस्त लागावी म्हणून ताईने माझ्याकडून वेळापत्रक करून घेतलं आणि ते भिंतीवर लावून ठेवलं. नेहमीप्रमाणे सेवादलात जाणं माझं सुरूच होतं. शाळेत जाणं असेल, नंतर कॉलेजला जाणं असेल, या सगळ्याचं ताई टाइमटेबल लिहून ठेवायची. ताईने माझ्यावर खूप माया केली. ती भाऊच्याऐवजी मला बऱ्याचदा ‘भावड्या’ म्हणत असे.