- जुही चावला मेहता
मोबाईलमुळे हवेमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पृथ्वीच्या नैसर्गिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींमध्ये बाधा येते. त्याचा धोका जीवसृष्टीला होतो.
मागच्या लेखात मी बॅरी ट्रॉवर यांच्या मुलाखतीबाबत तुम्हाला सांगितले होते. ती लिंक तुम्ही बघितली असेल, अशी अपेक्षा करते. मी नेहमी सांगते, एखादे औषध बाजारात आणण्यापूर्वी जशा त्याच्या चाचण्या केल्या जातात, त्याचे परिणाम-दुष्परिणाम पडताळून पाहिले जातात, तसेच एखादे नवीन तंत्रज्ञान बाजारात आणताना असे प्रयोग का केले जात नाहीत?
रेडिएशनचे जाळे आपल्या सभोवताली पसरलेले आहे आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत आहे, आपल्या सभोवताली असणाऱ्या प्राण्यांवर, झाडांवरही होतो आहे. याचे उदाहरण द्यायचे झाले, तर मधमाश्या खूप लहान असल्या, तरी पृथ्वीवरील सर्व प्राण्यांच्या कल्याणासाठी त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मधमाश्या नसल्या, तर आपले काय होईल, याचा विचार केला आहे का कधी?
पृथ्वीवरील महत्त्वाच्या प्रजातींच्या यादीमध्ये मधमाश्या या सर्वात उच्च स्तरावर आहेत. परागीभवनाच्या प्रक्रियेतील मुख्य स्रोत म्हणून मधमाश्यांना गणले जाते. सुमारे १०० पैकी ७० पिकांच्या प्रजातींचे परागीभवन हे मधमाश्यांमार्फत केले जाते. हे जगातील ९० टक्के पोषणास कारणीभूत ठरते.
रेडिएशनचा सततचा मारा असाच सुरू राहिला, तर याचा परिणाम म्हणून मधमाश्यांचे परागीभवन थांबू शकते. त्याचा परिणाम वनस्पतींवर आणि त्या वनस्पती खाणाऱ्या प्राण्यांवर होऊ शकतो. म्हणजेच याचा मोठा परिणाम हा अन्न साखळीवर होईल. मधमाश्या नसल्या, तर त्याचे गंभीर परिणाम जगभरात अब्जावधी लोकसंख्येला भोगावे लागतील. तसेच फळ आणि भाज्यांची उपलब्धताही ५० टक्के किंवा त्याहून जास्त कमी होऊ शकते.
फुलबागांचा ऱ्हास, हवामानात सतत होणारे बदल, अतिरिक्त कीटकनाशकांचा वापर आणि त्यात भर म्हणजे मोबाईल फोन वापरासाठी वाढत जाणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरी (ईएमआर) ही काही प्रमुख कारणे आहेत. याचा गंभीर परिणाम होऊन जलद गतीने मधमाश्यांची संख्या कमी होत आहे, ही अत्यंत भयावह परिस्थिती आहे.
२०१५ मध्ये जीनिव्हा येथे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधींसमोर प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. राधेश्याम शर्मा यांनी केलेल्या सादरीकरणात मधमाश्या आणि कृत्रिमरीत्या तयार केलेले मधमाश्यांचे पोळे ईएमएफ किरणोत्सर्गाचा विनाशकारी प्रभाव स्पष्टपणे दर्शवते.
१९६० च्या दशकामध्ये सर्वात पहिल्यांदा पक्ष्यांवर मायक्रोवेव्ह रेडिएशनच्या परिणामांवर संशोधन करण्यात आले. पक्ष्यांच्या उडण्याच्या क्षमतेवर रेडिएशनचा प्रामुख्याने परिणाम होतो आणि म्हणूनच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन (ईएमआर) पक्ष्यांसाठी अधिक धोकादायक आहे. स्थलांतरित पक्षी नद्या, महासागर आणि पर्वत ओलांडून हजारो किलोमीटर उडतात; परंतु त्यांना दरवर्षी नेमका मार्ग आणि ठिकाण कसे कळते?
पृथ्वीची चुंबकीय क्षेत्र जाणण्याची क्षमता पक्ष्यांमध्ये जन्मजात असते. ती त्यांना लांबच्या प्रवासात दिशादर्शक म्हणून काम करण्यास मदत करते. पक्ष्यांच्या रेटिनामध्ये क्रिप्टोक्रोम नावाची चुंबकीय संवेदनशील प्रथिने असतात. ती त्यांना सेन्सिंग आणि सिग्नलिंग सक्षम करतात. अशा लांबच्या अंतरावर त्यांना मार्गदर्शन करतात, असे एका संशोधनामध्ये आढळून आले आहे.
मोबाईल फोनच्या संख्येत वेगाने होणारी वाढ हवेमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचे प्रमाण वाढवत आहे आणि त्यामुळे पृथ्वीच्या नैसर्गिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींमध्ये बाधा येते.
पक्ष्यांची घटती लोकसंख्या ही मानव प्रजातीसाठी एक प्रकारची धोक्याची घंटा आहे. चिमण्यांसारख्या पक्ष्यांमध्ये प्रजनन आणि समन्वय समस्या आणि आक्रमक वर्तनदेखील दिसून आले आहे. भारतामध्ये करण्यात आलेल्या अशाच अभ्यासामध्ये भोपाळ, नागपूर, जबलपूर, उज्जैन, ग्वाल्हेर, छिंदवाडा, इंदूर आणि बैतूलमध्ये मोबाईल फोनच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण होणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरींमुळे दूषित झालेल्या भागांमधून चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे दिसून आले आहे.
सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट अँड व्होकेशनल स्टडीज ऑफ पंजाब या संस्थेने केलेल्या अभ्यासामध्ये असे आढळून आले की, चिमण्यांची ५० अंडी, पाच मिनिटे ते ३० मिनिटांच्या कालावधीसाठी विद्युत चुंबकीय लहरींच्या (ईएमआर) संपर्कात येतात, तेव्हा त्यापैकी ५० अंड्यांमधले भ्रूण मृत्युमुखी पडतात.
कुठल्याही दुष्परिणामांची पर्वा न करता तंत्रज्ञानाचा प्रवास अत्यंत वेगाने सुरू आहे. आपल्या आरोग्यापेक्षा आपल्याला हायस्पीड इंटरनेटची जास्त गरज आहे आणि यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला आपण तयार आहोत. आजची तरुण पिढी ही संपूर्णपणे मोबाईल, आयपॅड, टॅबच्या आहारी गेलेली आहे. डोळ्यांचे आजार, कानाच्या तक्रारी, डोकेदुखी, उच्च रक्तदाब, सहनशक्ती कमी होणे, सतत चिडचिड यासारख्या अनेक आजारांना आजच्या तरुण पिढीला सामोरे जावे लागत आहे. ही फक्त सुरुवात आहे. भविष्यात याहूनही वाईट परिस्थितीचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. त्यासाठी आपल्याला तयार असणे गरजेचे आहे. याविषयी तुम्हाला काय वाटते, ते जरुर कळवा.
एका संस्थेने केलेल्या अभ्यासामध्ये चिमण्यांची ५० अंडी, पाच ते ३० मिनिटांच्या कालावधीसाठी विद्युत चुंबकीय लहरींच्या (ईएमआर) संपर्कात येतात, तेव्हा त्यापैकी ५० अंड्यांमधले भ्रूण मृत्युमुखी पडतात, असे निरीक्षण नोंदवले आहे. त्यामुळे प्राणी, पक्षी आणि वनस्पती नष्ट करू पाहणाऱ्या या रेडिएशनचा धोका वेळीच ओळखणे गरजेचे आहे.
(शब्दांकन : नीलिमा बसाळे)
juhichawlaoffice@gmail.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.