- जुही चावला मेहता
मोबाईलच्या ‘ईएमएफ रेडिएशन’मुळे अनेक दुष्परिणाम होत असतात, पण त्यापासून वाचायचे असेल, तर काही सोप्या सोप्या गोष्टी करायलाच हव्यात.
कसे आहात? सध्या हवामान बदलते आहे, तर तब्येतीची काळजी घ्या. मागील लेखात आपण पाहिले, की कशा पद्धतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोबाईल टॉवर व मोबाईलमधून सतत निघणाऱ्या ‘इलेक्ट्रो मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी’ रेडिएशन (ईएमएफ रेडिएशन)चा आपल्या आरोग्यावर आणि सभोवतालच्या परिसरावर काय परिणाम होतो ते... कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट, असे मी नेहमीच म्हणते.
साधी गोष्ट आहे... बघा ना, आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण मोबाईलशी किती जोडले गेलो आहोत. बँकेच्या व्यवहारापासून ते भाजी घेण्यापर्यंत सगळेच व्यवहार मोबाईलच्या माध्यमातून होत आहेत. पूर्वी लहान मुलाला जेवण भरवताना खिडकीतून ‘चिऊ-काऊ’ची वाट पाहिली जायची; पण आता त्यांची जागा मोबाईलने घेतली आहे.
साखर आणि शीतपेयांमुळे शरीरांवर होणारे दुष्परिणाम आपल्याला माहिती असूनही आपण त्याचा वापर करतो. त्याचप्रमाणे मोबाईलमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांकडेही आपण दुर्लक्ष करीत आहोत. मग आपल्यासोबत असणाऱ्या ‘ईएमएफ रेडिएशन’चे नेमके काय परिणाम होतात, हे सर्वप्रथम समजून घेऊ...
प्रजननक्षमता आणि पुनरुत्पादन - सवयीप्रमाणे आपण फोन खिशात ठेवतो; पण तुम्हाला माहिती आहे का ‘ईएमएफ रेडिएशन’शी दीर्घकाळपर्यंत संपर्क आल्यास त्याचा पुनरुत्पादन आणि प्रजननक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे अनेक संशोधकांनी आपल्या संशोधनात असेही नमूद केले आहे, की ‘ईएमएफ रेडिएशन’मुळे महिलांना पीसीओएस (पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) आणि पीसीओडी (पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर) सारखे त्रास उद्भवतात. पुरुषांच्या शुक्राणूंवरही त्याचा परिणाम होतो.
न्यूरोटॉक्सिक प्रभाव - वायरलेस उपकरणांच्या प्रदीर्घ संपर्कामुळे मेंदूच्या पेशींवर परिणाम होतो. ज्यामुळे मेंदूच्या स्मृती आणि शिक्षण केंद्रांमध्ये मेंदूच्या पेशींचा मृत्यू होतो. सेलफोन रेडिएशनमुळे मानवातील मेंदूच्या हालचालींवरही परिणाम होतो.
आकलनशक्ती आणि क्षीण स्मरणशक्ती - अनेक संशोधनात असे आढळून आले आहे, की वायरलेस उपकरणांमुळे आकलनशक्ती, स्मरणशक्ती, एकाग्रता आणि प्रतिक्रिया यांसारख्या संज्ञानात्मक क्षमतांना हानी पोहोचते.
श्रवणशक्ती कमी होणे - मोबाईलच्या अतिवापरामुळे आपल्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. परिणामी कायमचे बहिरेपणही येऊ शकते. मेंदूतील श्रवणविषयक मज्जातंतूवर ट्युमर होण्याचा धोकाही काही संशोधनांमध्ये दर्शवला आहे.
हानीकारक ‘ईएमएफ रेडिएशन’मुळे थकवा, डोकेदुखी, बहिरेपणा, चिडचिडेपणा, एकाग्रता नसणे असे अनेक परिणाम आढळून येतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) आणि इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने (आयएआरसी) रेडिओफ्रिक्वेंसी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड्सला मानवांसाठी कर्करोगजन्य (गट २ बी) म्हणून वर्गीकृत केले आहे.
मागील अनेक लेखांमध्ये आपण पाहिले की ‘ईएमएफ रेडिएशन’चा आपल्या शरीरावर नेमका काय परिणाम होतो, त्यासाठी काय केले पाहिजे आणि, संशोधनातून काय परिणाम सिद्ध झाले आहेत. तुम्हाला मी काही गमतीशीर प्रयोगही सांगितले होते आणि मला आशा आहे, की तुम्ही ते करून पाहिले असतील.
आता तुमच्या मनात प्रश्न असेल, की अशा रेडिएशनपासून वाचायचे असेल, तर काय करता येईल. घाबरून जाऊ नका. काही सोप्या गोष्टी करून अशा रेडिएशनपासून आपला बचाव होऊ शकतो. सर्वांत आधी, मोबाईल शक्य तितका तुमच्या शरीरापासून दूर ठेवा. शर्टच्या वा पँटच्या खिशात ठेवणे टाळा. शक्य असल्यास बॅगेत ठेवा.
दुसरे म्हणजे, तुमच्या घरी वा कामाच्या ठिकाणी लॅण्डलाईन दूरध्वनी असल्यास मोबाईलऐवजी त्याचा वापर करा. रात्री झोपताना किंवा जास्त वापरात नसताना मोबाईल ‘एअरप्लेन मोड’वर ठेवा. लहान मुलांना व्हिडीओ पाहण्यासाठी मोबाईल देण्यापूर्वी आधी तो डाऊनलोड करा. त्यानंतर मोबाईल ‘एअरप्लेन मोड’वर ठेवून मुलांना द्या. सेलफोनवर बोलताना हॅण्ड्सफ्री स्पीकर किंवा वायर असलेला ईयरफोन वापरणे चांगले.
त्याची सवय लावण्याचा प्रयत्न करा. तुमचे बोलणे पूर्ण झाल्यावर इयरफोन काढून टाका. जर तुम्हाला हॅण्ड्सफ्री वापरायचे नसेल तर तुमचा फोन कानापासून एकदोन सेंमी दूर ठेवा. ब्लू-टुथ ईयरफोनचा वापर टाळा. शक्य असल्यास एसएमएसचा वापर करा. फोन चार्जिंग मोडवर असताना त्यावर बोलू नका.
कारण, त्या वेळी त्याद्वारे उत्सर्जित होणाऱ्या रेडिएशनचे प्रमाण दहा पट जास्त असते. कमी बॅटरीवर तुमचा फोन वापरणे टाळा. बॅटरी कमी असताना त्यातून रेडिएशन जास्त प्रमाणात होते. मोबाईलचे सिग्नल कमी असताना तो वापरणे टाळा. घरातील वायफाय रात्री झोपताना बंद करा.
असे काही सोपे उपाय आहेत जे आपण सहज करू शकतो आणि आपल्या माणसांची काळजी घेऊ शकतो. आपल्या कुटुंबासाठी आपण इतके तर नक्कीच करू शकतो. तुमच्याकडेही काही टिप्स असतील, तुमचे काही अनुभव तुम्हाला सांगायचे असतील तर मला नक्की कळवा.
juhichawlaoffice@gmail.com
(शब्दांकन : नीलिमा बसाळे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.