कैफीनामा : महत्त्वाच्या कालखंडाचा इतिहास

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातल्या दोन महत्त्वाच्या घटना म्हणजे ऑक्टोबर १९१७ मध्ये रशियात झालेली कामगार क्रांती आणि दुसरी म्हणजे १९३१ मध्ये भारतात सुरू झालेले सिनेमासंगीत.
kaifi azmi
kaifi azmisakal
Updated on

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातल्या दोन महत्त्वाच्या घटना म्हणजे ऑक्टोबर १९१७ मध्ये रशियात झालेली कामगार क्रांती आणि दुसरी म्हणजे १९३१ मध्ये भारतात सुरू झालेले सिनेमासंगीत. आता मनात असा विचार येणे अगदी शक्य आहे की यात दोन घटनांत काय परस्परसंबंध आहे? आहे. रशियन क्रांतीनंतर जगभरच्या तरुणांत मार्क्सवादाबद्दल प्रेम निर्माण झालं आणि मार्क्सवादाचा अभ्यास सुरू झाला.

यात विचारवंत, पत्रकार जसे होते तसेच लेखक-कवी-कलाकारसुद्धा होते. मुंबईतल्या गिरगावांत कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यालयात कैफी आझमी, अली सरदार जाफरी वगैरे मंडळी कम्यून करून राहत होते. त्या काळातील राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक वातावरणाच्या प्रभावाखाली साहिर लुधियानवी, कैफी आझमी, अली सरदार जाफरी वगैरे कवी डाव्या विचारांनी भारावून गेले.

अलीकडेच मुंबईत कैफी आझमींवर (१९१९-२००२) ‘कैफीनामा’ हा तासाभरचा माहितीपट दाखवण्यात आला. याचं दिग्दर्शन सुमांत्रो घोषाल यांनी केलं होतं. काही वर्षांपूर्वी मी ‘कैफी और मैं’ या नाटकाचा प्रयोग बघितला होता. याची संहिता कैफींची पत्नी शौकत आझमींच्या ‘याद की राहगुजर’ या पुस्तकावर आधारित होती. ‘याद की राहगुजर’चं शब्दांकन जावेद अख्तर यांचं. या नाटकात जावेद आणि शबानांच्या भूमिका होत्या, तर गाणी जसविंदर सिंग यांनी गायली होती. त्यानंतर आता हा माहितीपट बघण्याची संधी मिळाली.

अलीकडेच मुंबईत कैफी आझमींवर ‘कैफीनामा’ हा तासाभराचा माहितीपट दाखवण्यात आला. काही वर्षांपूर्वी मी ‘कैफी और मैं’ या नाटकाचा प्रयोग बघितला होता. त्यानंतरचा हा ‘कैफीनामा’ भारताच्या महत्त्वाच्या कालखंडाचा इतिहास आहे.

कैफी आझमींच्या जीवनाचा प्रवास आपल्याला तसा बऱ्यापैकी माहिती असतो. कैफींचं ८३ वर्षांचं समृद्ध आणि वादळी आयुष्य तासाभराच्या माहितीपटात पकडायचं हे आव्हान साधंसुधं नाही. सुमांत्रो घोषाल यांनी हे शिवधनुष्य व्यवस्थित पेललं आहे. घोषाल यांनी अनेक वर्षं जाहिरात संस्थांसाठी अॅड फिल्म्स बनवल्या आहेत. परिणामी ‘कैफीनामा’मध्ये अजिबात फापटपसारा नाही. कैफी जगले तो काळ फार महत्त्वाचा आहे.

कैफींचा जन्म १४ जानेवारी १९१९ रोजी उत्तर प्रदेशातील आझमगढ जिल्ह्यातील मिजवाँ या गावी झाला. त्यांचे तिन्ही भाऊ कवी होते. कैफींचे नंतरचे आयुष्य मुंबईतल्या चंदेरी दुनियेत जरी गेले तरी त्यांच्या मनांतलं ‘मिजवाँ’ कायम जिवंत होतं. या संदर्भातला त्यांचा प्रसिद्ध शेर आहे ‘ढूंढता हूं जिसे, वो जहाँ नही मिलता... वो जमीं, वो आसमां नही मिलता.’ सुमांत्रो घोषाल यांनी ‘कैफीनामा’मध्ये ‘मिजवाँ’ची काही अप्रतिम दृश्यं चित्रित केली आहेत.

कैफी मार्क्सवादी होते. ते १९४३ मध्ये कम्युनिस्ट पार्टीचे पूर्ण वेळ कार्यकर्ते झाले. तेव्हा कम्युनिस्ट पार्टीच्या शिस्तीनुसार पूर्ण वेळ कार्यकर्त्याला महिना चाळीस रुपये मिळत. तेवढ्यात घर चालवावं लागत असे. १९४९ मध्ये त्यांच्या अटकेचे वॉरंट असतानासुद्धा त्यांनी भिवंडीत ‘प्रगतीशील लेखक संघ’ आणि ‘इप्टा’चं कामं केलं. त्या काळच्या अनेक उर्दू कवींप्रमाणे त्यांच्या सुरुवातीच्या कवितांत प्रेम, विरह वगैरे टिपिकल भावना व्यक्त झाल्या होत्या. लवकरच ते यातून बाहेर पडले आणि धारदार सामाजिक आशय व्यक्त करणाऱ्या कविता लिहू लागले.

कैफी आणि शौकत यांचा प्रेमविवाह होता. त्यांचं लग्न मुंबईत झालं. कैफी शिया; तर शौकत सुन्नी पंथीय होत्या. लग्नानंतर ते काही काळ गिरगावातल्या कम्युनिस्ट पार्टीच्या कम्युनमध्ये राहत होते. ती जागा या माहितीपटात दाखवली आहे. याच दिवसांत म्हणजे २५ मे १९४३ रोजी ‘इप्टा’ची स्थापना झाली ज्यात कैफी आणि शौकत सुरुवातीपासून होते. कैफीने इप्टासाठी लिहिलेली दोन नाटकं ‘हिर रांझा’ आणि ‘आखरी शमा’ फार गाजली.

चेतन आनंदने १९७० मध्ये यावर आधारित सिनेमा बनवला. १९४९ मध्ये पंडित नेहरूंच्या सरकारने कम्युनिस्ट पार्टीवर बंदी आणली. परिणामी कैफींसारख्यांना भूमिगत व्हावे लागले. त्या काळी कार्यकर्त्यांना अतिशय हलाखीच्या दिवसांत जगावं लागलं. अशा स्थितीत कैफीच्या मनांत हिंदी सिनेमांसाठी गाणी लिहिण्याचे विचार आले. १९५१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बुझदिल’ची गाणी कैफींनी लिहिली होती; मात्र त्यांची गाणी जरी चांगली होती, तरी चित्रपट पडत होते.

‘कैफींची मुलगी शबाना’ ही ओळख केव्हाच मागे पडली. शबानामध्ये सामाजिक बांधिलकीची तीच भावना आहे. १९८४ मध्ये जेव्हा मुंबईत महापालिकेने गरिबांच्या झोपड्या तोडायला सुरुवात केली तेव्हा शबानाने मोर्चा काढला होता. एवढेच नव्हे, तर ती आमरण उपोषणाला बसली होती. तेव्हा मिजवाला असलेल्या कैफींनी तिला तार करून ‘carry on, Comrade’ असा आशीर्वाद दिला होता.

सुमांत्रो घोषाल यांच्या माहितीपटानंतर जी प्रश्नोत्तरं झाली तेव्हा खुद्द शबाना सहभागी झाली होती. या कार्यक्रमाला रमेश तलवारांसारखे बुजुर्ग उपस्थित होते. असे माहितीपट फार महत्त्वाचे असतात. कैफी आझमींसारख्या व्यक्तींच्या आयुष्यातून तो काळ साकार होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.