बहुआयामी रंगकर्मी!

कमलाकर सारंग याचं नाव उच्चारलं, की समोर येतं ते अजरामर ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक.
Nilu Phule and Kamlakar Sarang
Nilu Phule and Kamlakar Sarangsakal
Updated on

कमलाकर सारंग याचं नाव उच्चारलं, की समोर येतं ते अजरामर ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक. विजय तेंडुलकरांनी लिहिलेल्या आणि निळू फुले-लालन सारंग यांच्या अभिनयाने गाजलेल्या या नाटकाचं दिग्दर्शन केलं होतं कमलाकर सारंग यांनी. या नाटकाभोवती वादळ उठलं होतं, उलटसुलट चर्चा, कोर्टाकोर्टी झाली होती. यथावकाश ‘सखाराम’चा प्रवास सुखेनैव सुरू झाला. या कलाकृतीने इतिहास घडवला. आता ‘सखाराम बाइंडर’ म्हणजे भारतीय रंगभूमीवरील मैलाचा दगड समजलं जातं. या नाटकाचे दिग्दर्शक कमलाकर सारंग यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा.

फार वर्षांपासून मराठीत प्रायोगिक रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमी अशी विभागणी आहे; मात्र काही रंगकर्मींनी दोन्ही ठिकाणी स्वतःचा ठसा उमटवला. त्यातील चटकन आठवणारी नावं म्हणजे विजया मेहता आणि दुसरं तितकंच महत्त्वाचं नाव म्हणजे कमलाकर सारंग (१९३४-१९९८). आज २९ जून. त्यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १९३४ सालचा.

कमलाकर सारंग यांचं नाव ऐकलं की निळू फुलेंनी अजरामर केलेला ‘सखाराम बाइंडर’ आठवतो आणि त्यापाठोपाठ येते ती त्याच नाटकातील ‘चंपा’ पात्र रंगवणारी लालन सारंग. सारंग पती-पत्नींनी हे नाटक १९७२ साली म्हणजे आजपासून बावन्न वर्षांपूर्वी सादर करण्याचं धाडस केलं. ‘सखाराम बाइंडर’ने इतिहास घडवला. या नाटकाभोवती एवढं वादळ उठलं होतं, एवढ्या उलटसुलट चर्चा, कोर्टाकोर्टी झाली होती की विचारता सोय नाही.

या सर्व अग्निदिव्यातून विजय तेंडुलकरांनी लिहिलेलं, निळू फुले-लालन सारंग यांच्या अभिनयाने गाजलेलं हे नाटक कमलाकर सारंग या अवलियाने वयाच्या अडतिसाव्या वर्षी दिग्दर्शित केलं होतं. यात तसं फारसं आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कमलाकर यांना लहानपणापासून रंगभूमीने भुरळ घातली होती.

मालवणच्या टोपीवाला हायस्कूलमध्ये अकरावीला असताना त्यांनी ना. सी. फडकेंच्या ‘जानकी’ या नाटकात म्हाताऱ्या सासऱ्याची भूमिका केली होती. शालेय जीवनात चढलेली नाटकाची धुंदी मरेपर्यंत उतरलीच नाही. ते शेवटच्या काळात आजारी होते तेव्हा नाटकाचा ध्यास तीळमात्र कमी झाला नव्हता. अखेरच्या सात-आठ महिन्यांत त्यांना डोस्टोव्हस्कीच्या ‘ब्रदर्स कारमोझाव्ह’वर दूरदर्शनसाठी मालिका बनवायची होती. या कादंबरीचे मराठी भाषांतर धर्माधिकारींनी केलं होतं.

सारंग यांना मुंबई महानगरीने नाव, प्रतिष्ठा, पैसा सर्व काही दिलं. मात्र याच मुंबईत त्यांना प्रचंड गरिबीचा सामना करत जगावं लागलं होतं. त्यांचे आई-वडील माझगावला एका खोलीत राहत होते. सारंग रुईयाचे विद्यार्थी. त्यांना अनेकदा माझगाव ते हिंदू कॉलनी हा प्रवास पायी करावा लागत असे. त्यांनी १९५३ मध्ये रुईयात आर्ट्‌सला प्रवेश घेतला. त्या काळी गिरगाव चौपाटीवरच्या भारतीय विद्या भवनतर्फे आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा घेतल्या जायच्या.

त्या वर्षी रुईयातर्फे अनंत काणेकरांच्या ‘सशाची चित्रे’ नाटकातला एक प्रवेश करण्याचं ठरलं. सारंग यांनी प्रयत्न करूनही त्यांना भूमिका मिळाली नाही. ते सरळ प्राचार्यांना भेटले आणि वशिलेबाजी झाल्याचा आरोप केला. प्राचार्यांनी त्यांना कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये नाटक करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सारंग यांनी ‘सिलेक्शनचं नाटक’ ही एकांकिका सादर केली, जी त्यांचा वर्गमित्र यशवंत रांजणकरांनी लिहिली होती.

त्यासाठी रांजणकरांनी त्यांची निवड झाली नाही, हे वास्तव समोर ठेवत नवीन एकांकिका लिहिली. ही एकांकिका बरीच गाजली. हीच एकांकिका त्यांनी पुढच्या वर्षी ‘भवन’च्या स्पर्धेत सादर केली. या काळात अरविंद देशपांडे आणि आनंद पै कमलाकर सारंग यांना शोधत रुईयात आले आणि मुंबई राज्य नाट्य स्पर्धेत होणाऱ्या नाटकाच्या सिलेक्शनसाठी ‘भवन’वर बोलावलं. सारंगांची निवड झाली. नाटक होतं तेंडुलकरांचं ‘श्रीमंत’.

यात सारंगांना प्रौढ डॉक्टरची भूमिका मिळाली. या नाटकाचं दिग्दर्शन विजया मेहता (तेव्हाच्या विजया जयवंत) करणार होत्या. सारंगांच्या कारकिर्दीची दमदार सुरुवात झाली. दुसरीकडे त्यांना आर्थिक स्थैर्य दिसायला लागले होते. घरची परिस्थिती फार नाजूक होती. वडील दम्याने आजारी होते. चार भावंडं शिकत होती. सारंगांना नोकरीची फार गरज होती.

‘श्रीमंत’ची रंगीत तालीम ज्या दिवशी होती त्याच दिवशी त्यांना बर्मा शेलमध्ये नोकरी लागली. यानंतर सारंगांची कारकीर्द बहरतच गेली. १९५६ साली दामू केंकरेंनी ‘ललित कला केंद्र’तर्फे तीन अंकी ‘हॅम्लेट’ बसवलं होतं. ‘हॅम्लेट’मध्ये सारंगांनी ‘होरेशिओ’ची भूमिका सादर केली होती.

या नाटकांच्या प्रवासात त्यांना फोर्टमधल्या टाटा सर्व्हिसेसमध्ये नोकरी करणारी लालन भेटल्या आणि त्यांनी ७ जून १९६४ रोजी लग्न केलं. त्याआधी त्यांची सुमारे सव्वा वर्षाची ओळख होती. लालन तेव्हा रंगभूमीवर कार्यरत होत्या. नवीन लग्न, नवीन नाटकं... दिवस छान होते. आर्थिक स्थिती बरीच सुधारली होती.

अशा वातावरणात कमलाकरांच्या हाती तेंडुलकरांचं ‘सखाराम बाइंडर’ लागलं. हे नाटक डॉ. श्रीराम लागूंना दिग्दर्शित करायचं होतं; तर अरविंद देशपांडेंना ते ‘आविष्कार’साठी हवं होतं; पण तेंडुलकरांनी सारंगांना दिलं. या पाठीमागे एक मजेशीर किस्सा आहे. सारंग त्याआधी अनेक दिवसांपासून तेंडुलकरांकडे नाटक मागत होते. तेंडुलकरांचं ‘अशी पाखरे येती’ लिहून तयार झालं होतं; पण कसं कोण जाणे ते नाटक डॉ. जब्बार पटेल यांना मिळालं. मग मात्र तेंडुलकरांनी पुढचं नाटक सारंगांनाच द्यायचं ठरवलं. ते नाटक म्हणजे ‘सखाराम बाइंडर’.

‘सखाराम’ने इतिहास घडवला; मात्र या नाटकाच्या प्रवासात असंख्य अडचणी आल्या. या नाटकाचे निर्माते असणार होते ‘वेलकम थिएटर्स’चे पांडुरंग धुरत. त्यांनी ‘सखाराम’च्या भूमिकेसाठी डॉ. काशीनाथ घाणेकरांना घ्या, असं सुचवलं. तेंडुलकरांनीसुद्धा घाणेकरांना डोळ्यांसमोर ठेवूनच नाटक लिहिलं होतं. हे नाटक म्हणजे व्यावसायिक दिग्दर्शक म्हणून सारंगांचं पहिलंच नाटक. तसं पाहिलं तर १९५७ साली ठाण्याच्या ‘मावळ मंडळा’नं राज्य नाट्यस्पर्धेत ‘श्रीमंत’ सादर केलं, त्याचं दिग्दर्शन सारंगांनी केलं होतं.

‘सखाराम’चं पहिलं नाव होतं ‘रात्र देवाची असते.’ नंतर ‘सखाराम बाइंडर’ नक्की करण्यात आलं. आधी घाणेकरांनी आणि नंतर लागूंनी ही भूमिका केली नाही. ‘सखाराम’च्या भूमिकेसाठी कोण, याचा शोध सुरू झाला. या नाटकाची जुळवाजुळव सुरू असताना खुद्द सारंग आविष्कारच्या ‘तुघलक’मध्ये ‘इमामऊद्दीन’चं काम करत होते. ‘तुघलक’चा प्रयोग पुण्याला होता. त्या दरम्यान सुलभा देशपांडेंनी ‘सखाराम’च्या भूमिकेसाठी निळू फुलेंचं नाव सुचवलं.

नंतर तेच पक्क झालं. ‘लक्ष्मी’साठी कुसुम कुलकर्णी जरी नक्की झाली होती तरी अजून ‘चंपा’ सापडत नव्हती. या चर्चेत लालन सारंगांचं नाव कोठेही नव्हतं. त्या तेव्हा ‘स्टील फेम’ नावाच्या नाटकात काम करत होत्या. हे नाटक तेंडुलकरांनी बघितलं आणि त्यांच्या लक्षात आलं की, ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’. चंपा आपल्यासमोर आहे आणि आपल्याला दिसली नाही. तालमी सुरू झाल्या.

अजून सेन्सॉर प्रमाणपत्र मिळाले नव्हते! ते एकदाचं मिळालं; पण फक्त चार प्रयोगांचं आणि शिवाय सखारामच्या तोंडचे ‘च्यायला’, ‘मायला’ वगैरे शब्द गाळूनच. सर्व अडचणींवर मात करून १० मार्च १९७२ रोजी मुंबईत ‘सखाराम’चा प्रयोग मंचित झाला आणि एकच वादळ उठलं. संस्कृतीरक्षकांनी टीकेची झोड उठवली. नाटकावर बंदी आणा वगैरे मागण्या झाल्या.

आधी युवक काँग्रेसने, नंतर शिवसेनेने बंदी आणण्याची मागणी लावून धरली; पण बाळासाहेब ठाकरेंनी नाटक बघून प्रशस्तिपत्र दिले. शिवाय ज्येष्ठ नाट्यसमीक्षक माधव मनोहरांनी प्रचंड कौतुक केले. यथावकाश ‘सखाराम’चा प्रवास सुखेनैव सुरू झाला. आज ‘सखाराम बाइंडर’ म्हणजे भारतीय रंगभूमीवरील मैलाचा दगड समजलं जातं.

पुढे सारंगांनी १९८१ सालच्या ‘चित्रानंद’च्या दिवाळी अंकात ‘बाइंडरचे दिवस’ असा लेख लिहिला होता. पुढे ‘ग्रंथाली’ने ‘बाइंडरचे दिवस’ असं पुस्तक प्रकाशित केलं; पण सारंग म्हणजे फक्त ‘सखाराम बाइंडर’ एवढेच नाही. सारंगांनी नाट्यलेखन केलं. त्यांच्या नावावर ‘सहज जिंकी मना’सारखी नाटकं आहेत. ते अनेकदा गर्वाने म्हणत असत की ‘देवाचे पाय’, ‘चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी’ वगैरे एरव्ही कोणी सादर करणार नाही, अशी नाटकं आम्ही मंचित केली.

त्यांनी कविता केल्या. त्यांनी ‘दीडशहाणा’, ‘पश्चात्ताप’ वगैरे मराठी सिनेमातून तसेच ‘नासूर’, ‘सूत्रधार’, ‘तेरे शहर में’ अशा हिंदी सिनेमांतून भूमिका केल्या. १९८०च्या दशकात दूरदर्शन लोकप्रिय झाला तेव्हा त्यांनी ‘दूरदर्शन’साठी ‘झोपी गेलेला जागा झाला’सारख्या मराठी मालिका; तर ‘रथचक्र’सारख्या हिंदीत मालिकासुद्धा केल्या. कमलाकर सारंग हाडाचे रंगकर्मी होते. त्यांनी आत्माविष्कारासाठी सतत नवनवीन माध्यमं हुडकून काढली आणि म्हणूनच ते अनोखे ठरतात.

nashkohl@gmail.com

(लेखक राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.