- केदार गोरे, gore.kedar@gmail.com
कान्हा राष्ट्रीय उद्यानात २०२२ सालच्या व्याघ्रगणनेसाठी एक स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्याची संधी मला मिळाली. जंगल बऱ्यापैकी माहिती असणाऱ्या व्यक्तींनी केलेल्या अर्जाच्या आधारे वन खाते स्वयंसेवकांची निवड करते. त्यांना प्रशिक्षण दिले जाते आणि मग सुरू होते व्याघ्रगणना... त्याचा विलक्षण अनुभव मी घेतला...
जानेवारी महिन्याच्या कडाक्याच्या थंडीत आधीच सर्व गात्रे गोठलेली असताना काही अंतरावरून आलेली वाघाची डरकाळी थरकाप उडवून गेली. मी आणि भरत आयाम जागीच थबकलो आणि काही काळ वाघाच्या हालचालीचा अंदाज घेत राहिलो. एखाद-दोन मिनिटांनी पुन्हा एकदा डरकाळीचा आवाज आला; पण त्याची तीव्रता आणि दिशा लक्षात घेता, वाघ आमच्यापासून दूर जात होता, हे जाणवले. जंगलात पायी फिरत असताना वाघ बघायची संधी हुकली म्हणून हुरहूर लागून राहिली.