आदित्यनाथांची वक्तव्यं आणि देशाचं ऐक्य

मी असभ्य व्यक्ती नाही किंवा फार भोळाही नाही. मात्र, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुस्लिमांना सातत्यानं जे टोमणे मारतात त्या बाबीकडे तुम्ही कसं पाहाल?
Yogi Adityanath
Yogi AdityanathSakal
Updated on

मी असभ्य व्यक्ती नाही किंवा फार भोळाही नाही. मात्र, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुस्लिमांना सातत्यानं जे टोमणे मारतात त्या बाबीकडे तुम्ही कसं पाहाल? त्यांच्या वक्तव्यांमुळे माझी चिडचिड होते. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे, मला उद्वेग येतो. कारण, मला १९३० मधील जर्मनीतील, १९६० मधील दक्षिण आफ्रिकेतील आणि १९७० मधील युगांडातील घटनांचे प्रतिध्वनी ऐकू येतात, आणि हे, मी स्वतः हिंदू आहे, ही वस्तुस्थिती असूनही होतं. त्या तुलनेत या वक्तव्यांमुळं आपल्या देशातील मुस्लिम बांधव अधिकच घाबरून जात असणार. तरीही हे सर्व आदित्यनाथांच्या पक्षानं, त्यांच्या अध्यक्षांनी आणि पंतप्रधानांनीही मूकपणे स्वीकारलं आहे.

‘अब्बाजान’वरून टोमणे...

आपण त्यांचं सर्वांत ताजं वक्तव्य उदाहरणादाखल पाहू. मागील रविवारी त्यांनी आपण किती महान कार्य केलं आहे याची शेखी मिरवताना मुस्लिमांवर लक्ष्य करण्याचा मार्ग शोधलाच. त्यांनी विचारलं, ‘तुम्हाला २०१७ पूर्वी शिधापत्रिकेवर एवढं धान्य मिळत होतं का?’ यावर त्यांचंच उत्तर होतं, ‘पूर्वी अशी म्हण होती की, ‘अब्बाजान’ तुमचं रेशन खात आहेत.’ पूर्वी गरिबांच्या नोकऱ्या हेच ‘अब्बाजान’ बळकावत होते, असंही म्हटलं जायचं.’ हे कमी होतं म्हणून की काय, त्यांनी पुढं असंही आश्वासन देऊन टाकलं, ‘या ‘अब्बाजान’ला मानणाऱ्या रोमिओंना मी नक्कीच धडा शिकवणार आहे.’

त्यांनी देशातील मुस्लिमांना लक्ष्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती किंवा ती शेवटचीही नसणार याची मला खात्री आहे. ‘आपले हीरो ‘मुघल’ कसे असू शकतात,’ असा प्रश्न त्यांनी मागील वर्षी विचारला होता. असे विचारताना त्यांनी, अकबर हा सर्वांत महान सम्राटांपैकी एक होता, या वस्तुस्थितीकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं होतं. मागील वर्षी निवडणुकीत प्रचार करताना त्यांनी आपल्या विरोधकांना, ‘अली’वर मेहेरनजर करत असल्याबद्दल लक्ष्य केलं व आपली ‘बजरंगबली’वर श्रद्धा असल्याचं वक्तव्य केलं होतं.

प्रक्षोभक वक्तव्यांची मालिका

आदित्यनाथ यांनी आपला पूर्वग्रह कधीही लपवला नाही हे सत्य आहे. खरं तर त्यांना असं करताना आनंदच होतो. ‘त्यांनी एका हिंदू मुलीचं धर्मांतर केल्यास आम्ही १०० मुस्लिम मुलींचं करू,’ हे आदित्यनाथांनी सर्वाधिक वेळा वापरलेलं वाक्य त्यांच्या पूर्वग्रहदूषित मताचं आदर्श उदाहरण ठरावं. त्यांनी ता. सात सप्टेंबर २०१४ रोजी असा दावा केला होता की, ‘ज्या भागात अल्पसंख्याकांचं प्रमाण १० ते २० टक्के असतं, तिथं भरकटलेल्या लोकांकडून जातीय दंगली होतात. त्यांचं प्रमाण २० ते ३५ असल्यास मोठ्या व गंभीर जातीय दंगली होतात व हे प्रमाण ३५ टक्क्यांच्या पुढं गेल्यास तिथं बिगरमुस्लिमांना स्थानच नसतं.’ त्यांनी २००५ मध्ये, म्हणजे सत्तेवर येण्याआधी १२ वर्षांपूर्वी, त्यांची महत्त्वाकांक्षा जाहीर केली होती : ‘मी उत्तर प्रदेशाला आणि भारताला हिंदुराष्ट्र केल्याशिवाय थांबणार नाही.’ निःसंशयपणे यातून त्यांची मानसिकता लक्षात येते. खरं तर, मला वाटतं, यातून त्यांच्या पूर्वग्रहदूषित धारणेमागील बौद्धिक बैठकच अधोरेखित होते. मात्र, त्यांच्या या द्वेषमूलक वक्तव्यांना त्यांचा पक्ष आणि माध्यमं देत असलेल्या प्रतिसादाचं विश्लेषण कसं करणार?

धोकादायक मौन

भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि मुस्लिमांना देशात समान अधिकार आहेत. मग भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष व पंतप्रधान हे याविषयी जे मौन बाळगून आहेत त्याचा अर्थ काय काढायचा, हा प्रश्न ओरडून ओरडून त्यांना उत्तर विचारतो आहे.

आदित्यनाथ आपल्या लोकशाहीला कमी लेखत आहेत आणि राज्यघटनेनं घालून दिलेल्या तत्त्वांचा अवमान करत आहेत हे या दोघांना मान्य आहे का? आदित्यनाथांचा हा पूर्वग्रह आपल्या देशातील शांततेला व सहिष्णुतेला बाधा आणत आहे का? आदित्यनाथ हे भविष्यात कधीतरी आपल्या देशाचे पंतप्रधान होतील असा काहींचा विश्वास असलेल्या या नेत्याचा हा पूर्वग्रह योग्य आहे का? मला या प्रश्नांची त्यांची उत्तरं माहीत नाहीत.

मात्र, त्यांचं मौन उत्तर ‘नाही’ असल्याचंच दर्शवतं. अन्यथा, त्यांनी यावर कारवाई जरी केली नसती तरी त्यावर काही बोलले नसते का? या परिस्थितीत आपण आणखी एक प्रश्न विचारण्याची गरज आहे : ‘ही मतं ते स्वतः मांडू शकत नसल्यानं आदित्यनाथ यांच्या तोंडून वदवून घेत आहेत का?’ या प्रश्नाचं उत्तरही मिळणं आवश्यक आहे.

आता मी माध्यमांच्या भूमिकेकडं येतो. आमच्यापैकी काहीजण स्वतःला समाजाचे नैतिक पालक म्हणवून घेतात. इतर भुंकणारी कुत्री आहेत व त्यांना शांत करता येत नाही. यांतील सहा वर्तमानपत्रं मी रोज वाचतो आणि त्यातील केवळ दोघांनी आदित्यनाथांच्या ‘अब्बाजान’ या टोमण्याची बातमी दिली. यांपैकी एकाच वर्तमानपत्रानं आदित्यनाथांवर टीका केली आणि तीही अत्यंत सौम्यपणे.

भारतीयांना परदेशात चांगली वागणूक मिळाली नाही तर आपण चिडतो. मात्र, काश्मीरमध्ये आपण मुस्लिमांना देत असलेल्या वागणुकीबद्दल तालिबान मत व्यक्त करतं तेव्हा आपला रागानं तिळपापड होतो. तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन काय म्हणाला याचा एकदा विचार करा. तो म्हणाला, ‘‘हे पाहा, काश्मिरातील मुस्लिम तुमचेच नागरिक आहेत व त्यांना तुमच्याच कायद्याप्रमाणं समान अधिकार आहेत. तुम्ही कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे.’’

आदित्यनाथांची वागणूक पाहता तालिबान्यांचा मुद्दा योग्य असल्याचं दिसतं. त्यामुळेच आपण त्यांच्या वक्तव्यांवर बाळगत असलेलं मौन ही अतिशय भयंकर चूक आहे.

(सदराचे लेखक दिल्लीस्थित ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

(अनुवाद : महेश बर्दापूरकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()