प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काही तत्त्व स्वीकारून जगत असतो. कला ती तत्त्व व्यक्त करण्याचं माध्यम आहे. काही कलाकार प्रसिद्ध होतात; तर काहींना प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळतं. पंडित फिरोझ दस्तूर त्यांपैकीच एक. सोमवारी (ता. ३०) त्यांची १०५ वी जन्मतिथी. त्यानिमित्त त्यांच्या संगीत विचारांना उजाळा...
आपल्या मधुर गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारा लोकमान्य कलाकार म्हणजे पंडित फिरोझ दस्तूर. अनेक वर्षे त्यांनी चित्रपटात अभिनय व गायन केलं. पुढील आयुष्य त्यांनी शास्त्रीय संगीताला वाहून घेतलं. दस्तूरजींनी सुरांवर प्रेम केलं. किराणा घराण्याच्या गायकीची साधना केली. किराणा घराण्याचं गाणं स्वरप्रधान असल्याने आवाजाचा पोत, त्याचं विशिष्ट लगावाचं तंत्र समजलं तरच योग्य श्रुतीला स्वर लागतो. ‘स्वर गोलाकार व बरोबर केंद्रबिंदू मध्येच लागला पाहिजे, तसा लागला तरच तो काळजाला भिडतो,’ असं दस्तूरजी म्हणत. त्यासोबतच आवाजाची फिरक तिन्ही सप्तकांत सहज होण्यासाठी आवाज शास्त्राचं अचूक ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. दस्तूरजींनी हे सर्व काही योग्य विचार व प्रयत्नाने अवगत केलं होतं. त्यामुळे वयाच्या ८० व्या वर्षापर्यंतही ते अतितार षड्जसुद्धा खणखणीतपणे लावत असत. सुरांवर प्रेम करणं म्हणजं नेमकं काय हे दस्तूरजींच्या श्रुती ज्ञानाची ओळख झाल्याशिवाय कळत नाही. सर्वसाधारणपणे ललत या रागात दोन मध्यम (तीव्र व शुद्ध) घेतले जातात. या दोन मध्यमांमध्ये दस्तूरजी तिसरा मध्यमही लावत असत. मैफलीत गाताना अनेकदा ते पुरिया व मारवा रागाच्या धैवतातील भेद, तोडी व मुलतानीतील गंधाराचं स्थान, दरबारी व जौनपुरीच्या धैवतातील भेद हे ते प्रेक्षकांना समजावून सांगत व प्रत्यक्ष गाऊनही दाखवत असत.
सूर लागण्यासाठी योग्य तंत्र जसं महत्त्वाचं आहे, तसंच गाण्याप्रती भक्ती असणंसुद्धा महत्त्वाचं आहे. दस्तूरजी म्हणत, ‘when you are at war the music cannot begin. किराणा घराण्याच्या गायकीचं मूळदेखील भक्ती आहे.’ भक्तिभावात ईश्वराप्रती प्रेम तर आहेच; परंतु त्याचसोबत इतर जीवांबद्दल करुणाही आहे. दस्तूरजींची ‘गोपाला मोरी करुणा क्यू ना आवे’ ही ठुमरी याच भावातून नेहमी जन्म घेत असे. प्रेक्षकही त्या भावात चिंब भिजून जात.
दस्तूरजी तंबोरे उत्तम जुळवत असत. त्यांच्या तंबोऱ्यांची जवारी ते स्वतः घरी करत. जुळवलेल्या तंबोऱ्यात पंचमातून ऋषभ, मध्यमातून निषाद, खर्जातून गंधार ऐकू येणं हे तंबोरा जुळवण्याचं सूक्ष्म शास्त्र त्यांना अवगत होतं. त्यांचे हे कसब पाहून डॉ. अशोक रानडे युनिव्हर्सिटीत होणाऱ्या मैफलींमध्ये, दस्तूरजींना तंबोरे जुळवून देण्यास सांगत. एका खासगी बैठकीत पं. कार्तिक कुमार यांनी दस्तूरजींना तंबोरे जुळवून देण्यासाठी विनंती केली होती.