रास्टीय अध्यक्ष

सध्याचं राजकारण म्हनलं तर कोन्ता नेता कवा कोन्त्या पक्षात जाईन, याचा नेम न्हाई. आज या पक्षात, त उद्या त्या पक्षात. अशाच एका गावच्या नेत्याले एक-दोन पक्षाच्या नेत्याचा फोन आला अन् त्याईनं पक्षप्रवेशाचे आवतणच देल्लं.
Politics
Politicssakal
Updated on
Summary

सध्याचं राजकारण म्हनलं तर कोन्ता नेता कवा कोन्त्या पक्षात जाईन, याचा नेम न्हाई. आज या पक्षात, त उद्या त्या पक्षात. अशाच एका गावच्या नेत्याले एक-दोन पक्षाच्या नेत्याचा फोन आला अन् त्याईनं पक्षप्रवेशाचे आवतणच देल्लं.

- किशोर बळी, kishorbali11@gmail.com

सध्याचं राजकारण म्हनलं तर कोन्ता नेता कवा कोन्त्या पक्षात जाईन, याचा नेम न्हाई. आज या पक्षात, त उद्या त्या पक्षात. अशाच एका गावच्या नेत्याले एक-दोन पक्षाच्या नेत्याचा फोन आला अन् त्याईनं पक्षप्रवेशाचे आवतणच देल्लं. रात्री ‘बारामती’चा फोन आल्ला, अन् पायटी ‘मातोश्री’चा... त्याईनं म्हनलं की आताच्या कंडिशनमध्ये तुमीच पार्टीले वाचवू शकता; पण जवा त्याले समजलं की त्याचा एक दोस्त हाये नांदेडचा, तो कोन्याई नेत्याचा हुबेहूब आवाज काढते. त्यातच आजची तारीख एक एप्रिल समजल्यावर त्यानं डोक्शाले हातच मारून घेतला...

‘वैनी आपल्या टुनकीच्या सरपंच झाल्यापासून तुमचा बाकी ज्यलवा हाये राजेहो नाजुकराव!’

‘तुम्ही फक्त आठ दिवस थांबा हो!’

‘काय झालं?’

‘आठ दिवसात तुमची वैनी देशातल्या सर्वात मोठ्या पक्षाची महिला जिल्हाध्यक्ष होनार हाये म्हनलं. मज्याक नाई भाऊ. शिरीप बातमीच काफी हय... पुरी टुनकीको नई हिलाके रखदिया ना तो नाम बदल दुंगा!’

‘वैनीले सरपंच हून तीन मयनेच तं झाले.’

‘ग्रामपंचायत टुनकी डिजिटलची सरपंच आता डायरेक महिला जिल्हाध्यक्ष होनार हाये. आज पायटीच खासदाराचा फोन होता.’

‘मंग तं खासच ज्यमलं राजेहो.’

‘बायाईपैकी कोनतं दमदार नेतृत्वच नाई ना हो पार्टीजवळ. आता आपली केवळ सुरुवात झाली भाऊ. आगे आगे देखीये होता हय क्या!’

‘बरं मले पह्यले सांगा... इतले झकपक कपळे घालून कुठी चालले?’

‘दोन हजार चोवीसची तयारी.’

‘इलेक्शनची?’

‘मंग? इलेक्शनचीच.’

‘आतापासून?’

‘आतापासून केली तं काहीतरी खरं हाये भाऊ. मंग कुठी तहान लागल्यावर इहीर खंदता?’

‘काय खटपट चालली पन तुमची?’

‘डिजिटल फ्लेक्स लावतो ना हो चौकात. आतापासून माहोल झाला पाह्यजे.’

‘आता कायचा लावता बॉ फ्लेक्स?’

‘सर्व शेतकरी बांधवांना मिरुग नक्षत्राच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक - नाजुकराव लोखंडे, रास्टीय अध्यक्ष, अखिल भारतीय नवस्वराज्यसंग्राम पार्टी. (लोखंडे गट)’

‘आतापासून ? मिरूग लाग्यालेबी दोन मयने टाइम हाये ना अजून.’

‘अरे पन शुभेच्छा आतापासूनच द्या लागतात ना बावा!’

‘तुम्ही तं पक्षांतराच्याबी तयारीत दिसता.’

‘सात जूनले पक्षांतर करून राह्यलो. त्याचीच तयारी व्हय हे.’

‘कितवं पक्षांतर व्हय हे नाजुकराव?’

‘पक्षांतरानं मानूस चर्चेत राह्यते भास्करराव. आता जवळपास अवघेच पक्ष फिरून आलो मी.’

‘फिरून आलो म्हनजे? ते काय महारास्ट दर्शन व्हय काय? एका पक्षात तं टिकून राहा राजेहो!’

‘आता रास्टीय अध्यक्ष, लोखंडे गट... फायनल झालं भाऊ आपलं.’

‘पन लगे एकदम रास्टीय अध्यक्ष अन् तेबी लोखंडे गट?’

‘नाई तं काय हो! हयगय काय कामाची? पुळच्या हप्त्यात भागवत सप्ताह घेऊन राह्यलो आपून. पंधरा दिवसानं भीमजयंतीनिमित्त गान्याची स्पर्धा ठेवून राह्यलो. माहोलच माहोल सुरू हाये आपला.’

‘तुमच्यासंगं किती लोकं हायेत?’

‘मज्याक नोका करू भास्करराव तुम्ही. तुमचा पक्ष फक्त महारास्टाच्या लेवलवर हाये म्हनलं. अन् तुम्ही एका रास्टीय अध्यक्षासंगं बोलून राह्यले, हे ध्यानात ठुवा तुम्ही.’

‘अरे हो ना हो नाजुकराव!! पन कोनी तुमच्या मांगं तं लागीन किनी? की एकट्याचाच पक्ष असते?’

‘माली बायको हाये ना हो माल्यासंगं. फक्त स्टार्टिंग करू द्या मले. मंग पाहा पुरा देश माल्या मांगं उभा राह्यते.’

‘अरे पन गावाच्या भाईर कोन वयखते तुम्हाले?’

‘मानसाले डॉमिनेट नोका करू भास्करराव तुम्ही. अकरा जिल्ह्यात तं सीटा लढोतोच म्हनलं. पन आपल्या गटाचा माहोल तं कसाही बनोतोच मी. आता तुम्ही फक्त गंमत पाहा भास्करराव. सालभर वाट पाहा म्हनलं फक्त.’

‘काय सांगता?’

‘कॉन्फिडन्स पाहा फक्त तुम्ही पठ्ठ्याचा!! दिवाईत वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन चालू करतो. नव्या राज्यात नाई माल्या गटाचं सरकार आनलं तं मिसूर नाई ठुनार म्हनलं हा नाजुकराव!!’

‘पन मी म्हनतो इतला कान्फिडन्स आलाच कुठून तुमच्यात?’

‘सांगू?’

‘सांगा.’

‘आता सांगूच का?’

‘अरे सांगा ना हो पटकन.’

‘राती सव्वाबाराले मले मिसकॉल आला डायरेक बारामतीतून.’

‘कसा काय?’

‘काहीतरी अर्जंट मीटिंग चालू हाये अन् तुमच्याच नावाची चर्चा चालू हाये म्हने... दाहा मिनटं वाट पाहा ‘दादा’चा फोन येनार हाये म्हने...’

‘मंग?’

‘मंग काय... बराब्बर दाव्व्या मिनटाले मोबाईल वाजला भाऊ. तं डायरेक ‘दादा’!’

‘काय म्हनतं?’

‘या ठिकानी तुमचंच नाव सजेस्ट केलं म्हनत चार-पाच जनाईनं. विदर्भात आपल्या पार्टीचं काम वाढवा म्हने.’

‘उरे लेक!’

‘झपच नाई आली ना हो मले रातभर.’

‘पायटी पायटी जरासाक डोया लागला ना लागला तं अखीन मोबाईल वाजला.’

‘आँ?’

‘डायरेक ‘मातोश्री’तून कोनीतरी बोललं... अन् जागीच ‘सायबा’जवळ फोन देला.’

‘काय म्हनतं?’

‘अशा कंडिशनमध्ये पार्टीले वाचवू शकतात असे महारास्टात मोजकेच लोकं हायेत किंबहुना नाजुकराव लोखंडे हाच सशक्त पर्याय हाये म्हने.’

‘वा रे वा!’

‘अन् आता लगे खासदाराचा फोन... सरपंच बाईले महिला जिल्हाध्यक्ष करतो म्हनून!’

‘माहा तं काही भरोसा नाई बसून राह्यला बॉ!’

‘आपल्याजोळ अलग टेक्निक हाये भाऊ. सोशल मीडियावर आपलाच माहोल हाये. फेसबुक, व्हाट्सप, इन्स्टाग्राम, टिटर-फिटर सबनइकळे दांगळो हाये ना आपला.’

‘जराकभरानं तुम्हाले दिल्लीतून फोन येनार हाये नाजुकराव.’

‘कोनाचा?’

‘शेठजीचा.’

‘काय सांगून राह्यले?’

‘मज्याक नाई.’

‘तुम्हाले कसं ठाऊक?’

‘आपल्या गावातला तो पिंट्या नाई का... स्टँडप कॉमेडीचे कार्यक्रम करते तो...’

‘हूँ.’

‘त्याचा एक दोस्त हाये नांदेडचा. तो कोन्याई नेत्याचा हुबेहूब आवाज काढते. पिंट्या त्याले नंबर देते अन् अमुक नेत्याच्या आवाजात असं असं बोलजो म्हनते.’

‘खरंच का काय?’

‘आज तारीख किती हाये?’

‘एक.’

‘कोन्या मयन्याची?’

‘एप्रिल.’

‘उरे बापरे! असं हाये काय ते... मालं तारखीवर ध्यानच नाई. एप्रिल फुल बनोलं काय मले... या पिंट्याले हात दाखवाच लागते.’

‘हात’ कितीकई दाखव नं तू. पन ज्याईचा तुले फोन येनार हाये... त्याईचं चिन्हच ‘फूल’ हाये ना भाऊ. एप्रिल फूल!!’

(लेखक वऱ्हाडी बोलीतील स्तंभलेखक, चित्रपट गीतकार - अभिनेते तसेच 'हास्यबळी डॉट कॉम' ह्या विनोदी कार्यक्रमाचे सादरकर्ते असून त्यांची पहाटेच्या प्रतीक्षेत, पाकळ्या, अक्षरांचे सूर, धुम्मस, आणि माझ्या बालमित्रांनो ही पुस्तके प्रकाशित आहेत. गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या मैफिलीचे निवेदक म्हणूनही त्यांची ओळख आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.