ब्लॅक टेल्ड गॉडवीट चक्क नऊ हजार कि.मी. लांबीचा मुंबई ते सायबेरिया असा प्रवास करून, तो मुंबईत पुन्हा प्रकट झाला.
- किशोर रिठे sakal.avtaran@gmail.com
ब्लॅक टेल्ड गॉडवीट चक्क नऊ हजार कि.मी. लांबीचा मुंबई ते सायबेरिया असा प्रवास करून, तो मुंबईत पुन्हा प्रकट झाला. मार्च महिन्यात ज्या शास्त्रज्ञाने या पक्ष्याला जीपीएस टॅग लावून सोडले, त्याच शास्त्रज्ञाला हा पक्षी सप्टेंबर महिन्यात मुंबईनजीकच्या भांडुप पम्पिंग स्टेशनजवळ दिसला...
पोटापाण्यासाठी भटकणारी मानव जात आपल्याला माहिती आहे. कारण आपण सगळेच आपल्या उपजीविकेसाठी गावातून शहरात, शहरातून महानगरात किंवा अगदी विपरीत शहर आणि महानगरांतून गावात भटकंती केलेली माणसे पाहतो; पण निसर्गातील पक्षीही आपल्या उपजीविकेसाठी अक्षरशः हजारो किलोमीटर भटकंती करीत असतात, हे वाचून काहींना आश्चर्य वाटेल; पण हे खरे आहे आणि आता विज्ञानाने पक्ष्यांच्या या प्रवासकथांमागील कारणमीमांसाही आपल्या समोर ठेवणे सुरू केले आहे. आपल्याला उपलब्ध झालेल्या आधुनिक तंत्रज्ञानाने या गोष्टी केवळ भाकडकथा किंवा कपोलकल्पित गोष्टी राहिल्या नाहीत, तर पक्ष्यांच्या थक्क करणाऱ्या या प्रवास कथांचे गूढ उकलून आपल्यापुढे ठेवले आहे.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही भारतातील सर्वात प्राचीन संस्था, पक्षी अभ्यास व पक्षी संशोधनाच्या क्षेत्रात मागील १३९ वर्षांपासून कार्यरत आहे. या संस्थेने निसर्गातील वन्यप्राणी, वनस्पती, कीटक, पक्षी अशा सर्वच अंगांचा अगदी बारकाईने अभ्यास करण्यासाठी अनेक व्यक्तींना उतरविले आहे. या संस्थेच्या पक्षी शास्त्रज्ञांनी यापूर्वीही पक्षी शास्त्रातील अनेक गूढ उकलणारे अभ्यास केले आहेत. त्यांनी नुकताच लावलेला शोध तर सर्वसामान्य जनतेलाही थक्क करणारा आहे. ब्लॅक टेल्ड गॉडवीट (Black-tailed godwit) म्हणजेच काळ्या शेपटीचा अगदी कबुतरापेक्षा आकाराने दुप्पट असणारा पक्षी! पण या इवल्याशा पक्ष्याने चक्क नऊ हजार कि.मी. लांबीचा मुंबई ते सायबेरिया असा प्रवास पूर्ण केला आणि हा पक्षी मुंबईत पुन्हा प्रकट झाला. यंदाच्या मार्च महिन्यात ज्या शास्त्रज्ञाने आपल्या हाताने या पक्ष्याला जीपीएस टॅग लावून सोडले, त्याच शास्त्रज्ञाला जेव्हा सप्टेंबर महिन्यात हा पक्षी मुंबईनजीकच्या भांडुप पम्पिंग स्टेशनजवळ मिळाला, तेव्हा त्याने आनंदाने ‘युरेका युरेका’ असा एकच जल्लोष केला. त्याच्या या शोधाची बातमी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक डॉ. बिवाश पांडव यांनी त्याच्याच ‘युरेका युरेका’ शब्दात माध्यमांना दिली.
ब्लॅक टेल्ड गॉडवीट या पक्ष्याला जीपीएस टॅग लावून मार्च महिन्यात मुंबईतून सोडले. या वेळी त्याला ‘बाला’ असे नाव ठेवण्यात आले. बी.एन.एच.एस.चे एक प्रख्यात पक्षी शास्त्रज्ञ म्हणजे डॉ. बालाकृष्णन! त्यांनी आपल्या आयुष्यात हजारो पक्ष्यांच्या पायांना रिंग बांधून त्या पक्ष्यांना त्यांचा प्रवास जाणून घेण्यासाठी निसर्गात मुक्त केले होते. निवृत्तीनंतरही ते याच अभ्यासात व्यग्र आहेत. त्यांचेच नाव या गॉडवीटला देण्यात आले होते. यानंतर बी.एन.एच.एस.च्या शास्त्रज्ञांनी उपग्रहाच्या माध्यमातून त्याचा मागोवा घेतला. तेव्हा तो जून महिन्यात सायबेरियाच्या नैर्ऋत्येकडे मिळाला. म्हणजेच त्याने तीन महिन्यांत सुमारे पाच हजार कि.मी. अंतर कापले होते; पण त्याचा थक्क करणारा प्रवास इथे संपला नव्हता. पुढे तीन महिने तो सायबेरियामध्ये राहिला. त्याने पुन्हा भारतात परतण्याचा निर्णय घेतला. या वेळी मात्र त्याने कुठेही न थांबता हा प्रवास केल्याचे दिसून येते. कारण परतीच्या प्रवासात थेट ४२०० कि.मी. अंतर कापून तो केवळ पाचच दिवसांत भारतात, मुंबईनजीकच्या भांडुप पम्पिंग स्टेशनजवळ पोहोचला.
या पक्ष्याचा हा थक्क करणारा प्रवास आणि या अभ्यासामध्ये लक्षात आलेल्या आणखी काही गोष्टी पक्षी शास्त्रास समृद्ध करण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. म्हणूनच या शोधानंतर संचालक डॉ. बिवाश पांडव यांनी आनंदाने ‘युरेका युरेका’ असा उल्लेख केला. कारण हा क्षण आपल्या देशासाठी अत्यंत अभिमानाचा आहे.
यापूर्वी बी.एन.एच.एस.ने एप्रिल २०२२ मध्ये तीन मोठे अग्निपंख (ग्रेटर फ्लेमिंगो) व तीन लहान अग्निपंख (लेसर फ्लेमिंगो) यांनाही जीपीएस /जीएसएम उपग्रहीय टॅग लावले होते. त्यांचा मागोवा घेण्यात आला त्यावेळीही अग्निपंख पक्ष्यांच्या (फ्लेमिंगोंच्या) स्थलांतराची महत्त्वपूर्ण माहिती हाती आली होती. त्यातील एक अग्निपंख पक्षी (फ्लेमिंगो) एका दिवसात गुजरातमधील भावनगर येथे पोहोचल्याचे लक्षात आले होते. हा संपूर्ण अभ्यास ठाणे खाडीमध्ये येणाऱ्या स्थलांतरित पक्षांचा दीर्घकालीन अभ्यास करण्यासाठी हाती घेतलेल्या एका अभ्यास प्रकल्पाचा भाग आहे. या प्रकल्पात आतापर्यंत सुमारे २१ हजार पक्ष्यांना पायात रिंग घालण्यात आली आहे. आता त्यांच्या ठिकाणांचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे. यापैकी काही पक्षी भारतातील इतर राज्ये, रशिया याठिकाणी आढळून आले आहेत; परंतु त्यांची पुन्हा सापडण्याचे प्रमाण फारच कमी असते.
यावरून फक्त अग्निपंख (फ्लेमिंगो) पक्ष्यांसारखे आकाराने मोठे असणारे पक्षीच दीर्घ पल्ल्याचे स्थलांतर करतात, असा कुणाचा गैरसमज होईल; परंतु ते खरे नाही. अगदी चिमणीच्या आकाराचे पक्षीही असे दीर्घ पल्ल्याचे स्थलांतर करतात. उत्तरेकडील हिमाच्छादित देशांमधून खाद्याचा तुडवडा जाणवला, की अनेक पक्षी हिवाळ्यात उत्तरेकडून दक्षिणेकडे स्थलांतर करतात, असाही पूर्वी समज होता; परंतु काही पक्षी चक्क आफ्रिकेतून भारतात येतात, हेही अशा अभ्यासावरून आता दिसून आले आहे. एकंदरीत काय, तर पक्ष्यांच्या स्थलांतराचा जो अभ्यास बी.एन.एच.एस.द्वारे सुरू आहे तो येणाऱ्या काळात पक्ष्यांचे हवाई मार्ग आणि विहंगायन आणि मानवी हवाई वाहतूक या दोहोंच्याही दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईत साकारला जातोय. तेव्हा या विमानतळावरून होणारा हवाई प्रवास सुरक्षित व्हावा, त्यासाठीही हा प्रकल्प महत्त्वपूर्ण असणार आहे. हवाई वाहतूक तज्ज्ञांसाठी हा अभ्यास प्रकल्प महत्त्वपूर्ण राहणार आहे. अर्थात त्यामुळे पक्ष्यांच्या अस्तित्वावर गदा येणार असेल, तर त्यासाठी काय बदल करावे लागतील, हे अभ्यासनेही महत्त्वपूर्ण असेल. त्यामुळेच ब्लॅक टेल्ड गॉडवीट या पक्ष्याच्या नऊ हजार कि.मी. प्रवासाचे कौतुक करावेच लागेल; पण त्यासोबतच बी.एन.एच.एस.च्या शास्त्रज्ञांचेही त्यांच्या अहोरात्र संशोधनासाठी कौतुक करणे आवश्यक आहे.
(लेखक मागील ३० वर्षांपासून वने, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्यरत असून, त्यांनी मध्य भारतातील जंगलांमध्ये वन्यजीव संरक्षण व आदिवासी विकासाचे विविध प्रकल्प हाती घेतले आहे. केंद्रीय व राज्य वन्यजीव मंडळ तसेच जैवविविधता मंडळावर त्यांनी काम केले आहे.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.