बेटांचा जीव मुठीत

पाण्याने चहूबाजूंनी वेढलेली बेटे निसर्ग सौंदर्याने नटलेली असतात. पण हवामान बदलाच्या धोक्यांनी सध्या जगभरातील बेटांवर वाईट दिवस आले आहेत.
India Island
India IslandSakal
Updated on
Summary

पाण्याने चहूबाजूंनी वेढलेली बेटे निसर्ग सौंदर्याने नटलेली असतात. पण हवामान बदलाच्या धोक्यांनी सध्या जगभरातील बेटांवर वाईट दिवस आले आहेत.

- किशोर रिठे sakal.avtaran@gmail.com

पाण्याने चहूबाजूंनी वेढलेली बेटे निसर्ग सौंदर्याने नटलेली असतात. पण हवामान बदलाच्या धोक्यांनी सध्या जगभरातील बेटांवर वाईट दिवस आले आहेत. येथील लोकसमूह अगदी जीव मुठीत धरून जगत आहेत. अशात भारताच्या ग्रेट निकोबार बेटावर विनाश प्रकल्पाचे आणखी एक वादळ घोंगावत आहे.

भारताच्या दक्षिणेकडे पूर्व किनाऱ्यावर अंदमानच्या समुद्रात ५७२ बेटांपैकी ‘ग्रेट निकोबार’ बेट आहे. आकाराने फक्त ९२१ चौ.कि.मी. म्हणजेच मुंबई शहरापेक्षा थोडे मोठे. संपूर्ण बेट पर्जन्यहारी जंगलाने व्यापले आहे. या पर्जन्यहारी जंगलामध्ये सुमारे ६४८ प्रजातींच्या वनस्पती आढळून येतात. या छोट्याशा वनाच्छादित बेटावर फक्त ८०६७ लोकांची वस्ती विखुरली आहे. पूर्वी येथे निकोबारी आणि शोमपेन जमातीचे लोक राहायचे. स्वातंत्र्यानंतर १९६० नंतर भारतातील अनेक राज्यांमधून आलेले लोकही येथील रहिवासी झाले. या बेटापासून दक्षिणेकडे फक्त १८० कि.मी. अंतरावर सुमात्रा बेट आहे. निसर्गाची किमया अशी की ‘ग्रेट निकोबार’ या बेटावर उत्तर दक्षिण पसरलेल्या पर्वतातून अलेकझेंडरा, अमृत कौर, डोंगमार आणि गलाथीया या चार नद्या उगम पावतात आणि मिळालेल्या उतारानुसार उत्तर-दक्षिण वाहतात. या बेटाचा बहुतांश भाग येथील संपन्न जंगलामुळे बायोसफियर रिझर्व म्हणून घोषित केला आहे.

निकोबार मेगापोड व इडीबल नेस्ट स्विफ्टलेट नावाचा पक्षी, खाऱ्या पाण्यात राहणारी मगर, मोठे लेदरबेक समुद्री कासव, मलायन समुद्री कासव, मोठे रॉबर खेकडे, निकोबार खार म्हणजेच ट्री श्रू, लांब शेपटीचे निकोबार माकड व रेटीक्यूलेटेड अजगर अशा जवळपास ३३० वन्यजीव प्रजाती या बेटावर आढळतात. कोणत्याही बेटावर एनडेमीक म्हणजेच त्याच परिस्थितिकीत आढळणाऱ्या वन्यजीवांना अनोखे महत्त्व असते. या निकोबार बेटावर निकोबार रानडुक्कर, निकोबार मेगापोड पक्षी, ग्रेट निकोबार सर्प गरूड, निकोबार खार म्हणजेच ट्री श्रू व निकोबार स्वर्गीय नर्तक या प्रजाती फक्त याच बेटावर आढळणाऱ्या मूळ वांशिक (एनडेमीक) प्रजाती आहेत. लांब शेपटाचे माकड व इतर दुर्मिळ प्रजातींवर येथे अनेक संशोधक काम करीत आहेत. हे वन्यजीव अभ्यासक अनेक रहस्यमय गोष्टींचा उलगडा करीत आहेत.

सध्या संपूर्ण जगावर हवामान बदलाचे संकट आले आहे. बर्फाच्छादित प्रदेशांमधील बर्फ वितळणे, समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणे, समुद्राची पातळी वाढल्याने समुद्र किनाऱ्यावर अनेक बदल होणे, फयान, त्सुनामीसारखी अनेक नवनवीन वादळे येणे, ढगफुटी होणे यांसारख्या गोष्टी आता सातत्याने घडताना दिसून येत आहेत. या जागतिक समस्येचे मूळ वातावरणातील हरितवायूंच्या प्रमाणात आहे. वातावरणामध्ये हरितवायूंच्या प्रमाणात व त्यातही एकट्या कार्बनच्या (३९० पार्ट पर मिल्लीअन (पी.पी.एम.च्या वर) प्रमाणात वाढ झाल्याने पृथ्वीचे तापमान वाढले आहे. बर्फाच्छादित प्रदेशांमधील बर्फ वितळून समुद्राची पाण्याची पातळी वाढल्याने समुद्र किनारी असलेली अनेक शहरे, देश व समुद्री बेटे अक्षरशः जीव मुठीत घेऊन जगत आहेत. अगदी काल-परवा इंडोनेशियामध्ये आलेल्या भूकंपात जमिनीवर अशा काही उलथा-पालथी झाल्या की, अख्खे शहर पृथ्वीच्या पोटात गडप व्हावे तसे प्रत्यक्षात घडले. या गोष्टी काल्पनिक राहिल्या नसून, त्या प्रत्यक्षात घडत आहेत. २००४ मध्ये त्सुनामी वादळाने या ‘ग्रेट निकोबार’ बेटावर थैमान घातले आणि बेटाचे खूप नुकसान झाले. तेव्हापासून येथील लोकसमूह अगदी जीव मुठीत धरून जगत आहेत.

सध्या या बेटावरील लोक एका वेगळ्याच वादळाच्या संकटाने ग्रासले आहेत. येथे ग्रेट निकोबार बायोसफियर रिझर्व आणि गालाथीया उपसागरच्या भागात अंदाजे ७२ हजार कोटी रुपये खर्चून एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर, तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी समुद्रातील पाणी अडवून जहाजांना थेट बेटात आणण्यासाठी समुद्री प्रवाह बेटात सोडणारी एक भव्य संरक्षक भिंत समुद्र किनारी निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. बंदर, वसाहत व विमानतळ निर्मितीसाठी बेटावरील तब्बल २४४ चौ.कि.मी. भूभागावरील साडेआठ लाख नैसर्गिक पुरातन वृक्ष तोडण्यात येणार आहेत.

यापूर्वीही या प्रकल्पाचा विचार करण्यात आला होता; परंतु होणाऱ्या पर्यावरणीय हानीचा विचार करता तत्कालीन पंतप्रधानांनी हा प्रकल्प रद्द केला होता. ग्रेट निकोबार बायोसफियर रिझर्व आणि गालाथीया उपसागरच्या या भागात मागील काही महिन्यांमध्ये अनेक पर्यावरणीय मंजुरी मिळाल्याने आता या प्रकल्पाची चर्चा जोरदारपणे सुरू झाली आहे. अर्थात प्रकल्पासाठी तोडण्यात येणारे जंगल आणि किनारा हे दुर्मिळ वन्यजीवांचा अधिवास असल्याने या वन्यजीवांची अपरिमित हानी होणार, हे निश्चित. त्यामुळे येथे काम करणाऱ्या संस्थांनी हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे.

या ७२ हजार कोटींच्या प्रकल्पामुळे अंदाजे १२८ लाख कोटींच्या पर्यावरणाची हानी होणार असल्याचा या संस्थांचा दावा आहे. हे बेट आणि येथील समुद्र किनारा हे जैवविविधतेने संपन्न आहे. येथील २०२ कि.मी. लांबीचा समुद्र किनारा प्रवाळ म्हणजेच कोरल रीफ, मासे, कासवे यांसारख्या समुद्री जिवांचे, तसेच समुद्री पक्ष्यांचा उत्तम अधिवास आहे. यावर येथील जनतेचा उदरनिर्वाह चालतो. शिवाय बंदर, विमानतळ आणि नवे शहर याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर (दररोज ८६,६०० किलो लिटर) कायमस्वरूपी गोडे पाणी लागणार आहे. यापैकी ४५ हजार किलो लिटर पाणी विहिरी खोदून भूगर्भातून घेण्याचे ठरले आहे. त्यामुळे प्रकल्पास स्थानिकांचा विरोध होणे स्वाभाविक आहे.

पर्जन्यहारी जंगल आणि दुर्मिळ वन्यजीव प्रजातींची भरून न निघणारी हानी होणार असल्याने पर्यावरण संस्थांचाही विरोध होतो आहे. बेटांच्या जैव-भौगोलिक विज्ञानानुसार पाण्याने किंवा जमिनीने वेढलेल्या कोणत्याही बेटावर वनस्पती किंवा प्राणी प्रजातींचा नष्ट होण्याचा वेग अधिक असतो. अशात अविचारी विकास प्रकल्प हा वेग आणखी वाढविण्यास कारणीभूत ठरतात. ‘ग्रेट निकोबार’ बेटाच्या एकूण बहुभागापैकी एक तृतीयांश एवढ्या मोठ्या क्षेत्रावर आलेले हे गंडांतर या बेटावर जगणाऱ्यांसाठी किती भयावह असेल याची फक्त कल्पनाच केलेली बरी.

​जगातील अनेक समुद्री बेटे बुडण्याच्या परिस्थितीत आहेत. हवामान बदलाच्या अशा पार्श्वभूमीवर एवढे खर्चीक धाडस आम्ही का करीत आहोत, हे समजायला मार्ग नाही. समुद्री बेटांवर होणारी ही अंदाधुंद विनाश कामे थांबविता येण्यासारखी आहेत. हे झाले नाही तर समुद्री बेटांवर जगणाऱ्या आमच्या बांधवांचे जगणे आम्ही आणखी कठीण करणार आहोत. कारण समुद्राने समुद्री किनाऱ्यांना आणि समुद्री बेटांना आधीच गिळंकृत करणे आणि तडाखे देणे सुरू केले आहे. त्यातून सावरण्याऐवजी हे नवीन आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय दुखणे ओढवून घेणे योग्य नाही.

(लेखक मागील तीन दशकांपासून वने, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन क्षेत्रांत कार्यरत असून त्यांनी मध्य भारतातील जंगलांमध्ये वन्यजीव संरक्षण व आदिवासी विकासाचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.