गोष्ट एका वाघाची; ताडोबाच्या बापाची!

ताडोबातील मोहर्ली वनक्षेत्रावर ‘येडा अण्णा’ नावाच्या वाघाचा दबदबा असताना ‘वाघडोह’ दाखल झाला.
Tiger
TigerSakal
Updated on
Summary

ताडोबातील मोहर्ली वनक्षेत्रावर ‘येडा अण्णा’ नावाच्या वाघाचा दबदबा असताना ‘वाघडोह’ दाखल झाला.

- किशोर रिठे

ताडोबातील मोहर्ली वनक्षेत्रावर ‘येडा अण्णा’ नावाच्या वाघाचा दबदबा असताना ‘वाघडोह’ दाखल झाला. काहीच दिवसांत वाघडोहने येडा अण्णाला हाकलून लावले आणि आपली सत्ता प्रस्थापित केली. त्याचा धिप्पाड देह व धडकी भरविणारा चेहरा, चेहऱ्यावर खुणा, फाटलेले ओठ, एक डोळा अर्धवट उघडलेला, एखाद्या युद्धातील जखमी विजयी वीरासारखा तो दिसायचा. त्याचा मोहर्ली परिसरात दबदबा राहिला. ताडोबा तळ्यापासून तर खातोडा गेट ते मोहर्ली असे भले मोठे वनक्षेत्र त्याचे घर होते. गेल्या आठवड्यात त्याचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला, या ‘ताडोब्याच्या बापा’ची गोष्ट...

गेल्या आठवड्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ‘वाघडोह’ वाघाचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. देशभरातील वृत्तपत्रांनी एखाद्या वाघाच्या मृत्यूची अशी दखल यापूर्वी अभावानेच घेतली असावी. सोमवारी सीनाला गावाजवळ गस्तीवर असणाऱ्या वनकर्मचाऱ्यांना सकाळी आठ वाजता त्याचा मृतदेह दिसला आणि तब्बल १७ वर्षांचा ‘वाघडोह’ नराचा ताडोबातील दरारा संपुष्टात आला.

ताडोबातील अंधारी नदीवरील वाघडोह नाल्याच्या परिसरात वनखंड क्रमांक १४२ मध्ये २००७ मध्ये त्याचा जन्म झाला. त्याच्या वडिलांना येथे ‘देवडोहचा नर’ म्हणून संबोधले जायचे. वाघडोहचे वनखात्याच्या दफ्तरी ‘टी३८’ असे नाव असले तरी या ओढ्याचे नाव घेऊनच तो पुढे १७ वर्षे पूर्णपणे जगला. त्याला ताडोबाचा बाप किंवा ताडोबाचा आजोबा, असेही म्हटले जायचे.

तो आईपासून विभक्त झाला तेव्हा नजीकच्या मोहर्ली वनक्षेत्रावर ‘येडा अण्णा’ नावाच्या नर वाघाचा दबदबा होता. काहीच दिवसांत ‘वाघडोह’ने त्याला हाकलून लावले आणि आपली सत्ता प्रस्थापित केली ती तब्बल २०१५ पर्यंत! त्याचा धिप्पाड देह व धडकी भरविणारा चेहरा, चेहऱ्यावर खुणा, फाटलेले ओठ, एक डोळा अर्धवट उघडलेला, एखाद्या युद्धातील जखमी विजयी वीरासारखा तो दिसायचा. सुरुवातीच्या दिवसांत तो खूपच बुजरा होता. जिप्सीची चाहूल लागली की जंगलात गडप व्हायचा. नंतर तो वाहनांना सरावला. त्याचा मोहर्ली परिसरात सतत दबदबा राहिला. ताडोबा तळ्यापासून तर खातोडा गेट ते मोहर्ली असे भले मोठे वनक्षेत्र त्याचे घर होते. यादरम्यान त्याने टी-१० म्हणजेच तेलिया तलाव परिसरातील माधुरीशी समागम करून तीन बछडे जन्मास घातले. २०११ मध्ये उमरेडच्या जंगलातील जय प्रसिद्धीस येईपर्यंत वाघडोह नरच भारतातील सर्वात धिप्पाड वाघ म्हणून ओळखला जायचा. पिल्लांजवळ आई नसताना तो त्यांचे संरक्षण करताना, पिल्लांसाठी शिकार करून त्यांना भरविताना तो दिसून यायचा. एवढा तो कुटुंबवत्सल होता. त्याने जन्म दिलेल्या काही बछड्यांनीही आपली स्वतःची ओळख निर्माण केली. त्यातील टी ३० (सोनम), टी-५८ (लारा), मोना आणि गीता ही काही नावे. सोनम आजही तेलिया तलाव परिसरात पाहायला मिळते, तर लाराने तिच्या नजीकचे जंगल निवडले आहे.

२०१५ पर्यंत अनभिषिक्त सम्राट राहिलेल्या ‘वाघडोह’ला टी-४९ म्हणजेच ‘बजरंग’ या नर वाघाने सर्वप्रथम मात दिली. आणि मग ‘वाघडोह’ला बफरमधील जुनोना वनक्षेत्रात नाईलाजाने जावे लागले. त्यानंतर तो मामला या बफर क्षेत्रातसुद्धा दिसून आला. त्याची ८० टक्के पिल्ले जगली. त्यामुळे तो तब्बल ४० बछड्यांचा बाप होता. त्याचा मागील तीन वर्षांपासून मुक्काम लोहारा ते जुनोना या परिसरात असायचा. एकदा तर त्याने हनुमान मंदिर परिसरात चक्क एका अस्वलाला मारले होते.

काही दिवसांपूर्वी ‘वाघडोह’ नर दुर्गापूर कोळसा खाणीजवळ दिसून आला होता. तेव्हापासून वनकर्मचारी त्याच्या हालचालींवर पाळत ठेवून होते. अखेरच्या काळात त्याच्या हालचाली क्षीण झाल्या होत्या. तो सिंनाळा मसाळा भागात गेल्याने तिकडच्या लोकांना जंगलात जाण्यासाठी मज्जाव केला होता. असे असताना २१ मे रोजी सिंनाळा गावाच्या परिसरात गेलेल्या दशरथ पेंदोर या गुराख्याला वाघाने ठार केले. त्यामागे ‘वाघडोह’ वाघ असावा, असा कयास लावला गेला. ताडोबाला प्रसिद्धीस आणण्यात ‘वाघडोह’चा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. त्यामुळेच त्याच्या मृत्यूनंतर काही गावांमध्ये श्रद्धांजलीचे पोस्टर झळकले. समाज माध्यमांवरही त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.