पत्नीसमवेत पक्ष्यांना दाणे टाकणे सुरू केले अन् चक्क परदेशी पक्षी गोळा झाले.. क्रौंच संवर्धनाचा वसा

क्रौंच पक्ष्याच्या एका थव्याच्या दर्शनासाठी पक्षिमित्र खूप भटकंती करतात; पण भारतात राजस्थानातील खिचन नावाच्या गावात १५-२० हजार क्रौंचांना एकत्र पाहण्याचे भाग्य लाभते.
Crouch Bird
Crouch Birdsakal
Updated on

- किशोर रिठे, sakal.avtaran@gmail.com

क्रौंच पक्ष्याच्या एका थव्याच्या दर्शनासाठी पक्षिमित्र खूप भटकंती करतात; पण भारतात राजस्थानातील खिचन नावाच्या गावात १५-२० हजार क्रौंचांना एकत्र पाहण्याचे भाग्य लाभते. त्यासाठी या गावाने गेल्या अनेक दशकांमध्ये जे केले ते थक्क करणारे आहे. रतनलाल मालू यांनी सुरू केलेले हे काम आज त्यांचे सुपुत्र सेवारामजी अधिक नेटाने पुढे नेत आहेत.

एखाद्या सिनेमात शोभेल, असे हे कथानक आहे. ही गोष्ट साधारणतः चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीची असावी. ओरिसाच्या रतनलाल मालू यांना त्यांच्या काकांनी आपल्या आजारी आईची देखभाल करण्यासाठी राजस्थानातील खिचन येथे पाठविले. रतनलाल आपली पत्नी सुंदराबाई यांच्यासोबत खिचन गावामध्ये दाखल झाले. येथे राहू लागल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीसमवेत पक्ष्यांना दाणे टाकणे सुरू केले. त्यावर येथे अनेक पक्षी येऊ लागले.

हिवाळ्यामध्ये तर चक्क क्रौंच्यासारखे स्थलांतरित विदेशी पक्षीही हजेरी लावू लागले. यांना इकडे ‘कुरंज’ म्हणतात. आता येथे दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये कुरंज पक्षी यायला लागले आणि पाहतापाहता पक्षांची संख्या दरवर्षी वाढायला लागली. हे पक्षी चक्क जानेवारीपर्यंत या ठिकाणी राहायला लागले. यानंतर रतनलाल यांनी या पक्ष्यांना बिनदिक्कत कुठलीही भीती न बाळगता दाणे खाता यावे, यासाठी ग्रामपंचायतीकडे जागेची मागणी केली.

ग्रामपंचायतीनेही ती मान्य केली. त्यानंतर या जमिनीला सहा फूट उंचीचे तारेचे कुंपण घातले आणि त्याला ‘चुग्गा घर’ (पक्ष्यांचे खाण्याचे ठिकाण) असे नाव दिले. पक्ष्यांची संख्या पाहता धान्यखरेदीसाठी त्यांनी काही धनाढ्य लोकांकडे पैशांची मागणी केली. तीही पूर्ण झाली. या प्रयोगातून मागील ४० वर्षांमध्ये या गावाचे क्रौंच पक्ष्यांशी घट्ट नाते निर्माण झाले. सध्या तेथे दरवर्षी २० ते २५ हजार क्रौंच पक्षी हजेरी लावतात. पक्षी संरक्षणाच्या या कामासाठी रतनलाल मालू यांना सन २००९ मध्ये बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीतर्फे सलिम अली संवर्धन पुरस्कार मिळाला आहे.

पण ही कथा येथे संपत नाही. रतनलाल यांच्या मुलानेही हे काम चालू ठेवले. तो तर एक पाऊल त्यांच्याही पुढे गेला. या भागात या पक्ष्यांना संरक्षण मिळावे, यासाठी त्याने कंबर कसली. मी या प्रयोगबद्दल ऐकून होतो. पण हे सर्व पाहण्याचा योग आला नव्हता.

मी या वर्षी फेब्रुवारी महिन्यात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या कामासाठी राजस्थानच्या जैसलमेरला पोहोचलो. त्याच वेळी राजस्थानच्या फलोदी तालुक्यातील (आता जिल्हा झालाय) खिचन येथे कीटकनाशकांमुळे काही डेमोसेल क्रेनसंक्रमित झाल्याचे कळल्याने आमच्या बीएनएचएसच्या टीमने खिचनला भेट देण्याचे ठरविले. साहजिकच मलाही येथे भेट देण्याचा योग आला.

आम्ही सकाळी-सकाळी थेट खिचन गाव गाठले. गावातील शाळेजवळ जाऊन पोहोचलो. त्याला खेटून असलेल्या बंदिस्त मैदानात क्रौंच पक्ष्यांचा गोंगाट सुरू होता. पक्षिमित्रांची ही काशी! इतक्या मोठ्या संख्येत क्रौंच पाहून मी तर भारावून गेलो. बाजूलाच रतनलाल मालू यांचे चिरंजीव सेवाराम मालू यांचे घर होते.

महाशय घराच्या गच्चीवर विराजमान होऊन हजारो डेमोसेल क्रौंचांवर लक्ष देत त्यांचे खाणे आणि सामूहिक गुंजन ऐकत होते. त्यांनी अगदी नातेवाईक असल्यासारखे आमचे स्वागत केले. पुढचा अर्धा तास मी या पक्ष्यांचे फोटो काढण्यात व्यग्र होतो. तेवढ्यात चहा आला. मग सेवारामजी अनेक गोष्टी सांगू लागले.

खरे तर मी पक्ष्यांना कृत्रिमरीत्या खाऊ घालण्याचा पुरस्कर्ता नाही. त्यामुळे मी हा प्रयोग व त्यातील बारकावे समजून घेत होतो. दर वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये नेमाने येथे येणाऱ्या या डेमोसेल क्रेन्सचे रहस्य मला समजून घ्यायचे होते. एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येत आल्याने त्यांना काही धोके तर नाही ना, हेही मला जाणून घ्यायचे होते.

सेवारामजी या सर्व पक्ष्यांची एखाद्या पक्षिशास्त्रज्ञाप्रमाणे नोंद ठेवत होते. पक्ष्यांचे दस्तावेजीकरण करून जखमी व रोगग्रस्त पक्ष्यांवर तातडीने उपचार करण्याची त्यांची धडपड वाखाणण्याजोगी होती. अगदी ते मार्चमध्ये परत जाईपर्यंत सेवारामजी त्यांची काळजी घेतात. स्थलांतरादरम्यान जखमी झालेल्या पक्ष्यांची दररोज शुश्रूषा करतात.

येथे बराच वेळ घालविल्यानंतर सेवारामजी आम्हाला या पक्ष्यांचे भोजनानंतरचे आश्रयाचे ठिकाण असणाऱ्या तलावाकाठी घेऊन गेले; पण येथे आम्हाला आणण्यामागचा त्यांचा उद्देश दुसरा होता. येथे उभ्या होऊ घातलेल्या वीजवाहिन्या या पक्ष्यांना विहंगायनात त्रास देणाऱ्या होत्या. त्यामुळे त्यांनी या कंपनीशी लढा देऊन त्यांना या वीजवाहिन्या भूमिगत करण्यास भाग पाडले होते. येथून आम्ही आणखी एका ठिकाणाकडे कूच केली.

राजस्थान वनविभागाने सेवारामजींच्या सल्ल्यानुसार येथे एक जखमी पक्ष्यांसाठी शुश्रूषा केंद्र (रेस्क्यू सेंटर) उभारले होते. त्यालाही आम्ही भेट दिली. येथेच विषबाधा झालेले पक्षी आणण्यात आले होते. आठ डेमोसेल क्रेनवर उपचार सुरू होते. विषबाधा होऊन मरण पावलेल्या काही पक्ष्यांना शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते. पतंगाच्या मांजामुळे एका देखण्या क्रौंचाला दोन्ही पाय गमवावे लागले होते. आता या क्षेत्रात कीटकनाशकांचा वापर पूर्णपणे बंद करण्यासाठी सेवारामजींनी शेतकऱ्यांसोबत मोहीम सुरू केली आहे.

गावातील उच्चदाबाच्या वीजवाहिन्यांना धडक लागल्याने पक्षी बळी पडत असल्याचे लक्षात येताच सेवारामजींनी महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. नंतर राजस्थान विद्युत मंडळाविरोधात राजस्थान उच्च न्यायालयात धाव घेतली आणि अखेर वीजवाहिनी भूमिगत करण्यात आली.

स्थानिक तरुणांना बीएनएचएसकडून मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण देऊन रोजगार मिळावा, यासाठी संवर्धन राखीव क्षेत्र जाहीर करून संपूर्ण क्रौंच (क्रेन) अधिवास संरक्षित करण्याची त्यांची इच्छा होती. त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी बीएनएचएसचे कर्मचारी डॉ. सुजित नरवडे आणि डॉ. नीलकंठ बोरा त्यांच्यासोबत काम करत होते.

पुढे तीही पूर्ण झाली. हे सर्व पाहून या प्रयोगाबाबत माझे वेगळे मत बनले. आपल्याकडे अनेक शहरांमध्ये असणाऱ्या कबुतरखान्यांच्याच धर्तीवर हे चुग्गा घर आहे; पण गावात असल्याने आणि त्यातही फक्त स्थलांतरित पक्षीच आल्याने याचे निसर्गात होणारे विपरीत परिणाम फारसे नाहीत.

मागील ९० वर्षांमध्ये भारतात मुंबईत भायखळा, भुलेश्वर, काळबादेवी, चिराग, लालबाग तसेच इंदूर, हैदराबाद, पवागाढ (गुजरात) येथे कबुतरांना खाद्य पुरविणारे अनेक कबुतरखाने आहेत. या सर्व शहरांमध्ये असलेले मुख्यत्वे जैनधर्मीय बांधव या कबुतरांना खाद्य पुरविणे, त्यांची शुश्रूषा करणे अशी कामे करतात.

कबुतरांच्या कृत्रिम संगोपनामुळे मुंबईत किंवा कबुतरखाने असणाऱ्या इतर शहरांमध्ये कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या शहरांमधील उत्तुंग इमारतींच्या बाथरूम, गॅलरी अशा अडगळीच्या जागा या कबुतरांनी बळकावल्या आहे. साहजिकच त्यांच्या विष्ठा आता अशा प्रत्येक उत्तुंग इमारतीमध्ये पोहोचल्या आहेत. या विष्ठांमधून क्रिप्तोकोकोसीस, हिस्तोप्लास्मोसीस, प्सिटटाकोसिस अशा जवळपास साठ रोगांचा प्रादुर्भाव संभवतो.

विशेषतः वाळलेली विष्ठा झाडताना नाकावाटे श्वसननलिकेत जाऊन या रोगाची लागण होते. तसेच ही विष्ठा पाण्यात किंवा खाद्य पदार्थांमध्ये मिसळल्यानेही आजार होतात. असे अनेक रुग्ण आता या शहरांमधून आढळून येत आहेत. त्यामुळे चक्क मानवी आरोग्यच धोक्यात आले आहे; पण हा विषय हाताळायला वाटतो, तसा सोपा नाही. एकीकडे मानवाची भूतदया; तर दुसरीकडे यातून मानवी आरोग्यावर येणारे संकट, त्यामुळे हे कठीण जागेचे दुखणे झाले आहे.

यात आता शहरी कचरा व्यवस्थापनातील समस्यांमुळे कावळ्यांची संख्या वाढली आहे. मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली या महापालिकांनी आता यावर कठोर पावले उचलणे आवश्यक झाले आहे. वास्तविक पाहता कबुतरांना कृत्रिम खाद्याची अजिबात आवश्यकता नसते. असे असते तर जंगलात कबुतराच्या प्रजाती आढळल्याच नसत्या; परंतु त्यांनी आज मानवी आरोग्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

या पार्श्वभूमीवर खिचनचे चुग्गा घर वेगळे वाटले. चुग्गा घर ते संवर्धन राखीव क्षेत्र, असा याचा प्रवास खऱ्या अर्थाने पक्षिसंवर्धन मोहिमेस मदत करणारा आहे. या पुढच्या काळात हे चुग्गा घर गावाबाहेर संवर्धन राखीव क्षेत्रात गेले तर आनंदच होईल. अर्थात तोही विचार सेवारामजींच्या डोक्यात होताच.

पक्षिसंवर्धन करायचेच असेल, तर जंगलामधील पक्षी प्रजातींना अभय देणे, त्यांचे क्षेत्र सुरक्षित ठेवणे, त्यांच्या नष्ट होणाऱ्या प्रजातींना शास्त्रीयदृष्ट्या वाचविणे, त्यांचे संवर्धन करणे, संशोधन करणे या प्रयत्नामध्ये पक्षिप्रेमींनी सहभागी होणे आवश्यक आहे. त्यासाठी बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटीसारख्या ख्यातनाम संस्था कार्यरत आहे. जंगलातील पक्ष्यांच्या अनेक प्रजाती नामशेष व्हायला आल्या आहेत. त्यांना सेवारामजींसारख्या पक्षिमित्रांची खरी गरज आहे. सेवारामजीच्या कामाला सलाम!

(लेखक किशोर रिठे मागील ३० वर्षांपासून वने, वन्यजीव व पर्यावरणसंवर्धन क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी मध्य भारतातील जंगलांमध्ये वन्यजीव संरक्षण व आदिवासी विकासाचे विविध प्रकल्प हाती घेतले आहे. तसेच केंद्रीय व राज्य वन्यजीव मंडळ तसेच जैवविविधता मंडळावर त्यांनी काम केले आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.