व्हाईट टेल्ड ट्रॉपिक बर्ड

कावळ्याच्या आकाराचा एक समुद्री पक्षी दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन येथून प्रवास करीत असताना बिपरजॉय वादळामध्ये सापडल्याने महाराष्ट्राच्या मालवण किनाऱ्यावर जखमी अवस्थेत आढळला.
white tailed tropic bird
white tailed tropic birdsakal
Updated on

- किशोर रिठे, sakal.avtaran@gmail.com

कावळ्याच्या आकाराचा एक समुद्री पक्षी दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन येथून प्रवास करीत असताना बिपरजॉय वादळामध्ये सापडल्याने महाराष्ट्राच्या मालवण किनाऱ्यावर जखमी अवस्थेत आढळला. उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले; पण आता मृत्यूनंतरही तो माणसांशी बोलणार आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये एका पक्षी स्थलांतर शोध प्रकल्पांतर्गत या पक्ष्याला २०२२ मध्ये रिंग बसवण्यात आली होती. पांढरी शेपटी असलेला हा पक्षी उष्णकटिबंधीय प्रदेशातील समुद्री पक्षी आहे.

हवामान बदलामुळे कुठेकुठे काय काय होणार आणि कोणकोण संकटात सापडणार याबाबत दररोज नवनवीन गोष्टी जगासमोर येत आहेत. यातीलच एक घटना मागील आठवड्यात महाराष्ट्रात घडली. ‘व्हाईट टेल्ड ट्रॉपिक बर्ड’ हा कावळ्याच्या आकाराचा समुद्री पक्षी दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन येथून समुद्रीमार्गे निघाला.

तसेही समुद्री पक्षी काही काम नसेल तर समुद्र किनाऱ्यावर फारसे येत नाहीत. ते समुद्रात असणाऱ्या बेटांवर अंडी घालतात, प्रजनन करतात. जवळपास अशी बेटे नसतील तर मात्र समुद्र किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येतात. तर हा ‘व्हाईट टेल्ड ट्रॉपिक बर्ड’ म्हणजे पांढऱ्या शेपटीचा पक्षी समुद्रीमार्गे प्रवास करीत असताना बहुदा बिपरजॉय या वादळामध्ये सापडला. २५ जूनला तो महाराष्ट्राच्या मालवण किनाऱ्यावर आशीष परुळेकर यांना सापडला. त्यांनी या पक्ष्याला प्रा. हसनखान यांच्या मदतीने वनविभागाकडे सुपूर्द केले. या वेळी तो जखमी अवस्थेत असल्याचे लक्षात आले.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यावर त्वरित उपचार सुरू केले. या वेळी त्याच्या पायात एक रिंग असल्याचे आढळून आले. या रिंगवर क्रमांक लिहिला होता. तसेच त्यावर केप टाऊन साऊथ आफ्रिका असेही लिहिले होते.

वनविभागाने त्वरित बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या शास्त्रज्ञांशी संपर्क साधला. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही पक्षी अभ्यास व पक्षिसंशोधनाच्या क्षेत्रात मागील १४० वर्षांपासून कार्यरत भारतातील सर्वांत प्राचीन संस्था आहे. या संस्थेने समुद्री पक्षी याविषयी सखोल संशोधन केले आहे.

नुकतेच मागील महिन्यात बीएनएचएस व बर्डलाईफ इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने बीएनएचएसच्या मुंबईस्थित मुख्यालयात हिन्दी महासागरातील (अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर) समुद्री पक्ष्यांवर तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत समुद्री पक्षी, त्यांचे महत्त्वाचे अधिवास आणि हिंद महासागरातील समुद्री पक्ष्यांच्या हालचाली व त्यांचे अधिवास अशा महत्त्वपूर्ण विषयावर मंथन झाले होते.

बीएनएचएसच्या पक्षिशास्त्रज्ञांनी मागील दोन दशकांत केलेल्या मध्य आशियाई उड्डाणमार्ग (सेंट्रल एशियन फ्लायवे) याविषयीचे जगातील सर्व देशांच्या पक्षिशास्त्रज्ञांशी एकत्र काम केले आहे. समुद्री पक्ष्यांच्या अभ्यासातून संस्थेच्या पक्षिशास्त्रज्ञांनी आजवर पक्षिशास्त्रातील अनेक गूढ उकलणारे अभ्यास केले आहेत.

‘जनजंगल’मधून आपण यापूर्वी ब्लॅक टेल्ड गॉडवीट या इवल्याशा पक्ष्याने कसा चक्क ९००० कि.मी. लांबीचा मुंबई ते सायबेरिया प्रवास पूर्ण केला आणि तो मुंबईत नेमके भांडुप पम्पिंग स्टेशनमध्येच पुन्हा कसा परतला हे आपण पाहिले आहे.

असे शोध लावण्यासाठी या संस्थेचे पक्षिशास्त्रज्ञ दरवर्षी हजारो पक्ष्यांच्या पायात रिंग घालतात, तसेच काही पक्ष्यांना चिप बसवून त्याच्यावर उपग्रहीय प्रणालीद्वारे पाळत ठेवतात. आता ही माहिती या सर्व देशांमधून जमविलेल्या महितीशी जुळविल्यानंतर त्यातून अनेक नवीन गूढ गोष्टींची उकल होते.

प्रवासी पक्ष्यांच्या दीर्घकालीन प्रकल्पासाठी देशाच्या महत्त्वपूर्ण पक्षी अधिवासानजीक संस्थेने काही अभ्यास केंद्रे उभारण्यात आली आहेत. देशाच्या दक्षिण टोकावर तामिळनाडू राज्यात नागापट्टनम जिल्ह्यात पॉइंट कॅलीमर येथे संस्थेने एक केंद्र उभारले आहे. पॉइंट कॅलीमर येथे बंगालचा उपसागर आणि पाक स्ट्रीट भेटतात. संस्थेचे दुसरे अभ्यास ठिकाण मुंबईमध्ये ऐरोली येथे आहे.

रोहित म्हणजेच मोठे अग्निपंख (फ्लेमिंगो) पक्षी, तसेच गॉडवीट, रेडशांक, युरेशीयन कर्लयू, कसपीयन टर्न (सुरय), पलोवरची असे अनेक समुद्री पक्षी येथे हजारोंच्या संख्येत दरवर्षी येतात. दक्षिणेतील पॉइंट कॅलीमर तसेच मुंबईतील ऐरोली येथे असलेल्या मिठागरांमुळे या प्रवासी पक्ष्यांना समुद्र किनाऱ्यानजीकचा मोठा प्रदेश भक्ष्य शोधण्यासाठी उपलब्ध होतो.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीप्रमाणेच इंग्लंडमधील बर्ड लाईफ इंटरनॅशनलसारख्या अनेक संस्थांकडून समुद्री पक्ष्यांचे होणारे लांब पल्ल्याचे स्थलांतर अभ्यासण्यासाठी जगभर अनेक संशोधन प्रकल्प हाती घेतले जातात. या संशोधन प्रकल्पांमधून समुद्री पक्ष्यांचे ठराविक उड्डाणमार्ग असतात, ही महत्त्वपूर्ण बाब आता समोर आली आहे.

यातूनच आता समुद्री पक्ष्यांच्या या प्रवास कथांमागील कारणमीमांसाही आपल्यासमोर येत आहे. आपल्याला उपलब्ध झालेल्या आधुनिक तंत्रज्ञानाने पक्ष्यांच्या थक्क करणाऱ्या या प्रवास कथांचे गूढ उकलणे शक्य झाले आहे.

या सर्व कामांमुळे जेव्हा असा रिंग घातलेला पक्षी संस्थेच्या निदर्शनास येतो, तेव्हा संस्थेचे पक्षिशास्त्रज्ञ लगेच संबंधित देशाच्या संस्थेस कळवितात. अशीच माहिती एखादा रिंग घातलेला पक्षी बाहेर देशात सापडतो, तेव्हा त्या देशातील शास्त्रज्ञही तेवढ्याच तातडीने बीएनएचएसला कळवितात. बीएनएचएसने आतापर्यंत सुमारे २१,००० पक्ष्यांना पायात रिंग घातली आहे. ही पद्धत वापरण्याला २०२७ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत.

या दीर्घकालीन संशोधनातून या पक्ष्यांच्या थांब्यांच्या ठिकाणांचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे. असे असले तरी रिंग घातलेले पक्षी पुन्हा सापडण्याचे प्रमाण फारच कमी असते. त्यामुळे आता रंगीत बॅँड लावण्यासारख्या इतर अनेक गोष्टी स्वीकारण्यात आल्या आहेत. यात आता उपग्रहीय प्रणालीसारख्या आधुनिक पद्धतींची भर पडली आहे.

बीएनएचएसने समुद्री तसेच प्रवासी पक्ष्यांचा अभ्यास करताना १९९५ पासून सुमारे १७ प्रजातींच्या १७५ पक्ष्यांना उपग्रहीय टॅग बसवून त्यांच्या उड्डाण मार्गांची माहिती जमविली आहे. एप्रिल २०२२ मध्ये तीन मोठे रोहित/अग्निपंख (ग्रेटर फ्लेमिंगो) व तीन लहान अग्निपंख (लेसर फ्लेमिंगो) यांनाही जीपीएस /जीएसएम उपग्रहीय टॅग लावले होते. त्यांचा मागोवा घेण्यात आला.

त्या वेळीही रोहित /अग्निपंख पक्ष्यांच्या (फ्लेमिंगोंच्या) स्थलांतरणाची महत्त्वपूर्ण माहिती हाती आली होती. त्यातील एक अग्निपंख पक्षी (फ्लेमिंगो) एका दिवसात गुजरातमधील भावनगर येथे पोहोचल्याचे लक्षात आले होते. हा संपूर्ण अभ्यास ठाणे खाडीमध्ये येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचा दीर्घकालीन अभ्यास करण्यासाठी हाती घेतलेल्या एका अभ्यास प्रकल्पाचा भाग आहे.

दक्षिण आफ्रिकेमध्ये एका पक्षी स्थलांतर शोध प्रकल्पांतर्गत या पक्ष्याला २०२२ मध्ये रिंग बसवण्यात आली होती. पांढरी शेपटी असलेला हा पक्षी उष्णकटिबंधीय प्रदेशातील समुद्री पक्षी आहे. तो समुद्रातच आपले जास्तीत जास्त जीवन व्यतीत करीत असतो. सहसा किनाऱ्यावर येत नाही. अंडी घालण्यासाठी काही वेळा तो या किनाऱ्यावर येतो.

समुद्रात असलेली बेटे हे त्याचे अंडी घालण्याचे ठिकाण मानले जाते. या रिंगमुळे तो केप टाऊन येथून प्रवास करीत असल्याचे स्पष्ट झाले. बहुदा हिंदी महासागरात स्थलांतर किंवा भ्रमंती करीत असताना तो चक्रीवादळामध्ये सापडला असावा. त्याच वेळी बिपरजॉय हे चक्रीवादळ आले होते. यात तो सापडल्याने व जखमी झाल्याने तो आश्रयासाठी बहुदा मालवण किनाऱ्यावर भरकटत आला असावा.

तो किनाऱ्यावर जखमी अवस्थेत सापडल्याची बातमी वर्तमानपत्रात उमटली. त्यापाठोपाठ लगेच वनविभागाने बीएनएचएसला कळविले. बीएनएचएसचे पक्षिशास्त्रज्ञ वनकर्मचाऱ्यांच्या संपर्कात होते. वनविभागाने त्याची तातडीने सुश्रूषा सुरू केली, पण तरीही सुश्रूषा सुरू असताना २८ जूनला शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने डायरियामुळे या पक्ष्याचा मृत्यू झाला. एका समुद्री पक्ष्याचा अशा रीतीने अंत झाला.

त्याच्या पायात असलेल्या रिंगमुळे त्याने मृत्युपूर्वी आपले काम केले होते. पक्षिशास्त्रात एक महत्त्वपूर्ण माहिती त्याने जगाला कळविली होती. त्यामुळे त्याचे शरीर राखून ठेवले पाहिजे, हा विचार बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या पक्षिशास्त्रज्ञांच्या डोक्यात आला.

तोच विचार त्याची सुश्रूषा करणाऱ्या वनाधिकाऱ्यांच्या डोक्यातही होता. त्यासाठी सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक नवाकिशोर रेड्डी यांनी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, तसेच राज्याच्या प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) यांना पत्र लिहिले. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या शास्त्रज्ञांनी त्वरित पावले उचलली आणि त्याचे पार्थिव सोसायटीच्या मुंबईस्थित प्रयोगशाळेत आणले.

येथे असणाऱ्या संग्रहालयात सुमारे एक लाख ४० हजार असे पक्षी, प्राणी, कीटक याची शरीरे जतन करून ठेवण्यात आली आहेत. आता त्यात या ‘व्हाईट टेल्ड ट्रॉपिक बर्ड’चीही भर पडणार आहे. त्यामुळे आता तो त्याच्या मृत्यूनंतरही माणसांशी बोलणार आहे. त्याच्या केप टाऊन ते मालवण प्रवासाची कथा तो भारतातील भावी पक्षिशास्त्रज्ञांना सांगणार आहे.

(किशोर रिठे मागील ३० वर्षांपासून वने, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी मध्य भारतातील जंगलांमध्ये वन्यजीव संरक्षण व आदिवासी विकासाचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. तसेच केंद्रीय व राज्य वन्यजीव मंडळ तसेच जैवविविधता मंडळावर त्यांनी काम केले आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.