निसर्गात सामान्यपणे आढळणाऱ्या प्रजाती एक दिवस आपल्या नकळत ‘असामान्य’ बनतात आणि मग त्यांच्याप्रती आपण हळहळ व्यक्त करत बसतो. अशाच काही असामान्य प्रजातींचा आपण आढावा घेतला.
- किशोर रिठे, sakal.avtaran@gmail.com
निसर्गात सामान्यपणे आढळणाऱ्या प्रजाती एक दिवस आपल्या नकळत ‘असामान्य’ बनतात आणि मग त्यांच्याप्रती आपण हळहळ व्यक्त करत बसतो. अशाच काही असामान्य प्रजातींचा आपण आढावा घेतला. आता मी तराई प्रदेशातील अशाच एका सुंदर सुगरणीची माहिती करून देणार आहे.
भारतात सुगरण पक्ष्यांच्या सामान्य सुगरण किंवा भारतीय सुगरण, स्ट्रीक सुगरण, काळ्या छातीची सुगरण आणि पिवळी सुगरण म्हणजेच फीन सुगरण अशा चार प्रजाती आढळतात. २०१६ मध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे (बीएनएचएस) भारतातील सुगरण पक्ष्यांचे एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये संपूर्ण देशभरात केवळ सहा हजार ३५४ सुगरण पक्षी आढळून आले होते. यापैकी एक हजार १३८ पक्षी महाराष्ट्रात आढळले होते.
या पक्ष्यांचे यापूर्वी असे सर्वेक्षण करून संख्या निश्चित झाली नव्हती. त्यामुळे ही संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी झाली, असे छातीठोकपणे म्हणता येत नसले, तरीही एवढ्या कमी संख्येवरून संपूर्ण देशातील सुगरण पक्ष्यांची संख्या कमी होत असल्याचे दिसून येते. त्यातही पिवळी सुगरण किंवा फीन सुगरण हा पक्षी तर खूपच कमी संख्येत शिल्लक राहिल्याचे दिसून आले आहे. यालाच हिंदीत ‘बडा बया’ किंवा ‘पहरी बया’ असेही म्हटले जाते.
या पक्ष्याचा शोध १८८९ मध्ये ओटस याने लावला. त्या वेळी त्याने याला ‘ईस्टर्न बया’ असे नाव दिले. पुढे १९२५ मध्ये फ्रँक फीन आणि ई.सी. स्टुअर्ट बेकर यांनी या पक्ष्याचा अधिक अभ्यास केला. तेव्हापासून याला ‘फीन बया’ असे संबोधण्यात येते. तो मूळतः गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात आढळून येतो. केवळ नेपाळ आणि भारतात तराई या गवती प्रदेशातील दलदल क्षेत्रात असणाऱ्या उंच गवतात तो आढळतो; पण मागील ६० वर्षांमध्ये दलदलीचे प्रदेश संपून त्यावर मनुष्यवस्त्या उभ्या झाल्याने आता त्यांची संख्या या प्रदेशातही कमी झाली आहे.
संपूर्ण जगात यांची संख्या केवळ ९९९ शिल्लक राहिल्याचे जाहीर करण्यात आले. भारतात पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांनी १९३४ आणि १९५४ मध्ये या पक्ष्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम हाती घेतली होती; पण त्यात त्यांना यश आले नाही. अखेर १९५९ मध्ये कुमाऊच्या गवती अधिवासात त्यांना फीन सुगरण पक्ष्यांचा शोध लागला. यामध्ये दोन प्रजाती आहेत. एक ‘प्लॉसेस मेगा रेंचस’ ही प्रजाती उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम नेपाळमध्ये आढळते; तर ‘प्लॉसेस सलीमअली’ ही प्रजाती पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये आढळते. आज संपूर्ण जगात त्यांची संख्या केवळ एक हजारच्या आसपास असल्याचे म्हटले जाते. यापैकी भारतात केवळ ५०० पक्षी असल्याचे म्हटले जाते.
फीन किंवा पिवळा सुगरण पक्षी आपल्याकडील सुगरणपेक्षा थोडा वेगळा दिसतो. त्याची चोच थोडी मोठी म्हणजे १७ सेंटीमीटर असते. छातीखालील भाग पिवळा असून शेपटीचा वरचा भाग लहान पिसांनी झाकलेला असून डोळ्याभोवतीचा रंग हा थोडा गडद असतो. आपल्याकडे दिसणाऱ्या सुगरणप्रमाणेच फीन सुगरणमध्येही नर पक्षी दिसायला अधिक सुंदर, गडद रंगाचा असतो; तर मादी नराच्या तुलनेत फिक्कट रंगाची. शेपटी टोकाला अगदी गोलाकार आणि पंख्याप्रमाणे. मादीचा रंग प्रजननकाळात गडद होतो, परंतु तरीही ती नराच्या तुलनेत फिक्कटच दिसते.
‘बीएनएचएस’तर्फे उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील तराई गवती प्रदेशामध्ये सर्वेक्षण करण्यात आले. त्या वेळी या पक्ष्याची घरटी असलेल्या जागा शोधण्यात आल्या. दलदलीच्या अधिवासात असणाऱ्या सेमलसारख्या वृक्षांच्या टोकावर तो घरटे बांधतो. तसे सुगरण पक्षी हे त्यांच्या घरटे विणण्याच्या कौशल्यासाठी ओळखले जातात. किंबहुना, म्हणूनच त्याला मराठीत आपण ‘सुगरण’ म्हणतो. परंतु फीन किंवा पिवळ्या सुगरणची घरटी आपल्याकडील सुगरणसारखी आकर्षक विणलेली नसतात, तर ती झाडाच्या फांद्यांच्या टोकाला गवत गुंडाळल्यासारखी असतात. अगदी मुनिया पक्ष्याच्या घरट्याप्रमाणे!
बर्डलाईफ इंटरनॅशनल संस्थेकडे असलेल्या १८६६ ते २००० च्या नोंदीनुसार भारतात यापूर्वी १७ ठिकाणी फीन सुगरण आढळत असल्याचे सांगण्यात आले; परंतु २००१ मध्ये ‘बीएनएचएस’तर्फे केलेल्या सर्वेक्षणात मात्र संपूर्ण देशात ४७ अधिवास आढळून आले होते. परंतु यानंतर २०१२ ते २०१७ दरम्यान या ४७ अधिवासांमध्ये केलेल्या दुसऱ्या सर्वेक्षणात मात्र यापैकी केवळ नऊ अधिवासांमध्येच पिवळा सुगरण आढळत असल्याचे आढळून आले आहे. ही संख्या घटण्यामागील कारणांचा शोध घेतला असता अनेक ठिकाणी कावळ्यांची वाढलेली संख्या या घरट्यांना नष्ट करत असल्याचे लक्षात आले.
सुगरणच्या संवर्धनासाठी आता ‘बीएनएचएस’द्वारे एक विशेष प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मे ते सप्टेंबर महिन्यात या पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो. त्या वेळी घरटी असलेल्या जागांना कावळ्यांचा त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली गेल्यास यांची संख्या वाढण्यात मदत होऊ शकते. राज्य सरकारद्वारे त्यांचा बंदिस्त प्रजनन करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी ‘बीएनएचएस’द्वारे उत्तर प्रदेशातील हस्तिनापूर अभयारण्याची निवड करण्याचे सुचवण्यात आले आहे. या अभयारण्यात घडियालला वाचवण्यासाठी एक प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्याचा फायदा फीन म्हणजेच ‘पिवळ्या बया’ यांच्या संवर्धनासाठी होऊ शकतो.
तसेच उत्तराखंडमध्ये जी. बी. पंत विद्यापीठातही संवर्धनासाठी प्रयत्न केल्यास त्यास यश येऊ शकते, असे ‘बीएनएचएस’चे शास्त्रज्ञ डॉ. रजत भार्गव यांचे मत आहे. या दोन्ही ठिकाणी त्याला लागणारे अधिवास आहेत. केवळ प्रजनन व्यवस्था उभी करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. भार्गव म्हणतात. १९३६ मध्ये कोलकाता शहरात अशा प्रकारे केलेला प्रयत्न यशस्वी झाला होता. हा पक्षी बंदिवासात सहज घरटी बांधतो असा अनुभव आहे. त्यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालयाने राज्य सरकारांना मदत केल्यास हे काम आणखी सहजपणे शक्य होण्यासारखे आहे.
वरील सर्व परिस्थिती पाहता आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाद्वारे (आययूसीएन) या पक्ष्याचा दर्जा अतिसंवेदनशील (Vulnerable) ते संकटग्रस्त (Eendangered) असा करण्यात आला, तरीही त्यांच्या संवर्धनासाठी विशेष गांभीर्याने प्रयत्न होताना दिसत नाहीत. या प्रजाती अद्यापही भारतातील जंगलांमध्ये दिसून येतात ही जमेची बाब आहे. आताच त्यासाठी आपण प्रयत्न न केल्यास भविष्यात त्या नष्ट झाल्यानंतर त्यांच्याप्रती हळहळ व्यक्त करण्यात काही अर्थ नाही.
(लेखक मागील ३० वर्षांपासून वने, वन्यजीव व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी मध्य भारतातील जंगलांमध्ये वन्यजीव संरक्षण व आदिवासी विकासाचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत, तसेच केंद्रीय व राज्य वन्यजीव मंडळ तसेच जैवविविधता मंडळावर त्यांनी काम केले आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.