गणेशोत्सव कोकणातला सगळ्यात मोठा सण. श्रावणात पाठोपाठ आलेली नागपंचमी, नारळी पौर्णिमा, गोकुळाष्टमी ही जणू या उत्सवाची रंगीत तालीमच. उत्सवाआधी पंधरा दिवस गणरायाच्या स्वागताची तयारी इथल्या घराघरात सुरू होते. माडीवर ठेवलेली गणपतीची माटवी, चौरंग खाली उतरून त्याला न्हाऊ माखू घातले जाते. तबला, पेटी, टाळ याची डागडुजी सुरू होते. गणपती शाळांमध्ये मूर्ती रंगविण्यासाठी रात्री जागू लागतात.