दिशा उद्यमप्रवाहाची (लक्ष्मी पोटलुरी)

lakshmi potluri
lakshmi potluri
Updated on

हैदराबादमध्ये झालेली जागतिक उद्योजकता शिखर परिषद (जीईएस) भारताच्या उद्योगाच्या दृष्टीनं फारच उत्तम आणि प्रेरणादायी होती. केंद्र सरकारनं घेतलेला हा पुढाकार देशाच्या उद्योगजगतात नवीन प्रयोग ठरला आहे. नवीन उद्योग वाढीस लागण्यास ही परिषद ‘माइल स्टोन’ ठरेल.

या परिषदेत उपस्थित राहिल्यानंतर आलेल्या अनुभवांतून भारतातल्या नवीन महिला उद्योजकांचं प्रथम मी अभिनंदन करीन. माझं हेच सांगणं आहे, की कितीही अपयश आलं तरी खचून जाऊ नका. कारण महिला उद्योजकांनी आज उद्योग क्षेत्रात पुढं येण्यास देशात खूप संधी निर्माण झाल्या आहेत. त्यांचा फायदा आपण उचलला पाहिजे. ज्या नवकल्पना तुमच्याकडं आहेत, त्या जगासमोर मांडल्या गेल्या पाहिजेत. ज्या महिलांना आपल्या कल्पनांना आकार द्यायचा आहे; पण त्या काही बंधनांमुळं असं करू शकत नाहीत, त्यांनी आधी ही बंधनं तोडावी आणि उद्योग क्षेत्रात आपलं स्थान सक्षम बनवावं. बऱ्याच महिला आपल्या मुलाबाळांमुळं व्यवसाय, उद्योग शक्‍य होत नसल्याचं सांगतात. परंतु, हे कारण पुढं करून तुम्ही तुमच्याच स्वप्नांना संपवत आहात. त्यामुळं आर्थिक पाया मजबूत करणाऱ्या आणि तुमचं कौशल्य जगासमोर आणणाऱ्या व्यवसायांत महिलांनी आपलं स्थान नक्की निर्माण करायलाच हवं.

नवीन उद्योजकांना विस्तारासाठी
संशोधन करणं हे कोणतंही ‘स्टार्ट-अप’ सुरू करण्यासाठी फार गरजेचं असतं. त्याशिवाय तुम्हाला तुम्हाला उत्पादनाची गरज नेमकी कुठं जास्त ते कळणार नाही. दुसरं म्हणजे तुमच्या कुटुंबीयांचं सहकार्य महत्त्वाचं ठरतं. या दोन्हींमध्ये तुम्हाला संतुलन साधता आलं पाहिजे. स्वतःवरचा विश्वास कधी ढळू देऊ नका. कारण कोणत्याही उद्योगाची सुरवात करताना येणाऱ्या अडथळ्यांमुळं स्वतःबद्दल अविश्वास निर्माण होऊ शकतो. तो बऱ्याच वेळा आपल्याला समजून येत नाही. अशा वेळी वाटेल तितक्‍या वेळा संबधित सल्लागारांचा सल्ला घ्या. काय करावं यासोबतच काय करू नये, याचा आराखडा बनवा. कधीकधी निर्णय हे त्वरित आणि सतत घेत राहावे लागतात. अशा वेळी थांबून फार विचार करण्यात अर्थ नसतो. आत्मपरीक्षण गरजेचं असतं. तुम्हाला तुमच्या उद्योगासाठी काय हवं आहे, याकडंच कामाची दिशा असू द्या.
(लक्ष्मी पटलुरी या मूळच्या चेन्नईच्या. भारतीय महिला उद्योजिकांमध्ये त्यांचे नाव आज आघाडीवर आहे. ’सकाळ’ परिवारातल्या डीसीएफ व्हेंचर्स, मुंबई या संस्थेच्या त्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ‘जबाँग डॉट कॉम’, ‘शॉपिफाय डॉट कॉम’ आदी नामवंत कंपन्यांमध्ये त्यांनी नेतृत्व केलं आहे.)

आमच्या दृष्टीनं ‘जीईएस’
‘जीईएस २०१७’मध्ये जगभरातल्या शेकडो उद्योजकांनी सहभाग घेतला होता. ज्या उद्योजकांसाठी ही परिषद मोलाची ठरली, अशा काहींनी मांडलेले अनुभव.

उद्योजकांच्या मदतीसाठी उद्योग
डेस्मंड चोई (कॅनडा) ः ‘जीईएस’नं मला उद्योजकतेसाठी डोमेन निपुणता आणि जगभरातल्या सल्लागारांशी जोडण्याचे प्लॅटफॉर्म दिले. मला कॅनडाच्या सीमेपलीकडचा विचार करण्यास प्रेरणा मिळाली. आता Diamond.io या उत्पादनाच्या वाढीचे प्रमुख म्हणून, रोजच्या कामात सुधारणा करण्यासाठी नवं तंत्रज्ञान कसं वापरावं याचा फेरविचार करण्याचा प्रयत्न करत आहोत. कॅरोस बाजारपेठेसाठी किंवा सरकारच्या अडथळ्यांना नवीन उपाय शोधण्यासाठी, युवा उद्योजकांना संघटित करण्यासाठी जीईएसच्या प्रयत्नांचा विस्तार करत आहोत. मी यूएस- कॅनडा टोरंटो अल्युम्नी ॲडव्हायझरी कौन्सिलचा संस्थापक सदस्य आहे. या कौन्सिलच्या माध्यमातून युवक सक्षमीकरण आणि शिक्षणाला प्रोत्साहन दिलं जातं.

पंधराव्या वर्षी रेहाना बनली उद्योजक
रेहान (अझरबैजान) ही यंदाच्या ‘जीईएस’मध्ये सहभागी होणारी सर्वांत लहान वयाची (वय १५) उद्योजक होती. आपल्या मुख्य भाषणात, इव्हांका ट्रम्प यांनी रेहानच्या अभिनव कामाबद्दल आणि समुदायाला मदत करण्यासाठी तिच्या उत्कटतेबद्दल विशेष उल्लेख केला होता. रेनगेरी नावाची कंपनी रेहाननं स्थापन केली आहे. तिनं पावसाच्या पाण्याचं विजेत रूपांतर करणारे यंत्र विकसित केलं आहे. याविषयी ती म्हणाली ः ‘‘खरं तर, माझ्या वडिलांकडून मला ही कल्पना मिळाली. लोक सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती करू शकतात, मग पावसाच्या पाण्यापासून का नाही? पावसाच्या पाण्याचा योग्य प्रकारे उपयोग केला, तर मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती आपण करू शकतो.’’

नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार
जस्ट प्राइस प्रायव्हेट लिमिटेड या तंत्रज्ञानविषयक कंपनीचे तरुण संस्थापक अर्जिश यांनी अमेरिकेत गेल्या पार पडलेल्या ‘जीईएस’मध्ये भाग घेतला होता. ते सांगतात ः ‘‘गेल्या वर्षी जीईएसमध्ये सहभाग घेण्याची संधी मिळालेला मी पाकिस्तानमधला एकमेव किशोरवयीन उद्योजक होतो. ‘जीईएस’ ही खरोखरच जीवन बदलणारी संधी आहे. सिलिकॉन व्हॅलीतल्या उद्योजकांकडून; तसंच परिषदेत संपूर्ण जगभरातून आलेल्या उद्योजकांकडून मला भरपूर शिकता आलं. ‘जीईएस’नं माझ्या स्टार्टअपसह इतर उद्योजक आणि गुंतवणूकदारांना प्रवेश देऊन उद्योगवाढीसाठी संधी उपलब्ध करून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यामुळं उद्योगविषयक विचारांना योग्य दिशा मिळाली. अमेरिकेतल्या अनुभवावेळी मार्केटिंग कंपनीशी संपर्क साधल्यानंतर ‘जस्ट एक्‍स लिमिटेड’ ही कंपनी चालू ठेवण्याबरोबरच मी पाकिस्तानमधल्या कंपनीचे पहिला वितरक आणि प्रमाणित भागीदार बनलो. मी नुकतीच लाहोरमध्ये ‘जस्टवायफाय’ आऊटलेट्‌स ही कंपनी सुरू केली आहे. ही कंपनी ऑफलाइन किरकोळ व्यवसायांसाठी वायफाय विपणन आणि इन-स्टोअर विश्‍लेषणं अशा सेवा देते.

धोरणांचं गमक उमगलं
नेपाळचे ओनियन फिल्म्सचे संस्थापक सूरथ गिरी आणि इशू सुबेदी यांनी २०१४ आणि २०१६मध्ये झालेल्या ‘जीईएस’मध्ये सहभाग घेतला होता. उद्योजक आणि मुक्त-उद्योग धोरणांना प्रोत्साहित करणारी ओनियन फिल्म्स ही कंपनी. २०१४ची ‘जीईएस’ जीवन बदलवणारी ठरली, अशी प्रतिक्रिया गिरी यांनी व्यक्त केली. वेब डिझाइन कंपनी ‘वूफ वेब स्टुडिओ’चे सह-संस्थापक इशू यांनादेखील अमेरिकेत असाच अनुभव आला. वयाच्या सतराव्या वर्षी वेबसाइट सेवा विक्री करणाऱ्या कॉल सेंटरमध्ये ग्राहक मदतनीस म्हणून आपलं करिअर सुरू केल्यापासून तिला आयटी उद्योगामध्ये रस निर्माण झाला होता. वयाच्या बाविसाव्या वर्षी तिनं स्वत:ची कंपनी सुरू केली. परंतु, तिला अपयशाला सामोरं जावं लागलं. तरीही तिनं प्रयत्न सोडले नाहीत. २०१४मध्ये उद्योजकांकरिता आयोजित स्टेट डिपार्टमेंटच्या इंटरनॅशनल व्हिजिटर लीडरशिप प्रोग्रॅममध्ये (आयव्हीएलपी) सहभागी होण्यास तिची निवड करण्यात आली. इशूनं अमेरिकाभर प्रवास केला आणि वेब डिझाइनसाठी आपलं कौशल्य सुधारलं. ‘जीईएस’मुळं तिला अखेर तिच्या व्यवसायधोरणाचं गमक उमगलं. जीईएस परिषदेत ‘एरबॅंन’ आणि ‘लिंक्‍डइन’सारख्या प्रसिद्ध कंपन्यांच्या सीईओंची भेट घेऊन इशूनं त्यांच्याशी संवाद साधला. या भेटीतून तिचा आत्मविश्वास जागृत झाला. तिनं त्यानंतर नेपाळमध्ये सोशल मीडिया मोहीम लाँच केली आहे. परिपूर्ण वेब आणि ग्राफिक डिझाइन यासाठी तिचं काम सुरू आहे.

भाषा शिकविणारं ॲप्लिकेशन
दाओ शुआन हुवांग (व्हिएतनाम) ः शंभरपेक्षा अधिक देशांमधल्या एक हजारहून अधिक अर्जदारांबरोबरच्या स्पर्धेतल्या अनेक फेऱ्यांमधून सर्वोत्तम म्हणून निवड झालेलं, भाषा शिकवणारं ‘माँन्की ज्युनियर’ नावाचे ॲप्लिकेशन मी बनवलं. वैयक्तिक आणि व्यावसायिक अनुभवांवरून विज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारे ग्लोबल इनोव्हेशन कसं करता येतं, हे मला कळलं. ‘जीईएस’ला उपस्थित राहणं आणि टेक-आय स्पर्धा जिंकणं हे माझ्यासाठी एक महत्त्वपूर्ण वळण होतं. त्यामुळं आमच्या व्यवसायात पूर्णपणे बदल झाला. आमच्याकडं बऱ्याच प्रसारमाध्यमांचं लक्ष वळलं. आमची कथा अनेक वर्तमानपत्रं, दूरचित्रवाणी वाहिन्या, सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहे. यामुळे अचानक ‘माँन्की ज्युनियर’ या आमच्या स्पर्धेबाहेर असलेल्या उत्पादनाला व्हिएतनाममध्ये खूप लोकप्रियता प्राप्त झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.