ज्ञानशाखेप्रमाणे भाषा नवं रूप घेते...

‘लोकवाणी’ अर्थात समाजांच्या जिभेवर बसून असलेली बोलीभाषा ही पुष्कळशी ओघवती, उच्चारासाठी सुकर आणि सहजगत्या अशाच स्वरूपाची असते.
language spoken mother language education daily life
language spoken mother language education daily lifeSakal
Updated on

- डॉ. केशव स. देशमुख

‘लोकवाणी’ अर्थात समाजांच्या जिभेवर बसून असलेली बोलीभाषा ही पुष्कळशी ओघवती, उच्चारासाठी सुकर आणि सहजगत्या अशाच स्वरूपाची असते. लोकवाणीचा पिंड मुळात गहन - चिंतनप्रवण असा सहजी राहत नाही. शिवाय आपल्या उच्च शिक्षणांत असावेत, तसे लोकवाणीत दंडकही नसतात.

उदकाप्रमाणं प्रवाही, हवेसारखी वाहती, सर्व वयोगटांना उमजेल, आकळेल असाच लोकवाणीचा खरा स्वभाव... माणसांचे हर्ष-खेद, त्यांच्या भावनांचा परिपोष किंवा एकंदर माणसांच्या दैनंदिन व्यवहारांशी लोकवाणीचा अनुबंध हा अखंड जोडूनच असतो. या उलट शास्त्रांची परिभाषा ही ज्ञाननिष्ठ, काठिण्योच्चारी, पढून-घोकून आत्मसातच करावी लागणारी अशी...

शास्त्रभाषेची प्रकृती मुळात शिक्षणाची, संशोधनाची, क्षेत्रासीमित, चाकोरीची सुद्धा असते. लोकवाणीसारखा शास्त्रभाषेत ‘खुल्लमखुल्ला’ प्रकार नसतो. गावाकडचा एक माणूस शिवीसारखा शब्दही उच्चारून दुसऱ्या प्रिय माणसाला हाक घालतो, तेव्हा समोरच्यास राग कुठे येतो? उलट जिव्हाळाच अधिक जाणवतो!

आता हेच पाहा. आरोग्यबोध देणारे किंवा उपचाररीत उलगडून दाखविणारे आयुर्वेद क्षेत्र मानवी रोगराईंसाठी, त्यांच्या उपचारपद्धतींसाठी मूळ प्रचलित आजारांना नवी ‘शब्दावली’ देऊन भाषेचा क्षेत्रविस्तार व्यापकच करू पाहते.

परिभाषा म्हणूनही हा सगळा ‘शब्द-भाषा-नाम-संज्ञा-संकल्पना विचार’ शास्त्रकाट्याच्या कसोटींमधूनच उगवतो. वैद्य किंवा डॉक्टरांच्या उपचारांचा गुण माणसाला कळतो. परंतु त्याच गुणी उपचारांसाठी त्यांनी तिथे वापरलेली भाषा मात्र माणसाला कळत नाही. म्हणजे थोडक्यात लोकभाषा निराळी; तर रोगभाषा ही पण निराळीच; हा असा फरक ‘लोक आणि रोग’ यात आढळतोच.

गणिताला एक भाषा आहे. भौतिकशास्त्राला त्याची खास म्हणून एक परि-भाषा आहे. वैद्यकशास्त्राचीही एक स्वतंत्र भाषा आहे. जी अत्यंत मजेशीर, नूतन, आकर्षक अशी आहे. जसे लोकांना ठाऊक असलेली प्रचलित भिन्नभिन्न औषधी किंवा लोकांना विदित असलेले अनेक रोग किंवा तुम्हा-आम्हा सर्वांना माहीत असलेले आजार-उपचार वैद्यकशास्त्र मात्र नव्या ‘शब्दां’त सांगते;

तेव्हा सांगावयाचा प्रधान मुद्दा इतकाच, की मराठीच्या भाषेसाठी ही सर्व शब्दावली ‘देणगी’ म्हणून स्वाभाविकच मौलिक अशीच ठरते. या संदर्भात वानगीदाखल काही शब्दावलींचे दाखले आवर्जून इथे समजून घेण्यासारखे आहेत.

ज्यामुळे वस्तू, भाषा, नाव ही सगळी क्षेत्रं केवढी व्यापक आहेत याचा अनुभव पुढील उदाहरणांवरून सहजीच येईल. जसे, की आयुर्वेदामध्ये आरोग्य-सामग्री म्हणून पुढील अर्थात अगदी नव्या पद्धतींची ‘शब्दावली’ निदान आणि उपचारांतून सतत वापरली जाते.

हे सगळे भाषिक-परिभाषा म्हणून असणारे ‘धन’ अप्रूप वाटावे असेच. उदाहरणार्थ : संचळ म्हणजे काळे मीठ किंवा छिद्रोदर म्हणजे पोटातला अल्सर, कासरोग म्हणजे खोकला किंवा यमानी म्हणजे ओवा किंवा पोटफुगीसारखी व्याधी जडली तर आयुर्वेदामध्ये त्याला ‘विष्टंभि’ संबोधले जाते.

विसुचिका म्हणजेच कॉलरा आणि ‘धांव’ म्हणजे सतत वाहणारी नि कोणत्याही प्रकारची जखम. बिब्याला उष्णता देऊन बिब्याचे तेल काढले जाते; जे कितीतरी आजारांवर रामबाण गणले जाते; अशा तेलाला ‘शेवते’ म्हटले जाते. केवढा लोभस शब्द आहे हा!

ज्ञानशाखा बदलतात. प्रदेश बदलतात. भाषाही मग बदलते ! झेंडूफुलांना कोकणात ‘मखमल’ असा लाजवाब एक शब्द योजलेला ऐकायला मिळाला; तर ‘कंटक’ यासारखा तीक्ष्ण वाटणारा शब्द संस्कृतमध्ये फणसाला उद्देशून वापरला जातो, असे ग्रंथ वाचनांतून उमजले ! याप्रमाणेच तुळशीला संस्कृतात ‘शूलघ्नी’ असं म्हटल्याचं ऐकलं.

तात्पर्य इतकेच, की भाषा किंवा परिभाषा किंवा संज्ञा किंवा संकल्पना यातूनही मराठीच्या भाषेला अगदी नवा अंगरखा शोभून चढवला जातो. शिवाय ज्या त्या शब्दांची एकप्रकारची लोभसता ज्या त्या शब्दांचे आकर्षणसुद्धा आपल्या मन-विचारांत खेळत राहते. त्यातूनच या ‘नव्या मराठी भाषे’च्या प्रेमातच आपण स्वभावतः पडतो.

तब्येत ठणठणीत असणं ही गोष्ट तर सर्वोत्तमच. मग अशा कायम निरोगी राहण्याला आयुर्वेदात एक शब्द आहे आणि तो म्हणजे ‘वज्रदेही’ किंवा सर्वांगच पिवळे पडून काविळीसारखा प्राणघातक विकार माणसाला जडला की तो आयुर्वेदाच्या निदानभाषेत ‘कामला’ नावाने आपली ओळख सांगतो किंवा आणखी एक शब्द फारच आकर्षक आहे आणि तो आहे त्या हिंवतापासाठी!

आजारपण कुठलंच मुळात चांगलं असं संबोधायचंच नसतं. पण त्यासाठी योजलेली शब्दावली वाचताना मात्र मोहात पाडणारी असते. चार चार दिवसांनी पुनःपुनः येणारा हिवताप किंवा हिवताप थांबतो नि परत येतो, अशा स्थितीला ‘चौथारा’ म्हणावं असे आयुर्वेदाचे ज्ञानी सांगणे आहे. हे मोठे मजेशीर, आकर्षक शब्दाचे देणेच म्हटले पाहिजे.

तथापि अशा भाषेची गंमत खरी तर यापुढे आहे. जसे, की दूध, ताक, लोणी, तूप हा सगळा भाग एकातून दुसरे आणि दुसऱ्यामधून तिसरे अशा प्रकारचा भाग. मात्र, आयुर्वेदात त्यांचं पृथक्करण करून मग ज्या त्या प्रक्रियेला ‘घुसळणी’मधून नवीनवीन शब्दावली प्रदान केली; जी फारच मजेशीर व लोभस अशाच स्वरूपाची...

उदा. लोण्यासह असणारा पदार्थ म्हणजे ‘सस्नेह’. (सस्नेह घातलेला नमस्कार मग असाच तर मुलायम, मनोहर...) लोणी काढून घेतलेल्या पदार्थाला ‘रूक्ष’ म्हटले जाते; तर पाणी न घालता म्हणजे सायींसह जो म्हणून पदार्थ घुसळला जातो, त्याला ‘घोल’ म्हणायचे...

(इथे घोळ घालायला तुम्हाला जागा नाही.) किंवा ताकच परंतु पाणी न घालता आणि साय काढून घेतल्यानंतर जी उत्तम ताकस्थिती उरते त्याला मग ‘मथित’ म्हणावयाचे. (यातला ‘मथितार्थ’ ज्यानं त्यानं नीट समजून घ्यावयाचा...) किंवा निम्मे ताक आणि अगदी तेवढेच पाणी घालून जे तयार होईल; त्याला आपल्या आयुर्वेदामध्ये ‘उदश्वित’ म्हटलेले वाचनात आले.

दूध, दही, ताक, तुपाचा हा केवढा महिमा... लोकवाणी आणि शास्त्रवाणी या सगळ्याच अगदी महाप्रचंड क्षेत्रांनी भाषेला नवी रूपं बहाल केली. शिक्षणातून आणि शिक्षणाशिवाय भाषा शिकता येतेच; ही भाषेतली सर्वांत प्रभावी जादूच म्हणता येईल. ‘एक गहू आणि प्रकार बहू’ या म्हणण्याप्रमाणं जागा बदलली की एकाच वस्तूला अगणित नावांनी हाक घालता येते. यातच भाषेची सारी किमया !

(लेखक हे बोलीभाषेचे ज्येष्ठ अभ्यासक असून राज्य सरकारच्या ‘भाषा सल्लागार समिती’चे तज्ज्ञ सदस्य आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com