अपनी आज़ादी को हम...

ता. १५ ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन जवळ आला की रेडिओ-टीव्हीसारख्या माध्यमांवरून देशभक्तिपर गाणी कानावर पडू लागतात.
Leader Movie
Leader Moviesakal
Updated on

अपनी आज़ादी को

हम हरगिज़ मिटा सकते नही

सर कटा सकते है लेकिन

सर झुका सकते नही

ता. १५ ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन जवळ आला की रेडिओ-टीव्हीसारख्या माध्यमांवरून देशभक्तिपर गाणी कानावर पडू लागतात. स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळातली ही गाणी आदर्शवादी असायची.

हम लाए है तूफान से किश्ती निकाल के

इस देश को रखना मेरे बच्चों सॅंभाल के

कवी प्रदीप यांनी या दीर्घ गाण्यात लिहिलं होतं : ‘हा देश आता येणाऱ्या पिढीच्या हाती सोपवत आहोत. तिनं तो काळजीपूर्वक, जबाबदारीनं सांभाळावा. ॲटमबॉम्बच्या जोरावर चालणाऱ्या या जगात तुम्हाला स्वत:चा तोल सावरत चालायचं आहे.’

सन १९५४ मध्ये आलेल्या ‘जागृती’ या सिनेमातून प्रदीप यांनी हे भावनावश आवाहन केलं होतं. त्यानंतरच्या काळात येणाऱ्या गाण्यांमधूनही असाच आदर्शवाद परावर्तित होत होता.

इन्साफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के

ये देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के

हे गीत (सिनेमा : गंगा-जमना, १९६१) अशा आदर्शवादाचं आणखी एक उदाहरण. सन १९६२ च्या अखेरीस चीननं भारतावर आक्रमण केलं. भारतीय नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अद्याप चांगलीच जागृत होती. राष्ट्राभिमानानं देश पेटून उठला आणि मग या देशभक्तिभर गीतांची आदर्शवादाची भाषा बदलली. त्याची जागा त्वेषानं घेतली आणि गाण्यांमध्ये युद्धाशी संबंधित ‘हाणा’, ‘ठेचा’ असे शब्द येऊ लागले.

कर चलें हम फिदा जान-ओ-तन साथीयों

अब तुम्हारे हवाले वतन साथीयों

चिनी आक्रमणानंतरच्या या गीतात कैफी आझमी यांंनी जो जोश भरलाय तो पेटून उठवणारा आहे. आमचे श्वास थबकले, धमन्यांतलं रक्त जागीच थिजू लागलं तरी आमची पावलं मात्र न थांबता पुढंच पडत होती. आमची शिरं छाटली गेली तरी बेहत्तर; पण हिमालयाची मान आम्ही खाली झुकू दिली नाही. अशा रीतीनं या गाण्याच्या ओळीओळीतून भारतीय मनं पेटवणारा आवेश दिसत होता.

आदर्शवादी लिहिणाऱ्या कवी प्रदीप यांनीसुद्धा लिहिलं :

ऐ मेरे वतन के लोगों जरा

आँख में भर लो पानी

जो शहीद हुए है उन की

जरा याद करो कुर्बानी

कारुण्यातून वीररस निर्माण करण्याची किमया या गाण्यानं साधली होती.

मराठी भाषेतही मोठमोठ्या कवींनी अशा त्वेषपूर्ण रचना केल्या.

माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू

जिंकू किंवा मरू...जिंकू किंवा मरू...

हानी होवो कितिहि भयंकर

पिढ्या पिढ्या हे चालो संगर

मरू, पुन्हा अवतरू

‘हा देश शिवरायांचा आहे...झाशीच्या राणीचा आहे. आम्हीसुद्धा तळहातावर शीर धरू’ अशा अर्थाचं ‘छोटा जवान’(१९६३) या सिनेमासाठी शब्दप्रभू ग. दि. माडगूळकर यांनी हे गीत लिहिलंय. वसंत देसाई यांचं संगीत होतं. गीतातली शब्दरचना, तसंच त्याची चाल आणि संगीत इतकं जोरकस होतं की, त्या काळात शाळेत विद्यार्थ्यांकडून हे गीत सामूहिकरीत्या गाऊन घेतलं जात असताना आम्हां विद्यार्थ्यांमध्ये वीरश्री निर्माण होत असे. वसंत बापट यांचं ‘उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू’ हे गीत, तसंच देशभक्तिपर आणखीही काही मराठी गाणी होती.

ही गाणी देशभक्तिपर जरी असली तरी मुख्यत: युद्धाशी संबंधित आहेत. नंतर आलेल्या अशा गाण्यांमध्ये एक गाणं मात्र युद्धाशी संबंधित नसून थेट स्वातंत्र्याच्या भावनेशी संबंधित आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी हमखास ऐकायला येणारं हे गाणं स्वातंत्र्याशी संबंधित वस्तुस्थिती विशद करतं.

अपनी आज़ादी को

हम हरगिज़ मिटा सकते नहीं

सर कटा सकते है लेकिन

सर झुका सकते नहीं

शतकांनंतर आम्ही ईश्वरकृपेनं हे धन प्राप्त केलं आहे. त्यासाठी शेकडो बळी गेलेले आहेत...हसत हसत छातीवर बंदुकीच्या गोळ्या झेलल्या आहेत... काट्याकुट्यातून अग्निदिव्य करत आम्ही हा स्वर्ग गाठला आहे. आता आम्ही आमचा हा स्वाभिमान धुळीस मिळवू देणार नाही.

हमने सदियों में ये आज़ादी की नेमत पाई है

सैंकडों क़ुरबानियाँ देकर ये दौलत पाई है

मुस्कुराकर खाई है सीनों पे अपने गोलियाँ

कितने वीरानों से गुज़रे है तो जन्नत पाई है

ख़ाक में हम अपनी इज़्ज़त

को मिला सकते नही

स्वातंत्र्यासाठी भारतीयांनी ज्या खस्ता खाल्ल्या त्यांचं वर्णन

वरील फक्त चार-पाच ओळींतच करून स्वातंत्र्याचं महत्त्व विशद होतं. शांततेचा कुणी शत्रू लाखांच्या फौजा घेऊन आला तरी आमच्या एकतेसमोर टिकणार नाही. गीतकार शकील बदायुनी हे फक्त इतिहास सांगून न थांबता भविष्यातली देशाची एकताही बळकट असेल अशी खात्री बाळगतात. आम्ही भारतीय म्हणजे, ज्यांना कुणीही शत्रू हलवू शकत नाही असा पहाड आहोत, अशा शब्दांत एकतेचं वर्णन करतात.

क्या चलेगी ज़ुल्म की

अहले वफ़ा के सामने

जा नही सकता कोई शोला हवा के सामने

लाख फौजें ले के आए

अमन का दुश्मन कोई

रुक नहीं सकता हमारी एकता के सामने

हम वो पत्थर हैं जिसे दुश्मन

हिला सकते नही

त्याही पलीकडे हे गाणं असंही सांगतं की, यापुढं जगाची हवा ज्या दिशेनं जाईल त्या दिशेनं आम्हाला आमची दिशासुद्धा बदलावी लागेल आणि आम्ही ती काळाशी सुसंगत अशा रीतीनं बदलू.

वक्त की आज़ादी के

हम साथ चलते जाएँगे

हर कदम पर ज़िंदगी का रुख़ बदलते जाएँगे

गर वतन में भी मिलेगा कोई गद्दार-ए-वतन

अपनी ताकत से हम उस का

सर कुचलते जाएँगे

एक धोखा खा चुके है, और खा सकते नही

कुणी देशद्रोही जर देशातच आढळून आला तरी त्याला ठेचून काढू. एकदा आमचा विश्वासघात झालेला आहे. आम्ही आता तो पुन्हा होऊ देणार नाही... असा उल्लेख करताना, नुकत्याच होऊन गेलेल्या चिनी आक्रमणावरून चीनला इशारा दिला गेला आहे.

आमचा तिरंगा आकाशात यावच्चंद्रदिवाकरौ फडकत राहील. महात्मा गांंधीजींनी दिलेली शिकवण आम्ही विसरणार नाही, असा विश्वास हे गाणं देतं.

गाण्यातल्या चार कडव्यांचं वैशिष्ट्य असं की, पहिल्या कडव्यात इतिहास, दुसऱ्या कडव्यात वर्तमान आणि तिसऱ्या व चौथ्या कडव्यात भविष्याची वाटचाल गीतकार शकील बदायुनी यांनी मोठ्या युक्तीनं मांडली आहे. त्यामुळं हे केवळ एक स्वातंत्र्यगीत किंवा समरगीत न राहता ते एक परिपूर्ण देशभक्तिपर गाणं ठरतं.

गाण्याला चालसुद्धा तशीच वेगवान व वीरश्रीपूर्ण आहे. बिगूल, ड्रम आणि ट्रम्पेटसारख्या रणवाद्यांनी सजलेलं हे गाणं जणू एखाद्या मैदानावरच्या राष्ट्रीय समारंभात गायिलं जात आहे, असा आभास निर्माण करण्यात यशस्वी होतं. जोडीला कोरसचा स्वर असल्यानं ते जनसागराचं गाणं बनतं. संगीतकार नौशाद यांनी गाण्यातल्या शब्दांना अचूक न्याय दिला आहे. कमाल केली आहे ती महंमद रफी यांनी. गाण्याचा वेग अजिबात कमी होऊ न देता हे जोशपूर्ण गाणं त्यांनी फारच उंच सुरात गायिलं आहे. विशेषत: शेवटच्या काही ओळीतर उच्चतम सुरात आणि वेगात आहेत.

दिलीपकुमार स्टेजवर उभे राहून श्रोत्यांसमोर हे गाणं सादर करतात. त्यांचा एकंदर नूर पाहून श्रोतेही त्यांच्या गाण्यात सहभागी होतात. स्टेजवरचे कार्यकर्ते पुरुष-महिला गाणं गाऊ लागतात. सुरुवातीला बावरून गेलेल्या वैजयंतीमालासुद्धा नंतर गाण्याला साथ देतात. गिरगाव चौपाटीवर सभेची गर्दी दिसते, तर शेवटी मंत्रालयावर फडकत असलेला तिरंगा आणि महात्मा गांधीजी यांचा पुतळा दाखवून दिग्दर्शक राम मुखर्जी यांनी योग्य संदेश दिला आहे तो असा : ‘युध्द असो अथवा शांतता...स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी आपणां सर्वांची आहे. आपण एकजुटीनं ती पार पाडली पाहिजे.’ सिनेमा होता : लीडर (१९६४).

(लेखक हे हिंदी सिनेगीतांचे अभ्यासक-समीक्षक, तसंच ‘गाने अपने अपने’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. ‘गुनगुना रहे है भँवरे’ हे याच विषयावरचं पुस्तक त्यांच्या नावावर आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.