रोमान्सचं न उतरणारं गारुड...

देव आनंदवर काय लिहिणार ? त्यांच्याबद्दल मी सर्व बाजूंनी लिहिलंय. एखादी बाजू राहिलीय असं मला वाटत नाही. मग देव आनंद मनात इतका का रेंगाळतो ? बऱ्याचदा असं होतं की युट्यूबवर मी विविध प्रकारची गाणी ऐकण्यासाठी जात असतो.
legendary dev anand bollywood hero who left his legacy
legendary dev anand bollywood hero who left his legacysakal
Updated on

देव आनंदवर काय लिहिणार ? त्यांच्याबद्दल मी सर्व बाजूंनी लिहिलंय. एखादी बाजू राहिलीय असं मला वाटत नाही. मग देव आनंद मनात इतका का रेंगाळतो ? बऱ्याचदा असं होतं की युट्यूबवर मी विविध प्रकारची गाणी ऐकण्यासाठी जात असतो.

ती शोधत असताना मधेच कुठेतरी देव आनंदची गाणी दिसतात. कधी बर्मनदांची गाणी आणि बोट थबकतं. नकळत त्यावर बोट दाबलं जातं आणि पाचसहा गाणी ऐकूनच मी पुढे सरकतो. हे असं फक्त सचिन तेंडुलकरच्या खेळीबाबत होतं. हो आणि मधुबालाबाबतही होतं.

देव आनंद शरीरानं या जगात असता, तर त्यानं नक्की शंभरी ओलांडली असती. येत्या २६ ला त्याच्या जन्मशताब्दीची सांगता होत आहे. देव आनंद यांच्यानंतर किती हीरो आले आणि गेले, पण ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पाहून त्याच्यावर चर्चा करणं हे होतं नाही.

मी आज भरपूर सिनेमा पाहतो पण अमुक एक हीरो किंवा हीरॉइन आहे म्हणजे सिनेमा पाहिलाच पाहिजे असं होत नाही. ते काही घरचं कार्य होत नाही. सिनेमा चांगला आहे म्हणून पाहायला जातो. शाहरूख आहे किंवा अमुक आहे म्हणून पाहायला जात नाही. (हल्ली सिनेमात आलिया भट असली की आनंद होतो. काय अभिनय करते!) अमिताभच्या सिनेमानंतर हे थांबलं.

देव आनंदचं जे गारुड मनावर आहे ते अजून पंचवीस वर्षांनी सुद्धा असेल का? बहुदा नसेल. आजची पिढी देव आनंदचे सिनेमा पाहते की नाही याची मला कल्पना नाही, बहुदा नाहीच. आजची पिढी पंचवीस वर्षांनी मोठी झाली की ती सुद्धा देव आनंदचे सिनेमा पाहणार नाही. की वाढलेल्या वयाबरोबर त्यांनाही देव आनंद आवडायला लागेलॽ

‘प्यार का राग सुनो’ हे पुस्तक आम्ही तिघांनी मिळून लिहिलं. त्यात खरा हट्ट मीना कर्णिकचा. ती प्रामुख्यानं चित्रपटाविषयी लिहिणारी लेखिका. फिल्म फेस्टिव्हलमध्ये ती जगभरचे सिनेमा पाहत असते. चला काहीतरी वेगळं पाहू या म्हणून तिनं देव आनंदचे चारपाच सिनेमे पाहिले आणि त्यात ती गुंतून गेली. सिनेमात नाही तर देव आनंदमध्ये, ती वयाच्या साठीत गुंतली. एवढंच नाही तर रोमँटिक म्हणून आवडणाऱ्या शाहरूख खान आणि देव आनंदमध्ये तिला साम्य दिसलं.

मी चक्रावलो. मी शाहरूख खानमध्ये फारतर एखादं दोन जागी त्याच्याच गावचा आणि त्याचीच भाषा बोलणारा दिलीपकुमार पाहू शकलो असतो. पण देव आनंद? हे म्हणजे... पाया सुपात स्वीटकॉर्न चिकन सूप शोधण्यासारखं होतं. मग मीनाने दोघांमधीलं थोडं थोडं साम्य दाखवलं. विशेषतः स्टाईल्स, हाताच्या हालचाली आणि ते चेहऱ्यावरचे रोमँटिक भाव. मग मला रोमँटिक शाहरूख मध्ये देव आनंदची किंचित चाहूल लागली. आपण नक्कल आणि चाहूल ह्यातला फरक समजून घेतला पाहिजे.

नक्कल‌ हे थेट झेरॉक्स काढण्याचा प्रयत्न केलेला असतो. चाहूलमध्ये भास होतो. हळुवार रोमान्स करणाऱ्या कुठल्याही नटात देव आनंद सापडेल. कारण त्या रोमान्सचा पाया हिंदी सिनेमात देव आनंदने घातला आणि पुढल्या पिढीतल्या अनेक रोमॅंटिक नटांनी तो नकळत उचलला.

देव आनंद हिंदी सिनेमाचा रोमॅंटिक हीरो होण्यापूर्वी हिंदी सिनेमात रोमान्स होता. रोमँटिक भूमिका होत्या. त्या करणारे नट होते. पण मनावर ठसणारी एक मूर्ती तयार झाली नव्हती. देव आनंदलाही ही मूर्ती बनवायला आठ वर्षे लागली.

देव आनंद हा मुलखाचा लाजरा होता. लाहोरमध्ये राहत असताना मुली त्याच्यावर लट्टू होत्या. हा घाबरट होता. सिनेमात आल्यावर आधी तो रोमँटिक सीन आला की पळून जायला लागायचा. मग रोमँटिक सीनमध्ये त्यांचे पाय बांधून ठेवले जात.

मग तो सुरैय्याचा पदर धरून पुढे सरकत गेला. बाजीमध्ये त्याला एक प्रतिमा मिळाली. पण ती रोमँटिक देव आनंदची नव्हती. सहृदयी गुन्हेगारी वृत्तीच्या हीरोची होती. पुढे जाल, हाउस नंबर ४४, टॅक्सी ड्रायव्हरमध्ये हिच भूमिका होती.

त्याला फक्त रोमान्सची फोडणी होती. मुनिमजीपासून त्याने ती बदलली तो रोमँटिक हीरो झाला. पेइंग गेस्ट, नौ दो ग्यारह, सीआयडीत त्याने ती अधिक प्रगल्भ केली. नौ दो ग्यारहपासून विजय आनंद दिग्दर्शक म्हणून आला आणि त्याने देव आनंदची इमेज अधिक चांगली केली. ती लुभावणारी होती. ती आपल्यासारख्या त्याच्या फॅन्सना लुभावली.

लाजरा बुजरा हॅण्डसम तरुण ते हिंदी सिनेमात रोमँटिक हीरोचा संस्थापक हा प्रकार म्हणजे विनोबा भावेंच्या विचारांच्या माणसानं मिलिट्री स्कूल काढण्यासारखं होतं. पण पुढे तिचं इमेज अनेकांनी आपआपल्या परीने वापरली. शम्मी कपूरने देव आनंदचा हळुवार रोमान्स हिंसक केला. ती सेक्सुॲ लिटी होती. पुढं जॉय मुखर्जी त्याच मार्गाने गेला.

राजेश खन्ना हा सर्वांत मोठा रोमँटिक स्टार पण त्यानेही कबूल केलं, की रोमँटिक सीनमध्ये तो देव आनंद स्टाईलचा आधार घ्यायचा. जितेंद्रने एका मुलाखतीत म्हटलं, जब प्यार किसी से होता हैं गाण्यात देव आनंद ट्रेनमधून गाडीवर जी उडी मारतो, ती पाहून मी भारावलो होतो. आपल्यालाही तसं करायला मिळावं असं वाटतं होतं.

जसा दिलीपकुमारच्या गंभीर अभिनयाचा प्रभाव सर्व नटांवर गंभीर भूमिका करताना पडला होता तसा प्रभाव रोमँटिक भूमिकेत देव आनंदचा पडला होता. मात्र मला किंवा माझ्यासारख्या अनेक फॅन्सना‌ देव आनंद का आवडतो, तो अजूनही गारुड कसं टिकवून आहे ह्याचं लॉजिकल उत्तर कुणीच देऊ शकत नाही.

गंभीर अभिनय आणि देव आनंद ह्यांचा संबंध फार क्वचित आला. मुनिमजी, काला पानी, हम दोनो, गाइड वगैरे. तरी त्याला फिल्मफेअर ची सहा नॉमिनेशन आणि बेस्ट ॲक्टरची दोन ॲवॉर्डस मिळाली. अभिनयासाठी देव आनंद थोडाच मनामध्ये घर करून राहिलाय... तो राहिलाय त्यांच्या देखणेपणासाठी. पण देखणी माणसं जगात काही कमी नसतात.

सर्वच कुठे मनात घर करून राहतात. त्याच्या चेहऱ्यावर असं काही होतं की त्याला पाहिलं की मन प्रसन्न होते. त्याला पाहत राहावंसं वाटते. तरी पन्नास वर्ष ? दिलीपकुमार म्हणायचा, देव आनंदइतकं सुंदर हास्य फिल्म इंडस्ट्रीत कुणाकडेही नाही. सत्यवचन ? हा एक भाग असावा. वैजयंतीमाला म्हणते, Dev Aanand was heroism on celluloied. हाही भाग असावा.

त्याचं गाणं मनात रुतलं गेलंय. गेली २५ वर्ष मी सिनेसंगीताचे कार्यक्रम करतो. त्याआधी ऐकत असे आणि प्रत्येक वेळेला मला जाणवलं की देव आनंदवरचा संगीत कार्यक्रम नेहमी तुफान गाजतो. दिलीपकुमार अभिनय सम्राट असेल पण त्याच्यावर जवळपास कार्यक्रमच होत नाही.

राज कपूर एवढा मोठा पण त्याच्या कार्यक्रमात तो गाजण्याचा सर्वांत मोठा भाग आहे ते शंकर-जयकिशन यांचा. कार्यक्रम डोक्यावर घेतलेला मी पाहिलेला नट म्हणजे देव आनंद, त्याच्यावरचा कार्यक्रम डोक्यावर घेतला जातोच. नसीरुद्दीन शाह हा केवढा मोठा नट. तो देव आनंदचा फॅन आहे. तो म्हणतो, "देव आनंद जेव्हा पडद्यावर गाणं म्हणतो त्या वेळेला त्याच्या गळ्याच्या शिरा दिसतात इतका तो समरसून गातो.’’

ते गाणं त्याच्या गळ्यातून येत नाही आतून येतं असं जाणवतं, त्याचं कारण फक्त एस डी बर्मन नाही किंबहुना एस डी बर्मन हिंदी सिनेमात सुरुवातीला टिकून राहिले कारण देव आनंदने त्यांना सपोर्ट दिला. त्यांनी अर्थात देव आनंदला साजेशी गाणी तयार केली आणि विजय आनंद यानं त्याचं सोन केलं.

म्हणून असेल की देव आनंद अजून आमच्या पिढीच्या आणि आमच्या मागच्या काही पिढींच्या बाबतीत विस्मृतीच्या पडद्याआड जात नाही. मला तर तो गेलाय असं वाटतही नाही. त्याचा फोन नंबरसुद्धा मी अजून डिलिट केलेला नाही.

सत्तरीत मी तरुण आणि रोमँटिक राहिलोय याच कारण म्हणजे देव आनंद. त्यामुळे आम्ही म्हणतो, की ‘दिल अभी भरा नही’ पाहिलंत, देव आनंदवर काय लिहायचं असं म्हणत मी अख्खा लेख लिहून काढला. देव आनंदच्या बाबतीत असंच होतं, कागदाला पेन लागलं की अक्षर उमटायला लागतात, कारण ती कुठून तरी मनातून - खोलवरून येत असतात.

( लेखक हे क्रीडा आणि चित्रपटसृष्टीवर लेखन करतात. या दोन विषयांवर त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.