कोणतीही प्रसार वाहिनी उघडा केवळ आणि केवळ कोरोना आणि त्या संबंधीच्या नकारात्मक बातम्यांनी सारे व्यापलेली दिसत आहे. एका मुंबईच्या मित्राला फोन केला म्हटलं काय अवस्था मुंबईची? म्हणाला माहीत नाही यार...टीव्ही तर केव्हाच बघणे सोडले. डोक्याचं दही झालंय. त्याची उद्विग्नता समजू शकत होतो. पण, थोड्याफार फरकाने साऱ्यांची हीच अवस्था आहे. या महामारीच्या काळात घडत असलेल्या असंख्य सकारात्मक घटना आणि त्याच्या बातम्या मात्र आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत. एव्हाना कोरोना होणे म्हणजे जीव जाणे नाही हेही स्पष्ट झाले आहे. हा काळ आपल्या साऱ्यांच्या परीक्षेचा काळ आहे. तसा तो आपल्या आयुष्याची नव्याने मांडणी करायला शिकवणारादेखील आहे. आपले संबंध, नाती, व्यवसाय या साऱ्या बाबतीत पुन्हा एकदा विचार करायला लावायला ही नामी संधी आहे. आपल्यापैकी अनेकांनी त्या संधीचे सोने केले असेल.
कोकाकोला या जगविख्यात कंपनीचे सीईओ होते ब्रायन डायसन. ते एकदा म्हणाले, आपले आयुष्य म्हणजे पाच चेंडूंचा खेळ आहे. या पाचही चेंडूंचे जो योग्य संतुलन राखतो तो जीवनात यशस्वी होतो. काय आहेत ते पाच चेंडू? काम, कुटुंब, आरोग्य, मित्रपरिवार आणि आपली ऊर्जा. ते म्हणतात की यातील काम नावाचा चेंडू हा रबरी आहे. आज हातून सुटला तरी तो न्यूटनच्या नियमाप्रमाणे तो उसळून परत येऊ शकतो. मात्र कुटुंब, नाती, आरोग्य आणि आपली ऊर्जा हे सारे चेंडू काचेचे आहेत. ते जर हातून सुटले तर तडकतील, फुटतील आणि परत जोडता येणे अशक्य होऊन बसेल. कुटुंब आणि आरोग्याची हेळसांड न करणे हे लक्षात घेतले पाहिजे. या काळात बेजबाबदारपणा आपल्याला महागात पडू शकतो. या साऱ्या गोष्टींचा विचार करण्याची हीच ती वेळ. ज्यांच्याप्रती मनात घृणा, असूया आणि द्वेष आहे तो त्यागण्याचीसुद्धा हीच ती वेळ.
जपानवर 6 आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी "फॅट मॅन' आणि "लिटल बॉय' हे दोन अणुबॉम्ब टाकण्यात आले. लाखो निरपराध लोक एका क्षणात मारले गेले. यानंतर जपानच्या कित्येक पिढ्या अपंग आणि विकृत जन्माला येत राहिल्या. पण, आपल्याला ज्या पायलटने तो अणुबॉम्ब जपानवर टाकला त्याचे काय झाले हे माहीत नसते. इतक्या असंख्य लोकांचे प्राण घेण्यास कारणीभूत झालेल्या व्यक्तीला सुखाची झोप लागली असेल? अर्थात चार्ल्स स्विनी आणि पॉल तिबेत यांच्या असंख्य रात्री तळमळत गेल्या. अनेकदा मानसोपचारतज्ज्ञांकडे जावे लागले. मृत्यू मागूनही त्यांना मिळाला नाही. आमच्याकडे करुणेचा सागर आहे. त्याचे नाव तथागत. तथागताकडे बघा. सदैव मिटलेले डोळे आणि डोळ्यात प्रचंड करुणा. आपल्या आयुष्यातदेखील ती सहज येऊ शकते. केवळ पुढच्या व्यक्तीच्या चुका पोटात घालण्याची त्याला क्षमा करण्याची तयारी हवी. आपण फार लहान गोष्टी मनात धरून ठेवतो. माझा मान, सन्मान, अहंकार यातून प्रतिक्रिया जन्माला येतात. पण, याच प्रतिक्रिया आम्हाला सुखाने जगू देत नाहीत. एखाद्या व्यक्तीविषयी मनात क्रोध उत्पन्न करा. त्या क्रोधाचा त्रास समोरच्याला होण्याऐवजी क्रोध आपल्याला जाळायला सुरुवात करतो. भगवान म्हणतात "सब्बो लोको पकम्पितो' हे जग अनित्य आहे आणि आपण त्या अनित्याच्या मागे वेड्यासारखे धावत सुटलो आहोत. याचा अर्थ अकर्मण्य होणे नाही. पण, आपले काम करतानादेखील असूया आणि द्वेष यापासून मुक्त राहणे म्हणजे प्रज्ञा.
एकदा एक साधुबाबा मंदिरातून बाहेर पडत होते. बाहेर भिकारी उभा होता. भिकारी पुढे गेला आणि साधूला म्हणाला, साधुबाबा माझी ही अवस्था का? माझे आयुष्य कधी सुखी होईल की नाही? की मी असाच भीक मागत मरणार? साधू म्हणाला तुझ्याकडे जे आहे ते आधी लोकांना द्यायला शिक म्हणजे तुझे भले होईल...भिकारी म्हणाला, मी भिकारी आहे माझ्याकडे लोकांना द्यायला काय आहे? तुझ्याकडे परमेश्वराने हास्य दिलेले आहे, आशीर्वाद द्यायला तोंड आहे. जे तुला मदत करतात त्यांना मनापासून आशीर्वाद दे, सतत चेहऱ्यावर हास्य असू दे. ज्याने भीक दिली त्याचे आणि नाही दिली त्याचेही आभार मानायला विसरू नको. मग बघ तुझे आयुष्य बदललेले असेल. साधूचे हे उत्तर आपल्यालादेखील लागू आहे. आपल्याकडे जे नाही त्यासाठी रडण्याची ही वेळ नाही... जे आहे ते इतरांना देण्याची वेळ आहे. मित्रांनो हीच वेळ आहे आपल्या विचारांकडे तटस्थपणे बघण्याची. कुटुंब आणि आरोग्य जपण्याची, भविष्यातील योजना आखण्याची, गरजूंना मदत करण्याची. संकट मोठे आहे, पण आपण तरी कुठे लहानसहान लाटांच्या मागे होतो? वादळाची स्पर्धा करणे हेच काय ते आपले भागध्येय समजा आणि लागा कामाला. ही वेळ आहे आयुष्याच्या मशाली पुन्हा एकदा पेटविण्याची.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.