चौथ्या टप्प्यातील मतदान आणि निवडणुकीची दोन तृतीयांश प्रक्रिया पार झाल्यावर विविध स्वरूपाचे कल मांडले जात आहेत. ज्या वेळी निवडणूक जाहीर झाली, तेव्हा परिस्थिती फारच वेगळी होती. त्यावेळी भारतीय जनता पक्ष आपल्या २०१९ मधल्या कामगिरीत भर तर घालेलच, पण तो पक्ष आपल्या तीनशे तीन जागा तर राखेलच आणि त्यापेक्षा अधिक जागा मिळवेल, असं मानलं जात होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर भाजपच्या ३७० जागा तर एनडीएच्या ‘चारसो पार’ जागा असं लक्ष्य ठेवलं होतं. हे असं घडणारच असंही त्या वेळी अनेकांना वाटत होतं. ही गोष्ट तर झालीच असाही अनेकांचा समज होता.
विद्यमान गृहमंत्री आणि भाजपचे एकेकाळचे अध्यक्ष अमित शहा कार्यकर्त्यांना असं मोठं लक्ष्य द्यायचे पण या वेळी मोदी यांनी अत्यंत गांभीर्यानं हे मोठं लक्ष्य कार्यकर्त्यांसमोर ठेवलं होतं. देशाच्या अनेक भागात झालेल्या मतदानानंतर आता असं स्पष्ट होत आहे, की या वेळी मोदी यांच्या नेतृत्वाची लाट नाही. २०१४ आणि २०१९ मध्ये अशी लाट होती मात्र आता कुठल्याही स्वरुपाची लाट नाही.
देशात २०१४ मध्ये ‘यूपीए’ राजवटीच्या धोरणांच्या लकव्याबद्दल तसेच भ्रष्ट राजवटीबद्दल जोरदार टीका करण्यात आली होती, त्या सरकारविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड संताप होता. त्याचवेळी देशाच्या राजकीय क्षितिजावर नरेंद्र मोदी हा एक नवा तारा म्हणून लोकांना गवसला होता.
२०१९ मध्ये पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर संपूर्ण देशभर निर्माण झालेल्या देशभक्तीच्या लाटेत मोदी यांनाच त्या निवडणुकीत प्रचंड समर्थन लाभलं, या वेळच्या म्हणजेच २०२४ च्या निवडणुकीमध्ये सगळ्यांना भावेल असा देशभर सगळ्यांना प्रभावित करेल असा एकच एक कुठलाही ठोस मुद्दा नाही.
या वेळच्या निवडणुकीत राममंदिराच्या उभारणीचा मुद्दा पुलवामासारखा लाभदायक ठरेल अशी भाजपला आशा होती. पण तसं घडलं नाही. अयोध्येतला राम मंदिराचा सोहळा खूप लवकर झाला असं आता काहीचं म्हणणं आहे. त्या मुद्द्याचा जोर आता दोन महिन्यांनंतर ओसरला आहे.
मंदिराच्या बांधकामामुळं हिंदू समाजातील मोठा वर्ग आनंदी आहे आणि या मंदिराच्या उभारणीचं श्रेय ते मोदींना नक्कीच देतात. पण भाजपला मतदान करण्यासाठी जी ठोस कारणं असायला हवीत आहेत त्यामध्ये मतदारांकडून या मुद्द्याचा समावेश केला जात नाही. एखादी गोष्ट मिळाल्यानंतर त्यातलं स्वारस्य संपून जाव तसं त्या मुद्द्याचं झालेलं आहे.
२०२४ च्या निवडणुकीत असा भाजपकडं सर्वसमावेशक मुद्दा नाही ही महत्त्वाची बाब. तुम्ही जर भाजपच्या? सहानुभूतीदार मतदारांना मंदिराबद्दल विचारलं तर त्या मंदिराच्या उभारणीबद्दल भाजपाला ते नक्की श्रेय देतील पण आता मतदानाच्या दृष्टीनं त्याचं महत्त्व कमी झालं आहे.
यावेळी निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यातील मतदानांमध्ये हिंदू-मुस्लिम अशा गटांमध्ये भाजपकडून समाजाची विभागणी केली गेली नव्हती. त्यानंतर पंतप्रधानांनी हिंदू-मुस्लिम समाजात भेद करणारी व हिंदुच्या ध्रुवीकरणाच्या दृष्टीनं काही वक्तव्य केली. ‘कॉंग्रेस त्यांच्या पसंतीच्या व्होट बॅंकेला खूश करण्यासाठी तुमचं मंगळसूत्र पळवेल, तसेच जे घुसखोर अनेक मुलांना जन्म देतात, त्यांच्यासाठी कॉंग्रेस तुमची संपत्ती ताब्यात घेईल असा आरोपही पंतप्रधानांनी केला.
हिंदू मतदारांचं ध्रुवीकरण करण्यासाठी आजपर्यंत आजमावलेल्या आणि सिद्ध झालेल्या अशा हमखास जिंकून देणाऱ्या मुद्द्याकडं ते वळले. मात्र मोदी यांच्या या वादग्रस्त विधानांसाठी निवडणूक आयोगानं भाजपाला नोटिस बजावली. त्यानंतर पंतप्रधानांनी थेट असे स्पष्ट केले, की आपण मुस्लिमांबद्दल काहीही बोललेलो नाही. हिंदू-मुस्लिम असा भेद जर आपण केला, तर सार्वजनिक जीवनामध्ये वावरण्यासाठी आपण योग्य नाही, असा त्याचा अर्थ निघेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
दहा वर्षांच्या सत्तेनंतर थोडेफार शैथिल्य येणं स्वाभाविक आहे. २०१९ च्या तुलनेत ही निवडणूक वेगळी आहे. विविध मतदारसंघातले स्थानिक मुद्दे आणि तिथले प्रश्न आणि मोदी यांची प्रतिमा अशी लढाई अनेक ठिकाणी दिसत आहे. काही मतदारसंघांत भाजपाच्या उमेदवाराविरुद्धची तीव्र नाराजी तसेच त्याच्या लोकप्रियतेमध्ये झालेली घट, मतदारसंघांमध्ये दोन जातींमध्ये असलेला संघर्ष किंवा चुकीच्या उमेदवाराला मिळालेली उमेदवारीची संधी अशा पातळीवर हा संघर्ष होत आहे.
मोदींची प्रतिमा किंवा त्यांचा करिष्मा असे छोटे छोटे मुद्दे विसरायला या वेळी भाग पाडत नाही. मागील निवडणुकीत मोदींची प्रतिमा अशा छोट्या छोट्या घटकांचा विसर पाडण्याइतकी मोठी होती. याचा अर्थ मोदींची लोकप्रियता कमी झाली आहे असे मुळीच नाही. भाजपाच्या रक्षणासाठी त्यांची प्रतिमा एखाद्या भक्कम कवचासारखी ठाम आहे. त्यांच्या प्रतिमेचे कवच नसते तर भाजपाची मोठी अडचण झाली असती.
तरीही अनेक मतदारसंघांमध्ये मोदींचा करिष्मा आणि स्थानिक पातळीवरचे अनेक महत्त्वाचे मुद्दे यामध्ये मोठा संघर्ष आहे. या दोन गोष्टींमध्ये मोठी टक्कर होत असली, तरी याचा अर्थ तिथं विरोधकांचाच विजय होईल असे नाही. भाजपाकडे शेवटच्या माणसापर्यंत जाऊ शकेल अशी मजबूत यंत्रणा आहे. त्याचबरोबर भाजपाकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखा मोठा नेता आहे.
विरोधकांकडे अशी यंत्रणा आणि मोदींसारखा खंबीर नेता या दोन्हीचा अभाव आहे. आजपर्यंतच्या मतदानाच्या ज्या फेऱ्या झाल्या, त्यामध्ये कमी मतदान झाल्याचं दिसलं आहे. त्यातून दोन गोष्टी स्पष्ट होत आहेत. एकतर काही समाजघटक महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या याबद्दल ठामपणानं बोलत आहे.
मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह कममीआहे. काही जण या निवडणुकीबद्दल बोलताना खूप थंड अशी निवडणूक आहे असंही म्हणतात. मागील निवडणुकांप्रमाणे ‘जय श्रीराम’ची घोषणा देत भाजपचा कट्टर कार्यकर्ता बाहेर पडलेला नाही. त्याचबरोबर भाजपवर नाराज असलेला असंतुष्ट असा मोठा वर्ग देखील मतदानाला बाहेर पडलेला नाही.
मोदी सरकारवर ते नाराज असले तरी त्यांनी दुसऱ्या बाजूला मतदान केलेले नाही. उत्तर प्रदेशात सुरुवातीच्या टप्प्यात राजपूत समाजाची अशी नाराजी होती, तेथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हा वर्ग नाराज होता, त्यामुळे तो मतदानासाठी बाहेर पडला नाही.
मोदी यांच्या ‘४०० पार’ या घोषणेचा अर्थ पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणं हा होता. मात्र या घोषणेमुळं पक्षाचं सरकार आलं अशा समजुतीत काही प्रमाणात काही कार्यकर्ते देखील उदासीन झाले. त्याचबरोबर मी जिथं जिथं दौरा केला त्या ठिकाणी म्हणजे राजस्थान, हरयाना आणि महाराष्ट्रातील काही भागांमधील दलित समाजामध्ये भीती व नाराजी जाणवली.
भाजपचं सरकार ४०० जागांसह स्थापन झाल्यावर देशाच्या राज्यघटनेला भाजपकडून धक्का लागेल अशी भीती त्यांच्या मनात होती. बुद्धिवादी वर्गामध्ये तर भाजपाला असं इतकं मोठं यश मिळालं तर या पक्षाची हुकूमशाहीकडं व वर्चस्ववादी सरकारकडं वाटचाल होईल, अशी भीती वाटत आहे.त्यांना भाजपबद्दल बऱ्याच शंका आहेत.
थोडक्यात निवडणूक जाहीर झाली त्यावेळची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याचा विचार केला आणि राजकीय चर्चेचा वेध घेतला तर भाजप बहुमताच्या मॅजिक फिगरभोवती रेंगाळत आहे. भाजपच्या विरोधकांना असा विश्वास आहे, की भाजपा बहुमताच्या आकड्याच्या खाली जाईल तर भाजपाच्या समर्थकांना असा विश्वास आहे, की पक्षाला आवश्यक तेवढे बहुमत नक्की मिळेल.
(लेखिका ह्या दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार तसंच राजकीय विश्लेषक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.