#MokaleVha : लव्ह, अरेंज की लिव्ह इन?

Relationship
Relationship
Updated on

बदलत्या युगात लिव्ह इन रिलेशनशिप ही संकल्पना नव्याने जोर धरत आहे. तसे बघायला गेले तर लिव्ह इन रिलेशनशिप ही संकल्पना नवी नाही. बरीच जुनी आहे. पण, सध्याच्या काळात या संज्ञेला जे वलय प्राप्त झाले, कायदेशीर स्वरूप प्राप्त झाले, त्यामुळे ही संज्ञा समाजामध्ये सर्रास वापरात येताना दिसतेय. नाण्याला दोन बाजू असतात, तसेच यालाही दोन बाजू आहेत. आता ही संकल्पना कायद्यात किती बसते, यापेक्षाही समाजात हिचे काय स्थान आहे हाही विचार महत्त्वाचा आहे. 

आपण समाजात जरा बारकाईने बघितले तर लिव्ह इन रिलेशनशिप ही संकल्पना लग्नाच्या आधीची एक पायरी झालेली आहे. पुणे, मुंबईसारख्या शहरांत बघितले तर अनेक मुले-मुली लिव्ह इनमध्ये राहण्यास प्राधान्य देताना दिसतात. परंतु ही पायरी चढण्याआधी याचे परिणाम काय होतील याचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही. 

उदाहरणादाखल बघायचे झाले तर, माझ्याकडे आलेल्या एका केसमधील तो तरुण व ती तरुणी दोघेही उच्चशिक्षित. आयटी सेक्टरमध्ये काम करणारे. लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. पुण्यासारख्या ठिकाणी फ्लॅट भाड्याने घेऊन राहायला लागले. दोघेही उच्चशिक्षित असल्याने सर्व कायदेशीर बाबी पाळून म्हणजेच दोघांच्या नावे रेंट ॲग्रिमेंट व इतर कायदेशीर बाबी स्वीकारून एकत्र राहत होते. साधारण एक वर्ष एकत्र राहिले आणि अचानक एके दिवशी मुलगा घर सोडून निघून गेला. त्यानंतर मुलीची मानसिकता कितीही भक्कम किंवा सक्षम असली तरी आजूबाजूच्या लोकांनी दिलेल्या वागणुकीमुळे तिला घर सोडावे लागले. वास्तविक पाहता दोघे एकत्र राहताना दोघांचे स्वभाव भिन्न असूनही अत्यंत सुधारित व पुढारीत विचारसरणीने घेतलेला निर्णय साधारण वर्षभरदेखील दोघांना टिकवता आला नाही. याचा अर्थ त्यांनी चुकीचा निर्णय घेतला, समाजाच्या विरोधात जाऊन निर्णय घेतला, चौकट मोडली आणि म्हणून असे झाले असे नाही. तर आज वयाच्या ७० व्या वर्षीदेखील ३०-३० वर्षे एकत्र राहून संसार करणाऱ्या जोडप्यांना २५-२६ वर्षांची मुले असूनदेखील असे निर्णय घ्यावे लागतात. 

म्हणजेच लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांचे नाते तुटते असे नाही, तर लिव्ह इनमध्ये राहून लग्नाचा निर्णयदेखील घेतला जातो. असेच एक उदाहरण राहुल व स्मिताचे. वयाच्या २५ व्या वर्षी दोघांनी एकत्र लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. नोकरीच्या निमित्ताने दोघेही शहराबाहेर एकत्र राहू लागले. साधारण दोन वर्षांचा कालावधी मजेत गेला आणि स्मिता गरोदर राहिली. लग्न न करता गरोदर म्हणजे समाजाच्या दृष्टीने गुन्हा! म्हणून दोघांनी गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. परंतु कायद्याची चौकट आड आल्याने प्रयत्न करूनही गर्भपात होऊ शकला नाही. अशातच राहुलने स्मिताला गर्भपाताच्या गोळ्या आणून दिल्या. परंतु वेळ निघून गेली होती.

स्मिता साधारण सात महिन्यांची गरोदर होती. एव्हाना तिचे पोटही दिसू लागले होते. घरच्यांना टाळणे तिला अशक्‍य होत होते. म्हणून घरी सांगून लग्नाचा निर्णय घेतला. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता लग्न झाले. घेतलेल्या औषधांचा परिणाम म्हणून आणि तणावपूर्ण काढलेला लग्नाआधीचा वेळ यातून आठव्या महिन्यातच बाळ जन्माला आले. त्यामुळे त्यांना घरातल्या माणसांबरोबर राहण्याची वेळ आली आणि खटके उडायला सुरुवात झाली. स्मिताला राहुलच्या घरच्यांबरोबर राहणे अवघड झाले.

वैचारिक भिन्नता, राहणीमान आणि वेगळी संस्कृती, यामुळे जुळवून घेणे अवघड झाले. राहुलची लग्नाआधी चालणारी प्रसंगानुसार पिण्याची सवय स्मिताला खटकू लागली. त्याचे पार्टीला जाणे स्मिताला खटकू लागले आणि भांडणे विकोपाला गेली. मग स्मिताने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अशातच दोन्ही घरच्या लोकांनी तिची साथ सोडली. कारण लिव्ह इनमध्ये राहणे असो वा लग्न असो दोन्हीही निर्णय स्मिताचे होते. 

स्मिताने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केला आणि स्मिता बाळाला घेऊन बाहेर पडली. लग्न असो वा लिव्ह इन रिलेशनशिप दोन्ही नात्यांमध्ये माणसांचा समजूतदारपणा महत्त्वाचा असतो, ना की सामाजिक चौकट आणि समाजाने घालून दिलेले नियम. परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल घडवून वेळच्या वेळी निर्णय घेणे महत्त्वाचे. परंतु पाश्‍चात्तीकरणाचे अनुकरण करून, समजून न घेता घेतलेले निर्णय हे कधी कधी आयुष्यात चुकीच्या वाटेवर नेऊन ठेवतात. अडचणीतून मार्ग हे प्रत्येक गोष्टीला असतात. परंतु त्यातून होणारा मनस्ताप हा न झेपणारा असतो. बऱ्याचदा लग्न झालेले पुरुषही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दुसऱ्या स्त्रीबरोबर राहत असतात. अशा गोष्टी कायद्याने सिद्ध करणे जरा अवघड होऊन जाते. परंतु याही गोष्टीवर आळा बसावा म्हणून कायद्यातही काही तरतुदी आल्या आहेत. पण त्या तरतुदी आपण पुढील भागात सविस्तरपणे बघू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.