ही कथा आहे प्रेमाची...!

ही कथा आहे प्रेमाची...!
Updated on
Summary

सातत्याने नव्या आव्हानांचा शोध घेणारा उद्योजक आणि एंजल गुंतवणुकदार राहुल नार्वेकरची पत्नी सी पल्लवी राव हिला कर्करोग व ऑटोइम्यून आजाराने हिरावून नेले. धैर्य, तग धरून राहणे, दृढता, निश्चय आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रेम यांची ही कथा त्याच्या स्वतःच्याच शब्दात.

मे 18, 2021 पूर्वीच्या माझ्या उभ्या आयुष्यात मी मोजून चार वेळा रडलो असेन. मी शेवटी रडलो ते 2005 साली, जेव्हा आम्ही- मी आणि माझी पत्नी- आम्ही डॉ. विनित सुरींना भेटण्यासाठी अपोलो हॉस्पिटलमध्ये धाव घेतली अणि जेव्हा त्यांनी उच्चारलेले दोन शब्द कानावर पडले, जे पुढील 16 वर्षे आमच्या आयुष्यांना ग्रासून टाकणार होते. मायस्थेनिया ग्रॅव्हिस

माझ्या मनात आलेला पहिला विचार होता "अमिताभ बच्चन” यांचा कारण मला आठवले की या कलाकाराला देखील याच ऑटोइम्यून आजाराच्या सौम्य प्रकाराने ग्रासलेले आहे. पण मग मी डॉक्टरांचे पुढचे शब्द ऐकले - दाखल होणे, शस्त्रक्रियेची शक्यता, मग कदाचित रेडिएशन आणि केमोथेरपी. मला आठवतय मी हॉस्पिटलच्या स्वच्छतागृहात उभा होतो आणि अचानक माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू उभे राहिलेले माझ्या लक्षात आले. सगळ्यात प्रबळ भावना होती ती भीतीची. 18 मे नंतर मी किती वेळा धीर सोडून रडलो आहे त्याची गणती करणे अशक्य आहे. पण ही कथा रोगाची भीती, शस्त्रक्रिया, हॉस्पिटल्स आणि आयसीयूजबद्दल नाहीये. ही कथा आहे प्रेमाची

ही कथा आहे डोळ्यांसमोर स्वप्ने असलेल्या एका तरुण मुलीची. ही कथा आहे एका लग्नाची, कुटुंबाची, एका लेकीची, बहिणीची, मैत्रिणीची, शिक्षिकेची, आईची आणि लढवैय्या स्त्रीची. कारण माझी पत्नी या सर्व भूमिकांमध्ये आहे. मी "होती” असे म्हणणार नाही कारण ती “ आहे” आणि कायम असणारच आहे.

पूर्वी 2000 साली जेव्हा मी मुंबईतच होतो तेव्हा मी चॅनेल- ऑक्सिजन या स्टार्ट-अपचा भागीदार म्हणून काम करत होतो- आम्हाला म्हणायला आवडायचे तसा आशियातील पहिला इंटरअ‍ॅक्टीव्ह म्युझिक चॅनेल. या टीममधला मी सगळ्यात खोडकर माणूस होतो आणि त्यामुळे माझ्यावर बाजी पलटवण्यासाठी <<माझी खोडी काढण्यासाठी>> माझ्या भागीदारांनी माझी प्रोफाईल जीवनसाथीवर टाकली. त्याकाळात ऑनलाईन लग्न जमवणे ही एक नवीन संकल्पना होती. आयुष्याच्या त्या टप्प्यावर मी माझे सगळे लक्ष करीअर उभे करणे, पैसा आणि एक आयुष्य उभे करणे यांवर केंद्रित केलेले होते आणि त्यात लग्न तर सोडाच, प्रणयालासुद्धा शून्य वाव होता. जेव्हा माझ्याकडे संभाव्य सीव्हीजचा पूर यायला लागला तेव्हा मी सगळ्यांना उत्तर देण्यासाठी एक स्टॅन्डर्ड पत्र तयार करून टाकले, ज्यात मी स्पष्ट केले होते की ही माझ्या मित्रांनी माझी काढलेली खोडी आहे आणि माझा लग्न या कल्पनेला विरोध नसला तरी इतक्यात काही काळ तरी ते शक्य नव्हते.

ही कथा आहे प्रेमाची...!
बारा वर्षांवरील मुलांना मिळणार लस; 'झायडस कॅडीला'ला DCGI कडून मंजूरी

कथा थोडक्यात सांगायची तर सीपीआर आणि मी पहिल्यांदा ऑन-लाईन भेटलो आणि मग मुंबईतील माटुंग्याच्या सुंदर कॅफेमध्ये. आम्ही दोघेही सुरवातीला चाचपडत होतो पण मग आमचे जमून गेले खरे. पुढच्या तीन भेटी बिअरसंगे झाल्या आणि माझे मुंबईतले सगळे मित्र आणि माझे बाबासुद्धा म्हणायला लागले “लडकी तो अच्छी है, लेकिन कपॅसिटी देख ले” [मुलगी चांगलीच आहे पण तिची मद्यप्राशनाची क्षमता ध्यानात घे बरं!] मुळात दक्षिण दिल्लीत वाढलेल्या या मुलीकडे असलेली मद्यप्राशनाचा परिणाम न होऊ देण्याची क्षमता आमच्या सगळ्यांची मिळून होती त्याहून अधिक होती. तिला बिअर अतोनात प्रिय होती.

मुंबईतल्या लोकलमधून चार दिवस प्रवास केल्यावर सीपीआर म्हणायला लागली “मुंबई फार धावपळीची आहे” आणि "तुम्ही मंडळी तुमचे आयुष्य लोकल ट्रेन्समध्येच घालवता" आणि मग- “आपण एक वर्ष दिल्लीला रहायला जाऊयात आणि मग पुढच्या वर्षी आपण मुंबईला परत येऊयात.”

म्हणून मी तेच केलं. तोपर्यंत चॅनेल ऑक्सिजन हा स्टार्टअप राहिला नव्हता. मी दिल्लीला पोचलो आणि मला एका एजन्सीत नोकरी मिळाली. सफदरजंग एन्क्लेव्हमधल्या सेंट मेरीजमध्ये शिक्षिका असलेल्या सीपीआरने सुद्धा फ्रीलान्स व्हॉईसओव्हर्स करण्यासाठी ती नोकरी सोडून दिली. ती आकाशवाणी आणि दूरदर्शनची रेडिओ जॉकी (आरजे) होती.

मी अर्जुननगरमध्ये एक छोटा बरसाती (गच्चीवरील) फ्लॅट भाड्याने घेतला, सरोजिनीनगर मधून 7000 रुपयांमध्ये दोन गाद्या आणून टाकल्या आणि आमचे आयुष्य स्थिरावले. आम्ही फार वेळकाढूपणा न करता आणि विचार वगैरे करत न बसता 22 नोव्हेंबर, 2001ला सफदरजंग क्लब मध्ये विवाहबद्ध झालो.

माझ्या लग्नाच्याच दिवशी माझी नोकरी गेली. पुढचे काही दिवस ही बातमी मी सीपीआरकडे उघड केली नाही, पण अर्थातच आम्हाला हनीमूनला वगैरे जाता आले नाही. अगदी असहाय्यतेतून मी माझ्यासमोर जी पहिली नोकरी आली ती घेऊन टाकली- अंसल प्रॉपर्टीजमध्ये सीनिअर मॅनेजर, ज्यात माझे काम होते डिस्ट्रिक्ट सेंटर जनकपुरी या जागेवर एक अ‍ॅम्फीथिएटर बांधायचे आणि अगदी शून्य बजेटमध्ये ती एक हॅपनिंग प्लेस बनवायची.

सुदैवाने मी माझ्या कंपनीसाठी एक धाडसी व्यवहार केला आणि मला थेट व्हाईस प्रेसिडेंट पदावर बढती मिळाली- अंसल प्लाझा. त्याच दरम्यान सीपीआरने दिल्लीतल्या रेडिओ मिर्चीमध्ये संध्याकाळच्या ड्राईव्ह टाईममधील आरजे म्हणून नोकरी पटकावली. मी एका बाजूला फ्रीलान्स असाइनमेंट्सही करायला सुरवात केली आणि परत एकदा चांगले पैसे कमवायला लागलो.

आम्ही दिल्लीतले आमचे पहिले घर विकत घेतले, मोठी गाडी घेतली, एकदोन वेळा पेज-3 वरही झळकलो. आणि मग शोना, आमचा लॅब्रेडॉर आणि आमच्या आयुष्यातले प्रेम आमच्यात आले. आणि मग 2005 मध्ये आले आमचे सर्वोत्तम जॉइंट व्हेंचर- आमचा मुलगा- रिआन राव नार्वेकर. आयुष्य यापेक्षा आणखी काय सुंदर असू शकते? निदान आम्हाला तसे वाटत होते.

एक दिवस सीपीआर बोलताना अडखळायला लागली, तिची डावी पापणी खाली झुकायला लागली. मायस्थेनिया ग्रॅव्हिस हे निदान झाल्यावर दिल्लीच्या अपोलोमध्ये एक शस्त्रक्रिया पार पडली ज्यात तिचा एक स्वर-तंतू कापला गेला आणि दुसर्‍याला लकवा भरला. ती आपला आवाज गमावून बसली. अपोलोमधले इएनटीचे प्रमुख तिला म्हणाले: “आता यापुढे आरजे बनणे विसरून जा” ते म्हणाले की कधीकाळी सीपीआरला तिचा आवाज परत मिळाला तर तो एक चमत्कार असेल. मला त्याचा अगदी संताप आला होता, पण सीपीआरने शांतपणे एका कागदावर लिहिले: “एक दिवस मी परत ऑन-एअर असेन”

तिच्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही - ना तिच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी ना नंतर इतरांकडून घेतलेल्या मतांनी. तिच्या गळ्याभोवती एक घंटा बांधलेली होती जेणेकरून ती मदत मागू शकेल कारण तिला साधे कुजबुजतासुद्धा येत नव्हते.

तिला आणि आमच्या तान्ह्या मुलाला वेळ देण्यासाठी मी माझी नोकरी सोडली. लवकरच एक फार चमत्कारिक परिस्थिती आमच्या लक्षात आली. आत्तापर्यंत आमचा मित्र आणि हितचिंतकांचा एक भला मोठा परिवार होता, पण अचानक त्यातले 99.99% लोक गायब झाले. लोकांनी आमचे कॉल्स घेणे बंद केले आणि आम्हाला समारंभांची निमंत्रणे मिळणे बंद झाले. बहुतांश लोक आम्हाला अचानक भेटलेच तर नजर चुकवायला लागले.

असो, नाहीतरी आम्ही रेडिएशन, केमोथेरपी, केस गळणे आणि शक्तिपात होणे या गोष्टींमध्ये व्यग्र होतो. कारण शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या असे लक्षात आले की सीपीआरला ऑटो इम्यून डिसऑर्डर व्यतिरिक्त एक दुर्मिळ प्रकारचा कर्करोगही झालेला होता.

ही कथा आहे प्रेमाची...!
'सरहद' घेणार हजार अफगाणी विद्यार्थ्यांची जबाबदारी; PM मोदींना पत्र

सुदैवाने अनोळखी व्यक्ती, सहकारी आणि उपचार करणारे यांच्या रूपात आमच्या आयुष्यात काही देवमाणसे आली. त्यातील एक होता पवन नावाचा तरुण योग शिक्षक. सकारात्मकता, प्राणायाम आणि योग्य पोषणाच्या मदतीने अडीच वर्षांनंतर 2007 मध्ये सीपीआरला तिचा आवाज परत गवसला आणि ती परत ऑन-एअर गेली.

अचानक दिल्ली एनसीआरमध्ये सर्वत्र होर्डिंग्ज लागली- आणि त्यांवर "पल्लवी परतली आहे” हा मजकूर आणि तिचे छायाचित्र होते. सगळ्यात भव्य होर्डिंग अंसल प्लाझावर होते. आणि अंदाज बांधा काय घडले असेल?

परत आमचे फोन घणघणायला लागले आणि आम्ही पाहुण्यांच्या याद्यांमध्ये परत विराजमान झालो.

आयुष्य परत रुळावर आले होते. सीपीआर रेडिओवर परतली होती आणि मी www.fashionandyou.com चा सहसंस्थापक बनलो. आम्ही आधी सेक्वोइया भांडवलाद्वरे फक्त $8 दशलक्ष उभे केले आणि मग मागाहून $40 दशलक्ष.

केवळ काही महिने दिले गेलेली सीपीआर 2019 आणि 2020 मध्ये एकदाही हॉस्पिटलमध्ये दाखल करायला न लागता तगून राहिली. पण माझी शस्त्रक्रिया आणि उपचारांमुळे मला अमुकतमुक करायला जमणार नाही असे सीपीआर म्हणत राहिली. तिची ही मानसिकता बदलावी म्हणून मी तिला माझ्याबरोबर नेहरू पार्कमध्ये मॅरॅथॉनच्या तयारीसाठी यायला उद्युक्त केले. मग आम्हाला दुसरी एक परी भेटली - शीबा. तिने सीपीआरला आधी चालायला लावायचे आणि नंतर छोटी अंतरे पळायला लावायचे जमवले. यातूनच पुढे तिने तिच्या पहिल्या अर्ध-मॅरॅथॉन मध्ये भाग घेतला- 21 किलोमीटर्स- 2010च्या दिल्ली मॅरॅथॉनमध्ये.

पण तिची पहिली प्रतिक्रिया होती- "वेडा आहेस का? मला हे जमणे शक्य नाही...” मी तिला सांगितले की तू सुरवात तर कर आणि मग एक किलोमीटरनंतर तू मिथिलेशबरोबर गाडीत बसून घरी जाऊ शकतेस. मी तिला सांगत राहिलो की मिथिलेश पुढच्याच कोपर्‍यावर उभा आहे. आम्ही इंडिया गेटपर्यंत पोचलो तेव्हा तिच्या लक्षात आले की तिने जवळजवळ निम्मे अंतर पार केले होते. मग तिने उरलेले अंतर माझ्याबरोबर पार केले आणि मग ती भावनाविवश होऊन म्हणायला लागली “मी अर्धी मॅरॅथॉन पूर्ण केली, आता मी अगदी बरी आहे.”

आता सीपीआरने व्यायाम चालू केला आणि त्यासाठी कपडेसुद्धा घेतले. आता आयुष्य अगदी मजेत चालले आहे असे आम्हाला वाटायला लागले तेव्हाच मायस्थेनिया ग्रॅव्हिसने परत उचल खाल्ली. यावेळी तिच्या फुफ्फुसांभोवती पाच ट्यूमर्स होते. परत एकदा अपोलो हॉस्पिटल, शस्त्रक्रिया, रेडिएशन, केमोथेरपीची चक्रे.

परत एकदा मी तिच्यासह राहण्यासाठी माझ्या स्टार्टअप मधून बाहेर पडलो. परत एकदा मित्रपरिवार आटला, पण खरे सांगायचे तर आम्हाला त्याची पर्वा नव्हती. परत सगळे पूर्वीसारखेच घडले, आम्ही अपोलो हॉस्पिटलमध्ये आणि सीपीआर आयसीयूमध्ये.

2013 मध्ये मी एनडीटीव्हीसोबत Indianroots.com हा एक नवीन व्यवसाय सुरू केला. एक दिवस डॉ.प्रणय रॉय मला म्हणाले “मी तुला काय मदत करू शकतो?” मी त्यांना विनंती केली की सीपीआरच्या तब्येतीवर आणखी कोणाचे तरी वैद्यकीय मत हवे आहे. माझा संपर्क डॉ. नाझली यांच्याशी घालून देण्यात आला आणि त्यांनी मला मुंबईतल्या डॉ. सुलतान प्रधान यांच्याकडे पाठवले.

ही कथा आहे प्रेमाची...!
राज ठाकरेंच्या आरोपांनुसार राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीवाद उदयास आला? समजून घ्या

मी त्यांना सगळे रिपोर्ट्स दाखवले आणि ते अभ्यासल्यानंतर ते मला म्हणाले” तिला तुमच्या मुलाबरोबर जेवढा वेळ घालवायचा आहे तेवढा घालवू देत. कारण तिच्याकडे वेळ फार थोडा आहे. मी त्यांना विचारले की तिच्याकडे किती वेळ आहे तर ते म्हणाले "थोडे महिने"

मी संतापलो होतो. मी त्यांना विचारले की आपल्याला हे कसे बदलता येईल, पण ते म्हणाले की ते शक्य नाही.

मी पार खचून गेलो होतो, पण सुदैवाने पोषणतज्ञ आणि आरोग्य गुरु ल्यूक कौटिन्होच्या रूपात आमच्या आयुष्यात आणखी एक देवमाणूस आला. केवळ काही महिने दिले गेलेली सीपीआर 2019 आणि 2020 मध्ये एकदाही हॉस्पिटलमध्ये दाखल करायला न लागता तगून राहिली.

पण त्याआधी 2015 मध्ये मायस्थेनिक क्रायसीस (मायस्थेनिया ग्रॅव्हिसमधील एक गुंतागुंत) मुळे तिला अपोलोमध्ये दाखल करावे लागले होते, व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले होते आणि आयसीयूमध्ये हलवले होते. नेहमीप्रमाणे मी अपोलोमधील कॅफे कॉफी डे मधून माझे काम करत होतो आणि सीपीआरशी फोनवर चॅट करत होतो तर तिने अचानक विचारले “मीच का म्हणून? देव माझी अशी अवस्था का करत आहे?” मी तिला म्हटले की खरे तर आपण भाग्यवान आहोत आणि गणपतीचे आभार मानायला हवेत की आपण एम्सबाहेरच्या फूटपाथवर नाही तर शहरातल्या सर्वोत्तम हॉस्पिटलमध्ये आहोत, आपल्याला घरात मदत उपलब्ध आहे इ.

त्याक्षणी सीपीआर बोलून गेली, "माझी फक्त बोटेच चालत आहेत, माझ्या आजूबाजूचे बाकीचे सगळे कोमात आहेत. मी काय करायला हवे?” मी तिला आठवण करून दिली की ती एक कलाकार आहे आणि काहीतरी सकारात्मक करायचे शोधायला तिला सांगितले. दुसर्‍या दिवशी मी जागा झालो तर समोरच्या बेडवरील पेशंटपासून स्फूर्ती घेऊन सीपीआरने लिहिलेली एक प्रेमकथा मला वाचायला मिळाली.

मी तिला दोनच शब्दांमध्ये उत्तर दिले-”और लिख” [आणखी लिहित रहा]. तिने एका शब्दात उत्तर दिले-"कमिने" [दुष्ट माणूस] पण शेवटी तिने सात प्रेमकथा लिहिल्या. बर्‍याच काळाने तिला हॉस्पिटलमधून सोडल्यावर ती जेव्हा घरी आली तेव्हा मी त्या प्रेमकथा संकलित केल्या आणि “आयसीयू लव्ह स्टोरीज” या नावाने त्यांचे एक पुस्तक प्रकाशित केले. ते अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे.

आयसीयूमध्ये असताना तिने सात प्रेमकथा लिहिल्या. नंतर मी त्या प्रेमकथा संकलित केल्या आणि “आयसीयू लव्ह स्टोरीज” या नावाने त्यांचे एक पुस्तक प्रकाशित केले.

ल्यूक आणि आमच्या आयुष्यातल्या देवमाणसांमुळे सीपीआर लढत राहिली, ध्यानधारणा आणि योग्य पोषण यांच्या मदतीने तिने आपले मनोधैर्य उच्च राखले, तिने 3 टेडएक्स टॉक्स केले, अनेक कार्यक्रमांमध्ये भाषणे दिली आणि ती आता बरी होण्याच्या वाटेवर आहे असे वाटायला लागले होते. 2005 सालानंतर 2019 हे पहिलेच असे वर्ष होते ज्यात सीपीआरला एकदाही हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले नाही.

जेव्हा 2020 मध्ये महामारीचा प्रकोप चालू झाला तेव्हा आम्ही दोघेही सावध होतो. कोविड-19 टाळण्यासाठी सीपीआअरने कडक नियम घालून घेऊन स्वतःला घरात विलगीकरणात ठेवले. पण ती काम करत राहिली, तिचा पॉडकास्ट “कॅन इन्स्पायर", जो पदार्पणातच पहिल्या नंबरवर पोचला, तो ती तयार करत राहिली. 2020 चे जवळ जवळ अख्खे वर्ष कुठल्याही अघटिताविना पार पडले, पण डिसेंबर 2020 मध्ये काहीही पूर्वसूचना न देता सीपीआरची कोविड-19 चाचणी पॉझिटीव्ह आली.

अगदी सौम्य शब्दांमध्ये सांगायचे तर पहिले 24 तास तणावपूर्ण होते. सुदैवाने तिला लक्षणे उद्भवली नाहीत आणि ती उत्तम बरी झाली. आम्ही परत मार्गावर आलो होतो आणि यावर्षी तर तिने कामासाठी अहमदनगरचा प्रवास करणे सुद्धा जमवले.

जेव्हा दुसरी लाट आली आणि लोक प्रेमाची माणसे गमावू लागली तेव्हा तिच्या मनोधैर्यावर विपरित परिणाम झाला आणि मग तिला छातीत धडधड आणि भास व्हायला लागले. माझ्या लक्षात आले की तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आलेली आहे. जेव्हा बेड्ज उपलब्ध नसल्याने लोक हॉस्पिटल्सच्या पार्किंग लॉट्समध्ये प्राण सोडत होते तेव्हा आम्हाला आमचा मित्र अतुल पै काणेच्या खटपटीमुळे अपोलोत बेड मिळू शकला त्याचे शतशः आभार.

ती आयसीयूत असताना दुसर्‍यांदा तिला हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टर्स तिला वाचवू शकले पण तिला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. तिला निदान दोन आठवडे व्हेंटिलेटरवर ठेवावे लागेल असे जरी डॉक्टर्स म्हणालेले असले तरी सीपीआर काही दिवसांमध्येच त्यातून बाहेर आली.

माझी रोजची दिनचर्या होती, उठायचे, दाढी करायची, शॉवर घ्यायचा, माझे उत्तम सुहास्य चेहर्‍यावर आणायचे आणि तिला आयसीयूमध्ये पाच मिनिटांसाठी भेटायला जायचे. ती एखाद्या पॅडवर लिहायची किंवा खाणाखुणांनी संवाद साधायचा प्रयत्न करायची. सीपीआरने तिची मध्यमवर्गीय मनोवृत्ती कधीच सोडली नव्हती. तिला कायम खर्चाची चिंता वाटायची आणि ती आयसीयूमध्ये राहण्याबद्दल कुरकुर करायची. 17 मे च्या सकाळी जेव्हा मी तिला आयसीयूमध्ये भेटायला गेलो तेव्हा तिने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला ज्याचा अर्थ नर्सने “ मला साध्या खोलीत कधी हलवणार?” असा सांगितला. मी तिला म्हणालो की तू बरे होण्यावर लक्ष दे, बाकीची काळजी माझ्यावर सोड.

ती हसली आणि नर्सला म्हणाली "माझ्या नवर्‍याला सांग तो वेडा आहे.” मी फटकळ उत्तर दिले की हे तिने 21 वर्षांपूर्वी लक्षात घ्यायला हवे होते. “अभी क्या फायदा?” [आता त्याचा काय उपयोग?]

मी परत आलो आणि ती आता लवकरच घरी परतेल या विचाराने मला बर्‍याच दिवसांनंतर हायसे वाटले. झोप यावी म्हणून मी मेलॅटोडिनची एक गोळी घेतली, पण 30 मिनिटांमध्ये मला हॉस्पिटलमधून फोन आला की इकडे परत या. सीपीआरला आणखी एक हृदयविकाराचा झटका आला होता आणि ती झोपेतच गेली होती.

सकाळी आमच्या मैत्रिणी सौनिया, मोना आणि कोएल येईपर्यंत मी तिथे होतो त्याच्या आठवणी मला काही तुकड्यातुकड्यांशिवाय नाहीत. सकाळी उशिरापर्यंत मी शांत होतो आणि मग मला मृत्यूचा दाखला घ्यायला जावे लागले. मला वाटते मी हॉस्पिटलच्या पार्किंग लॉटमध्येच कोसळून पडलो आणि मला रडू फुटले. माझ्या आयुष्यातले सर्वात कठीण काम मला करायचे होते ते म्हणजे आमचा मुलगा रिआन आणि अम्मा ( सीपीआरची आई) यांना ही बातमी द्यायची होती. आम्ही हॉस्पिटलमधून थेट

स्मशानात गेलो आणि रिआनशी व्हीडिओ कॉलवरून संपर्क साधला. आणि मग मला अम्माला सामोरे जावे लागले. मला वाटले होते त्यापेक्षा ती खूप धीराची निघाली. खरे तर रिआन आणि अम्मा माझ्यापेक्षा जास्त धीराचे आहेत.

आता दोन महिने लोटले आहेत पण अजूनही हे अवघडच जात आहे. आता मला झोपेसाठी औषधे घ्यावी लागतात आणि मधेच मला रडू फुटते आणि ते रिआनला घाबरवून सोडणारे असते. लोकांकडून चांगल्या भावनेपोटी मला परस्परविरोधी सल्ले मिळत राहतात. रिआन, अम्मा, माझी मित्रमंडळी आणि कुटुंबीय हे माझे आधारस्तंभ आहेत पण तरीही हे इतके सोपे नाही.

खरे तर आमचा मुलगा रिआन आणि सीपीआरची आई अम्मा माझ्यापेक्षा जास्त धीराचे आहेत. रिआन, अम्मा, माझी मित्रमंडळी आणि कुटुंबीय हे माझे आधारस्तंभ आहेत पण तरीही हे इतके सोपे नाही.

मी अनेक अवघड प्रसंग हसत हसत झेलले आहेत आणि त्यांच्यावर मात केलेली आहे. पण याची काही एकच एक टेमप्लेट नसते आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर मी रोजच्या आयुष्याला कसा सामोरा जाणार आहे हे मला समजत नाही.

लवकरच अम्मा कायमची दुबईला परतेल आणि रिआन होस्टेलवर रहायला जाईल. घरात फक्त माझे बाबा, मी आणि आमचे पाळीव प्राणी असणार ही कल्पनाच मला घाबरवून सोडते. मला माहित आहे की मी आता रिआन आणि माझ्या कामावर लक्ष केंद्रित करायला हवे आणि त्यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा, पण अजून तरी ते अवघड जाते आहे.

मग अचानक तो उत्साही चिवचिवता आवाज माझ्या डोक्यात रुंजी घालतोआणि म्हणतो "बिट्टा चिल, हो जाएगा” [ शांत रहा, तू यातून सावरशील.] मग मी हसतो, माझ्या फोनवरील किंवा भिंतीवरील तिच्या सुंदर छायाचित्राकडे बघतो आणि म्हणतो “हां रे येडी” [ हो ग वेडे"]

मला आता पल्लवी राव फाउंडेशनच्या माध्यमातून तिचा वारसा पुढे नेण्यावर काम करायचे आहे, देशभरातील वंचित स्त्रियांना आवाज मिळवून द्यायचा आहे. गेली काही वर्षे गणपतीनेच आम्हाला सोबत वेळ घालवायची संधी देऊन एक वरदानच दिले होते या विचारापोटी “मी अपयशी ठरलो आहे” या भावपोकळीतून मी हळूहळू बाहेर येतो आहे.

माझा विश्वास आहे की मी या दुःखातून बाहेर झटपट येणे आणि परत मार्गाला लागण्यावर लक्ष केंद्रित करणे हीच माझ्या लढवैय्या राणीसाठी सर्वोत्तम आदरांजली ठरेल.

आता मागे वळून बघता लक्षात येते की गेली 21 वर्षे आम्ही अनेक जन्म सोबत घालवले आणि रिआनला तिचा एवढा दीर्घ सहवास लाभला ही त्याची पुण्यायीच. तो आज ज्या प्रकारचा माणूस बनला आहे आणि ज्या प्रकारे तो माझी काळजी घेतो त्याचा मला अतिशय अभिमान वाटतो. अर्थात मला लक्षात येते की तो आतून खूप घाबरलेला असतो आणि म्हणून तो सतत माझ्या निकट राहतो, माझ्या जेवणावर, औषधांवर आणि झोपेवर लक्ष ठेवून असतो. पण माझा विश्वास आहे की मी या दुःखातून बाहेर झटपट येणे आणि परत मार्गाला लागण्यावर लक्ष केंद्रित करणे हीच माझ्या लढवैय्या राणीसाठी सर्वोत्तम आदरांजली ठरेल.

मी माझ्या भाषणांमधून नेहमी तिला चिडवायचो, म्हणायचो, माझ्या बायकोने मला गंडवून गेली 21 वर्षे दिल्लीत गुंतवून ठेवले आहे,

पण एक ना एक दिवस मी मुंबईला परतेन. आता ते कधीच शक्य नाही. मी सीपीआरला भेटायला जाईपर्यंत दिल्ली हेच कायमचे घर राहणार आहे.

तिच्या “आयसीयू लव्ह स्टोरीज” या पुस्तकात एक ओळ आहे- प्रेमाने सगळे जिंकता येते. माझा विश्वास आहे की तसेच घडेल.

(हा मजकूर लेखकाच्या स्वतःच्या शब्दांमधला आहे आणि स्पष्टता येण्यासाठी त्यावर अगदी जुजबी संपादन संस्करण केले गेले आहे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.