पावसाळी खाणं ! (माधव गोखले)

पावसाळी खाणं ! (माधव गोखले)
Updated on

मला विचाराल तर, आपल्या सगळ्यांच्या मनाच्या एका कोणत्या तरी कप्प्यात हा येता पाऊस ‘सु-रस यात्रे’चा आणखी एक अनुभव उलगडत नेत असतो. ‘पाऊ ऽऽऽऽ स’ असं म्हटल्यावर ज्यांच्या डोळ्यांसमोर वाफाळता चहा आणि कांदाभजी येत नाहीत; त्यांनी पाऊस अनुभवलाच नाही! पाऊस म्हणजे भजी...पाऊस म्हणजे मक्‍याची कणसं...पाऊस म्हणजे रानभाज्या...पाऊस म्हणजे वाफाळतं काहीही...

कल्पना करा. दुपारची वेळ आहे...‘गडद निळे जलद भरुनी’ येताहेत... पाचोळा भिरभिरत उडतोय...‘आता कोणत्याही क्षणी पावसाची झड लागेल,’ असं म्हणेपर्यंत त्यानं भवतालात धांदल उडवून दिलीय...काही क्षणांपर्यंत कुंदलेला आसमंत विसरून त्या पडत्या पावसाबरोबर आता एक लय अंगात भिनायला लागलीय...मनानं नकळत ताल धरलाय...‘सरीवर सरी आल्या गं, सचैल गोपी न्हाल्या गं...सरीवर सरी’... आसमंत भिजतो आहे...सुखावतो आहे...आणि तुम्ही...तुमच्याहीपेक्षा उंच असलेल्या काचेआडून, वाफाळत्या चहासह किंवा कॉफीसह पावसाचं ते येणं तुम्ही पावसाच्या बाहेर राहून लुटता आहात...केवळ मनानंच भिजता आहात... ‘डिटॅच्ड्‌ ॲटॅचमेंट’ची आणखी वेगळी अनुभूती ती काय...! ‘जगी सर्व सूखी असा कोण आहे?’ या समर्थांच्या प्रश्‍नाला त्या क्षणापुरता हात वर करावा, असे जे मोजके क्षण आपल्या आयुष्यात येऊन जातात, त्यातलाच हा एक. काही क्षणांना चिरयौवनाचं वरदान मिळालेलं असतं. हातातल्या मोबाईलमधल्या अगदी लेटेस्ट कॅमेऱ्यातही हे क्षण पकडता येत नाहीत; पण जाणिवांच्या कॅनव्हासवर ते कायमचे चितारले जातात. (अशी खूप चित्रं आपल्या बॅकअपमध्ये असतात आणि प्रत्येकाच्या मनातली ही चित्र जलरंगातच असतात, असं मला उगाचच वाटतं). माझ्या मनातला पाऊस बऱ्याचदा असाच येतो आणि त्या येण्याला छान कॉफीचा वास असतो.

पाऊस काय काय घेऊन येत असतो. लहानपणच्या त्या कागदी होड्यांच्या असंख्य आठवणी आणतो. या पावसासाठी शायर आपली दौलत, मानमरातब, अगदी तारुण्यही पणाला लावायला तयार आहे. पाऊस तरुण मनासाठी प्रणय आणतो. ‘ती’च्या किंवा ‘त्या’च्या (पर्युत्सुक, व्याऽऽकुऽऽळ वगैरे) आठवणी आणतो. शांत पडलेल्या रानवाटांमध्ये चैतन्य भरतो. भराऱ्या मारणाऱ्या मनाला जखडून ठेवणारा मातीचा गंध आणतो. ग्रीष्माचा तडाखा सोसलेल्या भुईसाठी शांतवणारा दिलासा आणतो. कुणासाठी मल्हाराची धून आणतो. शापानं बांधल्या गेलेल्या कुण्या कुबेरसेवक यक्षाचा संदेश आणतो. सृष्टिचक्राची पुन्हा सुरवात करणारं नवचैतन्य आणतो. हल्लीच्या काळातल्या नगरपालिकांसाठी तो नालेसफाईचा, खड्डेदुरुस्तीचा संदेश आणतो. महामंडळाला विजेच्या तब्येतीची चौकशी करायला सांगतो.

पण मला विचाराल तर, आपल्या सगळ्यांच्या मनाच्या एका कोणत्यातरी कप्प्यात हा येता पाऊस ‘सु-रस यात्रे’चा आणखी एक अनुभव उलगडत नेत असतो. ‘पाऊ ऽऽऽऽस’ असं म्हटल्यावर ज्यांच्या डोळ्यांसमोर वाफाळता चहा आणि कांदाभजी येत नाहीत; त्यांनी पाऊस अनुभवलाच नाही! उगाच येता-जाता अंगावर चार थेंब पडले म्हणून ‘पावसात भिजलो’, असं सांगण्यात काही हशील नाही. पावसाबरोबरचं प्रत्येकाचं नातं वेगळं असलं तरी ‘पावसाळी खाणं’ हे प्रत्येकाच्या अजेंड्यावर कुठंतरी असतच असतं. मग पाऊस म्हणजे भजी...पाऊस म्हणजे मक्‍याची कणसं...पाऊस म्हणजे रानभाज्या...पाऊस म्हणजे वाफाळतं काहीही...
***

‘अबरचबर’ किंवा ‘अरबटचरबट’ हा शब्द मी पहिल्यांदा ऐकला तो भेळेच्या संदर्भात. त्या वेळी त्या अबरचबरचा अर्थ माझ्यालेखी ‘घरातली मोठी माणसं आपल्याला सुखानं खाऊ देणार नाहीत असा आपल्याला आवडणारा पदार्थ’ असा होता. काल-परवा दाते-कर्वे यांच्या ‘महाराष्ट्र शब्दकोशा’त अबरचबरचा अर्थ पुन्हा पाहिला. शब्दकोशातला ‘अबरचबर’ फारच निराशाजनक होता. बेचव, निःसत्त्व, नीरस, बेलज्जतदार, पोट बिघडवणारं खाणं! फारच वाईट. मात्र, हा अबरचबर एखाद्या पावसाळी दुपारी जेव्हा सुखावून टाकणाऱ्या भज्यांच्या रूपात येतो तेव्हा तो बेचव, निःसत्त्व, नीरस, बेलज्जतदार वगैरे वगैरे अजिबात नसतो, या माझ्या अनुभवाशी तुमच्यापैकी बहुतेकजण सहमत होतील. त्यामुळं माझ्या शब्दकोशातला अबरचबरचा अर्थ आजही ‘घरातली मोठी माणसं आपल्याला सुखानं खाऊ देणार नाहीत असा आपल्याला आवडणारा पदार्थ’, असाच आहे.

पडत्या पावसात एखाद्या पदार्थाचा आस्वाद घेण्यातला आनंद पहिल्यांदा समजला तो सिंहगडावर. सिंहगड किमान ३५ वर्षांपूर्वीचा. तेव्हा ‘गडा’वर जाणाऱ्या मंडळींमध्ये ‘पर्यटकां’च्या तुलनेत ‘भटक्‍यां’ची संख्या जास्त असायची. आतकरवाडीतून गडावर जाणाऱ्या वाटेनं चढायला सुरवात करायची, निम्मा चढ चढून गेल्यावर मेटावर थोडं टेकायचं, पुढच्या चढणीचा (पुन्हा नव्यानं) अंदाज घ्यायचा आणि पुढची वाट पकडायची. पुढचा थांबा पुणे दरवाजा. पावसात ही चढण आणखी वेगळी असायची. पावसातलं सिंहगडाचं रूपडं काही औरच असायचं. चढणीला लागेपर्यंत पाण्यानं भरलेली भाताची खाचरं दोन्ही बाजूंना सोबतीला असायची. हवेतला ओलावा झेलत चढणीला सुरवात व्हायची आणि पुणे दरवाजा गाठेपर्यंत आजूबाजूच्या ओलाव्यानं घट्ट लपेटून टाकलेलं असायचं. जोडीला भणाण वारं, गडावर तानाजी कड्याकडं चालायला लागावं तसं वाढत जाणारं. पावसातल्या सिंहगडावर पाऊस आपल्याला लपेटूनच असतो. अशाच पडत्या पावसात सिंहगडावरच्या खेकडाभज्यांची ओळख झाली. पुणे दरवाजातून पायऱ्या चढून आत गेल्यावर घोड्यांची पागा, दारूगोळ्याचं कोठार, टिळक बंगला अशा डाव्या-उजव्या बाजूच्या खुणा मागं टाकत तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडं जाताना वाटेत एक-दोन घरं लागायची. तिथंच बाजूला आडोसा करून हॉटेल थाटलेलं. ओल्या जमिनीवरच बसकण मारून ‘जर्मल’च्या जेमतेम तळहाताएवढ्या ताटलीतून येणारी भजी आणि लालचुटुक चटणी! खेकडाभज्यांच्या आठवणीबरोबर आजही सिंहगडाच्या असंख्य पावसाळी आठवणी ताज्या होतात. प्रचंड पावसात नखशिखान्ताच्याही पलीकडं भिजल्यावर, हाता-पायाची बोटं आखडायच्या बेतात असताना वाफाळत्या चहाच्या कपाभोवती हात गुंफून चहाच्या त्या कपाची ऊब गारठलेल्या हातात मुरवून घेण्यात काय सुख असतं, ते फक्त तेवढं भिजून काकडल्यावरच कळतं...आणि असं भिजायचं असेल तर सिंहगड किंवा सह्याद्रीतले घाटमाथेच हवेत. अशा निथळत्या भवतालात लक्षात राहिलेली वाफाळत्या चहाची ऊब आणि खेकडा भज्यांची आणखी दोन ठिकाणं म्हणजे कोयनेकडून चिपळुणात उतरणाऱ्या कुंभार्लीचा घाटमाथा आणि वरंधा घाटात कोकणच्या उतरणीला लागण्याच्या आधीच्या वळणाचा रस्ता. चिंब भिजवणारा पाऊस, दऱ्यांतून वर येत लपेटून टाकणारे ढगांचे पुंजके, हिरव्या रंगाच्या असंख्य छटा आणि कुरकुरीत भज्यांची रेंगाळणारी खमंग चव.

वयाचा कोणताही मुलाहिजा न ठेवता कोणालाही भुरळ घालणाऱ्या या पदार्थाला खेकड्याची उपमा पहिल्यांदा कुणी दिली कोण जाणे; पण ज्यानं कुणी दिली असेल तो पाऊस, खेकडे आणि भजी अशा तिघांच्याही प्रेमात असणारा अस्सल खवैय्या असणार. हा आपला माझा तर्क. धुवाँधार पावसानं ओढ्या-नाल्यांना पाणी आल्यानंतर मिट्ट काळोखात पेटती चूड घेऊन खेकडे पकडण्याचा उद्योग ज्यांनी केला असेल, त्यांच्या लक्षात येईल, मी काय म्हणतोय ते. बाकी सिंहगडावरच्या त्या इंटरेस्टिंग भज्यांची तितकीच इंटरेस्टिंग (आणि आजतागायत एकदाही स्वतःवर वेळ न आल्यानं) करायला अत्यंत सोपी असलेली रेसिपी त्या वेळी मोठ्या उत्साहानं समजावून घेतल्याचं आठवतंय. आता एखादं रेसिपी बुक वगैरे रेफर करायला घेतलं, तर कांदा कसा कापावा इथपासून सुरवात होईल; पण मला विचाराल तर चार-पाच कांदे घ्यावेत, ते मस्त कापावेत, मग तो ऐवज छान सुटा सुटा करून घ्यावा. हे करेपर्यंत कांद्यानं आपला प्रताप दाखवलेला असतो; त्यामुळं आधी कांद्याचे आणि मग तिखटा-मिठाचे हात डोळ्यांना लागणार नाहीत याची काळजी घ्यावी (नाहीतर कांदा कापणाऱ्याचाच ‘खेकडा’ होतो). मग तो छान सुटा केलेला कांदा मीठ-हळद-तिखटात तितक्‍याच छानपणे घोळवावा. एका बाजूला तेल तापायला ठेवावं. पाणी घालायची अजिबात गरज नाही. कारण, मिठामुळम कांदा मस्त झरू लागलेला असतो. आता त्या मिश्रणात पीठ घालावं, चवीला हवा असेल तर ओवा-जिरे, हवी असेल तर कोथिंबीर घालून पुन्हा ते सगळं मिश्रण एकजीव करून... बस्स... यापुढं असं आणखी काही नुसतं लिहीत बसणं केवळ अशक्‍य आहे!!

पावसाळी खाण्याचीही एक टेस्ट डेव्हलप होत जात असते; पण सणासुदीच्या स्वैपाकात जे स्थान गोडाधोडाचं, तेच स्थान पडत्या पावसात खाण्याच्या पदार्थांमध्ये भज्यांचं...आणि सोबत वाफाळता चहा. अव्वल. भज्यांच्या यादीतही खेकडाभजी पहिली, त्यानंतर मग ज्याची ज्याची भजी होणं शक्‍य आहे, अशा कशाचीही भजी किंवा पश्‍चिमेकडं करतात तशी फळांची फ्रिटर्स. निखाऱ्यांवर खरपूस भाजून, तिखट-मीठ-लिंबू (क्वचित चाट मसाला) चोपडलेली मक्‍याची कणसं, आमसुलाचं गरमागरम सार किंवा कोणतंही सूप, भरपूर रस असणाऱ्या गरमागरम नूडल्स, वाफाळते मोमोज्‌, खरपूस भाजलेल्या किंवा मस्तपैकी खारवून उकडलेल्या किंवा उकडून मग मंद आंचेवर परतलेल्या भुईमुगाच्या शेंगा हे या यादीतले बाकीचे मानकरी. आणखी कुणी या यादीत वडा-पाव, सामोसे, कचोऱ्या यांचीसुद्धा भर घालतीलही; पण कांदाभजी, कणसं, वाफाळता चहा आणि उकडलेल्या शेंगा जे नातं पावसाशी सांगतात, ते ही इतर मंडळी सांगू शकतील की नाही, याबाबत माझ्या मनात रास्त शंका आहेत.

खूप दिवस आणखी एक शंका छळत होती. एरवी डाएट, वजन, पोटाचा घेर, शून्य पॉईंट शून्य मिलिमीटरनं बिघडणारी झीरो फिगर असल्या मुद्द्यांवर वेळ-काळ न बघता कालवा करणारी मंडळी पावसाचा सांगावा घेऊन येणाऱ्या मेघदूतांच्या पहिल्या पलटणीसमोर नांगी टाकून भजी वगैरे भाषा बोलायला लागतात; ही केमिस्ट्री काय असावी? धुंद पाऊस, ते हवंहवंसं वाटणारं ओलेतेपण, कुठून तरी अवचित येऊन सुखावणारा मातीचा वास वगैरे ठीक आहे; पण म्हणून एकदम खरपूस तळलेली कांदाभजी आणि वाफाळता चहा? पावसाळी खाण्यावर वाचता-बोलताना याचंही उत्तर मिळालं. ऋतुबदलाबरोबर बदलणाऱ्या गरजांशी जुळवून घेण्याच्या माणसाच्या शरीराच्या प्रयत्नांमध्ये या प्रश्‍नाचं उत्तर सापडतं. उन्हाळ्यात शरीरात पित्त साचलेलं असतं; त्यामुळं वातदोष वाढतो; पावसानं बरोबर आणलेल्या थंडाव्याशी त्या साठलेल्या वाताची जोडी जमली की हा वातदोष उफाळून येतो. आयुर्वेदाच्या निकषांप्रमाणे, वात मुळात शीत असतो; त्यामुळं आपल्या शरीराला स्निग्धतेचं प्रमाण वाढवावंसं वाटतं, मग पोटातून म्हणा किंवा जिथं कुठं तो वातदोष साठलेला असतो, तिथून मेंदूला संदेश जातो ः ‘आता काहीतरी मस्त गरमागरम होऊन जाऊ द्या...’ शरीराची ही मागणी आणि चवीनं खाण्याचा सोस यांत कधीतरी कांदाभजी फिट्ट बसली आणि मग एरवी ‘अबरचबर’ किंवा ‘अरबटचरबट’ या सदरात जमा होणारी भजी पावसाळी खाण्याच्या ‘मस्ट’च्या यादीत जाऊन बसली असावीत.
***

अर्थात भजी आणि वाफाळते पदार्थ म्हणजे पावसाळी खाणं नव्हे. पाऊस सगळ्या सृष्टीसाठी हवाहवासा बदल घेऊन आलेला असतो. पहिल्या पावसाबरोबरच बदलाचा हा सांगावा येतो. संवेदना जाग्या ठेवणाऱ्या मनाला साद घालणाऱ्या ऋतुचक्राचा वेध घेताना दुर्गाबाई भागवत यांनी पावसाचं हे येणं त्यांच्या शब्दांतून जिवंत केलंय. पावसाच्या पहिल्या शिडकाव्याबरोबर उन्हानं खरपूस भाजलेल्या डोंगरउतारांवर, शेताच्या बांधांवर, नद्यांच्या काठांवर, रस्त्याच्या कडेला, पुलांच्या सांध्यांच्या भेगांत, घरांच्या माळवदांवर, इमारतींच्या पॅरापेट वॉलवर आणि आणखी कुठं कुठं बरा-वाईट कस असलेल्या मातीच्या आधारानं पडून राहिलेलं कसलं कसलं बी (जीआरची वाट न पाहता, वेळ पाळली म्हणून होणाऱ्या कौतुकाची अपेक्षा न ठेवता) उगवून येतं. सृजनाची द्वाही फिरवतं. यातल्या अनेक रानभाज्या, त्यांचे कंद, पानं, फुलं, फळं आपल्या परंपरांनी पावसाळी खाद्यसंस्कृतीशी जोडलेली आहेत. पाणथळ जमिनीवर पसरणारा घोळ, फोडशी, शेवळं, करटुलं, चिवलाचे कोंब, केना, कुरडू, भारंगी, आघाडा,  टाकळा, आंबट चुका, तांदुळचा, लाल माठ, चवळी, तेर अळू, चंदनबटवा किंवा चाकवत अशा फक्त पावसाळ्यातच किंवा त्याच्या आसपास मुबलक प्रमाणात येणाऱ्या भाज्यांनी, पावसाळ्यात उगवणाऱ्या अळंब्यांनी, दगडफुलांनी खाद्यसंस्कृतीचा एक कोपरा समृद्ध केला आहे. सेलेब्रिटी शेफ विष्णू मनोहर यांच्या मते, शाक म्हणजे पालेभाज्या हा खाद्यपदार्थांच्या १२ प्रकारांमधला सगळ्यांत महत्त्वाचा प्रकार. कारण, उरलेल्या ११ प्रकारांमधला फल, इक्षू, गोरस, मांस असा कोणताही खाद्यवर्ग घेतला तरी शाकवर्गाच्या वापराशिवाय पदार्थ पूर्णच होत नाही. जीवनसत्त्व आणि खनिजांची रेलचेल असणाऱ्या या पावसाळी भाज्या म्हणजे पावसाळी खाण्याचं अत्यंत महत्त्वाचं अंग. ज्येष्ठी पौर्णिमेच्या वटपूजनापासून ते कार्तिकातल्या त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत सुरू राहणाऱ्या व्रतांच्या आणि सणांच्या मालिकेत यातल्या अनेक भाज्यांना विशेष स्थान दिलं गेलंय. अभ्यासकांना विचाराल तर पावसाळी खाण्यात उपलब्धता आणि ऋतुबदलामुळं निर्माण होणारी शरीराची गरज या दोन्हींची सांगड कशी घातली गेलीय, ते ते विस्तारानं सांगतील. उदाहरणार्थ ः अळू. वनस्पतीशास्त्रज्ञ सांगतात त्यानुसार, अळू म्हणजे अ आणि क जीवनसत्त्व, कॅल्शियम आणि फॉस्फरसचा स्रोत. ही वनस्पती बलवर्धक मानली गेली आहे. एवंगुणविशिष्ट अळू पावसाळ्यात पोटात गेलाच पाहिजे, अशी व्यवस्थाच पारंपरिक व्रतवैकल्यांनी करून ठेवलीय, असं एक निरीक्षण वाचनात आलं. ऋषिपंचमीच्या निमित्तानं होणाऱ्या ऋषीच्या भाजीत तर अळू महत्त्वाचाच. ‘भाज्यांचा लगदा’ अशी संभावना होत असली तरी एकत्रित शिजवलेली जीवनसत्त्वं आणि खनिजं ही या व्रतांशी जोडली गेलेली कल्पनाच आरोग्यदायी आहे. कदाचित आता आहारशास्त्राचा भाग नजरेआड होऊन आपण हे केवळ परंपरेनं करत आलोय म्हणून चातुर्मासात भरायच्या एका रकान्याच्या पातळीवर उतरल्यामुळं ऋषीची भाजी अनेकांच्या ‘नाईलाजानं खायच्या पदार्थां’च्या यादीत पडली असणार; पण उद्या एखादा इनोव्हेटिव बल्लव ‘मिक्‍स सेज्‌ व्हेजिटेबल्स’ अशा नावानं हे ‘ट्रॅडिशनल इंडियन क्‍युझिन विथ मिनरल्स अँड व्हिटॅमिन-रिच व्हरायटीज्‌ ऑफ एंडेमिक सीझनल व्हेजिटेबल्स सर्व्ह्‌ड इन ग्रीन’ पेश करेल, तर ऋषीची पारंपरिक भाजीही ‘ट्रेंडी’ ठरू शकते.

यातल्या बऱ्याचशा भाज्या साठा उत्तराच्या; पण पाचा उत्तरीच सुफळ संपूर्ण (उच्चारी संप्रूण) होणाऱ्या चातुर्मासातल्या पारंपरिक कहाण्यांतून लहानपणीच भेटल्या होत्या. ‘...मग ती घरी गेली. इष्टदेवतेचं स्मरण केलं. केनू-कुरडूची भाजी केली. खीर केली. दारी आलेल्या अतिथीस जेवू घातलं... तिला जशी इष्टदेवता प्रसन्न झाली तशीच तुम्हा-आंम्हास होवो... वगैरे.’
***

पावसाळी खाण्यापिण्याचे नियम तसं पाहिलं तर फार म्हणजे फारच कडक असतात. ‘आला पावसाळा तब्येत सांभाळा’ छापाचं कोणतंही लिखाण काढून पाहा. पावसाळ्याच्या सुरवातीच्या काळात गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा होत असते. शीत वात, शरीराची मागणी वगैरे वाचनात आलं, ते बरोबर आहे का, असं आयुर्वेदाची प्रॅक्‍टिस करणाऱ्या एका मित्राला विचारत होतो. तो म्हणाला ः ‘ते बरोबर आहे; पण भजी जरा जपूनच खावीत. कारण, अति सर्वत्र वर्जयेत! अती होऊ देऊ नये.’ (हे बरोबरच आहे म्हणा. अती झालं की अजीर्ण होणार आणि मग हसूही होणार). पण कांदाभजी, मक्‍याची कणसं, वाफाळत्या नूडल्स यांच्याबरोबरचा रोमान्स मान्य केला, तरी पावसाळ्यातल्या आहाराविषयी सर्वाधिक सूचना मिळतात हे सत्य उरतंच. म्हणजे बघा हं, कडसर, तुरट, आंबट, तिखटाकडं झुकणाऱ्या पदार्थांना हरकत नाही; पण गोडावर भर नको. आहार पचायला हलका असावा. उदाहरणार्थ ः मसुरासारखी काही कडधान्यं (आख्खा मसूरप्रेमींनी लक्ष द्यावं का, ते तपासायला लागेल), आहार पित्तवर्धक नसावा; स्निग्ध पदार्थ आहारात असावेत इत्यादी... खनिजसंपन्न पावसाळी भाज्यांचं महत्त्व असलं, तरी ‘पालेभाज्या फार खाऊ नयेत,’ असाही सल्ला मिळतो. त्याऐवजी दुधी भोपळा, कारली, भेंडी, दोडका, तोंडलीही चालतील. तळकट पदार्थ पित्तकारक असतात आणि या दिवसांत पचनक्रियाही मंद असते म्हणून तळलेले पदार्थ खाऊ नयेत. (ओएमजी ः पण आपापला मॉन्सून रोमान्स बॅरोमीटर तपासून कांदाभज्यांची मात्रा ठरवायला हरकत नसावी. वि. सू. ः आपापल्या जबाबदारीवर) ज्वारीची भाकरी, मुगाचं वरण, मध, दह्याऐवजी ताक असावं, सफरचंद, पीचसारखी फळं खावीत, पचायला जड, शिळे, थंड पदार्थ टाळावेत. यादी मोठी आहे. तुम्ही कितीही ‘अबरचबर’प्रेमी असलात तरी पावसाळ्यात खाण्या-पिण्याबद्दल खूप काळजी घ्यावी लागते, हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे आणि माझ्या मित्रानं दिलेला ‘अति सर्वत्र वर्ज्ययेत’ हा सल्लाही महत्त्वाचाच!

पाऊस येतो आहे. हवामान विभाग त्यावर लक्ष ठेवून आहेच. आता ते कमी दाबाचे पट्टेबिट्टे तयार झाले की पाऊस मस्त कोसळायला लागेल. जिवंतपणाचा इंडिकेटर असणारे कांदाभज्यांचे, भटकंतीचे बेत होतील. अनेक आठवणी जाग्या होतील. पुनःप्रत्ययाचा आनंद मिळेल. पडणारा प्रत्येक पाऊस धूळ धुऊन काढेल.

गर्द ओलं रान असावं... थंडी अंगाशी लगट करत असावी... हातात वाफाळत्या कॉफीचा कप असावा...आणि कॉफीचा सुगंध भरून घेताना, काचेपलीकडेचा पाऊस मनात भिनवून घ्यावा...बघा तर अनुभव घेऊन...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.