मी डोलकर दर्याचा राजा...

महाराष्ट्राच्या लोकसंगीतात कोळीगीतांचा गोडवा आपण मोठ्या प्रमाणात अनुभवतो.
marathi singer
marathi singersakal
Updated on

महाराष्ट्राच्या लोकसंगीतात कोळीगीतांचा गोडवा आपण मोठ्या प्रमाणात अनुभवतो. कोकणचा निसर्गरम्य सागरकिनारा... समुद्रावरून सतत वाहणारा सुखद वारा... कधी सागरावर उठलेलं तुफान... नारळी-पोफळीची झाडं... होड्या नांगरून किंवा वल्हवत पाणी कापत जाणारे नाखवा... दर्यावर्दी मच्छीमार... पुरुषांच्या डोईवरची विशिष्ट टोपी आणि गुडघ्यापर्यंतचा लुंगीसदृश धोतरासारखा पोशाख...

महिलांच्या नाकात नथ आणि गुडघ्यापर्यंतच्या त्यांच्या नऊवारी साड्या... साधा-भोळा कोकणी माणूस... त्याची ती हेल काढून बोलली जाणारी कोकणी भाषा... असं काहीसं चित्र आपल्या डोळ्यासमोर या कोळीगीतांतून उभं राहतं.

प्रस्तुत कोळीगीत हे असंच एका विवाहित सुखी मच्छीमार दाम्पत्याचं प्रणयगीत आहे.

वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा

गाण्याच्या सुरुवातीला कोरसच्या तोंडी असलेल्या या पंक्तीमधला ‘रामा’ हा उल्लेख देवाला उद्देशून नाही, तर कोकणातल्या कोळी, आगरी अशा बहुजन समाजात सामान्यत: रामा, बबल्या, बाल्या अशी नावं असतात. मुंबईत पूर्वी रामा गडी असायचे. ते कोकणातलेच असायचे. दर्यात जाणाऱ्या प्रत्येक होडीत एखादा तरी रामा हटकून असतोच. साहजिकच हा उल्लेख त्याला उद्देशून आहे.

मी डोलकर डोलकर डोलकर दर्याचा राजा

घर पान्यावरी बंदराला करतो ये-जा

गलबताला शीड बांधायला जी एक मुख्य काठी असते ती डोलकाठी. तिच्यामुळं वाऱ्याचा झोत शिडात भरायला मदत होते. या डोलकाठीचं सततचं सान्निध्य असल्यानं तो मच्छीमार तरुण स्वत:ला ‘डोलकर’ म्हणवून घेतोय. हा डोलकर आपल्या गलबतातून सतत सागराच्या पाण्यात तरंगत असतो. दर्याचा राजाच तो. जणू काही पाण्यावरच त्याचं घर आहे आणि तो जमिनीकडे फक्त जा-ये करत असतो. असं अभिमानानं सांगत असतानाच त्याची राणी स्वत:चे गुण गाऊ लागते.

आय-बापाची लाराची लेक...मी लारी

चोली पिवली गो...नेसलंय अंजीरी सारी

माझ्या केसानं गो मालीला फुलैला चाफा

वास परमालता वाऱ्यानं घेतंय झेपा

नथ नाकानं साजीरवानी

गला भरून सोन्याचे मनी

कोलीवाऱ्याची मी गो रानी

रात पुनवेला नाचुन करतंय मौजा

माझ्या आई-बापांची मी लाडकी कन्या. पिवळी चोळी आणि अंजिरी साडी नेसून, केसांमध्ये फुललेला चाफा माळून, नाकात साजरी नथ आणि गळाभरून सोन्याचे मणी लेऊन मी जणू कोळीवाड्याची राणी शोभते आहे. असं तिनं स्वत:चं वर्णन तर छानच केलंय. शेवटी ती सांगते पौर्णिमेच्या रात्रीला नाच करून मी मौज करते.

या गो दर्याचा दर्याचा दर्याचा दरारा मोठा

कवा पान्यावरी उत्तान डोंगरलाटा लाटा लाटा लाटा

कवा उदान वारा शिराला येतंय फारू

कवा पान्यासुनी आभाला भिडतंय तारू

वाट बघुन झुरते पिरती

मंग दर्याला येतंय भरती

जाते पान्यानं भिजून धरती

येतंय भेटाया तसाच तसाच भरतार माजा

फक्त स्वत:चं वर्णन करून न थांबता आपला घरधनी कशा बिकट परिस्थितीला तोंड देत असतो हेही तिला ठाऊक आहे...अशा वेळी जिवाची घालमेल होत असते...उधाण आलेला वारा कधी होडीचं शीड फाडतो, तर कधी डोंगरांसारख्या उत्तान लाटांवर ते तारू उंच उचललं जाऊन जसं काही आभाळाला भिडत असतं...दर्याला भरती येते. अशा वेळी माझी प्रीती झुरत झुरत त्याची वाट पाहते.

तशातही माझा नवरा डोंगरलाटांना अन् वादळवाऱ्याला तोंड देऊन मला भेटायला परत येतोच, असं सांगत असताना तिचा सूर काळजीचा असला तरी त्याला अभिमानाचीही झालर आहे...अशी अभिमानयुक्त चिंता वर्णन करतानाच कवयित्री-गीतकार शान्ता ज. शेळके यांनी आभाळ आणि धरती यांच्या काव्यमय प्रेमाचं रूपक वापरलं आहे.

जमिनीला भेटून आलिंगन देण्याची अनिवार इच्छा जेव्हा आभाळाला होते तेव्हा धसमुसळेपणा करत वाऱ्या-वादळासह आभाळ जमिनीकडं झेपावू लागतं. त्याला आलिंगन द्यायला आसुसलेली धरतीसुद्धा सागरी लाटांना उंच उसळवून आभाळाला खाली आणू पाहते. मग आभाळ मुक्त होऊन धरतीवर धो धो बरसात करतं आणि ते बरसणारं आभाळ धरतीला कडकडून भेटून शांत होतं.

तशीच तीही पाण्यानं भिजून तृप्त होते. ती सांगते की, त्या आभाळासारख्याच आवेगानं माझा भ्रतार मला भेटतो

वाट बघुन झुरते पिरती

मंग दर्याला येतंय भरती

जाते पान्यान् भिजून धरती

येतंय भेटाया तसाच भरतार माझा

असं अतिशय रोमॅंटिक वर्णन या प्रणयगीतात आहे.

भल्या सकालला आभाल झुकतं हे खाली

सोनं चमचमतंय...दर्याला चढते लाली

आमी पान्यामंदी रापन टाकतो जाली

धन दर्याचं लुटून भरतो डाली

रात पुनवेचं चांदनं प्याली

जशी चांदीची मासोली झाली

माज्या जाल्यात होऊन आली ऽ ऽ ऽ ऽ

नेतो बाजारा भरून म्हवरा ताजा

दिवस उजाडताना आकाशच खाली उतरतं. आभाळाची लाली पाण्यावर पसरून सोन्यासारखी चमचमते तेव्हा आम्ही राबायला सुरुवात करतो आणि पाण्यात जाळं टाकून रात्रीपर्यंत राबतो. असं निसर्गाचं वर्णन करत तो आपली कामगिरी अभिमानानं सांगतो.

स्वत:च्याच गुणांचं वर्णन करत, आपल्या नवऱ्याची आणि आपली प्रीती ही आभाळ-धरतीच्या प्रीतीसारखी आहे, असं सांगत नवऱ्याच्या कर्तबगारीचा अभिमान मिरवणाऱ्या एका कोळी बाईच्या भावना शब्दबद्धा करताना शान्ता शेळके यांनी फार रोमॅंटिक गीतरचना केली आहे. मच्छीमार पुरुषानं केलेलं वर्णनही तितकंच रोमॅंटिक. पौर्णिमेच्या चांदण्यात चमचमणाऱ्या पाण्याला चांदीच्या चमकत्या मासळीची उपमा देत ‘रात पुनवेचं चांदनं प्याली, जशी चांदीची मासोली झाली’ अशी सुंदर रचना त्यांनी केली आहे.

नाखवा (होडी वल्हवणारा), डोलकर, दर्या (समुद्र), तारू (होडी), डोंगरलाटा, मासोली (मासळी), डाली (टोपली) , म्हावरा (मच्छी) असे मराठीत अस्तित्वात असलेले; पण कोकणच्या किनारपट्टीवर जास्त प्रचलित असलेले शब्द वापरल्यानं या कोळीगीताला अस्सलपणा आला आहे.

मराठी भाषेतल्या शब्दांच्या कोकणी उच्चारणाचं सौंदर्य प्रत्येक ओळीतून ठायी ठायी जाणवतं. ‘लाडाची’ लेक याचा उच्चार ‘लाराची’, ‘लाडी’चा उच्चार ‘लारी’, ‘चोळी पिवळी’ऐवजी ‘चोली पिवली’. ‘केसांत’ ऐवजी ‘केसानं’ हा कोकणी शब्द. ‘माळला’चा उच्चार ‘मालीला’... असे मजेदार उच्चार ऐकताना कान तृप्त होतात.

मराठी व कोकणी या भाषांच्या समन्वयातून शान्ता शेळके यांनी अप्रतिम प्रणयगीताची रचना केली आहे. हे गीत म्हणजे उत्स्फूर्तपणे सुचलेली कविता नाही. मच्छीमार महिलांची आणि पुरुषांची मानसिकता, कोळ्यांचं समाजजीवन, कोकणाचा भूगोल आदी गोष्टींचं नीट निरीक्षण करून आणि काही दिवस अभ्यास करून हे गीत लिहिलं गेलं आहे.

गाण्याच्या संगीताला एक लय आहे. ‘वल्हव रे नाखवा...’ या पंक्ती कोरसच्या माध्यमातून येतात. कारण, होडीतले सगळेजण ‘नाखवा’ला आवाहन करत आहेत. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी शान्ता शेळके यांच्या अनेक गाण्यांना संगीत दिलं आहे. त्यांत सर्वात जास्त गाजली ती ही कोळीगीतं.

पश्चिम बंगालमध्ये पालखी उचलणारे ‘कहार’ ती पालखी खांद्यावर वाहून नेताना स्वत:च्या मनोरंजनासाठी एका विशिष्ट लयीत गीत गात गात चालतात. हे हृदयनाथ यांनी पाहिलं होतं, ऐकलं होतं. आपणही अशाच लयीतलं कोळीगीत संगीतबद्ध करावं असा विचार करून त्यांनी शान्ता शेळके यांना कोळीजीवनावर गीत लिहायला सांगितलं.

शान्ता शेळके यांचा कोळीजीवनाचा अजिबात अभ्यास नव्हता; पण काही दिवसांच्या अभ्यासाअंती त्यांनी कोकण आणि कोळी या विषयांना अगदी शोभतील अशी काही गाणी लिहिली. ‘मी डोलकर दर्याचा राजा’, ‘राजा सारंगा, माझ्या सारंगा, डोलकरा रं...’, ‘वादल वारं सुटलं गं, वाऱ्यानं तुफान उठलं गं’ ही ती गाणी होत. तिन्ही गाणी अतिशय गाजली, त्यातही ‘मी डोलकर...’ची लोकप्रियता प्रचंड होती.

या कोळीगीताचं हृदयनाथ यांनी सोनं केलं आहे. ‘वल्हव रे नाखवा’ या पंक्ती ऐकताना आपणही होडीत बसलो आहोत आणि हलक्याशा लाटांवर झुलत वर-खाली होत आहोत असा फील येतो इतकी लयबद्धता त्यांनी साधली आहे. पहिल्या कडव्याला आनंदून जात दिलं गेलेलं संगीत आहे, तर दुसऱ्या कडव्यातल्या संगीतात उधाणलेल्या समुद्राची रौद्रता स्पष्ट जाणवते. प्रसंगानुसार बदललेली संगीतरचना विस्मयकारक आहे.

इंटरल्यूडला वाजणारी विविध वाद्येसुद्धा तसाच परिणाम साधतात. गायकांची योग्य अशी निवड हे आणखी एक वैशिष्ट्य. हेमंतकुमार यांच्यासारख्या बंगाली गायकानं आपल्या भारदस्त व घनगंभीर स्वरानं हे गाणं सजवलं आहे. बंगाली लोकसंगीताची चांगली जाण आणि गाण्यात ‘ळ’ हे मराठी मुळाक्षर नसल्यानं त्यांना गाणं काहीसं सोपं गेलं. लता मंगेशकर यांनी अर्थातच कमाल केली आहे. वेळोवेळी त्यांनी घेतलेल्या ताना आणि शब्दांचे केलेले कोकणी उच्चार यांची रंगत काही औरच आहे.

महाराष्ट्रात लोकसंगीतातून अनेक छान छान कोळीगीतं आपण रेडिओवरून ऐकत आलो आहोत. सन १९६९ मध्ये प्रथम रेडिओवर प्रसारित झालेलं आणि पुढली काही वर्षं सतत धुमाकूळ घालणारं हे गाणं कोळीगीतातलं ‘सरताज’ गीत आहे.

हे सिनेगीत नाही.

(लेखक हे हिंदी सिनेगीतांचे अभ्यासक-समीक्षक, तसंच ‘गाने अपने अपने’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. ‘गुनगुना रहे है भँवरे’ हे याच विषयावरचं पुस्तक त्यांच्या नावावर आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.