‘पंजाब गेला’ हिच भावना कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि कॉंग्रेसच्या हितचिंतकांमध्ये सध्या आहे आणि नव्या निर्णयाने ती बदलणार नाही. कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदी नेमून त्यांच्या हाताखाली चार कार्यकारी अध्यक्षांची टीम दिली आहे. या पाचजणांपैकी कोणीही मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्या गटातील नाही. कॉंग्रेसचा १३६ वर्षांचा इतिहास लक्षात घेतला तर झालेला निर्णय अत्यंत चुकीचा आणि वाईट असा आहे. लोकसभेच्या दोन निवडणुका आणि अनेक राज्यांतील पक्षाचे नुकसान लक्षात घेऊन हा जो निर्णय झाला तो दुर्दैवी आहे. सोनिया गांधी यांनी पक्षातील असंतुष्ट गट ज्याला ‘ग्रुप-२३’ म्हणून ओळखले जाते, त्यांच्याशी जुळवून घेतले आहे. मात्र हाच सामंजस्याचा भाग त्यांनी पंजाबचे लोकप्रिय मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांच्याबाबत न ठेवता त्यांना मात्र अपमानीत केले आहे. पुढील वर्षी पंजाबात राज्य विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर नवज्योतसिंग सिद्धू यांच्याबद्दलचा निर्णय घेऊन सोनिया गांधींनी देशभरातील कॉंग्रेसजनांना नकारात्मक संदेश दिला आहे. हा निर्णय सामूहिक असल्याने सांगितले जाते, मात्र हा निर्णय फक्त तिघांनी घेतला आहे.
कॉंग्रेसच्या बाबतीत सांगायचे झाले तर गांधी कुटुंबातील सोनिया, राहुल आणि प्रियांका यांनी हा निर्णय घेताना अमरिंदरसिंग यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. अमरिंदरसिंग यांना भेटीसाठी वेळही न देणाऱ्या कॉंग्रेस नेतृत्वानं सिद्धू यांच्या पडद्यावरच्या ताकदीकडे लक्ष दिलंय. सिद्धू यांच्या बरोबरच्या चर्चा या पक्षवाढीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या नाहीत. राहुल आणि प्रियंका ही पक्षात नव्याने दोन शक्तिकेंद्रे तयार झाली आहेत. मात्र या शक्तिकेंद्रांमुळे पक्षाच्या हिताचे निर्णय होण्याऐवजी पक्षाची हानी होईल असेच निर्णय होतात. एकतर सध्या पक्षात निर्णय उशिरा घेतले जातात. त्याचबरोबर जिथे कठोर निर्णय घेण्याची गरज आहे तिथं ते कठोर नसतात. पक्षाच्या प्रतिमेला हानी पोचेल असेच निर्णय होतात. यामुळे अनेक जणांनी पक्ष सोडणे पसंत केले आहे. भविष्यात आणखी काही लोक पक्ष सोडतील अशी शक्यता आहे.
कॉंग्रेस पक्षनेतृत्वानं अमरिंदरसिंग यांच्या वयाचं कारण देत त्यांचे उत्तराधिकारी म्हणून नवज्योतसिंग सिद्धू यांची निवड केली आहे. पण याबाबतीत पक्षनेतृत्वाने परिपक्वता दाखविलेली नाही. नवज्योतसिंग सिद्धू हे काही कसलेले राजकारणी नाहीत. ते जेव्हा खेळाडू होते तेव्हा त्यांनी कर्णधाराबरोबर भांडण केलं. भारतीय जनता पक्षात जेव्हा ते कार्यरत होते तेव्हा त्यांचे भाजपचा मित्रपक्ष अकाली दल, त्यातल्या नेत्यांशी पटले नाही. ‘आप’मध्ये प्रवेश करण्याची धमकी देऊन त्यांनी कॉंग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी मिळविली. पंजाबमध्ये इतका अविश्वसनीय पण अत्यंत महत्त्वाकांक्षी असा माणूस मिळणं अवघड आहे. सिद्धू यांच्याकडं अनुभवाची कमतरता आहे, पदाचा किंवा प्रशासकीय अनुभवाच्या कसोटीवर ते उतरत नाहीत. एखादे पक्षातील एखाद्या भांडणात निवाडा करण्याचे काम किंवा पक्षातील सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जायची त्यांची क्षमता आजपर्यंत दिसलेली नाही. त्यांची पडद्यावरची प्रतिमा पाहून राहुल आणि प्रियांका यांनी त्यांची निवड केली असेल; पण पक्षाला ते विजय मिळवून देऊ शकतील की नाही याबद्दल शंका आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा पराभव होण्याचीच शक्यता आहे.
सिद्धू यांनी माफी मागावी, अशी अमरिंदरसिंग यांनी मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष करणे हे चुकीचे पाऊल आहे. पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदी एखादी हिंदू व्यक्ती असावी असा आग्रह अमरिंदरसिंग यांनी धरला होता. मात्र राहुल गांधी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. भाजपकडून सिद्धू यांच्याविरोधात आक्रमक मोहीम चालविली जाईल यात शंका नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भेट घेतली होती. त्या वेळी भाजपवर टीका झाली होती; पण त्यानंतर पठाणकोट आणि उरी हल्ला झाला. त्यामुळे आता भाजपवर त्या संदर्भात टीका होण्याची शक्यता कमी आहे; पण सिद्धू यांनी घेतलेली इम्रान खान यांची भेट भाजपकडून टीकेचा मुद्दा ठरू शकते. त्याचबरोबर पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना मारलेली मिठी हे प्रकरणदेखील भाजपकडून प्रचारात आणले जाऊ शकते. पाकिस्तानमध्ये ज्याप्रमाणे क्रिकेटर इम्रान खान राजकारणातील धूमकेतू ठरला तसेच सिद्धूचे होऊ शकते. दोघांकडेही राजकीय पार्श्वभूमीचा अभाव आहे. इम्रान खान यांना किमान पाकिस्तानी लष्कराचा पाठिंबा आहे. सिद्धूच्या बाबतीत असा कुठलाच जमेचा मुद्दा नाही.
पंजाबमध्ये आजपर्यंत अकाली दल आणि कॉंग्रेस आणि काही प्रमाणात भाजप या तीन पक्षांचेच वर्चस्व होते. एक वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीत तिरंगी लढती नक्की नसतील. शेतकरी आंदोलनावरून अकाली आणि भाजप यांची युती संपुष्टात आली आहे. ही युती संपुष्टात आल्याने खरे तर पंजाबात कॉंग्रेसला चांगली संधी होती; पण सध्याची स्थिती लक्षात घेतली तर अकाली दल, भाजप, कॉंग्रेस या तीन पक्षांव्यतिरिक्त तिथल्या राजकारणात आप आणि बसपा यांचाही प्रवेश झाला आहे. पाच नद्यांच्या या प्रदेशातील राजकीय लढाई आता पंचरंगी झाली आहे. अमरिंदरसिंग यांना नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी समेट करावा लागला आहे. पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वानं नवज्योतसिंग सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष करून त्यांच्या महत्त्वाकांक्षेला बळ दिले आहे. अमरिंदरसिंग यांना तात्पुरती माघार घ्यावी लागली असली तरी ते पंजाब कॉंग्रेसच्या हिताचे नक्कीच नाही. सिद्धू यांची निवड झाली असली तरी पंजाबमध्ये पराभवच पत्करावा लागेल अशी कॉंग्रेसजनांना भिती आहेच.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.