सिंहासनावरची ७० वर्ष!

लिंकटेस्टिनचे जॉन द्वितीय आणि थायलंडचे भूमिबोल अदलयादेज यांच्यानंतर ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर ७० वर्षे पूर्ण करणाऱ्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय पहिल्या महाराणी ठरणार आहेत.
Queen elizabeth alexandra mary windsor
Queen elizabeth alexandra mary windsorsakal
Updated on
Summary

लिंकटेस्टिनचे जॉन द्वितीय आणि थायलंडचे भूमिबोल अदलयादेज यांच्यानंतर ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर ७० वर्षे पूर्ण करणाऱ्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय पहिल्या महाराणी ठरणार आहेत.

- मालिनी नायर

लिंकटेस्टिनचे जॉन द्वितीय आणि थायलंडचे भूमिबोल अदलयादेज यांच्यानंतर ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर ७० वर्षे पूर्ण करणाऱ्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय पहिल्या महाराणी ठरणार आहेत. इंग्लंड आणि राष्ट्रकुलच्या महाराणी म्हणून एलिझाबेथ द्वितीय या आठवड्यात राज्याभिषेकाची प्लॅटिनम ज्युबिली साजरी करत आहेत. या उत्सवासाठी संपूर्ण युनायटेड किंग्डम सज्ज झाले आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या सात दशकांच्या कारकिर्दीबद्दल...

एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी विंडसर असे पूर्ण नाव असलेल्या महाराणी एलिझाबेथ यांचा जन्म २१ एप्रिल १९२६ रोजी झाला होता. त्यांचे पालक जॉर्ज सहावे आणि एलिझाबेथ पुढे ब्रिटनचे राजा आणि राणी झाले होते. अगदी सुरुवातीच्या काळात एलिझाबेथ यांचे व्यक्तिमत्त्व असे होते की, त्यामुळे राजेशाहीची व्याख्या नव्याने मांडावी लागेल. राजघराण्यातील व्यक्ती असूनही त्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्या सर्वसामान्यांशी कशा जोडल्या गेल्या आणि ब्रिटनमधील आतापर्यंतच्या एकूण राजांपैकी त्या लोकप्रिय कशा झाल्या, त्यांना जोडण्यास कशी मदत झाली आणि ब्रिटनमधील सर्व राजांपैकी त्या लोकप्रिय कशा झाल्या, या सर्व गोष्टी फार रंजक आहेत. दुसऱ्या महायुद्धादरम्यान एलिझाबेथ द्वितीय २० वर्षांच्या होत्या. ब्रिटिश सैन्यामध्ये भरती होऊन सेवा करायला हवी, असा त्यांनी पालकांकडे आग्रह धरला. थोडी लाडीगोडी लावल्यानंतर तत्कालीन राजा-राणींनी त्यांना ब्रिटिश सैन्यातील महिला शाखा असलेल्या सहाय्यक प्रादेशिक सेवेत (एटीएस) रुजू होण्याची परवानगी दिली.

एलिझाबेथ द्वितीय यांनी सुरुवातीला सबलर्टन या कनिष्ठ पदावर काम करण्यास सुरुवात केली. नंतर त्यांना कनिष्ठ कमांडर म्हणून बढती मिळाली. दरम्यानच्या काळात त्यांनी ऑटो मॅकेनिकचे प्रशिक्षण घेतले आणि एटीएसमध्ये काम करताना लष्कराच्या ट्रकचे सारथ्यही केले. किंबहुना ब्रिटिश सशस्त्र दलात आणि सामान्य नागरिकांमध्ये सक्रिय कर्तव्य बजावणाऱ्या राजघराण्यातील पहिल्या महिला होत्या. एवढ्या लहान वयात देशासाठी उभे राहण्याची त्यांची तत्परता सर्वांनाच आवडली.

१९४७ साली ग्रीस आणि डेन्मार्कचे राजपुत्र आणि त्यांचेच चुलत भाऊ असलेल्या फिलीप माऊंटबॅटन यांच्याशी त्यांचा विवाह झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा विवाहसोहळा अत्यंत साधेपणाने पार पडला होता. एलिझाबेथ यांना त्यांच्या लग्नाचा गाऊन खरेदी करण्यासाठी राशनचे कूपन साठवून ठेवावे लागले होते. फिलिप यांच्याशी झालेला विवाह हा त्यांच्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरला. अगदी फिलिप यांच्या निधनापर्यंत सत्तर वर्षांहून अधिक काळ त्यांचा सुखी संसार टिकून राहिला.

एलिझाबेथ यांच्या वडिलांच्या निधनानंतर आणि काकांनी सिंहासनाचा त्याग केल्याने एलिझाबेथ यांना महाराणी घोषित करण्यात आले. त्यावेळी त्‍यांचे वय होते अवघे २६ वर्षे. १९५३ साली वयाच्या २७ व्या वर्षी त्यांचा राज्याभिषेक झाला. हा संपूर्ण सोहळा बीबीसीवर प्रसारित करण्यात आला होता. महाराणी एलिझाबेथ यांचा राज्याभिषेक सोहळा जवळपास २७ लाख ब्रिटिश नागरिकांनी पाहिला, तर ११ लाख नागरिकांनी बीबीसी रेडिओवर त्याचे धावते समालोचन ऐकले. एवढंच नव्हे, तर बंकिमहॅम पॅलेसबाहेर राज्याभिषेक सोहळ्याचा उत्सव साजरा करण्यासाठी जवळपास तीन लाख नागरिक जमले होते. एलिझाबेथ द्वितीय महाराणी झाल्यापासून राजघराण्याचा हा नवा काळ सुरू झाला होता. १९६९ मध्ये राजघराण्यावर आधारित असलेला ‘राजेशाही कुटुंब’ हा १०५ मिनिटांचा माहितीपट संपूर्ण यूकेमध्ये प्रसारित करण्यात आला. या माध्यमातून राजघराण्यातील प्रत्येक व्यक्तिमत्त्वाची झलक सर्वसामान्यांना दाखवण्यात आली. हा माहितीपट जवळपास ३० लाख प्रेक्षकांनी पाहिल्याचे सांगितले जाते. आतापर्यंत केवळ खासगीपण जपलेलं राजघराणे राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यापासून जणू एक सार्वजनिक कुटुंब बनले.

पूर्वी राजघराण्यातील सदस्य सर्वसामान्य नागरिकांपासून ठराविक अंतर राखत असत. त्यांच्यात कधी मिसळतही नव्हते; मात्र महाराणी एलिझाबेथ त्याला अपवाद ठरल्या. रस्त्याने पायी फिरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना अभिवादन करणाऱ्या त्या पहिल्या महाराणी ठरल्या. १९७० साली त्यांनी न्यूझीलंडला भेट दिली, तेव्हा त्यांनी जनसमुदायाला अभिवादन करण्यासाठी पायी चालण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट आता फार साधी वाटत असली, तरी त्यावेळी ती एक ऐतिहासिक घटना होती. नवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही महाराणी एलिझाबेथ मागे राहिल्या नाहीत. १९७६ साली यूकेतील मालव्हर्न येथे रॉयल सिग्नल आणि रडारची स्थापना करण्यात आली, त्यावेळी झालेल्या नेटवर्क तंत्रज्ञान प्रात्यक्षिकात सहभाग घेतला. तेव्हा ई-मेल वापरणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रप्रमुख ठरल्या.

महाराणी एलिझाबेथ यांच्या कारकीर्दीत विविध वसाहतींवरील ब्रिटिशांची पकडही सैल झाली होती. एलिझाबेथ यांची कारकीर्द सुरू होण्यापूर्वी जगभरात ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली ७० देश होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात यापैकी अनेक वसाहतींनी स्वायत्ततेची मागणी केली होती. १९५३ साली एलिझाबेथ यांनी जगभरातील वसाहतींवरील ब्रिटिशांचा कमी होत चाललेला प्रभाव मान्य केला आणि या वसाहतींचे स्वातंत्र्य स्वीकारले. परस्पर आदराचा पुरस्कार करत समान भागीदारीच्या युगाची सुरुवात केली. १९६० च्या दशकात आफ्रिका आणि आशियामधील वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणात विद्रोह झाला. भारताला १९४७ साली ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले होते. मलेशिया आणि केनियासुद्धा नंतर स्वतंत्र झाले; परंतु स्वातंत्र्यासाठी झालेल्या सर्व चळवळी शांततेत झालेल्या नव्हत्या. उत्तर आयर्लंडने १९६८ ते १९९८ या तीस वर्षांत राजेशाही विरुद्ध फुटीरतावादी असा इतिहासातील सर्वात रक्तरंजित संघर्ष पाहिला. महाराणींना आयरिश रिपब्लिकन आर्मीच्या बंडखोरांमुळे त्यांच्या चुलत भावाला गमावावे लागले; परंतु १९९८ नंतर गुड फ्रायडे करारानंतर राणींनी संघर्ष सोडून शांततेचा मार्ग स्वीकारण्याचा हेतू व्यक्त केला. ३० वर्षांच्या संघर्षात अतोनात रक्त सांडल्याबद्दल राणींनी माफी मागितली आणि आयरिश नेते मार्टिन मॅकगिनीस यांच्याशी हस्तांदोलन केले. तेव्हा त्यांचा हा हेतू आणखी दृढ होताना दिसला. याशिवाय नेल्सन मंडेला यांच्याशी असलेली त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे. नेल्सन मंडेला यांच्यासोबतचे त्यांचे नृत्य जगप्रसिद्ध झाले होते. ही नव्या युगाची, परस्पर आदराची, समानतेची भागीदारी सुरू झाल्याची नांदी होती.

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची कारकीर्द अतिशय सकारात्मक आणि चांगल्या घडामोडींची होती असे नाही. त्यांना अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. यूकेमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात शंभरहून अधिक नागरिक ठार झाले, तेव्हा कोळसा खाणीला भेट देण्यास त्यांना उशीर झाल्याने त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. त्या अविवेकी असल्याबद्दल माध्यमांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर त्यांच्या मुलांसोबतचे वाद, मुलांचे प्रेमसंबंध आणि वैवाहिक विसंवादाच्या घटना घडल्या. त्यांची मुलगी राजकुमारी मार्गारेट हिचे तिच्यापेक्षा १७ वर्षे लहान असलेल्या पुरुषासोबत विवाहबाह्य संबंध होते. मार्गारेट यांचा पती बायकांना फसवणारा व्यक्ती म्हणून कुप्रसिद्ध होता. त्यामुळे मार्गारेट यांच्या आयुष्यात अनेक अडचणी होत्या; परंतु नागरिकांनी केवळ मार्गारेट यांच्या अविवेकीपणाचा निषेध केला.

मार्गारेट यांचे विवाहबाह्य संबंध आणि त्यानंतरच्या घटस्फोटासाठी नागरिकांनी महाराणी एलिझाबेथ यांच्यावर जोरदार टीका केली. पुढे १९९२ मध्ये राजपुत्र चार्ल्स आणि डायना यांच्या वैवाहिक जीवनातील वाद माध्यमांमध्ये उघड झाले. त्यांचे विवाहबाह्य संबंध आणि १९९६ मध्ये झालेला घटस्फोट जगभरात चर्चेचा विषय ठरला. यापूर्वी राजघराण्यामध्ये घटस्फोट होणे निषिद्ध मानले जायचे; परंतु महाराणी एलिझाबेथ यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. राजपुत्र चार्ल्स आणि डायना यांचा विवाह अपयशी ठरल्याने त्यांना घटस्फोट घेण्याचा एलिझाबेथ यांनी सल्ला दिला. ही घटना अनपेक्षित घटनांचे वळण घेणारी ठरली. हा कालावधी महाराणीच्या आयुष्यातील सर्वाधिक वाईट कालावधी असल्याचे स्वतः महाराणीसह राजघराण्यातील अनेकांनी मान्य केले. १९९७ मध्ये लेडी डायना यांचा कार अपघातात मृत्यू झाला. तेव्हापासून काही गोष्टी आणखी वाईट होत गेल्या. संपूर्ण राजघराण्यावर डायना यांच्या हत्येचा आरोप करण्यात आला. हा आरोप कधी सिद्ध झाला नसला, तरी बंकिमहॅम पॅलेसच्या प्रतिमेवर त्यामुळे मोठा डाग लागला. या सर्व प्रकारांतून सावरण्यासाठी राजघराण्याला बराच वेळ लागला.

राजघराण्याशी संबंधित आणखी एक वाद म्हणजे राजकुमार अँड्र्यू यांचे एका अल्पवयीन मुलीशी असलेले लैंगिक संबंध. जेफ्री एपिस्टाइन प्रकरणातून हे संबंध उघडकीस झाले होते. सर्वप्रथम राणींनी राजकुमार अँड्र्यू यांचे विशेषाधिकार आणि त्यांच्या सर्व लष्करी मानद पदव्या रद्द केल्या आणि त्यांना राजघराण्याच्या सर्व व्यवसायातून काढून टाकले; परंतु या कारवाईला खूप उशीर झाला होता. अँड्र्यूंना त्याच्या गुन्ह्यासाठी इतके दिवस संरक्षण दिल्याबद्दल जनता त्यांना कधीच माफ करू शकली नाही. त्यानंतर डायना आणि राजकुमार चार्ल्स यांचा धाकटा पुत्र राजकुमार हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मर्केल यांना त्यांचे जीवन स्वतंत्रपणे जगण्यासाठी राजघराण्यातील कर्तव्यातून मुक्त करण्यात आले. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी केवळ त्यांच्या निर्णयाला सहमतीच दर्शवली नाही तर निर्णयाचे जाहीर समर्थन केले.

महाराणी एलिझाबेथ यांनी कोविड महामारीशी संबंधित संकट आणि ब्रेक्झिटवर वर्षानुवर्षे सुरू असलेले नाट्यही पाहिले. त्यावेळी कौतुक आणि टीकेची पर्वा न करता त्या मार्गक्रमण करत राहिल्या आहेत. एवढेच नव्हे, तर महाराणींनी राजकुमार चार्ल्स यांच्या दुसऱ्या पत्नी कमिला यांना उत्तराधिकारी म्हणून स्वीकारले. कॅमिला यांना राणीच्या पदासाठी मान्यताही दिली. राजकुमार चार्ल्स राजा झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला मिळालेली ही पदवी आहे. या सर्व घटनांमधून महाराणी एलिझाबेथ किती पुरोगामी आहेत, हे अधोरेखित होते.

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी लिंडन बी जॉन्सन वगळता अमेरिकेचे १३ अध्यक्ष, तसेच विस्टर्न चर्चिल यांच्यापासून आतापर्यंत यूकेचे १४ पंतप्रधान पाहिले आहेत. त्यांनी राजघराणे, देश आणि जग अनेक बदलांमधून जाताना पाहिले आहे, तसेच ते सर्व बदल त्यांनी स्वीकारलेही. २००२ मध्ये सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या सोहळ्यात त्यांनी संसदेला संबोधित केले होते. त्या म्हणाल्या, ‘बदल हा स्थिर असतो. त्याचे व्यवस्थापन करणे ही एक विस्तारित जाणारी शिस्त आहे. आपण ज्याप्रकारे ते स्वीकारतो, ते आपले भविष्य निश्चित करते.’ महाराणींच्या राज्याभिषेकाच्या ७० व्या वर्धापनदिनानिमित्त पाच हजार वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्या खरेच नागरिकांच्या हृदयातील राणी आहेत.

nairmalini2013@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.