राणी एलिझाबेथचे व्यक्तिमत्त्व खूप गोंधळात टाकणारे आहे. एकीकडे त्यांना परंपरावादी म्हटले जाऊ शकते, कारण त्यांनी वसाहतीक लुटीतून मिळवलेल्या संपत्तीचा उपभोग घेतला.
- मालिनी नायर nairmalini2013@gmail.com
राणी एलिझाबेथचे व्यक्तिमत्त्व खूप गोंधळात टाकणारे आहे. एकीकडे त्यांना परंपरावादी म्हटले जाऊ शकते, कारण त्यांनी वसाहतीक लुटीतून मिळवलेल्या संपत्तीचा उपभोग घेतला. पूर्वसुरींच्या मार्गावर प्रश्न न विचारता चालत राहिल्या. दुसरीकडे राजकीय विरोध असूनही त्या वर्णभेदाच्या विरोधात उभ्या राहिल्या. राणी कोणत्याही प्रकारे परिपूर्ण नव्हती; परंतु तिने शक्य तितके उत्तम करण्याचा प्रयत्न केला. या जगाने महायुद्ध, शीतयुद्ध, आर्थिक मंदी, ब्रेक्झिट आणि अलीकडची महामारी बघितली. यातूनही राणी तगली याचे कौतुक वाटते. ती सर्वांचीच राणी नव्हती, पण ती लाखो हृदयांची राणी होती.
युनायटेड किंगडम आणि जगाने राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांचा ८ सप्टेंबर रोजी अखरेचा निरोप घेतला. प्रदीर्घ काळ राज्य करणाऱ्या राणीला आदरांजली वाहण्यासाठी गेले दहा दिवस हजारो लोक आले. अंत्यदर्शनासाठी पाच मैलांपेक्षाही लांब रांगा लागल्या होत्या, पण त्यांच्या निधनाबद्दल सर्वांनीच शोक व्यक्त केला असे नाही. लाखो लोकांनी दुःख व्यक्त केले, पण राग किंवा मतभेद व्यक्त करणाऱ्यांची संख्याही तितकीच होती. मतभेद किंवा राग व्यक्त करणाऱ्यांमध्ये मुख्यत्वे ब्रिटिशांच्या पूर्व वसाहती देशांतील नागरिकांचा समावेश होता. समृद्धी, संसाधने, भूभाग आणि लोकसंख्या याबाबतीत भारत हा ब्रिटिशांच्या सर्वात मोठ्या वसाहतींपैकी एक होता. आपल्या दोनशे वर्षांच्या सत्तेच्या काळात इंग्रजांनी भारतीयांची अतोनात लूट आणि सांगता येणार नाहीत इतके अत्याचार केले. १९४७ मध्ये ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळवणाऱ्या पहिल्या वसाहतींपैकी भारत होता. त्यानंतर भारताने युनायटेड किंगडमच्या राजाला आपल्या देशाच्या प्रमुखपदावरून हटवले. पुढील सात दशकांत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असलेल्या इतर अनेक वसाहती स्वतंत्र झाल्या. त्यानंतरच्या वर्षांमध्ये भारताने झपाट्याने प्रगती केली. आज भारत ब्रिटनचा पसंतीचा व्यापारी आणि आर्थिक भागीदार आहे.
तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या निमंत्रणावरून १९६१ मध्ये राणी एलिझाबेथ यांनी पहिल्यांदा भारताला भेट दिली होती. तेव्हा भारताने कमी कालावधीत तंत्रज्ञान आणि विकासाच्या बाबतीत केलेल्या प्रगतीचे त्यांनी कौतुक केले होते; पण अनेकांनी आपल्या आजी-आजोबांकडून ब्रिटिश राजवटीतील भयकथा ऐकल्या आहेत किंवा इतिहास वाचला आहे. त्यामुळे भारतीयांच्या मनात साहजिकच संताप आहे. हा राग नक्कीच अवास्तव नाही, पण हा राग त्या घटनांसाठी कमीत कमी जबाबदार असलेल्या व्यक्तीवर आहे. आपल्याला माहितेय की, राणी एलिझाबेथ या १९५२ मध्ये सिंहासनावर आरूढ झाल्या. तेव्हा भारत स्वतंत्र होऊन पाच वर्षे झाली होती. भारत-पाकिस्तानची फाळणी हा ब्रिटिशांचा शेवटचा घाव एलिझाबेथ यांचे दूरचे नातेवाईक लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या कार्यकाळात घातला गेला आणि स्वातंत्र्यापूर्वी जे अत्याचार झाले होते ते एलिझाबेथ यांच्या पूर्वसुरींचे दुष्कृत्य होते. जर राणी दोषी असतील तर एवढ्या संबंधापुरत्याच. एलिझाबेथ राणी झाल्या तेव्हा ब्रिटिशांची वसाहतीक राजवट कमकुवत झाली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर जग आर्थिक, राजकीय आणि नैतिकदृष्ट्या लोकशाही आणि उदारमतवादी मूल्यांकडे झुकत होते. पुढच्या काही दशकांमध्ये बऱ्याच ब्रिटिश वसाहतींनी स्वतःला स्वतंत्र घोषित केले. ब्रिटिशांनी राणीच्या नावावर या वसाहतींना मुक्त होण्यास विरोध केला, हे लोकांना आठवते. पण लोक हे विसरतात की त्यांनी ब्रिटिशांची पकड कमकुवत होऊ दिली, जेणेकरून वसाहती हळूहळू मुक्त होतील.
राणीची ओळख चतुर, राजकीयदृष्ट्या धूर्त, कधीही दिलगिरी व्यक्त न करणारी अशी आहे. दुर्दैवाने जगभरातील सर्व राजघराण्याचा इतिहास असाच आहे. पण पुरोगामी आणि काळाप्रमाणे वाटचाल करणारी म्हणूनही त्यांची ओळख आहे. राणीचे व्यक्तिमत्त्व खूप गोंधळात टाकणारे आहे. एकीकडे त्यांना परंपरावादी म्हटले जाऊ शकते. कारण त्यांनी वसाहतीक लुटीतून मिळवलेल्या संपत्तीचा उपभोग घेतला. आपल्या पूर्वसुरींच्या मार्गावर प्रश्न न विचारता चालत राहिल्या. दुसरीकडे राजकीय विरोध असूनही त्या वर्णभेदाच्या विरोधात उभ्या राहिल्या. राजघराण्यातील व्यक्तीसुद्धा माणूसच आहे, असे समजून त्यांना पाठिंबा दिला. आपल्या मुलांच्या आणि इतर नातेवाईकांच्या घटस्फोटालाही पाठिंबा दिला, जे त्यापूर्वी ब्रिटिश राजघराण्यात ऐकायलाही मिळाले नव्हते. त्यांनी २०१३ च्या क्राऊन कायद्याला पाठिंबा दिला. ज्यामुळे लिंगभाव समानतेचा मार्ग सुकर होणार होता.
या सर्व गोष्टींसह त्या तंत्रज्ञानाच्या जाणकार आणि काळासोबत चालणाऱ्या होत्या. १९७१ मध्ये जगातील पहिला ई-मेल पाठवणारी पहिली व्यक्ती राणी एलिझाबेथ होत्या. त्यांच्याविषयी आणि त्यांच्या कुटुंबाविषयी माहितीपट बनवण्याची परवानगी देणाऱ्या त्या ब्रिटिश राजघराण्यातील पहिली व्यक्ती होत्या. अनेकांच्या मते, हा दूरचित्रवाणीवरील पहिला रिअॅलिटी शो होता. त्या स्वतः आणि त्यांचे कुटुंबीय कसे आयुष्य जगते हे लोकांना दाखवण्यासाठी या माहितीपटाला त्यांनी मदत केली. ज्या राजघराण्याला अतिशय उच्चस्थान दिले जात होते आणि ज्यांचा सहवास दुर्लभ समजला जात होता, त्यांचे मानवीकरण करणे हीच यामागील कल्पना होती. राणीला त्यांची प्रतिमा बदलायची होती. शाही कुटुंबात घटस्फोटाला मान्यता देणाऱ्या त्या पहिल्या राणी होत्या. प्रिन्स चार्ल्ससह त्यांच्या तीन मुलांनी घटस्फोट घेतला. अलीकडेच त्यांनी प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्केल यांना शाही कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांतून मुक्त केले आणि राजघराण्याच्या मानमर्यादेबाहेर सामान्य आयुष्य जगण्याची परवानगी दिली. त्यांनी २०१५ मध्ये त्यांचे ट्विटर अकाऊंट उघडले आणि २०१७ मध्ये इन्स्टाग्राम अकाऊंटही उघडले. त्यामुळे तुम्हाला राणीचा कोणता पैलू महत्त्वाचा वाटतो, यावरून तुम्ही एकतर त्यांची प्रशंसा कराल किंवा त्यांचा तिरस्कार कराल.
मी तरी त्यांना एक अशी सम्राज्ञी म्हणून पाहते ज्यांनी राजेशाहीचे अनेक नियम पुन्हा परिभाषित केले. परिस्थितीतील अनेक अंगांची गुंतागुंत असतानाही. त्या अधिक काही करू शकल्या असत्या का? कदाचित हो. उदाहरणार्थ १९९७ मध्ये त्यांची तिसरी भारतभेट वादग्रस्त ठरली. जालियनवाला बाग येथील सामूहिक हत्याकांडाच्या स्मृतिदिनादिवशी त्यांनी त्या जागेला भेट दिली. १९१९ मध्ये ब्रिटिश राजघराण्याच्या नावावर तेथे केलेल्या गोळीबारात अनेकांचा जीव गेला होता. त्या दिवशी त्यांनी जालियानवाला बागेत झालेल्या अत्याचाराची कबुली दिली. भूतकाळात घडून गेलेली त्रासदायक घटना जी आता बदलता येणार नाही, असा तिचा उल्लेख केला. पण त्यांनी या हत्याकांडासाठी माफी मागितली नाही. त्याचा पंजाबमध्ये निषेध करण्यात आला. अर्थात हे आंदोलन शमल्यानंतर राणीला पंजाबी पद्धतीने शीख समुदायाकडून निरोपही देण्यात आला.
इथे लोकांनी राणीने माफी न मागितल्याच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले आहे. पण मी परदेशात राहते आणि ब्रिटनमध्ये राहणाऱ्या अनेक भारतीय वंशांच्या मित्रांना भेटते. त्यांचा याबाबतचा दृष्टिकोन वेगळा आहे. फार कमी लोकांना माहीत आहे की, राणी एलिझाबेथ आणि प्रिन्स चार्ल्स (आता राजा) हे नेहमी ब्रिटनमधील मंदिर व गुरुद्वारांना भेटी देत असत. ब्रिटनमधील शीख आणि हिंदू समुदायाकडून राणीला खूप प्रेम मिळाले. राणी मोठ्या प्रमाणात धर्मादाय काम करण्यासाठी ओळखल्या जात. ज्याचे कौतुक या समुदायांकडून आणि सर्व जगानेच केले आहे. हे शक्य आहे की राणीने त्यांची राजघराण्याची प्रतिमा जपण्यासाठी अगदी तोलूनमापून शब्द वापरले असतील. शब्दाने माफी मागितली नसेल, पण त्यांनी त्यांच्या कृतीतून बरेच काही केले. त्यांच्या पूर्वजांनी ज्यांच्यावर अत्याचार केले, त्यांच्याप्रती केवळ पश्चाताप व्यक्त न करता त्यांनी अनेकप्रकारे मदत केली आहे आणि तुम्ही जर पाहिले तर आज ब्रिटनमध्ये अनेक भारतीय वंशाचे राजकारणी, मुत्सद्दी आहेत. ही गोष्ट तर भारतही साध्य करू शकला नाही. एवढ्या दशकांमध्ये युनायटेड किंगडम किती सर्वसमावेशक बनला आहे, याचेच हे लक्षण नाही का? अर्थात हे अमेरिका आणि इतर देशांबद्दलही सांगता येईल. जिथे परकीय वंशाच्या व्यक्ती सर्वोच्च पदापर्यंत पोहोचल्या. उदा. बराक ओबामा. भारतात परकीय वंशाचे सोडा, पण जाती आणि धर्माच्या वर राजकारण आणण्यात आपल्याला यश आले नाही. असो. तर ब्रिटन आणि ब्रिटनमधील सर्व समुदायांमध्ये राणी खूप लोकप्रिय होत्या. तेथील सर्व धार्मिक समुदायांनी राणीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. सर्व समुदायांना राणीने समान वागणूक दिली याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
लंडनमधील स्वामीनारायण संस्था आणि नेसडेन मंदिरात चार्ल्स वारंवार प्रार्थना सभा घेत असत. ब्रिटनमधील गुरुद्वारांमध्ये प्रार्थना करण्यात आली. पश्चिम लंडनमधील अनुपम मिशन स्वामीनारायण मंदिरात राणीच्या निधनानंतरच्या १० दिवसांच्या दुखवट्यात विविध धर्मांतील जवळजवळ ६०० लोक प्रार्थना करण्यासाठी, भजन गाण्यासाठी आणि कीर्तन करण्यासाठी एकत्र जमले होते. यावर्षी जूनमध्ये राणीच्या राज्यकारभाराची प्लॅटिनियम ज्युबिली साजरी करण्यात आली. त्यानिमित्त ‘ग्रीन कॅनोपी ट्री प्लांटेशन’चा कार्यक्रम राबवण्यात आला. या अंतर्गत ब्रिटनच्या हिंदू समुदायाच्या वतीने संपूर्ण ब्रिटनमध्ये सात हजार झाडे लावण्यात आली. ब्रिटनमधील हिंदू, शीख आणि इतर समुदायांचे राणीबद्दलचे प्रेम वरवरचे नाही. गेल्या अनेक दशकांमध्ये त्यांनी हळूहळू आणि शांतपणे त्यांच्या पूर्वसुरींनी केलेल्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच लोकांच्या नजरेत त्यांची प्रतिमा पूर्वीपेक्षा खराब होऊ नये यासाठी संतुलन राखण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय पंतप्रधान राणीच्या अंत्यविधीला अनुपस्थित राहिले; पण भारताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवून प्रोटोकॉल पाळला. पंतप्रधान मोदींनी राणीच्या निधनानंतर एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला. राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावण्यात आला. तसेच, राणीच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करणारे ट्विट केले. खरेतर भारत आणि इंग्लंड यांच्यामधील इतिहास पाहता मोदींनी एवढेही केले नसते तरी भारताला कुणी दोष दिला नसता.
हे खरे आहे की, राणीने त्यांच्या मुकुटात जडलेला कोहिनूर हिरा परत केला नाही. ज्याची किंमत आता जवळपास ५०० दशलक्ष डॉलर इतकी आहे. आपण आशा करू या की राजे चार्ल्स हा हिरा परत करतील. पण राणीने मुंबईतील डबेवाल्यांना शाही विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित केले होते. त्यांची वैयक्तिक भेट घेतली आणि त्यांच्यासोबत नाष्टा केला. राणीने भारत आणि इतर वसाहतीक देशांची अत्याचारांबद्दल माफी मागितली नाही, पण त्यांनी अनेक वसाहती देशांना ‘राष्ट्रकुल’च्या छत्राखाली एकत्र आणले. जेणेकरून हे देश खेळामध्ये, व्यापारामध्ये एकमेकांना सहकार्य करू शकतील. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ही सध्या ऑलिम्पिकनंतर सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे, तसेच यात राष्ट्रकुल देशांमधील अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचे धोरणही इंग्लंडने कायम ठेवले. आपल्याला राणीला सर्वच गोष्टींचे श्रेय देण्याची गरज नाही, पण मग आपण त्यांच्या कुटुंबातील इतरांच्या गैरकृत्यांसाठी त्यांना जबाबदारही धरू शकत नाही. भूतकाळ कितीही वेदनादायी आणि चुकीचा असला तरी सुधारता येत नाही, तसेच आपण भूतकाळात जगू शकत नाही. फक्त पुढे जाणे हाच एकमेव मार्ग आहे. या दृष्टीने आपण पाहिले तर आपल्याला समजेल की ब्रिटिशांच्या हातातून लुटले गेलेल्या समुदायाला त्यांनी मानवी पातळीवर शक्य तितकी मदत, तिही शांतपणे केली.
वांशिक भेदभावाच्या मुद्यावर त्या ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्या विरोधात उभ्या राहिल्या. वर्णभेदाचा उघडपणे विरोध केला. हे लक्षात ठेवणेदेखील महत्त्वाचे आहे की आजच्या जगात यूकेमधील राजेशाही ही वास्तविक सत्तेपेक्षा सजावटी अधिक आहे. तिचा राजकीय निर्णयांवर फारसा प्रभाव पडत नाही; परंतु अलीकडच्या वर्षांत यूकेने अनेक उलथापालथी पाहिल्या आहेत. अवघ्या सहा वर्षांत चार पंतप्रधान पाहिले. अलीकडेच लिझ ट्रस यांची राणीच्या निधनाच्या काही दिवस आधी पंतप्रधानपदी नियुक्ती झाली. कोविड १९, ब्रेक्झिट, राजघराण्यातील सदस्यांचा समावेश असलेले पीडोफिलिया घोटाळे, राजकारण्यांचा समावेश असलेले लैंगिक छळाचे प्रकरण, पार्टीगेट घोटाळा आणि आर्थिक मंदीचे संकेत देणारे ऊर्जा संकट आणि महागाई, या सर्व गोष्टी ब्रिटनने पाहिल्या. तेव्हा या काळात ९६ वर्षांची राणी, प्रतीकात्मक असली तरी स्थिरतेचे प्रतीक म्हणून उभी होती. राणी कोणत्याही प्रकारे परिपूर्ण नव्हती; परंतु तिने शक्य तितके उत्तम करण्याचा प्रयत्न केला. आणि या जगाने महायुद्ध, शीतयुद्ध, आर्थिक मंदी, ब्रेक्झिट आणि अलीकडची महामारी बघितली. यातूनही राणी तगली याचे मला कौतुक वाटते. ती सर्वांचीच राणी नव्हती, पण ती लाखो हृदयांची राणी होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.