जागतिक अर्थव्यवस्था आधीच संकटात आहे. आपण सर्व जण काही दिवसांत मोठ्या मंदीकडे जाऊ शकतो. बेरोजगारीसंबंधी संकट, महागाई याच्यासह सर्वसामान्यांसाठी आणखी एक संकट उभे राहू शकते.
- मालिनी नायर, nairmalin2013@gmail.com
जागतिक अर्थव्यवस्था आधीच संकटात आहे. आपण सर्व जण काही दिवसांत मोठ्या मंदीकडे जाऊ शकतो. बेरोजगारीसंबंधी संकट, महागाई याच्यासह सर्वसामान्यांसाठी आणखी एक संकट उभे राहू शकते. कर भरणाऱ्या, महागाईचे परिणाम भोगणाऱ्या, नोकरीची सुरक्षितता नसलेल्या आणि बॅंकांमधील बचत सुरक्षित नसताना सर्वाधिक असुरक्षित असलेल्या कोणत्याही देशामध्ये मध्यमवर्गीयांना सर्वात जास्त सावध राहण्याची गरज आहे.
ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढल्याचा ताण पडून बँक कोसळल्याने फेडरल रेग्युलेटर्सने ‘सिलिकॉन व्हॅली बँके’ (एसव्हीबी) वर गेल्या आठवड्यात बंदी आणली. त्यानंतर काहीच काळात रेग्युलेटर्सनी सिग्नेचर बँकही बंद झाली. इथेही ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढले होते. २००८ च्या आर्थिक मंदीनंतर हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे आर्थिक अपयश मानले जाऊ लागले आहे. या संपूर्ण घसरघुंडीमुळे टेक कंपन्या आणि वित्त संस्थांचे स्टॉक जगभरात कोसळत आहेत.
सिलिकॉन व्हॅलीतील टेक स्टार्टअप्सना बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी सन १९८३ मध्ये एसव्हीबीची स्थापना झाली होती. १९८७ मध्ये ही कंपनी ‘नॅसडॅक’वर लिस्टेड झाली होती आणि आयपीओद्वारे वर्षभरातच तिने सहा मिलियन डॉलरची इक्विटी जमा केली होती. सॅन जोस, कॅलिफोर्निया या ठिकाणच्या सुरुवातीच्या कार्यालयापासून १९९० मध्ये अमेरिका आणि विदेशातील अनेक कार्यालयांपर्यंत कंपनीचा विस्तार झाला. २००८ मध्ये इस्राईल, ब्रिटनमध्ये कार्यालये थाटून आणि त्याच वेळी चीनमध्ये, तसेच मागील दशकात युरोप व कॅनडात संयुक्त उपक्रम सुरू करून एसव्हीबीने आंतरराष्ट्रीय बाजारात विस्तार केला.
अनेकांना हे माहीत नसेल, की मागील वर्षापर्यंत एसव्हीबी ही अमेरिकेतल्या पहिल्या वीस बँकांतील एक होती; पण इतर मोठ्या बँकांपेक्षा निराळ्या पद्धतीने सिलिकॉन व्हॅलीतील स्थानिक टेक स्टार्टअप्स आणि लाईफ सायन्स बिझनेसवर तिची भरभराट झाली. हे वेगळेपण का आहे? कारण सर्वसाधारपणे मोठ्या बँका एखाद्या विशिष्ट बाजारपेठेत कार्यरत न राहता अनेक क्षेत्रातील वैविध्यपूर्ण ग्राहकासोबत व्यवहार करतात. दुसरे म्हणजे धोका जास्त असल्याने इतर बँकांचा महसूल बँकिंग सेवा आणि स्टार्टअप्सना कर्ज देण्यावर अवलंबून नसतो. सहसा जेव्हा कोणी कर्जाची मागणी करते तेव्हा बँका ‘कॅश फ्लो रेकॉर्ड’ आणि इतर तारण मागतात. स्टार्टअप्स हे बाल्यावस्थेतच असल्याने त्यांच्यापासून फायदा होणे हे आव्हानात्मकच असते आणि या स्थितीत त्यांचा कॅश फ्लो तोट्यातच असतो. पण, असे असले तरी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी, व्यवसाय सुरळीतपणे चालावा, यासाठी बँकिंग सेवेची आवश्यकता असतेच.
एसव्हीबीने हेच केले. त्यांनी टेक स्टार्टअप्सना बँकिंग सेवा दिल्या. त्यांनी त्या दिल्या नसत्या, तर त्यात असलेल्या धोक्यामुळे इतर बँकांकडून त्या मिळवण्यात स्टार्टअप्सना अडचण आली असती. भांडवलदार, उद्योजक आणि उच्च मिळकत असलेल्या व्यक्तींनी एसव्हीबीसोबत व्यवसाय करण्यास सुरुवात केली. व्यवसाय संबंधातील त्यांच्या विश्वासार्हतेमुळे त्यांना या वर्षांमध्ये अनेक टेक ग्राहक मिळाले. ज्यात उद्योजक, श्रीमंत व्यक्ती आणि इतर ग्रीनफील्ड टेक कंपन्या होत्या. याचा अर्थ असा की, ही बँक जे पैसे स्टार्टअप्सना देत होती ते जोखीम पत्करलेल्या ठेवीदारांकडून किंवा श्रीमंत व्यक्तींकडून आलेले होते. म्हणजे या बँकेचा पोर्टफोलिओ फारसा वैविध्यपूर्ण नव्हता, ज्याचा वापर वित्तीय संस्थांना कोसळण्याचा धोका असताना सावरण्यासाठी होतो.
एसव्हीबीची ९० टक्क्यांपेक्षा जास्त खाती ही दोन लाख ५० हजार डॉलरपेक्षा जास्त रक्कम असणाऱ्या ठेवीदारांची आहेत. कोणत्याही सामान्य बँकेपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. याचा अर्थ बहुतांश ठेवींचा सरकारने विमा उतरवला नव्हता. मागील वर्षी एसव्हीबीकडे विमा नसलेल्या १५० अब्ज डॉलरपेक्षा जास्त ठेवी होत्या. २०२०च्या महामारीच्या साथीमध्ये काहीतरी वेगळे घडले. एसव्हीबीने ट्रेझरी बाँडमध्ये गुंतवणूक केली. दीर्घकालीन मॅच्युरिटी आणि कमी व्याजासह ही गुंतवणूक तशी सुरक्षित मानली जाते; पण नंतर महागाईशी सामना करण्यासाठी फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवले. वाढत्या व्याजदरासमोर फिक्स्ड इंटरेस्ट पेआऊट्स टिकाव धरू शकले नाहीत, याचा या सरकारी रोख्यांच्या मूल्यांवर नकारात्मक परिणाम झाला. याचा अर्थ असा की, अपेक्षेपेक्षा जास्त व्याज भरून बँकेने पैसे गमावले होते. त्यामुळे फेडरल रिझर्व्ह बाँडमध्ये केलेल्या १७ अब्ज डॉलरचा तोटा एसव्हीबीला सहन करावा लागला.
बँक कोसळण्याचे कारण काय?
नेमके काय झाले हे समजून घेण्याआधी ‘बँक रन’ म्हणजे नक्की काय हे समजून घेऊ. जेव्हा व्यक्ती/संस्था बँकेत जाऊन पैसे जमा करतात, तेव्हा त्यांना त्या पैशावर बँकेकडून व्याज दिले जाते आणि त्यांना त्यांची ठेव (अंशत: किंवा पूर्ण) कधीही काढण्याचे स्वातंत्र्य असते. या बदल्यात बँक त्या ठेवी घेते आणि त्या व्यवसाय वगैरेंना देते आणि त्यावर व्याज आकारते. बँकेने एखाद्या व्यवसायाला दिलेल्या पैशांचा व्याजदर हा ती बँक एखाद्या व्यक्तीला देत असलेल्या व्याजदरापेक्षा जेव्हा जास्त असतो, तेव्हा ती बँक नफ्यात असते, असे समजले जाते. सहसा बँकेने व्यवसायांना दिलेली कर्जे ही दीर्घकाल, अधिक व्याजदरासह फेडली जातात. या दीर्घ कालात बँक व्याज आणि मुद्दल दोन्ही वसूल करू शकते. कारण वैयक्तिक ठेवीदार हे क्वचितच त्यांचे सर्व पैसे एकाच वेळी काढून घेतात. त्यामुळे बँका वैयक्तिक ठेवीदारांच्या पैशांचा मोठा भाग व्यवसायांना कर्ज म्हणून देऊ शकतात. ‘बँक रन’ ही अशी परिस्थिती असते जेव्हा वैयक्तिक ठेवीदार त्यांचे सर्व पैसे एकाच वेळी काढण्याचा निर्णय घेतात, पण त्यातील मोठा हिस्सा व्यवसायांना दिलेला असल्यामुळे बँक हे पैसे परत करू शकत नाही. सिलिकॉन व्हॅली बँकेच्या बाबतीत हेच घडले.
बँक तिच्या सर्व ग्राहकांची परतफेड करू शकली नाही आणि तसे करण्यासाठी बँकेने तिचे काही रोखे तोट्यात विकण्याचा निर्णय घेतला. यामुळे बाजार विश्लेषकांनी बँकेचे स्टॉक घसरल्याचे जाहीर केले. बँकेची स्थिती चांगली नाही, तसेच आपल्या ठेवींना धोका आहे या भीतीने ठेवीदारांच्या ठेवी काढून घेण्यासाठी बँकेबाहेर रांगा लागल्या; पण बँक रनची ही स्थिती केवळ एका बँकेत येऊन थांबत नाही, तर ही भीती इतर बँकेच्या ग्राहकांपर्यंत हस्तांतरित होते. त्यामुळे तिथेही मोठ्या प्रमाणात ठेवी काढून घेण्याची प्रक्रिया सुरू होऊन ती बँक कोसळण्याचा धोका निर्माण होतो. महामंदीच्या काळात नेमके हेच घडले होते. १९२९मध्ये जवळपास ६५० बँका कोसळल्या होत्या आणि वर्षभरातच इतर १३०० बँका ठेवी काढल्यामुळे कोसळल्या. या कालावधीत एकूण ९००० बँका अपयशी ठरल्या. अलिकडच्या काळात एसव्हीबी कोसळणे हे २००८ च्या आर्थिक संकटानंतरचे अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे आर्थिक पतन आहे.
फेडरल रिझर्व्हने त्यांचे व्याजदर जसजसे वाढवले तसे टेक स्टार्टअप्सनी त्यांचे पैसे बँकेतून काढून घेतले. दीर्घकाल हे पैसे काढले गेले नसते, तर एसव्हीबी कर्ज मॅच्युरिटी झालेल्या स्थितीत असती; परंतु ठेवीदारांकडून पैसे काढण्याच्या वाढीमुळे बँकेला मागणी पूर्ण करणे अशक्य झाले आणि बँकेला इतर उपायांचा अवलंब करावा लागला. ८ मार्च रोजी एसव्हीबीने जाहीर केले की, ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी त्यांची काही गुंतवणूक विकल्यानंतर त्यांना १.८ अब्ज डॉलरचा तोटा होईल. त्यांनी सांगितले, की सामान्य आणि पसंतीचे स्टॉक विकून त्यांनी २.२५ अब्ज डॉलरची जुळवाजुळव करण्याचे नियोजन केले आहे. या घोषणेनंतर लगेचच ‘मूडीज’ने एसव्हीबी फायनान्शिअल ही एसव्हीबीची पालक कंपनी अवसायनात गेली. यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शेअर बाजार उघडला तेव्हा एसव्हीबी फायनान्शिअलचे शेअर घसरले.
अमेरिकेतील सर्वात मोठ्या चार कंपन्यांचे शेअर्सही घसरले. भीतीमुळे बँकाही घसरल्या आणि जेपी मॉर्गन चेस, बँक ऑफ अमेरिका, वेल फार्गो आणि सिटीग्रुपच्या बाजारमूल्यात एकूण ५२ अब्ज डॉलरपेक्षा जास्त नुकसान झाले. बातम्या आणि सोशल मीडियाद्वारे भीती पसरल्याने, व्हेंचर-कॅपिटल कंपन्यांनी त्यांचे पैसे एसव्हीबीमधून बाहेर काढण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या पोर्टफोलिओ कंपन्यांना असे करण्यास उद्युक्त केले. एसव्हीबीचा त्या दिवशीचा व्यवसाय बंद झाला तोपर्यंत, ठेवीदारांनी ४२ अब्ज डॉलर काढण्याचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी फेडरल रेग्युलेटर्सनी स्टॉक मार्केट उघडण्यापूर्वी बँक ताब्यात घेतली आणि एसव्हीबी स्टॉकला ट्रेडिंगपासून थांबवले.
आता समस्या अशी आहे, की १३ मार्चपासून विमाधारक ठेवीदार नेहमीप्रमाणे त्यांची खाती संचलित करू शकतील, अशी सरकारने हमी दिली आहे. कारण, एसव्हीबीमधील ठेवींचा मोठा भाग हा विमारहीत आहे. एसव्हीबीमधील ठेवी कधी मिळतील, याबद्दल कोणतीही स्पष्टता नसल्याने हे व्यावसायिक ठेवीदार आता त्यांच्या वेतन आणि दैनंदिन कामकाजासाठी कसरत करत आहेत. याचा त्यांच्या दैनंदिन व्यवसायावर गंभीर परिणाम होऊ शकतो. फक्त एसव्हीबी बँक कोसळून विषय संपला नाही. सिग्नेचर बँक ही ‘बँक रन’च्या याच भीतीमुळे सीलबंद केल्यामुळे तेथील ठेवीदारांकडून पैसे काढण्याची मागणी होत आहे. सिग्नेचर बँकेतही विमारहीत ठेवीदारांचे मोठे प्रमाण आहे. याबाबत अमेरिकन सरकारकडून लगेच हस्तक्षेप करण्यात आला. खुद्द राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सरकार लोकांच्या हिताचे रक्षण करेल, असे विधान केले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लोकांची भीती दूर करण्यासाठी स्वतः पुढे आले असतील, तर हे प्रकरण दिसते त्यापेक्षा जटील असण्याची शक्यता आहे. एक बँक कोसळल्याने, ठेवीदार विशेषतः स्टार्ट-अप व्यवसाय जे अद्याप वाढीच्या टप्प्यात आहेत, त्यांना त्यांचे पैसे इतर सुरक्षित बँकांमध्ये ठेवायचे असतात. याचा अर्थ लहान आणि मध्यम बँकांचे ग्राहक मोठ्या बँकांकडे जाऊ शकतात. याचा परिणाम अनेक बँका बँक रनच्या अवस्थेत पोहोचण्यात होऊ शकतो आणि त्या व्यवसायातून हद्दपार होऊ शकतात. मोठ्या बँकांच्या कर्जावरील व्याजदरात आणि स्टार्टअप्सच्या खर्चात वाढ होऊ शकते.
स्टार्टअप हे रोपट्यासारखे असतात, ज्यांना त्यांची वाढ होत असताना खूप काळजी आणि पोषण आवश्यक असते. ठराविक कालावधीत जास्त पैसा बाहेर पडणे हे अनेक स्टार्टअप्सच्या वाढीसाठी आणि जगण्यासाठी हानिकारक ठरू शकतात. असे झाल्यास अनेक टेक आणि लाईफ सायन्सेस स्टार्टअप्स बंद पडू शकतात. ज्यामुळे मोठ्या टेक कंपन्यांची या क्षेत्रात मक्तेदारी स्थापन होऊ शकते. तिसरे म्हणजे, ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करताना सरकारी जामीन दीर्घकाळात कोणत्याही क्षेत्राच्या वाढीसाठी हानिकारक ठरू शकते. सरकार सामील झाल्यामुळे, नियम आणि छाननी वाढेल. बँकेचे कर्ज घेणे अधिकाधिक कठीण होत जाईल. ज्यामुळे स्टार्टअप्स आणि व्यवसायांना सामान्यपणे संचलित करणे किंवा सुरुवातीस निधी मिळणे कठीण होऊ शकते. यामुळे टेक सेक्टरच्या वाढीची गती मंदावेल आणि मोठ्या कंपन्यांची मक्तेदारी वाढीस लागेल. जे आत्ताच त्यांच्या कंपन्यातील हजारो कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपक्रमात पैसे गुंतवत आहेत.
कर्मचाऱ्यांच्या छाटणीच्या बाबतीत टेक सेक्टरमध्ये मोठे मंथन होत आहे, हे लक्षात घेता, जनतेमधील विश्वासार्हता कमी झाल्यामुळे या क्षेत्राची शेअर बाजारात आणखी घसरण दिसू शकते. मेटा, अल्फाबेट, ॲमेझॉन आणि मायक्रेसॉफ्ट यांसारख्या चार मोठ्या कंपन्यांनी ५० हजार कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यातील ५६ टक्के या महिला कर्मचारी आहेत. महिलांना तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रात येण्यासाठी आधीच मोठा संघर्ष करावा लागतो, त्यात या प्रकारचा निर्णय हा अत्यंत प्रतिगामी आहे. दरम्यान, ट्विटरचे नवीन मालक एलॉन मस्क यांनी गेल्या वर्षाच्या अखेरीस पदभार स्वीकारला तेव्हा कंपनीच्या निम्म्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले.
सुरुवातीला असे सांगण्यात आले होते की त्यांना कर्मचारी संख्या कोरोनापूर्व काळाइतकी करायची आहे; पण ‘३६५ डेटा सायन्स’च्या अलीकडील संशोधनात असे दिसून आले, की जे कर्मचारी त्या कंपनीचा एक दशकाहून अधिक काळ अभिन्न भाग आहेत, त्यांनाच कामावरून काढून टाकण्यात आले आहे. याचा अर्थ या अत्यंत कुशल व्यक्ती आहेत ज्या चांगले पगार मिळण्याच्या योग्यतेच्या आहेत. या कंपन्या आर्थिक संकटात नाहीत. तेव्हा या कंपन्यांचे स्पष्टीकरण असे की कर्मचारी कपात करून वाचवलेले पैसे ते नवीन तंत्रज्ञान उपक्रमांना चालना देण्यासाठी वापरणार आहेत. हजारो लोकांची कपात केल्यामुळे लोकभावना या कंपन्यांच्या विरोधात जात आहे. टेक सेक्टरला पाठिंबा देण्याऱ्या एसव्हीबीच्या बुडण्यामुळे तर ही भावना अधिक वाढू शकते. टेक क्षेत्र आणि वित्तीय क्षेत्रातील स्टॉकमध्ये जागतिक पातळीवर घसरण दिसून आल्याचे आपण या आठवड्यात पाहिले.
शेवटी या प्रकरणाचा राजकीय फायदा रिपब्लिकन्स ज्यो बायडेन आणि डेमोक्रॅट्सच्या विरोधात घेऊ शकतात. बायडेन सरकार अमेरिकन लोकांचे हित जपत नाही आणि आंतरराष्ट्रीय बाबींना पाठिंबा देण्यासाठीच करदात्यांचे पैसे खर्च करते, असा आरोप त्यांनी अनेकदा केला आहे. पुढील वर्षीच्या निवडणुकांवर या सगळ्याचा नक्कीच परिणाम होईल आणि लोकभावना डेमोक्रॅट्सपासून दूर जात रिपब्लिकनच्या बाजूने जातील. याचा अमेरिकेतील अल्पसंख्याक समुदाय, एलजीबीटीक्यू समुदायाचे हक्क आणि काही राज्यातील महिलांच्या हक्कावर नक्कीच परिणाम होईल; पण आंतरराष्ट्रीय राजकारणावर आणि अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धोरणावरही परिणाम होईल.
एसव्हीबी आणि एसबीच्या कोसळण्याचा फायदा फक्त शॉर्ट सेलर्सना फायदा झाला आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी पुन्हा कोट्यवधींची कमाई केली आहे. जागतिक अर्थव्यवस्था आधीच संकटात आहे. या सर्व गदारोळातून एकाच गोष्टीचा संकेत मिळतो तो म्हणजे आपण सर्व जण काही दिवसांत मोठ्या मंदीकडे जाऊ शकतो. टेक कंपन्या लोकांना कामावरून काढून टाकून अनेकांना स्वयंरोजगाराचा मार्ग स्वीकारण्यास भाग पाडतात. पण, कर्ज देणाऱ्या बँकेने बाजारात येऊ पाहणाऱ्या स्टार्टअप्सपुढे नियमांची यादी फेकल्यास त्यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर आणि निराशादायक वातारवण उभे राहू शकते. बेरोजगारीसंबंधी संकट, महागाई याच्यासह सर्वसामान्यांसाठी आणखी एक संकट उभे राहू शकते. कर भरणाऱ्या, महागाईचे परिणाम भोगणाऱ्या, नोकरीची सुरक्षितता नसलेल्या आणि बॅंकांमधील बचत सुरक्षित नसताना सर्वाधिक असुरक्षित असलेल्या कोणत्याही देशामध्ये मध्यमवर्गीयांना सर्वात जास्त सावध राहण्याची गरज आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.