- मालोजीराव जगदाळे, jagdaleomkar5@gmail.com
जगातला सगळ्यांत मोठा देश, दुसरं महायुद्ध, शीतयुद्ध, अंतराळ मोहिमा ही विशेषणं ऐकल्या-ऐकल्या मनात सगळ्यांत पहिल्यांदा जे नाव येतं ते म्हणजे, रशिया! अजस्त्र पसरलेला आणि आशियासह युरोपला व्यापणारा हा देश जितका सुंदर तितकाच गूढ वाटणारा.
भारताचे जुने व्यापारी आणि सामरिक हितसंबंध असल्यानं शस्त्रास्त्रं, तंत्रज्ञान, ऊर्जासाधनं यांची मोठी देवाणघेवाण भारत व रशियात होते. तसंच, वैद्यकीय शिक्षण रशियात स्वस्त असल्यानं मोठ्या प्रमाणावर भारतीय विद्यार्थी रशियात राहतात.
रशियानं तब्बल ५५ देशांसाठी ‘ई-व्हिजा’ची सोय उपलब्ध करून दिली आहे. यात अर्थातच रशियाचा पारंपरिक मित्र असणाऱ्या भारताचाही समावेश आहे. यापूर्वीची रशियन व्हिजा प्रक्रिया थोडी किचकट आणि महागडी होती; इतकी की, त्यापेक्षा ‘शेंगेन व्हिजा’ला अप्लाय करणं आणि तो मिळवणं जास्त सोपं वाटत होतं.
आता मात्र ऑनलाइन प्रक्रियेद्वारे अवघ्या तीन हजार दोनशे रुपयांत चार दिवसांच्या आत हा व्हिजा मिळू शकतो. पूर्वी युरोपबरोबर रशियासुद्धा करणं शक्य होतं. परंतु, युद्धामुळे बंधनं लादली गेल्यानं आता रशियातून युरोपात जाणं-येणं पूर्णपणे बंद आहे. एक आठवडा ते एक महिना अशी आपल्या सोयीनुसार ट्रीप प्लॅन करता येते.
इथलं चलन ‘रुबल’ हे आहे. साधारणतः आपले ९० पैसे म्हणजे १ रुबल असा हिशोब आहे. आवर्जून नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, रशियात प्रवास करताना खर्चाची काही अडचणी येऊ नये, म्हणून सर्व पैसे रोख नोटांच्या स्वरूपात घ्यावेत. कारण, सध्या रशियात ‘व्हिजा’ आणि ‘मास्टर कार्ड’ची सेवा बंद आहे. त्यामुळे इथल्या ‘एटीएम मशिन’वर ही कार्डं चालणार नाहीत. रशियाला भेट द्यायची असेल, तर सर्वोत्तम काळ म्हणजे एप्रिल ते ऑक्टोबर.
या काळात वातावरण आल्हाददायक असतं. तर, इतरवेळी बहुतांश भागात कडाक्याची थंडी असते. भारतातून रशियाला जाण्यासाठी अनेक विमानकंपन्या सेवा देतात. यात ‘एरोफ्लोट’ नावाची रशियन विमानकंपनी आहे, काही महिने आगाऊ तिकीट काढलं, तर अतिशय कमी दरात दिल्ली ते मास्को असं परतीचं तिकीट मिळू शकतं.
मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग, सोची, कझान, वेलिकी नोव्होग्रोद, मुरमन्स्क ही काही महत्त्वाची आणि आवर्जून भेट देण्याजोगी शहरं आहेत. भटकंतीची सुरुवात राजधानी मॉस्कोपासून करावी. देखण्या वास्तूंनी नटलेलं आणि प्रचंड मोठा ऐतिहासिक वारसा मिरवणारं हे शहर आहे. तब्बल २५० पेक्षा जास्त संग्रहालयं असणारं हे जगातील एकमेव शहर असावं.
इथं आपल्याला टॅक्सी, बस आणि मेट्रोतून प्रवास करता येतो. चीनप्रमाणं इथंसुद्धा काही अमेरिकन ॲप्स फारसे चांगले चालत नसल्यानं इथं ‘गुगलमॅप’ऐवजी ‘यॅंडेक्स मॅप्स’ हे ॲप वापरावं. याच्या मदतीनं बस, मेट्रोचं टाइमटेबल जवळील रेस्टॉरंट, हॉटेल, स्थानिक आकर्षणं शोधता येतात. याच कंपनीचं यॅँडेक्स टॅक्सी हे ॲप आपल्याकडच्या ओला, उबरप्रमाणं काम करतं.
मेट्रोचं जाळं शहरभर पसरलं असून, एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पन्नास रुबल सरसकट तिकीट आहे. मॉस्कोचं केंद्रस्थान आणि संपूर्ण रशियातील आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे, ‘रेड स्क्वेअर’. तब्बल ८० हजार स्क्वेअर फूट इतकी जागा व्यापलेला हा एक अतिप्रचंड मोठा चौक असून, इथली सेंट बासिल कॅथेड्रल इमारत जगप्रसिद्ध आहे. पंधराव्या शतकापासून वेगवेगळ्या काळांत तयार झालेल्या दहा चर्चनं मिळून हे बनलं आहे. या भागात इतर अनेक ऐतिहासिक वास्तू व संग्रहालयं आहेत. अतिरिक्त वेळ असल्यास, ती आवर्जून बघावीत.
‘रेड स्क्वेअर’च्या शेजारीच प्रसिद्ध ‘क्रेमलिन’ आहे. इथल्या २.२५ किलोमीटर लांबीच्या भिंतीनं वेढलेल्या विविध वास्तू आहेत. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थानही इथंच आहे. इथलं ‘क्रेमलिन आर्मरी’ हे रशियन साम्राज्यकालीन शस्त्रास्त्रांचं संग्रहालय आवर्जून बघावं. रशियन वॉल, आयर्न कर्टन ही प्रसिद्ध विशेषणं या क्रेमलिनच्या भिंतीसाठीच वापरली गेली होती. रशियन लोककला आणि संस्कृतीचं दर्शन घडवणारी अनेक ठिकाणं मॉस्कोत आहेत.
इथला ‘अर्बात स्ट्रीट’ हा एक खुला वॉकिंग प्लाझा असून, इथं स्थानिक कलाकार आपली कला सादर करण्यासाठी येत असतात. अतिशय गजबजलेला हा भाग असून, इथं परदेशी पर्यटक आवर्जून भेट देतात. शहराजवळ असलेला ‘यामा चौक’ हे एक प्रकारचं नवं आकर्षण असून, ते ओपन थिएटर आहे. इथं रोज सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्याचा आनंद आपल्याला या ओपन थिएटरात बसून घेता येतो.
मॉस्कोतलं आवर्जून बघण्यासारखं संग्रहालय म्हणजे, ‘म्युझियम ऑफ कॉस्मोनॉटिक्स’. रशियन अंतराळ मोहिमांना वाहिलेलं हे संग्रहालय असून, यात अंतराळ मोहिमांसंदर्भातल्या ८० हजारांपेक्षा जास्त वस्तू प्रदर्शनात मांडल्या आहेत. मॉस्कोत होणाऱ्या ‘वॉकिंग टूर’मध्ये आवर्जून सहभाग घ्यावा. रशियाचा इतिहास, संस्कृती सखोलपणे जाणून घेण्यासाठी याची मदत होईल. संध्याकाळच्या मोकळ्या वेळी रशियन बॅले, इथली प्रसिद्ध सर्कस यांनासुद्धा हजेरी लावता येईल.
मॉस्कोत बघण्यासारख्या अनेक गोष्टी असून, चार ते पाच दिवसांचा वेळ त्यासाठी हवा. राजधानी मॉस्कोनंतर सेंट पीटर्सबर्ग बघण्यासाठी जाता येईल. भारताप्रमाणंच रशियातसुद्धा रेल्वेचं जाळं उत्कृष्ट आहे. मॉस्को ते सेंट पीटर्सबर्ग हा प्रवास सुपरफास्ट रेल्वेनं फक्त साडेतीन तासांत करता येतो. इथलं प्रमुख आकर्षण असलेल्या जगप्रसिद्ध हर्मिटेज म्युझियमला भेट द्यावी.
हे जगातलं सर्वात मोठं आर्ट म्युझियम असून, कलाक्षेत्राशी संबंधित जवळपास ३२ लाखांपेक्षा जास्त गोष्टी इथं बघायला मिळतात. शहरातील ‘नेवा रिव्हरफ्रंट’ अतिशय प्रसिद्ध असून, अतिशय सुंदर कॅफे, रेस्टॉरंट्स या परिसरात आहेत. ॲमस्टरडॅमप्रमाणं इथल्या ‘रिव्हर क्रूज’असून, त्यात लंच आणि डिनरसुद्धा घेऊ शकता.
‘वेसिल्विसस्काय आयलंड’मध्ये स्थानिक लोककलांचं सादरीकरण होतं. तिथं आवर्जून हजेरी लावू शकता. सेंट पीटर्सबर्गमधल्या नेव्ही स्कूलमध्ये एकोणिसाव्या शतकातली अरोरा युद्धनौका आहे. तिचं रूपांतर आता संग्रहालयात केलं गेलं आहे.
रशियातला सगळ्यांत सुंदर पॅलेस हा सेंट पीटर्सबर्गमध्ये असून, रशियाचा झार म्हणजे, राजा ‘पीटर द ग्रेट’ याच्या काळात तो बांधला गेला. त्यामुळे या पॅलेसचं नाव पीटरहाफ पॅलेस असं आहे. अत्यंत देखणी अशी ही वास्तू असून, पॅरिसमधल्या जगप्रसिद्ध ‘पॅलेस ऑफ व्हर्साय’ला तोडीसतोड आहे. शंभरहून अधिक कारंजी या परिसरात आहेत. इथला इतिहास आणि शिल्पकला समजून घ्यायला, इथल्या ‘वॉकिंग टूर’मध्ये सहभागी व्हावं.
पहिल्या भेटीत शक्यतो पर्यटक मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग या शहरांना व याच्या आजूबाजूच्या परिसराला भेट देतात. आपण जर दहा दिवसांपेक्षा जास्त मोठी भटकंती करू इच्छित असाल, तर इतर ठिकाणं यात समाविष्ट करता येतील. जसं की, सायबेरिया भागाला भेट देता येईल. जगप्रसिद्ध अशा ‘ट्रान्स सायबेरियन रेल्वे’नं प्रवासाचा अनुभव घेता येईल. जगातील सगळ्यांत थंड शहरं या भागात आहेत.
इतक्या अत्यंत कमी तापमानात शहराचं कामकाज कसं चालतं, इथल्या लोकांचं रोजचं जीवन कसं आहे, हे आपल्याला इथं प्रत्यक्ष मुक्काम करून अनुभवता येतं. हा एक विलक्षण अनुभव ठरू शकतो. युरोपातलं सगळ्यांत उंच शिखर ‘माउंट एल्ब्रस’ रशियात आहे. या परिसरालासुद्धा तुम्ही भेट देऊ शकता. नॉर्वेप्रमाणं रशियाच्या एकदम उत्तरेकडच्या मुरमन्स्क इथून ‘नॉर्दन लाइट्स’ बघता येतात.
या नॉर्दन लाइट्सचं कॅलेंडर प्रशासनाकडून जाहीर करण्यात येतं. त्यामुळे आपल्याला त्या अंदाजानं इथं प्रवासाचं नियोजन करता येतं. इतिहासप्रेमी, शस्त्रप्रेमींसाठी रशिया खास असून, इथं दुसऱ्या महायुद्धासंबंधीची अनेक संग्रहालयं आहेत. तसंच, इथल्या काही संग्रहालयांच्या परिसरात पर्यटकांना दुसऱ्या महायुद्धातली शस्त्रं चालवण्याचा अनुभव घेता येतो.
तसंच विमानं, रणगाडे चालवण्याचासुद्धा आगळावेगळा अनुभव इथं घेता येतो. रशिया एक खंडप्राय देश असून, कदाचित एका भेटीत पूर्ण देश बघता येणं शक्य होणार नाही. त्यामुळे नियोजन करताना देशाचा एक ठरावीक भाग निवडून तिथली प्रेक्षणीय स्थळं व शहरं बघण्यावर भर द्यावा.
(लेखक जगभर भटकंती करत असतात. साहसी पर्यटनावर त्यांचा भर असतो.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.