भटकंती का करावी?

प्रत्येकासाठी पर्यटनाची व्याख्या वेगवेगळी असू शकते. धार्मिक स्थळी भाविक म्हणून दिलेली भेट मग ती अगदी जवळपास असेल, दुसऱ्या राज्यात असेल अथवा दुसऱ्या देशात जाणं असेल.
France Tourism
France TourismSakal
Updated on

- मालोजीराव जगदाळे, jagdaleomkar5@gmail.com

मित्र परिवार, आप्त, ओळखीचे लोक कायम मला विचारतात, की महिना दोन महिने उलटले नाही, की तू बॅग उचलून पुन्हा भटकंतीला बाहेर पडतोस, नेमकं काय मिळतं यातून? अनोळखी देशांत, अनोळखी माणसांत जायचं, तिथले चित्र विचित्र पदार्थ खायचे, पूर्णतः अनभिज्ञ प्रदेश फिरायचे, ट्रेकिंगला जाऊन शरीराला त्रास करून घ्यायचा, त्यासाठी ‘सेव्हिंग’ खर्च करायची कशासाठी करायचं हे सगळं?

त्यापेक्षा त्या पैशात चांगलं घर, गाडी घेता आली नसती का? किंवा रिटायरमेंटनंतरसुद्धा फिरता आलंच असतं की. यातील काही गोष्टी अंशतः खऱ्या असल्या, तरी मात्र भटकंतीतून नेमकं काय साध्य होतं याची व्याख्या सरळ सोपी नाही.

प्रत्येकासाठी पर्यटनाची व्याख्या वेगवेगळी असू शकते. धार्मिक स्थळी भाविक म्हणून दिलेली भेट मग ती अगदी जवळपास असेल, दुसऱ्या राज्यात असेल अथवा दुसऱ्या देशात जाणं असेल. व्यावसायिक कारणांसाठी सतत फिरणं, वेगवेगळ्या शहरांना भेटी देणं, मुलं परदेशी शिकत असतील अथवा कामानिमित्त परदेशात असतील तर त्यांना भेटायला जाणं, मित्रांनी, नातेवाइकांनी आग्रह केला या कारणासाठी ग्रुपचा भाग म्हणून एखाद्या पर्यटनस्थळी जाणं, अभ्यास दौऱ्यासाठी अथवा इतिहास, विज्ञान या विषयांमध्ये विशेष रुची असल्यानं संबंधित ठिकाणांना भेटी देणं, अशा वैयक्तिक कारणांमुळेही पर्यटक म्हणून आपण हळूहळू घडत असतो आणि आपल्या नकळत त्याचं रूपांतर आपल्या छंदात होतं.

जगभर भारत ज्या एका गोष्टीसाठी ओळखला जातो, ती म्हणजे ताजमहाल. इंडोनेशियामध्ये भटकंतीनिमित्त असताना, आशियातील काही देशांच्या दौऱ्यावर असणारं फ्रान्सचं एक कुटुंब भेटलं. त्यांच्याशी गप्पा मारताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली, ती म्हणजे या युरोपियन लोकांच्या आयुष्यात पर्यटनाचं स्थान मोठं आहे.

हे फ्रेंच दांपत्यसुद्धा पाच वर्षं पैसे साठवून प्रवासाची तयारी करत होतं. त्यांची ‘विशलिस्ट’ ज्याला ते ‘ड्रीम डेस्टिनेशन’ म्हणत होते, ती त्यांनी मला दाखवली. त्यात ताजमहाल पहिल्या नंबरला होता. ताजमहालाचं पहिलं दर्शन झालं, त्यावेळी ताजचं भव्य आणि सुंदर रूप बघून स्तब्ध झाल्याच्या त्यांचा अनुभव होता. हा अनुभव कदाचित जन्मभर त्यांच्या गाठीशी राहील.

ताजमहालासारखी आनंदाची अनुभूती देणारं ठिकाण प्रत्येकाच्या ‘विशलिस्ट’मध्ये असतंच. मग ते कदाचित गोव्याचे सुंदर समुद्रकिनारे असतील, हिमालयाच्या कुशीतलं केदारनाथ मंदिर असेल, केरळमधले चहाचे मळे असतील, महाराष्ट्रातील गड-किल्ले असतील किंवा काश्मीरचा दल लेक असेल.

पर्यटकाच्या भूमिकेत आपण एक-एक अनुभव वेचत, नवीन गोष्टी शिकत पुढं जात असतो. पर्यटन आपल्या ज्ञानात जाणते-अजाणतेपणी भर घालंत असतं. एखाद्या देशाची संस्कृती, वारसा, कला आणि इतिहास याबद्दलचं आपलं ऐकीव मत बदललं जातं. वेगवेगळे संदर्भ लक्षात येतात. गैरसमज दूर होतात. पर्यटन ही अशी एकमेव गोष्ट आहे, जिच्यात आपण दुसऱ्या संस्कृतीबरोबर एकरूप होतो.

तिच्यातील भिन्नता आपल्याला तिथल्या लोकांपासून दूर नेण्यापेक्षा त्यांच्याजवळ आणण्याचा प्रयत्न करते. कधीकधी ‘कल्चरल शॉक’ बसतो. यासाठी आपण कदाचित मनाची तयारी केलेली नसते. परंतु, हे अनुभव जास्त काळ लक्षात राहतात. तेहरानसारखं रूढीवादी शहर ते थेट पटायाची ‘वॉकिंग स्ट्रीट’ इमॅजिन करा; किंवा सौदीची राजधानी रियाध ते न्यूयॉर्कचा ‘टाइम्स स्क्वेअर’ इमॅजिन करा. आपण कल्पना केलेली नसते, इतक्या कॉन्ट्रास्ट गोष्टींनी हे जग भरलेलं आहे.

परदेशी लोक भारताला खंडप्राय देश म्हणतात. अर्थातच याला कारण म्हणजे, इथे असलेली प्रचंड विविधता. हे वैविध्य फक्त भाषा किंवा संस्कृतीपुरते मर्यादित नाही. एकाच देशात सुंदर समुद्रकिनारे आहेत. अफाट मोठ्या नद्या आहेत. प्रचंड मोठी जंगलं आहेत. जगाचा माथा असलेला हिमालयसुद्धा आहे आणि त्याचवेळी वाळवंटही आहे. कदाचित भारत फिरण्यासाठीच अनेक वर्षें पुरतील इतका मोठा ठेवा आपल्याकडं आहे.

आपल्याकडे परदेशी पाहुणे येतात आणि बऱ्याचदा वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी रेंगाळतात. त्या ठिकाणच्या प्रेमात पडतात. गोव्यात रशियन, हिमालयात इस्रायली, ऋषिकेश-वाराणसी-वृंदावनला युरोपियन लोकांनी ठिय्या मांडल्याचं आपल्या लक्षात येईल.

ऐतिहासिक ठिकाणांना भेट दिल्यावर तिथली स्मारकं इतिहास सांगत असतात आणि आपण श्रोते होऊन ऐकत असतो. प्राचीन, मध्ययुगीन, रेनेसाँ, आधुनिक हे इतिहासाचे विविध भाग जवळून समजून घेण्यासाठी पर्यटनाची मदत होते. मानवानं आजवर केलेला प्रवास झरकन डोळ्यासमोरून जातो. जगभरात पसरलेल्या वेगवेगळ्या सभ्यता, नगररचना यांचा उदय आणि अस्त कसा झाला याचा मागोवा घेता येतो.

जगातील सर्वांत मोठे हिंदू मंदिर अंगकोरवट भारताबाहेर कंबोडियामध्ये कसं काय, पिरॅमिड कसं बांधलं गेलं, दुसरे महायुद्ध कसं सुरू झालं, ग्रीकांनी भव्य मंदिरं कशी उभारली, ऑलिंपिकची सुरवात कशी झाली, लोकशाहीची सुरवात कशी झाली या सर्वांची उत्तरं आपल्याला त्या त्या ठिकाणी गेल्यावर मिळतात. प्राग, पॅरिस, रोमसारखी भव्य शहरं आपल्याला स्तिमित करतात, तर ऑश्ट्विचसारखी नाझी छळ छावण्यांचा इतिहास असलेली क्रूर ठिकाणं आपल्याला रडवतात.

नुकताच उझबेकिस्तान, कझाखस्तानच्या भेटीवर असताना कझाखस्तान बॉर्डरजवळ एक मराठी गृहस्थ सायकलवर भेटले. माझ्यासाठी ही थोडी आश्चर्याची गोष्ट होती. त्यामुळं आवर्जून त्यांची विचारपूस केली. सातारा जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील हे गृहस्थ होते. वयाच्या पन्नाशीपर्यंत त्यांनी फक्त शेती केली होती व जिल्ह्याच्या बाहेरही फारसे गेले नव्हते.

मुलांमुळं एकदा देशाबाहेर जाण्याचा योग आला आणि तेव्हापासून त्यांना पर्यटनाची इतकी गोडी लागली, की त्यांचे जवळपास ४० पेक्षा जास्त देश फिरून झाले आहेत. उझबेकिस्तान, कझाखस्तान, ताजिकिस्तान, किरगिझस्तान हे देश ते एकट्यानं सायकलवर फिरत होते. जाताना मला इतकंच म्हणाले, ‘मित्रा मला भटकंतीची सुरवात करायला खूप उशीर झाला.

निश्चितपणे हे आयुष्य मला जग फिरण्यासाठी पुरेसं पडणार नाही. वीस-पंचवीस वर्षांचा असतानाच एखादा मित्र भटकंती करणारा मिळाला असता, तर अजून चांगलं झालं असतं. आयुष्यात जेव्हा संधी मिळेल, तेव्हा फिरायला बाहेर पड. प्रत्येक देश वेगळा आहे. तिथली माणसं वेगळी आहेत. त्यांची संस्कृती वेगळी आहे प्रत्येक देश तुला वेगळा अनुभव देऊन जाईल.’’

भटकंतीनं मला अनुभवाची श्रीमंती दिली. जगातील सर्वांत गरीब देशात मनानं सर्वांत श्रीमंत असलेले लोक राहतात हे समजलं. प्रेमाच्या बदल्यात प्रेमच मिळतं हे समजलं. संवादासाठी भाषा कधीच अडसर ठरू शकत नाही, हे समजलं. जगातील सर्वांत आधुनिक देशात आणि जगातील सर्वांत मागास देशात स्थानिक लोक तितकेच आतिथ्यशील आणि दयाळू आहेत हे समजलं.

लोकांविषयी त्यांच्या देशांविषयी त्यांच्या रूढी, परंपरा, धर्म, इतिहास याविषयी आपल्या मनात किती गैरसमज होते, हे सुद्धा समजलं. टोकियोपासून तेहरानपर्यंत, दम्मामपासून दिल्लीपर्यंत, मेक्सिको सिटीपासून मनिलापर्यंत जग अतिशय वेगळं आहे. प्रत्येक देश वेगळा आहे, तिथले अनुभव वेगळे आहेत, हे लक्षात आलं. कुणीतरी म्हटलं आहेच ‘‘तुम्ही किती शिकलाय हे सांगू नका, तुम्ही किती फिरलाय ते सांगा.’

(लेखक जगभर भटकंती करत असतात. साहसी पर्यटनावर त्यांचा भर असतो.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.