प्रवासातलं राहण्याचं नियोजन

भटकंतीसाठी जगातील सर्वांत स्वस्त देशांमध्ये भारताचा समावेश होतो, म्हणजेच भारतात एकंदर फिरणं, राहणं आणि खाणं यांचा खर्च तुलनेने इतर देशांपेक्षा कमी आहे.
Travel accommodation planning
Travel accommodation planningsakal
Updated on

- मालोजीराव जगदाळे, jagdaleomkar5@gmail.com

भटकंतीसाठी जगातील सर्वांत स्वस्त देशांमध्ये भारताचा समावेश होतो, म्हणजेच भारतात एकंदर फिरणं, राहणं आणि खाणं यांचा खर्च तुलनेने इतर देशांपेक्षा कमी आहे. पर्यटकांच्या भाषेत आपला देश व्हॅल्यू फॉर मनी आहे. पर्यटनासाठी बाहेर पडल्यावर येणाऱ्या सर्वांत मोठ्या खर्चांमधला एक खर्च म्हणजे राहण्याचा खर्च.

लंडन, न्यूयॉर्क, सिंगापूर, हाँगकाँग, दुबई ही नावं डोळ्यांसमोर आली की, आपसूकच इथली महागडी हॉटेल्स आपण इमॅजिन करू लागतो. भारताबाहेर भटकंतीसाठी जाताना आपल्या मनातसुद्धा बऱ्याचदा असे विचार येतात की, इतर देशांमध्येसुद्धा राहण्याचा खर्च भारतात येतो तितकाच यावा. योग्य नियोजनाअभावी संपूर्ण दौऱ्याचं आर्थिक गणित यामुळे कोलमडू शकतं.

परदेशात जाताना दौऱ्याचं नियोजन करत असतो, त्या वेळी राहण्याचं ठिकाण मध्यवर्ती असावं असंच आपण निश्चित करतो. त्या शहरातील मुख्य आकर्षणं, बस स्टेशन, मेट्रो स्थानकं इत्यादी दळणवळणाची साधनं, शॉपिंगची ठिकाणं, उत्तमोत्तम रेस्टॉरंट अगदी जवळ असतील अशाच हॉटेलला आपण राहण्यास पसंती देतो.

साहजिकच जगभरातून पर्यटक अशा प्रसिद्ध पर्यटनस्थळी येत असतात, त्यामुळं अशा मध्यवर्ती भागातील हॉटेल्सना प्रचंड मागणी असते आणि त्यामुळं ती महागही असतात. मी अनेक देशांमध्ये भटकंती केली; पण माझ्या प्रवास खर्चापैकी राहण्याचा खर्च हा बऱ्यापैकी मला कमी ठेवता आला. हॉटेलच्या पलीकडं जाऊन होम स्टे, एअर बीएनबी, हॉस्टेल, सर्विस अपार्टमेंट यासुद्धा राहण्याच्या पर्यायांकडं वळलं पाहिजे.

काही गोष्टी प्रकर्षाने लक्षात आल्या की, पर्यटकांच्या मनात ठराविक ठिकाणं ठसवण्यात आली आहेत. पूर्वीपासून टूर कंपन्या आणि पर्यटक परदेशातील एखाद्या शहरात ज्या ठिकाणी राहतात, तिथंच नव्याने जाणारे पर्यटक राहण्यास पसंती देतात, हे वर्तन साहजिक असलं तरी बऱ्याचदा त्यामुळं तोटा होऊ शकतो.

सिंगापूरमधील लिटिल इंडिया, बँकॉकमधील इंद्रा मार्केट, दुबईमधील बरदुबई, बालीमध्ये कुटा, हो ची मिन्हमधील डिस्ट्रिक्ट एक ही काही प्रातिनिधिक उदाहरणं आहेत. या शहरांमधील नमूद केलेली ठिकाणं पर्यटकांना राहण्यासाठी प्रसिद्ध झाल्यानं काही काळातच प्रचंड महागही झाली. बालीमध्ये कुटाऐवजी २-३ किमी उत्तरेकडं अथवा दक्षिणेकडं सरकलात, तर राहण्याचे उत्कृष्ट ऑप्शन मिळून खर्च तब्बल निम्म्याने कमी येऊ शकतो. सेमनियाक, उलुवाटू, सानुर, उबुद हे कुटा भागाला पर्याय आहेत.

बँकॉकमध्ये प्रचंड गजबज असलेल्या इंद्रा मार्केटच्या भागात राहण्यापेक्षा सयाम, सिलोम, सुखुमवित या भागात राहणं एकदम उत्तम व किफायतशीर ठरेल. सिंगापूरला गेल्यावर पर्यटक साधारणतः लिटिल इंडिया या परिसरात राहणं पसंत करतात; परंतु चायना टाउनचा भागसुद्धा मध्यवर्ती आहे. दुबईमधील बरदुबई हा जास्तीत जास्त भारतीयांची लोकवस्ती असलेला भाग आहे, त्यामुळं भारतीय पर्यटकांना आपलासा वाटतो; परंतु दुबईचा अत्याधुनिक चेहरा बघायचा असेल, तर दुबई डाउनटाउन किंवा मरिना भागात आवर्जून राहायला हवं.

मी केलेला बहुतांश प्रवास हा एकट्याने म्हणजेच सोलो पद्धतीने केलेला होता, त्यामुळं सोलो प्रवासावेळी मी आंतरराष्ट्रीय होस्टेल मुक्कामासाठी निवडलं. मी राहिलेलो सर्वांत महाग होस्टेल ९५० रुपये प्रतिदिन होतं, तर सर्वांत स्वस्त २०० रुपये प्रतिदिन. इथं संपूर्ण रूम न घेता डॉर्मेटरीमधील फक्त एक बेड आपण घेऊ शकतो. बेडसोबत मोफत इंटरनेट, किचन, २४ तास चहा-कॉफी, सामान ठेवण्यासाठी लॉकर्स, लॉन्ड्री यांसारख्या सुविधा इथं मिळतात.

वेगवेगळ्या देशांतून आलेल्या समवयीन, समविचारी पर्यटकांशी इथं भेटीगाठी, ओळखी होतात. शहरातील मुख्य आकर्षणाच्या अतिशय अल्प किमतीत गाइडेड टूर्ससुद्धा होस्टेलतर्फे आयोजित केल्या जातात. होस्टेलच्या कॉमनरूममध्ये त्या शहराचे नकाशे, पर्यटनस्थळांची माहितीपर पत्रकं, पर्यटकांना अल्प दरात मिळणाऱ्या सुविधा ही माहिती उपलब्ध असते. शहराच्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी ही होस्टेल्स असल्यामुळं प्रवासासाठी लागणारा अधिकचा वेळ व खर्च वाचतो.

मलेशियाची राजधानी कुआलालंपूर इथं केएल सेंट्रल या मेट्रो व बसच्या मुख्य स्थानकासमोरच्याच होस्टेलमध्ये मुक्काम केल्याने २ दिवसांतच संपूर्ण शहर फिरता आलं. बालीमध्ये कुटा बीचलगत होस्टेल होतं आणि त्यांच्या स्वतःच्या स्कूटर बाइक होत्या, त्यामुळं कुणावर अवलंबून न राहता संपूर्ण बालीचा सहज फेरफटका मारता आला. हाँगकाँगमध्ये तर ज्या बिल्डिंगमध्ये होस्टेल होतं, त्याच्याच बेसमेंटला मेट्रो स्थानक होतं. इंडोनेशियामध्ये मलांग नावाच्या एकदम अनोळखी शहरामध्ये राहिलो होतो; परंतु तिथल्या होस्टेलनेच पिकअप, ड्रॉप व स्थानिक टूरची सुविधा दिल्याने मोठा प्रश्न मिटला.

नेपाळची राजधानी काठमांडूमधल्या थामेल भागातील प्रसिद्ध होस्टेलमध्ये राहिलात, तर ४-५ दिवसांत किमान डझनभर तरी एव्हरेस्टवीरांना भेटू शकाल, इतक्या मोठ्या प्रमाणावर गिर्यारोहकांची उठबस इथं असते. कंबोडियामधील आमचं होस्टेल अंगकोरवट मंदिर समूहाजवळच होतं. मंदिर प्रवेशासाठी तिकीट पहाटे ४ वाजता काढावं लागतं. अक्षरशः आम्हाला झोपेतून उठवून तिकीट ऑफिसपर्यंत नेण्याचे सोपस्कार त्यांनी पार पाडले.

भारतातसुद्धा आता हे हॉस्टेलचं कल्चर रुळू लागलं आहे. हिमाचल, उत्तराखंड, राजस्थान, केरळ इथल्या सगळ्या मुख्य पर्यटनस्थळी आता अशा सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. जगभरातील सर्व होस्टेलची यादी आणि त्यांचं बुकिंग तुम्हाला होस्टेलवर्ल्ड वेबसाइटच्या माध्यमातून करता येईल. इतर ठिकाणी बुकिंग करावं लागतं तसं आगाऊ संपूर्ण रक्कम न देता फक्त १०% भरून होस्टेल बुक करता येतं. तब्बल १८० देशांमध्ये ते सुविधा देतात.

सोलो पद्धतीने प्रवास न करता मित्रांसोबत किंवा फॅमिलीसोबत प्रवास करणाऱ्यांसाठी सर्विस अपार्टमेंट, होम स्टे आणि एअरबीएनबीसारखे इतर पर्याय उपलब्ध आहेत. युरोपमध्ये बहुतांश ठिकाणी हॉटेल्स अतिशय महाग असल्याने एअरबीएनबी हा लोकप्रिय पर्याय ठरू लागला आहे. अगदी दोन लोकांना सामावून घेईल अशा छोट्या रूमपासून ते अगदी पन्नास लोकांना राहता येईल अशा व्हिलापर्यंतचे ऑप्शन्स एअरबीएनबीवर मिळतात.

सर्विस अपार्टमेंट ही सुविधा पूर्वी फक्त कॉर्पोरेटजगतापुरती मर्यादित होती; परंतु आता पर्यटन क्षेत्रात याची मागणी वाढली आहे. काही आठवड्यांपासून ते काही महिन्यांपर्यंतच्या मोठ्या सुट्ट्यांसाठी स्वयंपाकी, हाउसकीपर यांच्यासह संपूर्ण घर किंवा अपार्टमेंट भाड्याने घेता येतं. होम स्टे प्रकारात एखाद्या राहत्या घरातील एक खोली आपल्याला मिळते, यामुळं त्या घराचे मालकच आपल्या खाण्यापिण्याची आणि फिरण्याची जबाबदारी घेतात.

युरोप व दक्षिण अमेरिकेमध्ये होम स्टे प्रकार प्रसिद्ध होत असून, अनेकांचं रोजचं जीवनमान, त्या ठिकाणाचं स्थानिकांच्या नजरेतून दर्शन आपल्याला घडतं. नवीन भाषा, नवीन संस्कृती यांची जवळून ओळख आपल्याला होते. अगदी जवळच्या नातेवाइकासारखी आपली काळजी घेतल्याने कधीकधी कायमचे ऋणानुबंध जुळतात. भारतातसुद्धा नॉर्थ ईस्ट, हिमाचल, उत्तराखंड या पर्वतीय भागात होम स्टे सर्रास आढळतात.

चांगलं हवामान आणि कमी गर्दीचा सीझन लक्षात घेऊन जर नियोजन केलं, तर अतिशय उत्तम हॉटेल्स कमी दरात बुक करता येतात. सोमवार ते गुरुवारदरम्यान हॉटेलचे प्रतिदिन जे दर असतात, त्याहून ५० टक्के अधिक दर साहजिकच मागणी जास्त असल्याने शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी असतात. बऱ्याच हॉटेल बुकिंग वेबसाइटवर बुधवारी व शनिवारी रात्री बुकिंग केल्यास मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट दिले जातात.

काही हॉटेलच्या आंतरराष्ट्रीय चेन्स असतात, जर तुम्ही नियमितपणे या हॉटेल्समध्ये राहत असाल, तर लॉयल्टी प्रोग्रामद्वारे तुम्हाला पॉइंट्स दिले जातात, जे जमा होऊन त्यांच्या जगभरातील हॉटेल्समध्ये वापरता येतात. तुमच्या पुढील प्रवासाला जाताना हॉटेल्सबरोबरच वर दिलेल्या इतर पर्यायांचासुद्धा आवर्जून विचार करा. एकंदरच राहण्याचं सुयोग्य नियोजन यशस्वी पर्यटनाची गुरुकिल्ली आहे.

(लेखक जगभर भटंकती करत असून, साहसी पर्यटनावर त्यांचा भर आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.