भटकंतीचं आर्थिक नियोजन

परदेशातल्या पर्यटनाचं, अर्थातच प्रवासाचं नियोजन करताना आर्थिक गणित योग्य पद्धतीने केलेलं असेल, तर भटकंती अतिशय सुखकर होते.
Foreign Tour
Foreign TourSakal
Updated on

- मालोजीराव जगदाळे, jagdaleomkar5@gmail.com

परदेशातल्या पर्यटनाचं, अर्थातच प्रवासाचं नियोजन करताना आर्थिक गणित योग्य पद्धतीने केलेलं असेल, तर भटकंती अतिशय सुखकर होते. फ्लाइट, व्हिसा, राहण्याचा, फिरण्याचा, खाण्याचा खर्च, परदेशी चलन, शॉपिंग हे प्रवास खर्चाचे महत्त्वाचे घटक आहेत. या सगळ्याची योग्य सांगड घालता यायला हवी.

आपल्या विशलिस्टमध्ये असलेल्या देशाचा प्रवास यशस्वीपणे पार पाडण्यासाठी काही महिन्यांची पूर्वतयारी आवश्यक आहे. संपूर्ण गंगाजळी एकाच सहलीला ओतण्यापेक्षा योग्य नियोजनाद्वारे वीस टक्क्यांपासून ते अगदी दुपटीने खर्चात बचत होऊ शकते. बचत झालेले पैसे पुढच्या एखाद्या सहलीसाठी किंवा शॉपिंगसाठी वापरता येतात.

बरेच जण पहिल्याच परदेश प्रवासासाठी अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया असे तुलनेनं अवघड व्हिसा प्रोसेस असलेले देश निवडतात. कागदपत्रं गोळा करताना प्रचंड दमछाक होते. व्हिसा व सर्व्हिस फीचा खर्च जास्त येतो आणि बऱ्याचदा व्हिसा नाकारला गेल्यानं मोठा मनस्तापसुद्धा पदरी पडतो.

तुम्ही पहिल्यांदा परदेश प्रवास करत असाल, तर देशांची निवड करताना भारतासाठी व्हिसा फ्री देश, व्हिसा ऑन अरायव्हल देश, व्हिसा उपलब्ध असलेले देश, सोपा पेपर व्हिसा देणारे देश आणि शेवटी थोडी किचकट व्हिसा प्रक्रिया असणारे देश या क्रमानं निवड करावी.

उदाहरणादाखल भूतान, नेपाळ, मालदीव, मॉरीशियस, कझाकिस्तान हे व्हिसा फ्री देश असून, या देशांना भेट दिल्यास व्हिसासाठी कोणताही खर्च येत नाही; तर थायलंड, इंडोनेशिया, श्रीलंका, मलेशिया या देशांमधील महत्त्वाच्या एअरपोर्टवर व एंट्री पॉइंटवर अत्यल्प किमतीमध्ये व्हिसा उपलब्ध असतो, ज्याला व्हिसा ऑन अरायव्हल म्हणतात.

अमेरिकन व्हिसा जगातील सर्वांत ताकदवान व्हिसा समजला जातो, हा व्हिसा जर आपल्याकडे असेल, तर भारतीय नागरिकांना आणखी ४० ते ५० देशांचे दरवाजे उघडले जातात. उदाहरणार्थ - अमेरिकन व्हिसा असणाऱ्या भारतीयांना दुबई (यूएई)मध्ये व्हिसाशिवाय येता येतं व पोचल्यावर केवळ २३०० रुपयांत तेथील व्हिसा दिला जातो.

आपण ज्या देशात जाणार आहोत तेथील चलन कॅश, फॉरेक्स कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यापैकी नक्की कोणत्या प्रकारात न्यावं याची योग्य माहिती पर्यटकांना बऱ्याचदा नसते. अधिकचा एक्स्चेंज रेट, तसंच बँकांकडून लावली जाणारी अव्वाच्या सव्वा मार्कअप फी यामुळे ट्रीप संपल्यावर हिशेब करताना मोठा आर्थिक फटका बसल्याचं आपल्या लक्षात येतं.

स्वतःकडे असलेलं क्रेडिट किंवा डेबिट कार्ड परदेशात वापरणं शक्यतो टाळावं. परदेशी चलनात अमेरिकन डॉलर हा राजा असल्याने भारतातून जाताना डॉलरमध्ये पैसे घेऊन जावेत व त्या देशात गेल्यावर तेथील चलन डॉलरच्या बदल्यात घ्यावं.

आज अनेक देशांमध्ये डॉलरच्या तुलनेत तेथील चलनाचं मोठ्या प्रमाणावर अवमूल्यन होत आहे, त्या पार्श्वभूमीवर डॉलरच्या बदल्यात मोठ्या प्रमाणावर स्थानिक चलन फॉरेक्स एक्स्चेंजमध्ये मिळत असल्यानं मोठा फायदा यामुळे होतो.

आफ्रिकन देश, तुर्की आणि श्रीलंका ही याची ताजी उदाहरणं आहेत. मी स्वतः अमेरिकन डॉलर आणि फोरेक्स कार्ड अशा दोन्ही गोष्टी जवळ बाळगतो. एअरपोर्ट लाउंज सुविधा, अत्यल्प मार्क अप फी, टॅप अँड पे यामुळे फॉरेक्स कार्डचासुद्धा मला चांगला अनुभव आहे.

फ्लाइट बुक करताना किमान दोन ते तीन महिन्याअगोदर बुकिंग केल्यास खर्चामध्ये ५० टक्क्यांपर्यंत बचत होते. अनेक विमान कंपन्या त्यांच्या तिकिटांचा फ्लॅश सेल करतात. याचा अर्थ जवळपास एक-दोन वर्ष अगोदरच ते फ्लाइट तिकिटं विकतात. तुम्ही जर एक वर्षानंतर सहलीचं नियोजन करत असाल, तर चालू दरापेक्षा दुप्पट तिप्पट स्वस्त तिकिटं या माध्यमातून मिळू शकतील.

तसंच एखादी एअरलाइन नवीन मार्गावर जर सेवा सुरू करत असेल, तर सुरुवातीचे काही महिने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अतिशय कमी दरांमध्ये तिकीट विक्री करते. बऱ्याच एअरलाइन्स जाण्या-येण्याचं जर तिकीट काढलं, तर मोठी सूट देतात.

गेल्या काही वर्षांत अल्ट्रा लो कॉस्ट पद्धतीच्या एअरलाइन्सचा उदय झाला आहे, ज्यामध्ये अक्षरशः अविश्वसनीय दरामध्ये तिकिटं मिळतात. काही वेळा नॉन स्टॉप गन्तव्यस्थानी जाणाऱ्या विमानापेक्षा एखाद दुसरा थांबा घेऊन जाणाऱ्या विमानाची तिकिटं बऱ्यापैकी स्वस्त मिळतात. अशावेळी जर आपल्याकडे रिकामा वेळ हाती असेल, तर हा ऑप्शन निवडायला हरकत नाही.

परदेशात पोचल्यावर त्या देशांतर्गत प्रवासासाठी रेल्वे, बस, मेट्रो, टॅक्सी, बोट इत्यादी साधनं उपलब्ध असतात. मेट्रोची सेवा जगभरात सर्वसाधारणपणे परवडणाऱ्या किमतीमध्ये असते; परंतु रेल्वे आणि टॅक्सीबद्दल असं नाही.

पूर्व युरोपच्या तुलनेत पश्चिम युरोपमध्ये टॅक्सीसेवा बऱ्यापैकी महाग आहे, तसंच बहुतांश तेल उत्पादक देशांमध्ये टॅक्सीसेवा अफाट स्वस्त असते. युरोपियन रेल्वेसेवा काहीशा महाग आहेत, त्यामुळे बऱ्याचदा पर्यटक दोन देशांना जोडणाऱ्या फ्लिक्सबस या बससेवेचा वापर करताना दिसतात.

आपल्या लांब पल्ल्याच्या स्वस्त आणि किफायतशीर सेवेमुळे कझाकिस्तान, रशिया, इजिप्त, व्हिएतनाम या देशांतील रेल्वे प्रसिद्ध आहेत, तर काही देशांमध्ये सेल्फ ड्राइव्ह पद्धतीची कार घेऊन फिरणं जास्त सोयीचं ठरतं.

जगातील बहुतांश देशात बाइक्स भाड्यानं मिळत असल्यानं शहरांतर्गत अथवा शहरालगत असणारी स्थळं बघण्यासाठी या सोयीच्या ठरतात. काही देशांत वाहन चालवण्यासाठी आंतरराष्ट्रीय परवाना (आयडीपी) गरजेचा आहे, जवळच्या आरटीओ ऑफिसमध्ये हा उपलब्ध असतो.

या आधीच्या काही लेखांमध्ये राहण्याच्या सोयी आणि परदेशात कुठे काय खावं याबद्दल लिहिलं आहे, त्यामुळे इथं त्याबद्दल जास्त काही लिहिणार नाही. परदेशात स्थानिक खाद्यपदार्थ आणि भारतीय खाद्यपदार्थ यांच्या किमतींमध्ये काही पटींची तफावत असते. भारतीय उपखंडातील आणि लगतचे देश अर्थातच याला अपवाद आहेत.

देशोदेशीचे प्रसिद्ध असलेले पदार्थ आवर्जून चाखावेत, या मताचा मी आहे. हॉटेल बुक करताना अनेक वेबसाइट्सवरील दर पडताळून बुकिंग करावं, बऱ्याच बुकिंग कंपन्या कोटा (quota) पद्धतीनं काम करतात, त्यामुळे कमी-जास्त दर या वेबसाइटवर दिसतात.

मनसोक्त भटकंती झाल्यावर प्रवासाचे शेवटचे एक-दोन दिवस खरेदीसाठी राखीव असतातच. कुठे काय खरेदी करावं याची जर इत्थंभूत माहिती असेल, तर या खरेदीला चारचाँद लागतात. दुबई, सिंगापूरमध्ये भारताच्या तुलनेनं बऱ्यापैकी स्वस्तात मोबाईल फोन व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळतात.

बँकॉक इथं एमबीके स्क्वेअर नावाचं एकापाठोपाठ एक आठ शॉपिंग मॉल्स असलेलं ठिकाण आहे, तर चाटूचाक मार्केट या नावाचं तब्बल आठ हजार दुकानं असलेलं शॉपिंग कॉम्प्लेक्ससुद्धा आहे.

बाली हँडीक्राफ्टसाठी प्रसिद्ध आहे. पर्यटकांनी गजबजलेल्या ठिकाणी खरेदी करण्यापेक्षा स्थानिक लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या जागांना भेटी देऊन तिथं खरेदी करावी. ज्या वस्तू भारतात सहज आणि स्वस्त उपलब्ध आहेत, त्या घेणं टाळावं.

जसं प्रत्येक ठिकाणी आपल्याला चांगले लोक भेटतात आणि त्यांच्या आदरातिथ्यामुळे कायमच लक्षात राहतात, तसंच काही वेळा पर्यटकांना कटू अनुभवांनासुद्धा सामोरं जावं लागतं. काही ठिकाणं पर्यटकांसोबत गैरवर्तणुकीसाठी, फसवणुकीसाठी कुप्रसिद्ध आहेत. इंटरनेटवर पर्यटनस्थळांवर होणाऱ्या विविध स्कॅमची माहिती सहज उपलब्ध आहे. त्यामुळे पर्यटकांनी योग्य ती काळजी घेऊन डोळस भटकंती करावी.

प्राचीन इमारती, वारसास्थळं, संग्रहालयं, बगीचे, थीम पार्क इत्यादी आकर्षणांचं आगाऊ बुकिंग आता ऑनलाइन पद्धतीने करता येतं. ऑनलाइन आरक्षण केलं की, तिकीट बऱ्याचदा स्वस्त असतं. ज्यामुळे पैशांची बचत होतेच, त्याशिवाय प्रचंड गर्दीच्या दिवशी जाऊनसुद्धा लाइनला थांबून तिकीट घेणं, तिकीट उपलब्ध नसणं इत्यादी मनस्ताप होत नाहीत.

परदेशात अघटित घटना घडणं जसं की, लहान-मोठा अपघात, सामान चोरी होणं, काही कारणानं फ्लाइट मिस होणं अशा बाबींमुळे मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते, त्यावर उपाय म्हणून सर्वोत्तम असा, सगळ्याच गोष्टी कव्हर करेल असा ट्रॅव्हल इन्शुरन्स काढणं मस्ट आहे.

सरते शेवटी संपूर्ण सहल पूर्ण झाल्यावर पर्यटक भारतात पोहोचतात तेव्हा एअरपोर्टवर कस्टम तपासणी दरम्यान देशात प्रतिबंधित असणाऱ्या गोष्टी सापडतात आणि मोठा आर्थिक दंड ठोठावल्याचे अनेक प्रसंग रोज घडतात. हे टाळण्यासाठी परदेशात जाताना व भारतात परत येताना गोष्टी बाळगण्यासंदर्भात काय काय नियम आहेत याचा अभ्यास जरूर करावा. प्रत्येक देशाच्या कस्टम विभागाच्या वेबसाइटवर याची माहिती उपलब्ध असते.

जगातील प्रत्येक देश वेगळा आहे. प्रत्येक देशाला भाषा, खाद्यसंस्कृती, वारसास्थळं, पर्यटनस्थळं, इतिहास, पर्वत, समुद्रकिनारे वेगवेगळे लाभलेले आहेत. आचार-विचार, लोकसंस्कृती, आदरातिथ्य करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे निश्चितपणे एखाद्या देशाचा प्रवास पूर्ण झाला की, दुसरा देश आपल्याला खुणावत असतो. जास्तीत जास्त देश फिरण्यासाठी श्रीमंत असण्याची गरज नाही, केवळ भटकंतीचं आर्थिक नियोजन चांगलं असेल, तरी हे शक्य आहे.

(लेखक जगभर भटकंती करत असून, साहसी पर्यटनावर त्यांचा भर आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.