समरकंद-बुखारा : मध्ययुगीन जागतिक व्यापारीकेंद्रे

उझबेकिस्तानच्या प्रवासातील ताश्कंदचा टप्पा पूर्ण करून आम्ही समरकंदच्या दिशेनं रवाना झालो.
Bukhara City
Bukhara CitySakal
Updated on

- मालोजीराव जगदाळे, jagdaleomkar5@gmail.com

उझबेकिस्तानच्या प्रवासातील ताश्कंदचा टप्पा पूर्ण करून आम्ही समरकंदच्या दिशेनं रवाना झालो. ताश्कंदमध्ये आम्हाला अनेक युरोपीय व अमेरिकी बॅकपॅकर तरुण-तरुणी भेटल्या. हे सर्वजण पुढं किर्गिझस्तान किंवा कझाकिस्तानला जाणार होते.

ताश्कंदपासून कझाकिस्तानची सीमा अवघी २० किलोमीटरवर आहे, तसंच भारतासह अनेक देशांना कझाकिस्तानला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही. किर्गिझस्तानची राजधानी बिश्केकला जाणाऱ्या बसेसही ताश्कंदहून उपलब्ध आहेत.आम्ही मात्र इथल्या अतिवेगवान अशा अफ्रोसियाब रेल्वेनं अवघ्या दोन तासांत समरकंदला पोहोचलो.

bukhara old bazar
bukhara old bazarsakal

समरकंद हे शहर ताश्कंदपेक्षा लहान असल्यानं इथं फिरणं सोपं आहे. ताश्कंदप्रमाणे इथं मेट्रो जरी नसली तरी टॅक्सी स्वस्त आहे. ‘यांडेक्स’ या ॲपचा वापर केल्यास ओला-उबेरप्रमाणे टॅक्सीसेवा उपलब्ध असते. कोणत्याही ठिकाणाहून कुठंही जाण्यासाठी ७० ते ८० रुपयांपेक्षा जास्त खर्च येत नाही.

स्थानिक चलन उझबेकिस्तानी सोम हे असून एक लाख सोम म्हणजे साधारणतः ७०० भारतीय रुपये असा हिशेब आहे. समरकंद हे शहर बराच काळ तिमुरीद या साम्राज्याच्या राजधानीचं शहर होतं, त्यामुळे संबंधित इतिहास सांगणारी अनेक स्मारकं व ऐतिहासिक इमारती इथं आहेत. यातील सर्वात महत्त्वाची तीन ठिकाण म्हणजे ‘रेगिस्तान स्क्वेअर’, ‘शाह-ए-जिंदा’ नावाचा स्मारकसमूह आणि तैमूरलंगची कबर.

समरकंदमध्ये राहण्यासाठी हॉटेलचे अथवा गेस्ट हाऊसचे पर्याय उपलब्ध आहेत, ‘रेगिस्तान स्क्वेअर’पासून अगदी चालत जाण्याच्या अंतरावर असलेलं ठिकाण राहण्यासाठी निवडावं; जेणेकरून इतर सर्व ऐतिहासिक स्थळं याच अंतराच्या आवाक्यात राहतील. ‘रेगिस्तान स्क्वेअर’ म्हणजे अनेक ऐतिहासिक वास्तूंचा समूह असून त्या काळी तिमुरीद शासकांच्या दरबाराचं हे ठिकाण होतं.

इथल्या वास्तू अतिशय देखण्या असून त्या बघताना ताजमहालची आठवण आल्याशिवाय राहत नाही. संध्याकाळच्या वेळी अतिशय आकर्षक अशी विद्युत्-रोषणाई या ठिकाणी केली जाते. इसवीसन १४२० ते १६६० च्या दरम्यान इथल्या वास्तूंचं बांधकाम झालेलं असून मुख्य तीन वास्तू ‘उलुघबेग मदरसा’, ‘तिला कोरी मदरसा’, आणि ‘शेरदोर मदरसा’ या नावानं ओळखल्या जातात.

registhan square in samarkand
registhan square in samarkandsakal

पूर्वीच्या काळी मदरशांचा वापर आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसारखा होत असे. त्यात इतिहास, भूगोल, खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, शेती इत्यादी विषय शिकवले जात. नंतरच्या काळात त्यांचा वापर फक्त धार्मिक शिक्षणासाठी होऊ लागला.

‘रेगिस्तान स्क्वेअर’पासून साधारणतः दोन किलोमीटरवर एका छोट्या टेकडीवर असलेलं ‘शाह-ए-जिंदा’ हे स्थळ म्हणजे तिमुरीद राजघराण्यातल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ बांधल्या गेलेल्या जवळपास वीस स्मारकांचा समूह आहे.

इथल्या इमारतींचं बांधकाम अतिशय आखीव-रेखीव आहे, अप्रतिम स्थापत्यशैलीमुळे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर ‘ही जागा एकदम इन्स्टाग्रामेबल आहे!’ ही सर्व स्मारकं अकराव्या ते पंधराव्या शतकादरम्यान बांधली गेलेली आहेत. याव्यतिरिक्त तैमूरलंगाचा नातू उलुघबेग - हा गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होता - यानं बांधलेली वेधशाळा बघण्यासारखी आहे.

समरकंदचा दौरा पूर्ण करून आम्ही बुखारामध्ये पोचलो. ‘सिल्क रोड व्यापारीमार्गा’वरचं केवळ उझबेकिस्तानमधीलच नव्हे तर, संपूर्ण आशियातील सर्वात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे बुखारा. या शहराला ‘ ‘सिल्क रोड’ची राजधानी’ असं म्हटलं जात असे.

shah-e-jinda in samarkand
shah-e-jinda in samarkandsakal

बुखारा हे मध्य आशियातील सांस्कृतिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सर्वात संपन्न शहर म्हणून ओळखलं गेल्यानं जगातील अनेक ताकदवान शासकांना याची भुरळ पडली. मंगोल, सफाविद, मुघल यांच्यासह अगदी मराठ्यांनासुद्धा या शहराचं आकर्षण होतं.

मध्ययुगीन कवी भूषण यानं छत्रपती शिवाजीमहाराज यांचे नातू छत्रपती शाहूमहाराज यांची प्रशंसा करताना लिहिलेल्या काव्यात ‘शाहूमहाराजांची कीर्ती बुखारापर्यंत पोहोचली आहे,’ असा उल्लेख केलेला आहे. तो उल्लेख असा आहे - ‘बलख बुखारे मुलतान लौं हहर पारै काबुल पुकारे कोऊ गहत न सार है। रुम रुँदी डारै खुरासान खुँदी मारैं खग्ग खादर लौं झारे ऐसी साहू की बहार है।’

पूर्वीच्या काळी चीनमधून आणि भारतातून रेशीम, मसाले व इतर वस्तूंचा व्यापार युरोप-आफ्रिकेतील अनेक राष्ट्रांशी होत असे; परंतु हे सामान विकणाऱ्या आणि हे सामान खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना युरोपातून, आफ्रिकेतून भारतात जाणं आणि भारतातील व्यापाऱ्यांना युरोपातील अथवा आफ्रिकेतील बाजारपेठेत जाणं ही अत्यंत वेळखाऊ प्रक्रिया होती. अशा वेळी व्यापाराच्या सोईसाठी बुखारा हे मध्यवर्ती ठिकाण ठरलं, जिथं खरेदी आणि विक्री करणारे जगभरातील व्यापारी एकमेकांना भेटू शकत.

हे शहर जवळपास अडीच हजार वर्षं जुनं असून चंगेझखानानं आक्रमण करून याचा मोठा भाग नष्ट केला होता. आता उभं असलेलं बुखारा हे शहरसुद्धा सहाशे ते एक हजार वर्षं जुनं आहे. दोन किलोमीटरच्या परिघात हे संपूर्ण शहर जसंच्या तसं जतन करून ठेवलेलं असल्यानं इथं फिरताना, आपण त्याच काळात आहोत, असा भास होत राहतो.

पूर्वापार जो व्यापार इथं चालत असेल ती व्यापाराची ठिकाणं ‘टोकी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. या घुमटाकृती वास्तू म्हणजे व्यापारीपेठा असून सराफाटोकी (सोन्या-चांदीचे व चलनाचे व्यवहार), किताबटोकी (पुस्तके), फुरसोनटोकी (गालिचे, कपडे, लाकडी वस्तू) होत. या ठिकाणी अजूनही ही दुकानं सुरू आहेत.

या संपूर्ण परिसरातील सर्वच वास्तू जुन्या असल्यानं संपूर्ण परिसर व्यवस्थित बघण्यासाठी तीन-चार दिवस तरी हवेत.

मुक्कामासाठी इथल्या जुन्या इमारतींत काही हॉटेल्स आहेत त्यांचा विचार पर्यटकांनी करावा. आम्हीसुद्धा तिथंच राहिलो, त्यामुळे सगळा परिसर आम्हाला पायी पायी फिरता आला. या जुन्या भागात वाहनांना तशीही पूर्णपणे बंदीच आहे; पण पर्यटकांच्या सोईसाठी भाड्यानं इलेक्ट्रिक बाईक, सायकल व लहान रिक्षा इत्यादी वाहनं उपलब्ध असतात.

अकराव्या शतकातील कुतुबमिनारसारखा उंच असा ‘कलोन मिनार’ ही इथली सर्वात देखणी वास्तू आहे. याच्या शेजारी ‘कलोन मास्क’ आणि आशियातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा असा ‘मीर-ए-अरब मदरसा’ आहे. ‘बुखारा ओल्ड टाऊन’ किंवा या जुन्या शहराचं ‘लाबी हौज’ हे पाण्याचा मोठा हौद असलेलं मध्यवर्ती ठिकाण आहे.

चहूबाजूंनी ऐतिहासिक देखण्या वास्तूंनी हे ठिकाण नटलेलं आहे. इथं तासन् तास वेळ घालवता येईल इतका सुंदर हा परिसर असून, तो पर्यटकांनी सतत गजबजलेला असतो. पूर्वीच्या काळी मोठ्या प्रमाणावर व्यापारीतांडे या शहरात येत असत; त्यामुळे त्यांच्या मुक्कामासाठी अनेक कारवाँ-सराया (हॉटेल्स) बांधण्यात आलेल्या होत्या. वीस-पंचवीस सरायांपैकी आता फक्त दोन-तीन शिल्लक आहेत; परंतु त्या आवर्जून बघण्यासारख्या आहेत.

इथला जुना बुखारा किल्ला व त्याच्या प्रचंड बुरजांचे अवशेष आज ‘आर्क ऑफ बुखारा’ या नावानं प्रसिद्ध आहेत. बुखारामध्ये आवर्जून बघण्यासारख्या २५ ते ३० ऐतिहासिक इमारती आहेत.

उझबेकिस्तानमधील प्रत्येक शहर वेगळ्या धाटणीचं आहे. स्थानिक इतिहास आणि लोकांचा प्रभाव इथल्या शहरांवर आहे. उदाहरणार्थ : ताश्कंदमध्ये मोठ्या प्रमाणावर रशियन भाषाच बोलली जाते, तर शेजारील फरगाणा आणि समरकंदमध्ये उझबेक भाषेचा आणि उझबेक संस्कृतीचा जास्त प्रभाव आहे. बुखारामध्ये मात्र स्थानिक पर्शियन (ताजिक) भाषा जास्त प्रमाणात बोलली जाते.

इथं रशियन मोठ्या प्रमाणावर असल्यानं हा संपूर्ण मुस्लिम देश असूनसुद्धा देशातील ९० टक्के लोक धार्मिक नाहीत; त्यामुळे पाश्चिमात्य आणि रशियन प्रभाव इथल्या युवा पिढीवर आणि संस्कृतीवर बघायला मिळतो. इथला काही प्रदेश शीत वाळवंटाचा असल्यानं हिवाळ्यात इथं येणं टाळावं; कारण, त्या वेळी इथलं तापमान उणे २० अंशांपर्यंत खाली जातं.

उझबेकिस्तानची भटकंती ताश्कंद, समरकंद, बुखारा अशी सात-आठ दिवसांची होऊ शकते अथवा त्यात अरल समुद्र, खिवा, फरगाणा या ठिकाणांचा समावेश करून दहा-बारा दिवसांचाही दौरा आखता येऊ शकतो. शेजारील देश कझाकिस्तानलाही भेट द्यायची असल्यास आणखी चार-पाच दिवस वाढवता येतील.

(लेखक हे जगभर भटकंती करतात. साहसी पर्यटनावर त्यांचा भर असतो)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.